
खरे मनःपरिवर्तन कसे असते?
03/10/2025
“मानव-जीवनाचे पावित्र्य” याचा नेमका अर्थ काय?
14/10/2025वधस्तंभामध्ये देवाचा उद्देश काय होता?
ख्रिस्ताने पाप्यांसाठी केलेले प्रायश्चित्त मर्यादित आहे हा सिद्धांत (ज्याला निश्चित प्रायश्चित्त किंवा विशिष्ट मुक्ती असेही संबोधले जाते) असे प्रतिपादन करतो की ख्रिस्ताचे प्रायश्चित्त हे केवळ निवडलेल्या लोकांसाठी मर्यादित होते; येशूने संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्तीच्या पापांसाठी प्रायश्चित्त केले नाही. माझ्या मंडळी-पंथात जे तरुण सेवक होण्यासाठी पुढे येतात त्यांची परीक्षा घेतली जाते, आणि अशा वेळी हमखास एक प्रश्न विचारला जातो “तुमचा मर्यादित प्रायश्चित्तावर विश्वास आहे का?” विद्यार्थी उत्तर देतो, “होय, माझा विश्वास आहे की ख्रिस्ताचे प्रायश्चित्त सर्वांसाठी पर्याप्त आहे आणि काहींसाठी प्रभावी आहे.” म्हणजे, वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताच्या मरणाचे मूल्य इतके व्यापक आणि मर्यादेपलीकडे आहे की ते प्रत्येक व्यक्तीच्या सर्व पापांसाठी पुरेसे ठरू शकेल, तथापि ते प्रत्यक्षात केवळ त्यांच्यावर लागू होते जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. परंतु, हे विधान वादाच्या मूळ विषयाचा प्रश्न सोडवत नाही. खरी चर्चा या बाबतीत आहे की — वधस्तंभामध्ये देवाचा नेमका उद्देश काय होता?
खरं तर, देवाच्या सार्वकालिक योजनेला समजून घेण्यासाठी दोन मुख्य दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन असा की, अनादिकाळापासूनच देवाची इच्छा होती की पतित मानवजातीमधून शक्य तितक्या अधिक लोकांचे तारण व्हावे. म्हणून त्याने मुक्तीची एक योजना आखली, ज्यायोगे तो आपल्या पुत्राला पतित लोकांचे पाप हरण करणारा म्हणून या जगात पाठवेल. येशू क्रूसावर जाईल आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी मरण सहन करील.
ही योजना परिक्षणाधीन दृष्टीने सशर्त स्वरूपाची होती — देवाने सर्वांसाठी प्रायश्चित्त उपलब्ध करून दिले, पण ते केवळ त्यांच्यासाठीच प्रभावी ठरते जे त्याचा लाभ घेतील, म्हणजे जे विश्वास ठेवतील. या विचारानुसार, येशूने सर्वांसाठी संभाव्य मृत्यू पत्करला; परंतु संकल्पनात्मक दृष्टिकोनातून विचार केला असता, अशी शक्यता वर्तवली जाऊ शकते की संपूर्ण जग येशूच्या कार्याचा स्वीकार न करता, आपल्या अपराधांमध्ये मृतावस्थेतच राहण्याचा मार्ग निवडू शकते. अशा परिस्थितीत, देवाची योजना निष्फळ ठरू शकते, कारण कुणीच तिचा लाभ घेणार नाही. आजच्या काळातील बहुसंख्य मंडळ्यांमध्ये हाच दृष्टिकोन प्रचलित आहे — की येशूने सर्वांसाठी सशर्त प्रायश्चित्त केले. आणि शेवटी, तारण साध्य होईल की नाही, हे पूर्णपणे सुवार्ता कानी पडलेल्या मनुष्याच्या व्यक्तिगत प्रतिसादावर अवलंबून राहते.
