What Is Christian Maturity?

ख्रिस्ती परिपक्वता म्हणजे काय?

29/10/2026
Jesus Is the New Temple

येशू हा नवीन मंदिर आहे

05/11/2026
What Is Christian Maturity?

ख्रिस्ती परिपक्वता म्हणजे काय?

29/10/2026
Jesus Is the New Temple

येशू हा नवीन मंदिर आहे

05/11/2026

दैनंदिन जीवनात देवाच्या पवित्रतेची रूपांतर घडविणारी शक्ती

The Transforming Power of God’s Holiness in Everyday Life?

…..मी ख्रिस्ताकडे वळल्यानंतर काही आठवड्यांनी, माझ्या अनेक मित्रांच्या मनात माझ्यासाठी प्रश्न होते, विशेषतः पुढे जाऊन माझ्या रात्रीच्या जीवनासाठी याचा काय अर्थ होणार होता याशी संबंधित: मी अजूनही बाहेर जाणार होतो का? मला दारू पिण्याची “परवानगी” होती का? त्या सुरुवातीच्या दिवसांत माझ्या लक्षात राहिलेला एक प्रश्न माझ्या मित्राच्या वडिलांकडून आला होता. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारले, “उरलेल्या आयुष्यात प्रत्येक जण बाहेर मजा करत असेल आणि आयुष्याचा आनंद घेत असेल, पण तू मात्र मंडळीत जाण्यात अडकून पडशील, हे जाणून तुला कसे वाटते?” आता मागे वळून पाहताना मला अशा प्रश्नावर हसू येते; परंतु त्या क्षणी त्याने मला शांतपणे विचार करायला लावले: मी माझे “पार्टीचे” जीवन सोडण्यासाठी तयार आणि सक्षम होतो का? मी रविवार मंडळीत घालवण्यास तयार होतो का? प्रेषित पौलाचे शब्द घेऊन सांगायचे झाले, तर मागे राहिलेल्या गोष्टी विसरून पुढे असलेल्या गोष्टींकडे झेप घेण्यास मी तयार होतो का? (फिलिप्पैकरांस 3:13).

ख्रिस्ताचे अनुसरण करण्याच्या माझ्या तीसहून अधिक वर्षांच्या काळात वर दिल्याप्रमाणे संभाषणे वारंवार झाली आहेत, आणि अशा प्रश्नांना सामोरे जाताना त्यांचा नेहमीचा भर पृथ्वीवरील गोष्टींवरच राहिला आहे. तो नेहमी माझ्याविषयी आणि माझ्या इच्छांबद्दल, मी कोण आहे आणि मला काय हवे आहे याविषयीच राहिला आहे. तो कधीही देवाविषयी आणि त्याच्या इच्छांबद्दल, तो कोण आहे आणि त्याला काय हवे आहे याविषयी नव्हता. हे आश्चर्यकारक नाही; आपण कधीही अविश्वासू व्यक्तीकडून भौतिक क्षेत्राच्या पलीकडे विचार करण्याची अपेक्षा करू नये. या गोष्टी फक्त ख्रिस्ताशी एकरूप झालेल्यांनाच समजू शकतात. पौल म्हणतो त्याप्रमाणे, “स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते.” (1 करिंथकरांस 2:14).

हे मला या लेखाच्या विषयाकडे नेते: देवाच्या पवित्रतेची रूपांतर घडविणारी शक्ती. ख्रिस्ती झाल्यानंतर काही महिन्यांनी मला हे स्पष्ट झाले की या जगातील गोष्टी मागे टाकून त्याऐवजी पवित्रतेचा पाठपुरावा करण्याची माझी इच्छा ख्रिस्तामधील देवाच्या माझ्या अनुभवात्मक ज्ञानावर अवलंबून होती. देव कोण आहे याची माझी समज जितकी सखोल होत गेली, तितका त्याच्यासारखे बनण्याचा माझा प्रयत्न वाढत गेला. देवाच्या पवित्रतेच्या बाबतीत हे विशेषतः खरे आहे.

देवाची पवित्रता हा केवळ त्याचा एक गुणविशेष नाही — तो देव कोण आहे याचा पाया आणि खरा गाभा आहे. ती त्याची पूर्ण शुद्धता, नैतिक परिपूर्णता आणि जे काही लौकिक किंवा अपवित्र आहे त्यापासूनचे पूर्ण वेगळेपण आहे. ईश्वर-शास्त्रज्ञ लुईस बर्कहॉफ यांनी म्हटल्याप्रमाणे, पवित्र देव “त्याच्या सर्व सृष्ट प्राण्यांपासून वेगळा आहे आणि अनंत वैभवात त्या सर्वांपेक्षा उंच व श्रेष्ठ आहे.”1 देवाचा ज्या एकमेव गुणधर्मावर तीन वेळा पुनरुच्चाराने जोर दिला जातो, तो म्हणजे पवित्रता: “पवित्र, पवित्र, पवित्र” (यशया 6:3; प्रकटीकरण 4:8). पवित्रतेची ही तिहेरी घोषणा यावर भर देते की देव पूर्णपणे वेगळा आहे; त्याच्यासारखा कोणीही नाही. जोएल बीके याचे वर्णन खालीलप्रमाणे करतात: “तो आपल्या गौरवाने, आपल्या गौरवासाठी वेगळा आहे. . . . देव म्हणून तो कोण आहे यामुळे तो पवित्र आहे, [आणि तो] पवित्र आहे कारण तो करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीत स्वतः कोण आहे हे प्रकट करण्यासाठी तो आवेशाने कटिबद्ध आहे.”2

