प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळ संपुष्टात आली का?
14/10/2025
जॉन कॅल्विन यांनी “चर्चमध्ये धर्मसुधारणा करण्याची निकडीची गरज” यावर मांडलेले विचार
15/10/2025
प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळ संपुष्टात आली का?
14/10/2025
जॉन कॅल्विन यांनी “चर्चमध्ये धर्मसुधारणा करण्याची निकडीची गरज” यावर मांडलेले विचार
15/10/2025

सुव्यवस्थित ईश्वरशास्त्राचे मूळ स्त्रोत

सुव्यवस्थित ईश्वरशास्त्राचे मूळ स्त्रोत बायबल आहे. खरेतर, बायबल हे बायबलनिष्ठ ईश्वरशास्त्र, ऐतिहासिक ईश्वरशास्त्र आणि सुव्यवस्थित ईश्वरशास्त्र या तीनही ईश्वरशास्त्र शाखांसाठी प्राथमिक स्रोत आहे.

बायबलनिष्ठ ईश्वरशास्त्र

बायबलनिष्ठ ईश्वरशास्त्राचे कार्य म्हणजे काळाच्या ओघात पवित्र शास्त्रातील सत्याचा क्रमशः उलगडा कसा होतो, याचे निरीक्षण करणे; आणि हे कार्य सुव्यवस्थित ईश्वरशास्त्रज्ञासाठी स्रोत म्हणून कार्य करते. एक बायबल-पारंगत अभ्यासक बायबल वाचतो आणि जुन्या व नवीन करारातील संज्ञा, संकल्पना व विषयांचा क्रमिक विकास कसा होतो याची पडताळणी करतो, जेणेकरून वचनाच्या प्रकटीकरणाच्या इतिहासात त्या संज्ञांचा कसा उपयोग झाला व त्यांचा निष्कर्ष कशा प्रकारे काढण्यात आला, हे तो समजू शकतो. 

आजच्या ईश्वरशास्त्र महाविद्यालयांमध्ये एक समस्या “अणुवादी खंडित दृष्टिकोन” म्हटलेल्या बायबलनिष्ठ ईश्वरशास्त्राच्या पद्धतीमध्ये आहे, ज्यानुसार पवित्र शास्त्रातील प्रत्येक “अणु” अद्वितीय, म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असलेला आहे. एखादा अभ्यासक स्वतःला फक्त गलातीकरांस पत्रातील पौलाच्या तारणविषयक शिकवणीपुरता मर्यादित ठेवतो, तर दुसरा फक्त इफिसकरांस पत्रातील तारणविषयक शिकवणीवर लक्ष केंद्रित करतो. परिणामी, दोघेही तारणविषयी दोन वेगवेगळ्या निष्कर्षावर येऊन दृष्टिकोन सादर करतात, म्हणजे एक शास्त्रज्ञ गलातीकरांस पत्रातून, तर दुसरा शास्त्रज्ञ इफिसकरांस पत्रातून, पण हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकांशी कसे सुसंगत आहेत, हे तपासण्यात ते अपयशी ठरतात. ही कल्पना या गृहितकावर आधारलेली असते की, पौलाने जेव्हा गलातीकरांस व इफिसकरांस पत्रे लिहिली, तेव्हा तो देवाच्या प्रेरणेने प्रेरित नव्हता; त्यामुळे देवाच्या वचनामध्ये कोणतीही व्यापक एकरूपता किंवा सुसंगती नाही. अलीकडच्या काळात तर ईश्वरशास्त्रज्ञ असेही सांगताना दिसतात की, ‘पूर्वकालीन’ पौल व ‘उत्तरकालीन’ पौल यांच्या विचारांमध्ये केवळ फरकच नाही, तर बायबलमध्ये जितके लेखक आहेत, तितकी वेगवेगळी ईश्वरशास्त्रे आहेत असे प्रतिपादित होते. पेत्राचे, योहानाचे, पौलाचे व लूकाचे ईश्वरशास्त्र हे एकमेकांशी विसंगत आहेत, असे मानले जाते. हा नक्कीच पवित्र शास्त्राच्या सुसंगतीबाबत एक नकारात्मक दृष्टीकोन आहे. जेव्हा कोणी पवित्र शास्त्राच्या एखाद्या केवळ संकुचित भागाचा अभ्यास करतो आणि एकाच वेळी संपूर्ण बायबलच्या प्रकटीकरणाचा विचार करत नाही, तेव्हा अशा प्रकारचे चुकीचे निष्कर्ष उद्भवतात. 

