वधस्तंभामध्ये देवाचा उद्देश काय होता?

08/10/2025

गर्भपाताचा स्वेच्छा-हक्क  (प्रो-चॉइस): म्हणजे काय?

14/10/2025

वधस्तंभामध्ये देवाचा उद्देश काय होता?

08/10/2025

गर्भपाताचा स्वेच्छा-हक्क  (प्रो-चॉइस): म्हणजे काय?

14/10/2025

“मानव-जीवनाचे पावित्र्य” याचा नेमका अर्थ काय?

xr:d:DAFXk0WDSFg:25,j:45162075609,t:23011320

पवित्र शास्त्रानुसार, मानव-जीवनाचे पावित्र्य हे सृष्टीच्या निर्मितीत मुळावलेले आणि स्थिरावलेले आहे. मानव हा विश्वातील एखादा योगायोग किंवा अनियोजित प्रसंग नाही; तर तो सनातन सृष्टिकर्ता परमेश्वराने काळजीपूर्वक घडविलेली निर्मिती आहे. मानवाची प्रतिष्ठा ही त्याला देवाकडून प्राप्त झालेली आहे. मनुष्य हा मर्यादित, पराधीन आणि प्रसंगाधीन प्राणिमात्र असला, तरी त्याच्या सृष्टिकर्त्याने त्याला उच्च मूल्य दिले आहे.

उत्पत्तीच्या पुस्तकातील सृष्टीचे वर्णन हे मानवाच्या प्रतिष्ठेची चौकट ठरवते:

 “मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.” देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. (उत्प. 1:26–27)

देवाच्या प्रतिरूपात निर्माण होणे हेच मानवाला इतर सर्व प्राणिमात्रांपासून वेगळे ठरवते. देवाचे प्रतिरूप आणि देवाचे सदृश्यता यांची छाप मानव आणि देव यांच्यात एक अद्वितीय नाते निर्माण करते. जरी पवित्र शास्त्र मनुष्याला देवासारखा मानण्याची परवानगी देत नाही, तरी सृष्टिकर्ता परमेश्वराशी असलेल्या या अद्वितीय नात्यामुळे मानवाला उच्च प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.

मनुष्य आता निर्मळ नसला, तरी तो अजूनही मानव आहे. आपण जोपर्यंत मानव आहोत, तोपर्यंत आपण व्यापक अर्थाने देवाच्या  प्रतिरूपाचेच आहोत. देवाच्या सृष्टीत आपण आजही मूल्यवान प्राणिमात्र आहोत. आपण पात्र नसलो तरी आपण मौल्यवान आहे. हीच पवित्र शास्त्रातील तारणाच्या संदेशाची प्रतापी घोषणा आहे. देवाने निर्माण केलेली हीच ती प्राणिजात जिला पापापासून बंधमुक्त करण्यासाठी तो धावून येतो.  

मानवजीवन हे देवाच्या प्रतिरूपात मुळावलेले असल्यामुळे जुन्या करारात अशी अनेक घोषणात्मक विधाने आहेत जी मानवजीवनाच्या प्रतिष्ठेची साक्ष देतात, ज्यांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

“देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले, आणि सर्वशक्तिमानाच्या आत्म्याने  मला जीवन दिले.” (ईयोब  33:4)

“परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत.” (स्तोत्रसंहिता 100:3)

“जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्याला धिक्कार असो! तो मातीच्या खापर्‍यांपैकी एक आहे. ‘तू काय करतोस’ असे माती आपल्या घडणार्‍याला म्हणेल काय? ‘तुला हात नाहीत’ असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय? ‘तू काय जन्म देतोस?’ असे जो बापाला म्हणतो, आणि ‘तू काय प्रसवतेस?’ असे जो आईला म्हणतो त्याला धिक्कार असो!”’ इस्राएलाचा निर्माणकर्ता पवित्र प्रभू, परमेश्वर म्हणतो, होणार्‍या गोष्टींविषयी मला कोण विचारणार? माझे पुत्र व माझ्या हातांचे कृत्य ही पाहा, असे मला कोण सांगणार? मीच पृथ्वी केली व तिच्यावर माणसे उत्पन्न केली, मी म्हणजे माझ्या हातांनी आकाश पसरले; मी आकाशसेनेस आज्ञा दिली.”(यशया 45:9-12)

