
येशू ख्रिस्त, देवाचा कोकरा!
27/09/2025
वधस्तंभामध्ये देवाचा उद्देश काय होता?
08/10/2025खरे मनःपरिवर्तन कसे असते?
स्तोत्रसंहिता 51 जे पश्चात्तापभावी स्तोत्रांपैकी एक आहे, दावीदाने त्या वेळी लिहिले, जेव्हा नाथान संदेष्ट्याने त्याला सामोरे जाऊन त्याचे पाप उघड केले. बथशेबेला आपली पत्नी करून घेणे आणि तिचा नवरा, उरीया याचा खून करणे हे दावीदाचे परमेश्वराविरुद्ध केलेले गंभीर पाप होते असे नाथानाने उघडपणे जाहीर केले.
दावीदाने व्यक्त केलेले दुःख आणि अंतःकरणातून उमटलेला पश्चात्तापभाव हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. परंतु याहूनही महत्त्वाचे म्हणजे हे समजणे की खरे मनःपरिवर्तन हे देवाच्या पवित्र आत्म्याचे कार्य आहे. दावीदाचा पश्चात्ताप हा पवित्र आत्म्याच्या प्रभावामुळे झाला होता. इतकेच नव्हे तर जेव्हा तो ही प्रार्थना लिहितो तेव्हा तो ती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहितो. पवित्र आत्मा स्तोत्रसंहिता ५१ मध्ये दाखवतो की तो आपल्यामध्ये पश्चात्ताप कसा निर्माण करतो. ह्या स्तोत्रावर चिंतन करत असतांना आपण ही गोष्ट लक्षात ठेऊया .
स्तोत्रसंहिता 51 ची सुरुवात अशी होते:
“हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.” (स्तोत्रसंहिता. 51:1). येथे मनःपरिवर्तनाचा मूलभूत घटक उलगडतो. जेव्हा मनुष्याला आपल्या पापाची जाणीव होते आणि तो त्यापासून फिरतो, तेव्हा तो स्वतःला देवाच्या दयेवर सोपवतो. खऱ्या मनःपरिवर्तनाचे पहिले फळ म्हणजे आपल्याला दयेची किती खोलवर गरज आहे याची जाणीव होणे. दावीद देवाकडे न्याय मागत नाही, कारण त्याला ठाऊक आहे की देव जर त्याच्याशी न्यायाने वागला, तर त्याचा तत्क्षणी नाश होईल. म्हणूनच त्याचा पापस्वीकार दयेच्या आकांतपूर्ण विनंतीने सुरू होतो.
जेव्हा दावीद देवाकडे त्याचे अपराध पुसून टाकण्याची विनंती करतो, तेव्हा तो प्रत्यक्षात देवाला आपल्या आत्म्यावर उमटलेला अधर्माचा डाग काढून टाकण्याची, आपल्या अनीतीला झाकून टाकण्याची आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या पापापासून स्वतःला शुद्ध करण्याची विनंती करतो. म्हणूनच तो म्हणतो:
“मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.” (स्तोत्रसंहिता 51:2).
पापांची क्षमा आणि शुद्धीकरण या संकल्पना परस्परांशी जोडलेल्या असल्या, तरी त्या तंतोतंत सारख्या नाहीत. नवीन करारामध्ये प्रेषित योहान लिहितो:
“जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (1 योहान 1:9).
पश्चात्तापी अंत:करणाने आपण देवापुढे जातो, आपली पापे पदरी घेतो आणि केवळ क्षमेसाठी नव्हे तर पुन्हा पाप न करण्यासाठी सामर्थ्यही मागतो. जसे दावीद या स्तोत्रात करतो, तसेच आपणही देवाला विनंती करतो की वाईटाकडे जाणाऱ्या आपल्या प्रवृत्तीचा त्याने नाश करावा. दावीद पुढे म्हणतो:
“कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.” (स्तोत्रसंहिता 51:3). ही फक्त अपराधाची औपचारिक कबुली नाही. तो खरोखरच पापाने पछाडलेला असा मनुष्य आहे. तो स्पष्टपणे म्हणतो: “मी दोषी आहे हे मला ठाऊक आहे.” तो आपला अपराध कमी करून दाखवत नाही; तो स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्नही करत नाही. आपण मात्र अनेकदा आपल्या पापी वर्तनाचे समर्थन करण्यासाठी कारणे शोधण्यात तरबेज असतो आणि ते योग्य ठरवण्यासाठी विविध कारणे पटकन पुढे करतो. पण या शास्त्र पाठात आपण पाहतो की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दावीद देवापुढे प्रामाणिक होतो. तो आपला अपराध कबूल करतो, आणि त्याला ठाऊक आहे की त्याचे पाप सतत त्याच्या समोर आहे. तो त्यापासून पळून जाऊ शकत नाही, आणि ही जाणीव त्याला सतत पछाडत आहे.
