
देव जर सार्वभौम अधिपती आहे, तर मनुष्य स्वतंत्र इच्छा असलेला कसा असू शकतो?
14/10/2025
सुव्यवस्थित ईश्वरशास्त्राचे मूळ स्त्रोत
15/10/2025प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळ संपुष्टात आली का?
या विषयावर, अशा लोकांकडून, ज्यांना मी “माजी इव्हॅंजेलिकल” म्हणतो, अनेक विश्लेषणात्मक निरीक्षणे मांडण्यात आलेली आहेत. त्यांपैकी एकाने लिहिले, “सोळाव्या शतकाचा विचार करता, नीतिमान ठरविले जाण्याच्या मुद्यावर लूथर यांचा युक्तिवाद खरा आणि योग्यच होता, परंतु आता या विषयावर कुठलीही शंका राहिलेली नाही.” एका पत्रकार परिषदेत, ज्यात मी स्वतः उपस्थित होतो, एका अन्य व्यक्तीने, जो स्वतःला इव्हॅंजेलिकल म्हणवतो, अशी टिप्पणी केली की, “फक्त विश्वासाने नीतिमान ठरविले जाण्यावरील धर्मसुधारणेचा वाद म्हणजे केवळ एका छोट्या भांड्यात उठलेले वादळ, म्हणजे डोंगरावरचा उंदीर होते.” आणखी एका प्रसिद्ध युरोपीय देवशास्त्रज्ञाने आपल्या लेखनात असा युक्तिवाद केला आहे की, फक्त विश्वासाने नीतिमान ठरविले जाण्याचा सिद्धांत हा आता मंडळीसाठी कोणताही महत्त्वाचा विषय राहिलेला नाही. आज आपल्या समोर एक असा लोक-समूह उभा आहे जो स्वतःला प्रोटेस्टंट तर म्हणवतो, परंतु ज्याला मुळात ते कशाचा विरोध करीत आहेत याचाच पूर्णपणे विसर पडला आहे.
केवळ विश्वासाने नीतिमान ठरविले जाण्याच्या सिद्धांताच्या महत्त्वाविषयी प्रस्तुत करण्यात आलेल्या या समकालीन मूल्यांकनांच्या उलट आपण सोळाव्या शतकातील प्रतिष्ठित धर्मसुधारकांनी मांडलेला एक भिन्न दृष्टिकोन पाहतो. मार्टिन लुथरने एक अजरामर वक्तव्य केले होते, की फक्त विश्वासाने नीतिमान ठरविले जाण्याचा सिद्धांत हा मंडळीच्या अस्तित्वाचा आधारस्तंभ आहे, ज्यावर तिचं स्थैर्य टिकून राहते, किंवा कोसळते. जॉन कॅल्व्हिन यांनी एक वेगळे रूपक वापरून म्हटले की नीतिमान ठरविले जाणे ही संपूर्ण देवशास्त्रीय चौकटीची मुख्य कवळी आहे, जिच्याभोवती सत्याचे सर्व अवयव टिकून राहतात. विसाव्या शतकात, जे. आय. पॅकरने एक अतिशय प्रभावी रूपक वापरून म्हटले की फक्त विश्वासाने नीतिमान ठरविले जाणे हा ‘ॲटलास’ आहे, ज्याच्या खांद्यावर इतर सर्व देवशास्त्रीय तत्त्वे उभी राहतात. तथापि, नंतर पॅकरने त्या मजबूत रूपकापासून माघार घेतली आणि ‘केवळ विश्वासाने नीतिमान ठरणे ही ‘सुवार्तेची बारीक अक्षरे’ आहेत’ असे म्हणत एक खूप कमकुवत रूपक वापरले.