 “तर आता, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत.” (यशया 64:8)

विशेष म्हणजे, येशू ख्रिस्ताने जुन्या कराराच्या दृष्टिकोनातून मानव-जीवनाच्या पावित्र्याची सर्वात महत्त्वाची व्याख्या दिली:

“खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.” (मत्तय 5:21–22)

येशूचे हे शब्द आपण मानवजीवनाचे पावित्र्य कसे समजतो यासाठी अत्यंत निर्णायक आहेत. येथे येशूने जुन्या करारातील नियमशास्त्राचे  व्यापकपणे अर्थविवरण केले. तो धार्मिक पुढाऱ्यांशी बोलत होता, ज्यांना दहा आज्ञांचा फक्त संकुचित आणि बाह्य अर्थच समजला होता. त्याकाळच्या धर्मकायदेपंथी समुहाचा असा विश्वास होता की जर त्यांनी शब्दिकपणे स्पष्ट सांगितलेल्या नियमांचे पालन केले, तर त्यांना स्वतःच्या नीतिमत्त्वाचा अभिमान बाळगता येईल. परंतु ते नियमशास्त्राचा व्यापक गर्भितार्थ समजण्यास अपयशी झाले. येशूच्या दृष्टीकोनातून, नियम शास्त्रात ज्या ज्या गोष्टीं तपशीलवार सांगितलेल्या नव्हत्या, त्या देखील त्यांच्या व्यापक अर्थाद्वारे स्पष्टपणे सूचित केलेल्या होत्या.

नियमशास्त्राचे हे वैशिष्ट्य येशूने व्यभिचारावरील निषेधाचा विस्तार करताना प्रकट केले :

‘‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून [पूर्वी त्यांनी] सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. ‘मत्तय 5:27-28

येथे येशू स्पष्ट करतो की जर  एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष शारीरिक व्यभिचार टाळला, म्हणून त्याने संपूर्ण नियमशास्त्र पाळले असा त्याचा  हमखास अर्थ होत नाही. व्यभिचाराचा नियम हा एक गुंतागुंतीचा नियम आहे. त्यात केवळ प्रत्यक्ष अवैध संबंधच नव्हे, तर कामवासना आणि व्यभिचार यांत मोडणाऱ्या सर्वच गोष्टींचा समावेश होतो. येशूने कामवासनेला अंतःकरणात केलेला व्यभिचार असे म्हटले आहे.

नियमशास्त्र हे केवळ काही नकारात्मक कृती आणि चित्तवृत्तीवर प्रतिबंध घालत नाही, तर अप्रत्यक्षपणे सकारात्मक वर्तन आणि चित्तवृत्तीची आज्ञा देते. म्हणजेच, जर व्यभिचार निषिद्ध असेल, तर शुद्धता आणि पवित्रता आवश्यक आहे. 

जेव्हा आपण येशूने दाखवून दिलेले हे नमुने “तू खून करू नकोस” या आज्ञेला लागू करतो, तेव्हा हे स्पष्ट जाणवते की एका बाजूला आपल्याला खूनाच्या व्यापक व्याख्येत मोडणाऱ्या प्रत्येक कृतीपासून दूर राहावे लागते; पण दुसऱ्या बाजूला आपल्याला जीवनाचे रक्षण, उन्नती आणि संगोपन यासाठी सक्रियपणे प्रयत्न करणे ही सकारात्मक आज्ञा दिलेली आहे. खूनाचे सर्व पैलू आपण टाळले पाहिजेत, आणि त्याच वेळी जीवनाची वृद्धी व प्रोत्साहन यासाठी आपण आपल्याकडून सर्वतोपरी (शक्य तितके) प्रयत्न केले पाहिजेत.

जसे येशूने कामवासना ही व्यभिचाराचाच एक पैलू आहे असे म्हटले, तसेच त्याने अन्यायकारक क्रोध आणि निंदा यांना सुद्धा खून करण्याचेच पैलू म्हटले आहे. ज्याप्रमाणे कामवासना अंतःकरणातील व्यभिचार आहे, त्याप्रमाणेच क्रोध आणि निंदा ही अंतःकरणात घडून येणारा खून आहे.