मग तो आक्रोश करून म्हणतो: “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे” (स्तोत्रसंहिता 51:4). एका अर्थाने येथे दावीद अतिशयोक्ती वापरतो. कारण त्याने उरीया, त्याचे कुटुंबीय व मित्र, बथशेबा आणि देवाच्या संपूर्ण लोकांविरुद्ध गंभीर पाप केले होते. तरीही दावीद समजतो की शेवटी प्रत्येक पाप हे देवाविरुद्धच असते. कारण देव हा विश्वातील एकमेव पावित्र्याने परिपूर्ण असा आहे. देव हा स्वर्गाचा आणि पृथ्वीचा न्यायनिवाडा करणारा असल्यामुळे, प्रत्येक पाप हे देवाच्या नियमशास्त्राचा भंग आणि त्याच्या पावित्रतेविरुद्धचा अपराध ठरतो. दावीद हे जाणतो आणि कबूल करतो. तो मनुष्यांविरुद्ध केलेल्या अपराधाला कमी लेखत नाही, पण आपले पाप हे शेवटी देवाविरुद्ध केलेले पाप आहे हे तो मान्य करतो.
यानंतर तो असे विधान करतो जे अनेकदा गांभीर्याने घेतले जात नाही. हे विधान वचन 4 च्या दुसऱ्या भागात आहे, आणि पवित्र शास्त्रात आढळणाऱ्या खऱ्या मनःपरिवर्तनाच्या सर्वांत प्रभावी अभिव्यक्तींमध्ये ते गणिले जाते : “म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, आणि तू निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील” (स्तोत्रसंहिता 51:4). दावीद प्रत्यक्षात म्हणतो: “हे देवा, तुला माझ्यावर न्यायनिवाडा करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, आणि हेही स्पष्ट आहे की तुझा न्याय आणि तुझा कोप यांशिवाय मी दुसऱ्या कशासही पात्र नाही.” दावीद कबूल करतो की देव निर्दोष आहे आणि त्याला न्याय करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देवाशी कोणतीही सौदेबाजी किंवा तडजोड शक्य नाही.
तो पुढे म्हणतो: “पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे.” (स्तोत्रसंहिता 51:5–6). देव केवळ बाह्यरूपातील सत्यावर समाधानी राहत नाही; तर ते सत्य आपल्या अंतःकरणाच्या गाभ्यातून उमलावे अशी तो मागणी करो. दावीद कबूल करतो की तो देवाने दिलेल्या आज्ञा पाळण्यात अपयशी ठरला आहे. आणि त्याचे आज्ञापालन अंतःकरणातून वाहणाऱ्या खऱ्या कृतींऐवजी अनेकदा केवळ बाह्य स्वरूपाचे होते.
मग दावीद पुन्हा शुद्धतेसाठी आक्रोश करतो: “एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.” (स्तोत्रसंहिता 51:7)
आपण दावीदाच्या आवाजात असहाय्य अवस्थेतेचा स्वर ऐकू शकतो. दावीद म्हणत नाही: “देवा, थांब; ही प्रार्थना पुढे सुरू करण्यापूर्वी मला आधी माझे हात किंवा स्वतःला स्वच्छ करावे लागेल.” दावीद जाणतो की तो स्वतःच्या अपराधबोधाचा डाग स्वतः पुसू शकत नाही; त्याची भरपाई तो करू शकत नाही. म्हणून आपल्यालाही दावीदाबरोबर कबूल करावे लागते की आपण स्वतःच्या पापांसाठी प्रायश्चित्त करू शकत नाही.