या विषयावर होत असलेल्या सर्व चर्चा लक्षात घेता, आपल्याला ज्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे तो म्हणजे हा की, सोळाव्या शतकापासून आजच्या काळापर्यंत काय बदलले आहे? याचे उत्तर देताना एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी देखील आहे. चांगली बातमी म्हणजे, देवशास्त्रीय मतभेदांबाबत लोक अधिक सभ्य आणि सहिष्णू झाले आहेत. आता मतभेदांमुळे कोणाला जिवंत जाळले जात नाही किंवा खांबावर लटकवले जात नाही. आपण गेल्या काही वर्षांत हेही पाहिले आहे की रोमन कॅथलिक संप्रदाय ख्रिस्ती पारंपरिक शिकवणीच्या इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर, उदाहरणार्थ, ख्रिस्ताचे देवत्व, त्याचे प्रतिनिधिक प्रायश्चित्त, आणि पवित्र शास्त्राची प्रेरणा, स्थिरतेने ठाम राहिला आहे, तर अनेक प्रोटेस्टंट उदारमतवादींनी या विशिष्ट शिकवणींचा पूर्णपणे त्याग केला आहे. आपण हेही पाहतो की गर्भपात व नैतिक सापेक्षतावाद यांसारख्या गंभीर नैतिक प्रश्नांवरही रोमने आपली भूमिका ठामपणे मांडून ती टिकवून ठेवलेली आहे. एकोणिसाव्या शतकात झालेल्या व्हॅटिकन कौन्सिल I मध्ये, रोमन कॅथलिक मंडळीने प्रोटेस्टंट लोकांना “पाखंडी आणि फुटीरवादी” असे संबोधले. परंतु विसाव्या शतकातील व्हॅटिकन II परिषदेत प्रोटेस्टंट लोकांना “वेगळे झालेले बंधू” असे संबोधले गेले. या दोन कौन्सिल्सच्या स्वरात एक लक्षणीय विरोधाभास आपल्याला दिसतो.
परंतु वाईट बातमी अशी आहे की, ज्या अनेक शिकवणींमुळे पूर्वी ऑर्थोडॉक्स प्रोटेस्टंट व रोमन कॅथोलिक यांच्यात मोठे सैद्धांतिक विभाजन निर्माण झाले होते, त्याच शिकवणी सोळाव्या शतकानंतर अधिकृतपणे “घोषित सिद्धांत” किंवा “अनिवार्य तत्त्व” म्हणून घोषित झाल्या आहेत. मरियेच्या उपासनेशी संबंधित जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण धर्म-सिद्धांत मागील 150 वर्षांमध्ये आज्ञा म्हणून स्पष्टपणे घोषित करण्यात आले आहेत. पोपच्या अचूकतेचा सिद्धांत (papal infallibility)—जरी प्रत्यक्ष व्यवहारात खूप पूर्वीपासून तो मानला जात असला, तरी—1870 साली व्हॅटिकन कौन्सिल I मध्ये औपचारिक परिभाषेच्या स्वरूपात स्पष्ट करण्यात आला आणि ‘de fide’ (म्हणजे तारणासाठी विश्वास ठेवणे आवश्यक आहे) म्हणून घोषित करण्यात आला. अलीकडील वर्षांत आपण पाहतो की, रोमन संप्रदायाने एक नवीन कॅथलिक धर्मशास्त्र प्रकाशित केले आहे, ज्यामध्ये ट्रेंट कौन्सिलच्या शिकवणींची ठामपणे पुनःपुष्टी करण्यात आली आहे—ज्यात नीतिमान ठरविले जाण्याच्या शिकवणीची ट्रेंटने दिलेली व्याख्याही समाविष्ट आहे (आणि त्यामुळे, विश्वासाद्वारे नीतिमत्व प्राप्त होते या धर्म-सुधारित शिकवणीविरुद्ध ट्रेंटने उच्चारलेल्या शापांचाही पुनःसंकेत होतो). ट्रेंटच्या या पुनःपुष्टीकरणासोबतच, “पर्गेटरी” (purgatory), “इंडल्जन्सेस” (indulgences), आणि “ट्रेझरी ऑफ मेरिट्स” या रोमन कॅथलिक संकल्पनांचेही स्पष्टपणे पुनःदृढीकरण करण्यात आले आहे.
केवळ विश्वासाने नीतिमान ठरवले जाण्याच्या शिकवणीचे आजही तितकेच महत्त्व आहे का, यासंदर्भात काही प्रमुख देवशास्त्रज्ञांच्या चर्चेत मायकेल हॉर्टन यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला : “गेल्या काही दशकांमध्ये असे काय घडले की ज्यामुळे पहिल्या शतकातील सुवार्ता महत्त्वहीन बनली आहे?” नीतिमान ठरविले जाण्याविषयीचा हा वाद काही देवशास्त्रीय तांत्रिक मुद्द्यापुरता मर्यादित नव्हता की जो पवित्र शास्त्रातील सत्यांमध्ये कमी महत्त्वाचा मानून दुर्लक्षित करता येईल. ना तो ‘फुरसतीतली भांडणं’ यासारखा किरकोळ मुद्दा होता. हे वादळ सर्व प्रकारच्या सीमारेषा ओलांडून गेले होते. “माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?” हा प्रश्न, देवाच्या क्रोधाच्या समोर उभा असलेल्या कोणत्याही मनुष्याच्या दृष्टीने, अजूनही अत्यंत निर्णायक प्रश्न आहे.