ऐतिहासिक ईश्वरशास्त्र

दुसरी शाखा, जी सुव्यवस्थित ईश्वरशास्त्रासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्रोत आहे, ती म्हणजे ऐतिहासिक ईश्वरशास्त्र. ऐतिहासिक ईश्वरशास्त्रज्ञ हे पाहतात की मंडळीच्या इतिहासात, विशेषतः अशा संकटाच्या प्रसंगी जेव्हा खोट्या सुवार्ता आणि पाखंडी मते उदयास आले आणि मंडळीने त्या पाखंडी विचारांचा निषेधपूर्वक प्रतिकार केला, तेव्हा धर्मसिद्धांत कसे विकसित झाले. आज जेव्हा मंडळीमध्ये किंवा ईश्वरशास्त्र महाविद्यालयांमध्ये तथाकथित नवीन वाद उद्भवतात, तेव्हा अनेक ईश्वरशास्त्रज्ञ खिन्न होतात, कारण मंडळीने भूतकाळात वेळोवेळी हे नवनवीन ईश्वरशास्त्रीय वाद अनुभवले आहेत. इतिहासात अशा वादांचा निपटारा करण्यासाठी मंडळीने विविध महासभा बोलावल्या, जसे नायसिया महासभा (सन 325) आणि चाल्सेडोन महासभा (सन 451). या घटनांचा अभ्यास करणे हे ऐतिहासिक ईश्वरशास्त्रज्ञांचे प्रमुख संशोधनकार्य असते. 

सुव्यवस्थित ईश्वरशास्त्र

तिसरी शाखा म्हणजे सुव्यवस्थित ईश्वरशास्त्र. सुव्यवस्थित ईश्वरशास्त्रज्ञाचे कार्य हे बायबलमधील माहितीच्या स्रोतांचा, पाखंडी मतवादांमधून आणि मंडळीच्या महासभांमधून उद्भवलेल्या ऐतिहासिक विकासांचा, व त्यातून निर्माण झालेल्या मतांगीकार व धर्ममतांचा तसेच शतकानुशतकांत देवाने मंडळीला दिलेल्या महान विचारवंतांच्या अंतर्दृष्टीचा एकत्र अभ्यास करणे हे आहे. नवीन करार आपल्याला सांगतो की देवाने आपल्या कृपेने चर्चला शिक्षक दिले आहेत (इफिसकरांस 4:11–12). सर्वच शिक्षक ऑगस्टिन, मार्टिन ल्यूथर, जॉन कॅल्विन किंवा जोनाथन एडवर्ड्स यांच्याइतके कुशाग्र बुद्धीचे नसतात. अशा महान पुरुषांना प्रेषितसत्तेचा अधिकार नसला, तरी त्यांचे संशोधन, त्यांची तात्त्विक खोली आणि त्यांच्या अंतर्दृष्टीची व्याप्ती, प्रत्येक युगात मंडळीसाठी अमूल्य ठरलेली आहे. थॉमस अक्विनास यांना रोमन कॅथलिक चर्चकडून “डॉक्टर एन्जेलिकस” किंवा “दैवी वैद्य” असे संबोधले गेले. रोमन कॅथलिक चर्चचा असा दावा नाही की अक्विनास 100 टक्के अचूक किंवा निर्भ्रांत होते, पण कोणताही रोमन कॅथलिक इतिहासकार वा ईश्वरशास्त्रज्ञ त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करीत नाही.  

सुव्यवस्थित ईश्वरशास्त्रज्ञ हा केवळ बायबल, चर्चचे धर्ममत व मतांगीकार एवढ्यापुरता मर्यादित राहत नाही, तर देवाने ऐतिहासिक कालखंडांमध्ये मंडळीला दिलेल्या प्रमुख शिक्षकांची अंतर्दृष्टी याचाही तो अभ्यास करतो. सुव्यवस्थित ईश्वरशास्त्रज्ञ हा बायबलनिष्ठ, ऐतिहासिक आणि सुव्यवस्थित अशा सर्व स्तरांवरील माहितीचा तपशीलवार आणि अचूक अभ्यास करून तिचे सुसंगत एकत्रीकरण करतो.

हा अंश ‘एव्हरीवन’ज अ थिओलॉजियन ‘ या आर. सी. स्प्रौल यांच्या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आर. सी. स्प्रौल
आर. सी. स्प्रौल
डॉ. आर. सी. स्प्रौल हे लिगोनियर मिनिस्ट्रीज या संस्थेचे संस्थापक होते. ते सेंट अँड्र्यूज चॅपे, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील प्रथम उपदेशक आणि शिक्षक होते. ते रिफॉर्मेशन बायबल कॉलेजचे पहिले अध्यक्ष होते आणि टेबलटॉक मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा रिन्यूइंग युवर माइंड हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ स्टेशनवर दररोज प्रसारित केला जातो आणि ऑनलाइनही ऐकता येतो. त्यांनी द होलीनेस ऑफ गॉड, चोजन बाय गॉड, आणि एव्हरीवन्स अ थिओलॉजियन या सह शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. डॉ. स्प्रौल यांना संपूर्ण जगभर देवाचे वचन अचूक आणि त्रुटीरहित आहे या सत्याचे प्रभावी आणि स्पष्ट समर्थन करणारे म्हणून ओळखले जाते. देवाच्या लोकांनी त्याच्या वचनावर ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे — या गोष्टीवर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भर दिला.