जेव्हा आपल्या अपराधबोधाची जाणीव असाह्य होते, तेव्हा देवापुढे पश्चात्ताप करीत उभे राहताना शब्द अपुरे पडतात.
नंतर देवाने यशया संदेष्ट्याद्वारे असे वचन दिले: “परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील” (यशया 1:18)
जेव्हा देव आपणाला पापाच्या चिखलात पडलेले पाहतो, तेव्हा त्याला आपल्याला शुद्ध करणे आवडते.
दावीद मग म्हणतो, “माझ्या कानी आनंद व हर्षाचे शब्द पडू दे” (स्तोत्रसंहिता 51:8a). पश्चात्ताप हा वेदनादायी अनुभव असतो — पापाची कबुली देणे आणि अपराधबोधाची जाणीव मान्य करणे हे कोणासाठीही आनंददायी नसते. अपराधबोध हा आनंदाचा सर्वात मोठा नाशक असतो. दावीद या क्षणी आनंदी नाही, तरी तो देवाला विनवतो की त्याच्या आत्म्याची पुनर्स्थापना करावी आणि त्याला पुन्हा आनंद व हर्ष अनुभवता यावा. तो याच आशेने पुढे म्हणतो, “म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील” (स्तोत्रसंहिता 51:8b). हा वाक्प्रचार किती अर्थगर्भ आहे. तो म्हणतो — देवा, तूच मला चिरडलेस; तूच माझी हाडे मोडलीस; ती सैतानाने किंवा नाथानाने मोडली नाहीत, तर तूच माझ्या अपराधाचा भंडाफोड करून मला दोषी ठरवताना माझी हाडे मोडलीस. म्हणून मी तुझ्यासमोर एक भग्न व अनुतप्त मनुष्य म्हणून उभा आहे, आणि पुढे जाण्याचा माझा एकमेव मार्ग म्हणजे तूच मला बरे कर आणि मला पुन्हा आनंद व हर्ष दे.
पुढे तो म्हणतो, “माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तोत्रसंहिता 51:9–10). शुद्ध अंतःकरण प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देवाची नवी उत्पत्ति. हे मी स्वतःच्या सामर्थ्याने करू शकत नाही. फक्त देवच शुद्ध अंतःकरण निर्माण करू शकतो, आणि ते तो आपले पाप पुसून टाकूनच निर्माण करतो.
यानंतर दावीद विव्हळ होऊन ओरडतो, “तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.” (स्तोत्रसंहिता 51:11). दावीदाला हे लक्षात येते की हे कोणत्याही पाप्याबरोबर घडू शकणारे सर्वांत भयानक वास्तव आहे. तो जाणतो की जर आपण मनःपरिवर्तन न करता राहिलो, तर देव प्रत्यक्षात आपल्याला आपल्या उपस्थितीतून बाहेर घालवून देईल. येशू इशारा देतो की जे त्याला नाकारणार आहेत त्यांना देवाकडून कायमचे दूर केले जाईल. परंतु पश्चात्तापभावी प्रार्थना ही विश्वासणाऱ्यांसाठी आश्रय आहे. हा त्या व्यक्तीचा देवभिरू प्रतिसाद आहे ज्याला स्वतःचे पाप मान्य झालेले आहे. अशा प्रकारचा प्रतिसाद हा प्रत्येक हृदय-परिवर्तन झालेल्या विश्वासणाऱ्याच्या जीवनात दिसून येतोच.
दावीद पुढे म्हणतो, “तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील” (स्तोत्रसंहिता 51:12–13). आपण अनेकदा ऐकतो की लोकांना ख्रिस्ती लोकांच्या सहवासात राहणे नकोसे वाटते, कारण ख्रिस्ती लोक गर्विष्ठ, आत्म-नीतिमत्व दाखवणारे किंवा ‘मीच पवित्र’ अशा वृत्तीने वागताना दिसतात.पण तसे अजिबात नसावे. ख्रिस्ती लोकांकडे गर्व करण्यासारखे काहीही नाही. आपण अनीतिमान लोकांमध्ये सुधारणा करणारे स्वतःमध्ये नीतिमान असे लोक आपण नाही.