दहा आज्ञांची व्याप्ती वाढवताना येशूने कामवासना आणि निंदा यांसारख्या गोष्टींचा समावेश केला असला, तरी त्याला हे म्हणायचे नव्हते की एखाद्या व्यक्तीकडे कामवासनेने पाहणे हे अवैध शारीरिक संबंध ठेवण्याइतकेच दुष्कृत्य आहे. तसेच येशूने असेही म्हटले नाही की निंदा करणे हे खून करण्याइतकेच वाईट आहे. त्याने म्हटले ते इतकंच की खूनाविरुद्ध असलेला नियम हा अशा प्रत्येक गोष्टीविरुद्ध आहे जी अन्यायकारक मार्गाने एखाद्या मनुष्याला इजा पोहोचवते.

हे सगळे गर्भपाताच्या विषयाला कसे लागू पडते? येशूच्या उपदेशात आपण मानवजीवनाच्या पावित्र्याबद्दल आणखी एक ठोस पुष्टी पाहतो. निंदा किंवा इतर अंतःकरणातील खूनांना आपण “संभाव्य मनुष्यवध” म्हणू शकतो. ह्याला संभाव्य मनुष्यवध असे म्हटले जाते कारण, उदाहरणार्थ, क्रोध व निंदा यामध्ये प्रत्यक्षपणे खून करण्याच्या कृत्याकडे घेऊन जाण्याची क्षमता असते. अर्थातच, त्या नेहमीच त्या टोकापर्यंत जात नाहीत. क्रोध निंदा यांना निषिद्ध ठरवले आहे, हे मुख्यत्वे ते पुढे काय घडवू शकतात म्हणून नव्हे, तर ते जीवनमानाला प्रत्यक्ष इजा करतात म्हणूनही. 

जेव्हा आपण मानवजीवनाच्या पावित्र्याविषयीच्या चर्चेला गर्भपाताच्या प्रश्नाशी जोडतो, तेव्हा एक सूक्ष्म पण सुसंगत असा संबंध प्रकट होतो. जरी हे ठामपणे सिद्ध करता येत नाही की गर्भरूपात असलेले बाळ प्रत्यक्ष सजीव मानवव्यक्ती आहे, तरीही यात किंचितही शंका नाही की तो एक संभाव्य सजीव मानव आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, गर्भस्थ बाळ हे घडत जाणारा मानवप्राणी आहे. ते संभाव्यतेच्या गोठलेल्या निष्क्रिय अवस्थेत नाही; उलट, ते एका सतत गतिमान प्रक्रियेत आहे—ज्यात जर कुठलाही बाह्य हस्तक्षेप किंवा अनपेक्षित विपत्ती घडली नाही, तर ते बाळ नक्कीच एक पूर्णत्वास गेलेला प्रत्यक्ष सजीव मानव बनेल.

येशू ख्रिस्त खूनाविरुद्धच्या आज्ञेला केवळ प्रत्यक्ष खूनाच्या कृतीपुरती मर्यादित ठेवीत नाही; तो संभाव्य मनुष्यवधाच्या कृत्यांचाही त्यात समावेश करतो. येशूने स्पष्ट केले की प्रत्यक्ष जीवनाचा संभाव्य खून करणे हेही अन्यायकारक व अवैध आहे. तर मग, संभाव्य जीवनाचा प्रत्यक्ष नाश करण्याचे परिणाम किती भीषण असतील?

संभाव्य जीवनाचा प्रत्यक्ष नाश हा प्रत्यक्ष जीवनाच्या संभाव्य नाशासारखा नाही. हे दोन प्रकार एकसारखे नसले तरी, ते इतके जवळचे आहेत की संभाव्य जीवन नष्ट करण्यापूर्वी त्याचे संभाव्य परिणाम आपण काळजीपूर्वक विचारात घ्यायला हवेत. जर नियमशास्त्राच्या ह्या पैलूत खूनाविरुद्ध असलेल्या विस्तृत व गुंतागुंतीच्या प्रतिबंधात गर्भपाताच्या क्रियेचा स्पष्टपणे आणि अंतिमरित्या समावेश नसला, तरी नियमशास्त्राच्या दुसऱ्या पैलूत नक्कीच तिचा समावेश आहे.