या प्रश्नापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे त्याचे उत्तर, कारण हे उत्तर सुवार्तेच्या सत्याच्या थेट मर्माशी संबंधित आहे. अंतिम विश्लेषणात, ट्रेंट परिषदेपासून आजपर्यंत रोमन कॅथलिक चर्चने असा दावा केला आहे आणि अजूनही करतो की एखाद्या व्यक्तीस देव नीतिमान किंवा दुष्ट ठरवतो त्याचा आधार त्या व्यक्तीच्या “अंतर्निहित नीतिमत्वा”त आढळतो. जर एखाद्या व्यक्तीमध्ये हे अंतर्निहित नीतिमत्व नसेल, तर ती व्यक्ती किमान पातळीवर तरी नरकात जाते; आणि जर तिच्या जीवनात काही अशुद्धता उरलेली असेल, तर ती पर्गेटरीत पाठवली जाते — अशा ठिकाणी जिथे ती शिक्षा लाखो वर्षांपर्यंत भोगावी लागू शकते. या दृष्टिकोनाच्या ठळक विरोधात, बायबलनिष्ठ आणि प्रोटेस्टंट दृष्टिकोन असा शिकवतो की नीतिमान ठरवले जाण्याचा एकमेव आधार म्हणजे ख्रिस्ताचे नीतिमत्व, जे विश्वासणाऱ्याच्या खात्यात गणले जाते. त्यामुळे, ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीमध्ये ख्रिस्तावर खरी श्रद्धा निर्माण होते, त्या क्षणी ख्रिस्ताचे नीतिमत्व त्याचे गणले गेल्यामुळे तारणासाठी आवश्यक सर्व काही त्या व्यक्तीचे होऊन जाते.
मूळ प्रश्न असा आहे: मला नीतिमान ठरवले जाते त्याचा आधार माझे स्वतःचे नीतिमत्व आहे का? की, मार्टिन लुथरने म्हटल्याप्रमाणे, ते एक “परकीय नीतिमत्व” आहे, म्हणजेच, माझ्याबाहेरील, कोणा दुसऱ्याचे — म्हणजेच ख्रिस्ताचे नीतिमत्व? सोळाव्या शतकापासून आजपर्यंत रोमने नेहमी शिकवले आहे की नीतिमान ठरणे हे विश्वासावर, ख्रिस्तावर आणि कृपेवर आधारित असते. मात्र, फरक एवढाच की रोम अजूनही नाकारतो की नीतिमान ठरणे फक्त ख्रिस्तामुळे, फक्त विश्वासाद्वारे, आणि फक्त कृपेने होते.
या दोन दृष्टिकोनांमधील अंतर म्हणजे तारण आणि तारणरहित स्थिती यामधील अंतर होय. जो कोणी देवाच्या नीतिमत्वापासून दुरावलेला आहे, त्याच्या दृष्टिकोनातून पाहता, याहून अधिक गंभीर प्रश्न असूच शकत नाही.ज्या क्षणी रोमन कॅथलिक चर्चने “फक्त विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाणे” या बायबलसिद्ध तत्त्वज्ञानाचा निषेध केला, त्या क्षणीच तिने सुवार्तेचाच निषेध केला आहे, आणि ख्रिस्ती धर्मसिद्धांतातील इतर सर्व बाबी तिने मान्य केल्या असल्या तरी, ती एक वैध मंडळी राहिलेली नाही. ज्याअर्थी ती बायबलमधील तारण्याच्या सिद्धांताला नाकारते, त्याअर्थी तिला एक खरी व प्रामाणिक मंडळी मानणे हा घातक भ्रम आहे. आपण अशा काळात राहत आहोत, जेथे धर्मशास्त्रीय संघर्ष करणे हे ‘राजकीय दृष्ट्या अयोग्य’ मानले जाते. पण जेथे खरी शांती नाही तेथे ‘शांती, शांती’ चा घोष देणे म्हणजे सुवार्तेच्या मध्यवर्ती सत्याशी व मर्माशी विश्वासघात करणे होय.
हा लेख मूळतः ‘टेबलटॉक’ (Tabletalk) मासिकात प्रकाशित झाला होता.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