एका प्रचारकाने म्हटले आहे, “सुवार्ता-प्रचार म्हणजे एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला भाकरी कुठे मिळते ते दाखवतो.” विश्वासणारा आणि अविश्वासणारा यांच्यातील मूळ फरक म्हणजे पापांची क्षमा. ख्रिस्ताचा सुवार्तिक होण्याची खरी पात्रता हीच की त्याने स्वतः क्षमा अनुभवलेली असते आणि आपण तीचा घोष इतरांना करावा अशी उत्कंठा त्याला असते.
“हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशूयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता;होमबलीही तुला प्रिय नाही.देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. (स्तोत्रसंहिता 51:15–17).
येथे आपण संदेष्ट्यांनी घोषित केलेल्या पश्चात्तापाच्या संदेशाचे मर्म पाहतो ज्याविषयी आपण मागील अध्यायात पाहिले. खऱ्या देवभक्तीने केलेल्या मनःपरिवर्तनाचे स्वरूप या वाक्यात प्रकट होते: “हे देवा,भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” दावीद म्हणतो की जर तो स्वतःच्या पापांसाठी पापक्षालनाचे अर्पण करू शकला असता, तर त्याने ते नक्कीच केले असते; पण तसे शक्य नसल्याने त्याची एकमेव आशा म्हणजे देवाने त्याला आपल्या विपुल करुणेला अनुसरून स्वीकारावे.
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते आणि अप्रत्यक्षपणे दाखवते की देव गर्विष्ठांना विरोध करतो पण नम्र जनांवर कृपा करतो. दावीद हे सत्य जाणतो. तो भग्न व अनुतप्त असला तरी देव कसा आहे आणि देव पश्चात्ताप करणाऱ्यांशी कसा वागतो हे त्याला माहीत आहे. त्याला समजते की देव कधीही भग्न व अनुतप्त अंतःकरणाचा तिरस्कार करत नाही. देवाला आपल्याकडून हेच अपेक्षित. हेच येशूने धन्यवचने सांगताना अभिव्यक्त केले होते: “जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.” (मत्तय 5:4). हे स्तोत्र फक्त एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनाविषयीच्या शोकाबद्दल नाही, तर पापाविषयीच्या अपराधबोधातून उत्पन्न झालेल्या शोकाविषयी आहे. येशू आपल्याला खात्री देतो की जेव्हा आपण आपल्या पापांबद्दल शोक करतो, तेव्हा देव पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला शांती देतो.
मी सर्व ख्रिस्ती लोकांना स्तोत्र 51 पाठ करण्याचा सल्ला देतो. हे सुभक्तीने केलेल्या मनःपरिवर्तनाचे परिपूर्ण उदाहरण आहे. माझ्या जीवनात अनेक वेळा मी प्रभूकडे आलो आणि म्हटले: “हे देवा, माझ्यात शुद्ध अंतःकरण निर्माण कर,” किंवा, “माझे अपराध पुसून टाक. एजोबाने मला शुद्ध कर. मला धुऊन निर्मळ कर.” अनेकदा मी प्रार्थना केली: “हे प्रभु, मला तुझ्या तारणाचा आनंद पुन्हा दे,” आणि विव्हळ होऊन म्हटले: “तुझ्याविरुद्ध, फक्त तुझ्याविरुद्ध मी पाप केले.” जेव्हा आपण आपल्या अपराधाच्या सत्याने खचून जातो, तेव्हा देवापुढे मनःपरिवर्तनाने स्वतःला व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच उरत नाहीत. अशा प्रसंगी आपल्या ओठांवर प्रत्यक्षांत पवित्र शास्त्राचे शब्द असणे हा खरेच आशीर्वाद आहे. हा अंश आर. सी. स्प्रौल यांच्या पश्चाताप काय आहे *?* या “निर्णायक प्रश्न मालिका ” पुस्तकातून घेतलेला आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


