प्रोटेस्टंट विश्वासात प्रचलित सर्वात खोटा सिद्धांत कोणता आहे?
28/10/2025
धर्मसुधारणा आजही का महत्त्वाची आहे?
04/11/2025
प्रोटेस्टंट विश्वासात प्रचलित सर्वात खोटा सिद्धांत कोणता आहे?
28/10/2025
धर्मसुधारणा आजही का महत्त्वाची आहे?
04/11/2025

प्रोटेस्टंट धर्मसुधारणा का आवश्यक होती?

ख्रिस्ती मंडळीला नेहमीच धर्मसुधारणेची गरज असते. अगदी नव्या करारातही आपण पाहतो की येशू पेत्राला फटकारतो, आणि पौल करिंथकरांच्या सिद्धांतातील दोष दाखवून त्यांचे मार्गदर्शन करतो. ख्रिस्ती लोक हे देहरित्या पापी-स्वभावाचे असल्यामुळे, मंडळीला सदैव धर्मसुधारणेचीच गरज राहील. तथापि, आपल्यासाठी प्रश्न असा आहे की ही गरज नेमक्या कोणत्या क्षणी अत्यंत तातडीची ठरते?

16व्या शतकातील महान धर्मसुधारकांनी असा निष्कर्ष काढला की त्यांच्या काळात धर्मसुधारणा तातडीची आणि आवश्यक होती. मंडळीमध्ये धर्मसुधारणा पुढे नेताना त्यांनी दोन टोकांच्या भूमिकांना नाकारले. एका बाजूला, “मंडळी मुळात ही स्वस्थ आहे; तिच्यात कोणतेही मूलभूत बदल करण्याची गरज नाही,” असा आग्रह धरणाऱ्यांना त्यांनी नकार दिला. तर दुसरीकडे, “आपण सर्व बाबतीत परिपूर्ण अशी मंडळी उभी करू शकतो असे मानणाऱ्यांनाही त्यांनी नाकारले. मंडळीला मूलभूत सुधारणा आवश्यक होतीच, परंतु तिला स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करत राहण्याचीही गरज होती. पवित्र शास्त्राच्या अभ्यासातूनच धर्मसुधारक या निष्कर्षांपर्यंत पोहोचले.

1543 मध्ये स्ट्रासबुर्गचे सुधारक मार्टिन बुसेर यांनी  जॉन कॅल्विन यांना विनंती केली की त्यांनी धर्मसुधारणेचे समर्थन करणारा एक बचावात्मक ग्रंथ लिहावा, जो सम्राट चार्ल्स पाचवा यांना 1544 मध्ये स्पेयर येथे भरविण्यात येणाऱ्या सम्राटीय परिषदेत सादर करता येईल. रोमन कॅथलिक सम्राटाच्या सभोवती असे सल्लागार होते जे मंडळीतल्या सुधारणेच्या प्रयत्नांना बदनाम करीत होते, हे बुसेर यांना ठाऊक होते; आणि प्रोटेस्टंट भूमिकेचे प्रभावी समर्थन करण्यास कॅल्विन सर्वांत समर्थ सेवक आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास होता. 

कॅल्विन यांनी हे आव्हान स्वीकारले आणि आपली श्रेष्ठ अशी एक कृती—“द नेसेसिटी ऑफ रिफॉर्मिंग द चर्च”—लिहिली. हा ग्रंथ जरी सम्राटाचे मन वळवण्यात यशस्वी झाला नसला, तरीही अनेकांच्या मते प्रोटेस्टंट रिफॉर्म्ड चळवळीचे मांडणीकरण करणारे हे सर्वात प्रभावी बचावपत्रक मानले गेले आहे.

कॅल्विन यांनी अशी नोंद करून सुरुवात केली की मंडळीत “असंख्य आणि गंभीर व्याधी” आहेत, यावर सर्वांचे एकमत होते. त्यांनी युक्तिवाद केला की परिस्थिती इतकी गंभीर होती, की ख्रिस्ती लोकांना सुधारणेसाठी “अधिक विलंब” सहन करणे किंवा “मंदगती उपायांची” वाट पाहणे शक्य नव्हते. धर्मसुधारकांवर “उद्धट व अधार्मिक नवकल्पनाविष्कार” केल्याचा आरोप त्यांनी नाकारला; उलट, “आपल्या धर्माचे सत्य” जपण्यासाठी “देवाने ल्यूथर आणि इतरांना उभे केले,” असे ते ठामपणे म्हणतात. ख्रिस्ती धर्माची पायाभरणी धोक्यात आली आहे आणि केवळ पवित्र शास्त्रातील सत्यच मंडळीचे नूतनीकरण करू शकते, हे कॅल्विन यांनी ओळखले.