ख्रिस्ती विश्वासाचा धर्मसुधारित (रिफॉर्म्ड) दृष्टिकोन देवाच्या योजनेविषयी एक वेगळा आणि ठाम दृष्टिकोन मांडतो. या विश्वासमतानुसार देवाने अनादिकालापासून अशी एक योजना आखली ज्यांत कुठल्याही प्रकारची परिक्षणाधीन अट नव्हती. ती एक अशी “अ” योजना होती की, तिचे अपयश गृहीत धरून ‘योजना ब’ तयार करण्याची आवश्यकता कधीच भासली नाही. या योजनेनुसार, देवाने पतित मानवजातीमधून काही विशिष्ट लोकांचे, ज्यांना पवित्र शास्त्रात “निवडलेले” म्हटले गेले आहे, तारण करण्याचा निश्चय केला. इतिहासामध्ये त्या निवडीची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्याने आपल्या पुत्राला निवडलेल्या लोकांच्या मुक्तीसाठी ठरवून, विशिष्ट हेतूने, या जगात पाठवले. हे कार्य अशा प्रकारे परिपूर्णतेने साध्य करण्यात आले की ख्रिस्ताच्या रक्ताचा एक थेंबही व्यर्थ गेला नाही. पित्याने ज्यांना तारणासाठी निवडले, ते सर्व या प्रायश्चित्ताच्या माध्यमातून नक्कीच तारण पावतील.
याउलट, धर्मसुधारित नसलेल्या दृष्टिकोनाचा गर्भित अर्थ असा ठरतो की कोण तारण पावेल आणि कोण नाही हे देवाला आधीपासून माहीत नसते. याच कारणास्तव काही आधुनिक धर्मशास्त्रज्ञ असे म्हणतात, “देव शक्य तितक्या अधिक लोकांना तारतो.” परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, देव किती लोकांना तारू शकतो? त्याच्याकडे किती लोकांना तारण्याचे सामर्थ्य आहे? जर तो खरा देव असेल, तर मग त्याच्याकडे प्रत्येक व्यक्तीचे तारण करण्याचे संपूर्ण सामर्थ्य असायला हवे, नाही का? पण त्याच्याकडे किती लोकांना तारण्याचा अधिकार आहे? तो असा देव नाही का की, मोशेच्या जीवनात जसा त्याने हस्तक्षेप केला, अब्राहामच्या जीवनात जसा तो उतरला, प्रेषित पौलाला जसे त्याने पकडले—तसाच तो कोणाच्याही जीवनात हस्तक्षेप करू शकतो, आणि त्या व्यक्तीला स्वतःशी तारणाच्या संबंधात आणू शकतो? असं करण्याचा पूर्ण अधिकार त्याच्याकडे नाही का? तो खरोखर असा परमेश्वर आहे, ज्याला हे करण्याचा संपूर्ण हक्क आहे.
पवित्र शास्त्राचं हे कथन करते की येशूने “जगासाठी” मरण सोसले, आपण नाकारू शकत नाही. योहान 3:16 हे अशा प्रकारच्या भाषेचं सर्वोच्च उदाहरण आहे. परंतु नवीन करारात—अगदी योहानाच्या सुवार्तेतसुद्धा—याच्या समतोलासाठी एक भिन्न दृष्टिकोन दिला आहे: येशूने सर्वांसाठी नव्हे, तर आपल्या मेंढरांसाठी आपले जीवन अर्पण केले. योहानाच्या सुवार्तेत येशू आपल्या मेंढरांविषयी बोलतो आणि म्हणतो की, ती मेंढरे म्हणजे पित्याने त्याला दिलेले लोक होत. योहान 6:44 मध्ये येशू म्हणतो: “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटच्या दिवशी मी उठवीन.” येथे “आकर्षित” या शब्दाचा अर्थ खर्या अर्थाने “बलपूर्वक ओढणे” असा आहे. आणि याच अध्यायात येशू म्हणतो: “पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.” (योहान 6:37). येशूचा मुद्दा स्पष्ट आहे — पित्याने ज्यांना पुत्राजवळ आणण्याचा निर्धार केला आहे, ते सर्व नक्की येतील; आणि इतर कुणीही येणार नाही. म्हणून, तुमचे तारण हे संपूर्णपणे आणि प्रारंभापासून शेवटपर्यंत देवाच्या संप्रभु निर्धारणावर आधारित आहे — ज्याने आपल्या कृपेमुळे तुमच्यावर दया करावी असे ठरविले. देवाने तुमच्यात काही विशेष पाहिले म्हणून नव्हे, तर आपल्या पुत्रावर असलेल्या प्रेमामुळे त्याने हे केले. आज मी ख्रिस्ती आहे, यामागचे आकाशाखालील एकमेव कारण म्हणजे — मला पित्याने पुत्राला देणगी म्हणून दिले आहे. आणि हे माझ्या काही केलेल्या कर्मांद्वारे किंवा मी करू शकत असलेल्या कृत्यांनी नव्हे.
हा अंश डॉ. आर. सी. स्प्रौल यांच्या योहानकृत शुभवर्तमानावरील भाष्यग्रंथातून घेतलेला आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


