
मी निराशेचा सामना कसा करावा?
23/04/2026पापाची कबुली म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही एखाद्या धर्मसुधारित मंडळीच्या उपासना सभेत सहभागी होता, त्यावेळी पाळक तुम्हाला पापाची कबुली देण्यास प्रवृत्त करू शकतात. त्यापूर्वी ते देवाचे नियमशास्त्र वाचू शकतात, आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पापक्षमेसाठी प्रार्थना करू शकतात, किंवा क्षमेची घोषणा करू शकतात. पापाच्या या कबुलीचा अर्थ काय आहे? या प्रथेचा उगम कुठे आहे? आणि तुम्ही यात अधिक विश्वासाने कसे सहभागी होऊ शकता?
पापाच्या कबुलीचा अर्थ
1 योहान 1:9 सांगते, “जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून तो आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करील.” येथे ‘पदरी घेणे’ यासाठी योहान जो शब्द वापरतो, त्याचा अर्थ “त्याच्यासारखेच बोलणे” असा होतो. आपल्या पापांची कबुली देणे म्हणजे पवित्र शास्त्राप्रमाणे परमेश्वर आपल्या पापाचे जे वर्णन करतो, त्याशी आपण सहमत होणे होय.
सार्वजनिक उपासनेत पापाची कबुली देण्याचा एक निश्चित वेळ असतो. त्या वेळेस पाळक ख्रिस्ताचे शरीर म्हणजे मंडळीला तिच्या पापांची कबुली देण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यानंतर ते प्रार्थना करतात की विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना ख्रिस्तामध्ये पुरविलेली परमेश्वराची दया प्राप्त व्हावी.
पापाच्या कबुलीचा उगम
जुन्या करारातील निवासमंडप आणि मंदिरात परमेश्वराने अशी आज्ञा दिली होती की अंगणाचे द्वार पूर्वेकडे असावे (निर्गम 27:13). ही दिशा निवडली गेली, कारण आदाम आणि हव्वा पापात पडल्यानंतर त्यांना एदेन बागेतून पूर्वेकडे घालवून दिले गेले होते (उत्पत्ति 3:24). हे द्वार इस्राएलला देवाकडे परत येण्यासाठीचे एक कृपापूर्ण आवाहन होते.
उपासक आत शिरताच त्यांना दिसणारी पहिली वस्तू म्हणजे यज्ञवेदी. प्रवेश केल्यावर उपासक थांबत, अर्पण करावयाच्या पशूवर आपले हात ठेवत, आणि याजक पवित्र देवाला ते अर्पण करीत असताना ते आपल्या पापांची कबुली देत. ही प्रथा त्यांना आठवण करून देत असे की “रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.” (इब्री 9:22; लेवीय 17:11 देखील पहा).
इब्री 9:10–22 या अर्पणांचा उल्लेख करून हे दाखवते की त्या अर्पिलेल्या पशूंमध्ये खऱ्या अर्थाने शुद्ध करण्याचे कुठलेही सामर्थ्य नव्हते. त्याबरोबर तुलना केली असता, आपण असे वाचतो: “तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील? (इब्री 9:14).
देवाकडे येताना ख्रिस्ताच्या रक्ताची ही गरज प्रतिबिंबित व्हावी म्हणून, अनेक धर्मसुधारित उपासना पद्धतींमध्ये पापाची कबुली सार्वजनिक उपासनेच्या प्रारंभीच ठेवली जाते. जिनिव्हा आणि स्ट्रासबर्ग येथील स्विस मंडळ्यांत जॉन कॅल्विन यांनी उपासनेचा प्रारंभ या आवाहनाने करवून घेतला:
आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हांला साहाय्य मिळते. (स्तोत्रसंहिता 124:8)
यानंतर सार्वजनिक पापाची कबुली दिली जात असे. कॅल्विन यांनी म्हटल्याप्रमाणे,
खरोखर, सर्व सुव्यवस्थित मंडळीत, एका उपयुक्त प्रथेचे पालन करताना, पाळक प्रत्येक प्रभूच्या दिवशी स्वतःच्या नावाने आणि लोकांच्या नावाने पापकबुलीचे एक सूत्र तयार करतात; त्यामध्ये ते अधर्माची सामूहिक कबुली देतात, आणि प्रभूकडे क्षमेसाठी विनवणी करतात. (इन्स्टिट्यूट 3.4.11)
कॅल्विन आणि इतरांच्या प्रभावामुळे ही पद्धत पसरत गेली. वेस्टमिन्स्टर डिरेक्टरी ऑफ पब्लिक वर्शिपमध्ये असे म्हटले आहे की उपासनेची सुरुवात “परमेश्वराची अगाध थोरवी व महात्म्य मान्य करून, (ज्याच्या सान्निध्यात ते त्या वेळी विशेष रीतीने उभे असतात,) आणि त्याच्या इतक्या जवळ जाण्यासाठी स्वतःची नीचता व अपात्रता कबूल करून” झाली पाहिजे. त्यानंतर त्या डिरेक्टरीमध्ये पापाची कबुली कोणकोणत्या विविध रीतींनी द्यावी, याचे ठोस वर्णन केले आहे. आध्यात्मिक वारसदार म्हणून, ही धर्मसुधारित पद्धत आपल्यापर्यंत पोहोचली आहे.