कॅल्विन मंडळीच्या जीवनातील ज्या चार प्रमुख क्षेत्रांना सुधारणा आवश्यक होती, त्याकडे लक्ष देतात. या क्षेत्रांना ते मंडळीचे “आत्मा” आणि “शरीर” असे संबोधतात. मंडळीचा आत्मा म्हणजे “देवाची शुद्ध व विधिसंगत उपासना” आणि “मनुष्यांचे तारण”; तर मंडळीचे शरीर म्हणजे “पवित्र विधींचा उपयोग” आणि “मंडळीचे व्यवस्था-शासन.” कॅल्विन यांच्या मते हेच विषय धर्मसुधारणेतील वादांच्या केंद्रस्थानी होते. हे मंडळीच्या जीवनाला अत्यावश्यक असून, त्यांचे योग्य आकलन फक्त पवित्र शास्त्राच्या शिकवणीच्या प्रकाशातच होऊ शकते.

कॅल्विन यांनी उपासनेला धर्मसुधारणेतील पहिला मुद्दा मानले, हे आपल्याला आश्चर्यकारक वाटू शकते; परंतु तो त्यांच्या विचारातील सातत्यपूर्ण धागा होता. यापूर्वी त्यांनी कार्डिनल साडोलेतो यांना लिहिले होते: “देवाची विपर्यासपूर्ण व विकृत उपासना आपल्या तारणासाठी याहून घातक दुसरे काही नाही.” उपासना ही देवाशी भेट होण्याची जागा आहे, आणि ती भेट देवाने घालून दिलेल्या निकषांनुसारच घडली पाहिजे. आपली उपासना खरेच देवाच्या वचनाला अधिकार मानते व त्याच्या अधीन राहते का—हे ती दाखवते. मनुष्यनिर्मित उपासना ही एकीकडे कर्माधिष्ठित नीतिमत्वाची वृत्ती तर दुसरीकडे मूर्तिपूजेचा आविष्कार आहे.

यानंतर कॅल्विन त्या विषयाकडे वळतात, ज्याला आपण अनेकदा धर्मसुधारणेतील सर्वोच्च मुद्दा मानतो—म्हणजे नीतिमान ठरविले जाणे (justification).

आम्ही असे प्रतिपादन करतो की मनुष्याची कृत्ये कोणत्याही प्रकारची असली तरी, तो केवळ देवाच्या विनामूल्य कृपेमुळेच देवापुढे नीतिमान ठरविला जातो; कारण देव, कृत्यांचा काडीमात्र विचार न करता, ख्रिस्तामध्ये त्याला मुक्तपणे दत्तक घेतो—ख्रिस्ताचे नीतिमत्व त्या व्यक्तीच्या खात्यावर जणू त्याचेच आहे असे गणतो. यालाच आम्ही “विश्वासाचे नीतिमत्व” म्हणतो: म्हणजे, जेव्हा मनुष्य आपल्या कृत्यांवरील सर्व आत्मविश्वास शून्य करून खातरी बाळगतो की देवाकडून स्वीकारला जाण्याचा एकमेव आधारस्तंभ म्हणजे असे नीतिमत्व, जे त्याच्या स्वतःकडे नाही, तर जे ख्रिस्ताकडून मिळते. ज्या ठिकाणी जग नेहमीच चुकते (कारण ही चूक जवळपास प्रत्येक युगात प्रचलित आहे),  ते म्हणजे—मनुष्य अंशतः दोषपूर्ण असला तरी, कृत्यांमुळे काही अंशी तरी देवकृपेचा पात्र होतो, असा समज. 

मंडळीचा “आत्मा” घडविणाऱ्या या पायाभूत बाबींना “शरीर” म्हणजेच पवित्र विधी आणि मंडळीचे शासन यांचा आधार असतो. पवित्र विधींना पवित्र शास्त्राने दिलेल्या त्यांच्या शुद्ध, साध्या अर्थाकडे आणि उपयोगाकडे परत आणले पाहिजे. आणि मंडळीच्या शासनात देवाच्या वचनाच्या विरुद्ध जाऊन ख्रिस्ती लोकांच्या अंतःकरणांना जखडून ठेवणाऱ्या कोणत्याही जुलूमशाहीचा विरोध केला पाहिजे.

आपल्या काळातील मंडळींकडे पाहता, कॅल्विन ज्यांच्याविषयी चिंतित होते अशा अनेक क्षेत्रांत धर्मसुधारणेची गरज आहे—खरंच, आवश्यकच—असा निष्कर्ष काढावा लागतो. अखेरीस, मंडळीमध्ये खरी सुधारणा देवाच्या वचनाने आणि देवाच्या आत्म्यानेच होऊ शकते. म्हणूनच अशी सुधारणा आपल्या काळात घडून यावी, यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रार्थना करावी आणि विश्वासूपणे कष्ट करावेत.

हा लेख मुळात टेबलटॉक  या मासिकात प्रकाशित झाला होता.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्रे
डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्रे
डॉ. डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्री हे लिगोनियर संस्थेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत, तसेच वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्नियामधील चर्च इतिहासाचे अध्यक्ष एमेरिटस आणि प्राध्यापक एमेरिटस आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये सेविंग द रेफार्मेशन आणि लर्निंग टू लव साम्स यांचा समावेश आहे.