नियमशास्त्रातील नकारात्मक प्रतिबंध हे सकारात्मक चित्तवृत्ती आणि कृती सूचित करतात. उदाहरणार्थ, व्यभिचाराविरुद्ध असलेला पवित्र शास्त्रातील नियम हा शुद्धता आणि पवित्रतेची आज्ञा देतो. त्याचप्रमाणे, एखादा नियम सकारात्मक स्वरूपात सांगितला गेला, तर त्याच्या उलट नकारात्मक गोष्टीला अप्रत्यक्षपणे प्रतिबंध लावलेला असतो. उदाहरणार्थ, देवाने आपल्याला आपण आपल्या पैशांचे चांगले कारभारी व्हावे अशी आज्ञा दिली, तर याचा अर्थ आपण उधळपट्टी करणारे नसावे. त्याचप्रमाणे, परिश्रमपूर्वक काम करण्याची हितकारक आज्ञा ही आपल्या कामात आळस करणे यावर अप्रत्यक्ष प्रतिबंधच आहे. 

प्रत्यक्ष आणि संभाव्य मनुष्यवधाविरुद्ध असलेला नकारात्मक निषेध हा जीवनाच्या संरक्षणासाठी आणि पोषणासाठी असलेली एक सकारात्मक आज्ञा सूचित करतो. खूनाला विरोध करणे म्हणजे जीवनाचे मूल्य जपणे होय. गर्भपात जे काही करतो, ते गर्भातील बाळाच्या जीवनाचे मूल्य जपत नाही. काही लोक असा युक्तिवाद करतील की गर्भपात हा अपत्य नकोसे मानणाऱ्यांच्या जीवनमानाला मूल्य देतो; परंतु असा युक्तिवाद प्रत्यक्ष विषयाच्या—म्हणजे विकसित होत असलेल्या गर्भातील बाळाच्या—जीवनाचे मूल्य जपत  नाही.

पवित्र शास्त्र सातत्याने आणि ठामपणे थोर व लहान, अशा प्रत्येक मानवजीवनाच्या अत्यंत महान मूल्याची पुष्टी करते. दीन-दरिद्री, पीडित, विधवा, अनाथ आणि अपंग—हे सर्व पवित्र शास्त्रात अत्यंत मूल्यवान मानले गेले आहेत. त्यामुळे गर्भपातावरील कोणतीही चर्चा असो, तिला शेवटी या मुख्य बायबल विषयाला सामोरे जावे लागतेच. जेव्हा संभाव्य जीवन सहजपणे नष्ट केले जाते, तेव्हा मानवजीवनाचे पावित्र्य आणि मानवाची प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टींवर गडद अंधकार पडते. 

हा उतारा आर. सी. स्प्रोल यांच्या अबॉर्शन: अ रॅशनल लुक अ‍ॅट अ‍ॅन इमोशनल इश्यू या पुस्तकातून घेतलेला आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आर. सी. स्प्रौल

आर. सी. स्प्रौल

डॉ. आर. सी. स्प्रौल हे 'लिगोनियर मिनिस्ट्रीज'चे संस्थापक, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील 'सेंट अँड्र्यूज चॅपल'चे मुख्य उपदेशक आणि शिक्षक, तसेच 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'चे पहिले अध्यक्ष आणि 'टेबलटॉक' या मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा 'रिन्यूइंग युअर माइंड' हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ केंद्रांवर दररोज प्रसारित केला जातो आणि तो ऑनलाइन देखील ऐकता येतो. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये 'द होलिनेस ऑफ गॉड' , 'चोजन बाय गॉड' आणि 'एव्हरीवन्स अ थिओलॉजियन' यांसारख्या प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश आहे. पवित्र शास्त्राच्या अचूकता यावर प्रभावीपणे बचाव करण्यासाठी आणि देवाच्या लोकांनी त्यांच्या वचनावर ठाम विश्वासाने उभे राहण्याच्या गरजेवर भर देण्यासाठी ते जगभरात ओळखले जात होते.