पापाच्या कबुलीचा सराव
आपल्या पापाची अधिक विश्वासाने कबुली देण्यासाठी पुढील 3 उपयोजन विचारात घ्या.
1. आपल्या पापाची भीषणता मान्य करा.
अनेकदा आपण केवळ पापाच्या कृत्याचा विचार करतो; परंतु त्याहून अधिक गंभीर बाब ही आहे की आपण कोणाविरुद्ध पाप केले आहे.
समजा, मी काढलेल्या चित्रावर तुम्ही गमतीशीर मिशा काढल्या, तर तो अपराध किरकोळ ठरेल. का? कारण मी काही फारसा पारंगत चित्रकार नाही. पण जर तुम्ही लूव्रमध्ये जाऊन दा विंचीच्या मोना लिसावर तशाच मिशा काढण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही मोठ्या संकटात सापडाल. कारण त्या एकाच कृत्याचे परिणाम तिथे अधिक गंभीर ठरतील, कारण तुम्ही एका उत्कृष्ट कलाकृतीचा अपमान केलेला असेल.
त्याचप्रमाणे, सर्व सृष्टीच्या स्वामीविरुद्ध पाप करणे ही एक गंभीर बाब आहे. जेव्हा दावीदाने बथशेबाशी व्यभिचार केल्याबद्दल आणि तिच्या पतीची हत्या केल्याबद्दल, म्हणजे देवाच्या प्रतिरूपात निर्माण झालेल्या दोन व्यक्तींविषयी घडलेल्या त्या पापाबद्दल, कबुली दिली, तेव्हा तो म्हणाला, “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे” (स्तोत्रसंहिता 51:4).
2. आपल्या पापांच्या सामूहिक स्वरूपाबद्दल दु:ख व्यक्त करा.
प्रभूच्या प्रार्थनेत आपण प्रार्थना करतो, “तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड” (मत्तय 6:12). ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे आपण मंडळीतील इतरांशी एकरूप आहोत. म्हणून आपल्या पापाचा परिणाम संपूर्ण मंडळीवर होतो; आणि म्हणूनच आपण आपल्या पापांची एकत्रितपणे कबुली दिली पाहिजे.
पौलाने म्हटले, “तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?” (1 करिंथ 3:16). या वचनात “तुम्ही” हे अनेकवचनी आहे. ख्रिस्ताच्या देहातील पापे ही स्वरूपाने अपमानजनक ठरतात, कारण पवित्र देव तिथे वस्ती करतो. मंडळी ही देवाच्या कला-संग्रहालयासारखी आहे, आणि आपल्याला सुशोभित करणारा “रंग” म्हणजे ख्रिस्ताचे रक्त आहे (इब्री 10:28–31). थॉमस वॉटसन यांनी म्हटल्याप्रमाणे: “दुष्टांची पापे देवाला क्रोधाविष्ट करतात. त्याच्या स्वतःच्या लोकांची पापे त्याला खेदित करतात.”
3. आपल्या पापाबद्दल खरा पश्चात्ताप व्यक्त करा.
पवित्र शास्त्रात इस्राएलाने आपल्या पापांची कबुली दिल्याच्या अनेक घटनांची नोंद आहे, जसे की इस्राएलाने अरण्यात कुरकूर केल्यानंतर परमेश्वराने त्यांच्यावर अग्निमय सर्प पाठविले (गणना 21:7), किंवा लोक बंदिवासातून परत येऊन यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधू लागले (नहेम्या 9:1–3). हे वृत्तांत वाचताना, देवाच्या लोकांच्या अंतःकरणातील दु:खाचे सूर स्पष्टपणे ऐकू येतात.
जरी तुमची मंडळी अशा खालच्या पातळीवर नसेल, तरीही प्रभूविरुद्धच्या कोणत्याही पापाने खरे दुःख झाले पाहिजे. पापाची कबुली देताना वाचली जाणारी किंवा गायली जाणारी अनेक स्तोत्रे आपल्या अपराधांविषयीचे अंतःकरणापासून आलेले विलाप व्यक्त करतात. पापकबुलीची ही भाषा मंडळीच्या जीवनात नियमित आणि अपेक्षित अशी प्रथा असली पाहिजे. मार्टिन ल्यूथर यांनी म्हटल्याप्रमाणे: “म्हणून, जेव्हा मी तुम्हाला पापकबुलीसाठी बोध करतो, तेव्हा मी तुम्हाला ख्रिस्ती होण्यासाठी बोध करत असतो.”
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