आपल्या पवित्रतेपेक्षा, जी दोषपूर्ण आणि सातत्यहीन आहे, देवाची पवित्रता सार्वकालिक आणि अपरिवर्तनीय आहे. ती तो करतो त्या प्रत्येक गोष्टीची व्याख्या ठरवते. उदाहरणार्थ, देवाची प्रीती पवित्र आहे; त्याचा न्याय पवित्र आहे; त्याची दया पवित्र आहे; त्याचे सामर्थ्य पवित्र आहे; त्याचे सत्य पवित्र आहे. म्हणूनच, देवाच्या पवित्रतेची समज होणे आणि तिचा स्वीकार करणे, आपण कसा विचार करतो, जगतो आणि उपासना करतो, यात परिवर्तन घडवून आणेल.

जेव्हा आपण देवाच्या पवित्रतेचा खरोखर अनुभव घेतो, तेव्हा आपण बदलतो. यशया 6 चा विचार करा. देवाच्या पवित्रतेच्या प्रदर्शनाने यशया भारावून गेला आहे. तो पूर्णपणे खचून गेला आहे, आणि तो म्हणाला, “माझा धिक्कार असो!” (यशया 6:5). देवाच्या पवित्रतेचा अनुभव घेणे आपल्याला नम्र करते, आपले पापीपण उघडे करते आणि आपले मन आणि हृदय पुन्हा घडवते, ज्यामुळे आपल्या इच्छा आणि इच्छाशक्ती त्याच्या इच्छा आणि इच्छाशक्तीशी जोडण्यास आपल्याला भाग पाडते. आणि आपल्यासाठी देवाची इच्छा अशी आहे की आपण पवित्र असावे कारण तो पवित्र आहे: ““तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” (लेवीय 11:44; 1 पेत्र 1:16). आपल्याला त्याची गरज आहे हे ओळखून, आपण त्याच्या उद्देशांसाठी वेगळे केले जातो आणि त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होतो.

या लहान चिंतनात याचा सविस्तर उलगडा करणे शक्य नाही, परंतु धडा सोपा आहे: जर आपल्याला ख्रिस्तासारखे अधिक बनायचे असेल, तर आपल्या पवित्र देवाला, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, जाणून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. आर. सी. स्प्रौल यांचे द होलिनेस ऑफ गॉड, किंवा जे. आय. पॅकर यांचे नोइंग गॉड, किंवा स्टीफन चार्नॉक यांचे द एक्झिस्टन्स अँड अॅट्रिब्यूट्स ऑफ गॉड हे पुस्तक वाचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ख्रिस्ताच्या ज्ञानात आपली वाढ व्हावी या उद्देशाने प्रार्थनापूर्वक पवित्र शास्त्र वाचा. डी. ए. कार्सन यांनी म्हटल्याप्रमाणे:

लोक आपोआप पवित्रतेकडे वाहत जात नाहीत. कृपेने प्रेरित प्रयत्नांशिवाय, लोक सुभक्ती, प्रार्थना, पवित्र शास्त्राचे आज्ञापालन, विश्वास आणि प्रभूमधील आनंद याकडे स्वाभाविकपणे झुकत नाहीत. आपण तडजोडीकडे वाहत जातो; . . . आपण आज्ञाभंगाकडे वाहत जातो; . . . आपण अंधश्रद्धेकडे वाहत जातो.3

ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताद्वारे आपल्या पवित्र देवाचे वाढत जाणारे ज्ञान आपल्यावर त्या भरकटण्यापासून अवरोध आणते, आपल्याला पवित्रतेच्या मार्गावर आणते आणि चिरस्थायी सुख व आनंदाच्या जीवनाचे अभिवचन देते. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला विचारेल, “उरलेल्या आयुष्यात प्रत्येक जण बाहेर मजा करत असेल आणि आयुष्याचा आनंद घेत असेल, पण तू मात्र मंडळीत जाण्यात अडकून पडशील, हे जाणून तुला कसे वाटते?” तेव्हा हसा आणि म्हणा: “तुम्हाला माझा पवित्र देव माहीत असता, तुम्हाला येशू माहीत असता, तर तुम्ही असा प्रश्न विचारला नसता. त्याची उपासना करण्यासाठी मंडळीत जाणे हा माझा आनंद आहे; कारण केवळ तोच माझे हृदय हर्षाने आणि विपुल आनंदाने भरू शकतो!” (स्तोत्रसंहिता 16:11; यशया 35:10; योहान 16:24). 

1. लुईस बर्कहॉफ, समरी ऑफ ख्रिश्चन डॉक्ट्रिन (बॅनर ऑफ ट्रुथ, 2011), 28.

2. जोएल आर. बीके आणि पॉल एम. स्मॉली, रिफॉर्म्ड सिस्टिमॅटिक थिऑलॉजी, खंड 1 (क्रॉसवे, 2004), 569.

3. डी. ए. कार्सन, फॉर द लव्ह ऑफ गॉड: अ डेली कम्पॅनियन फॉर डिस्कव्हरिंग द रिचेस ऑफ गॉड्स वर्ड, खंड 2 (गुड न्यूज पब्लिशर्स, 2006), गुडरीड्स.कॉमवर उद्धृत केल्याप्रमाणे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

ड्र्यू डिनार्डो

ड्र्यू डिनार्डो

डॉ. ड्र्यू डिनार्डो हे न्यू हॉलंड, पेनसिल्व्हेनिया येथील सेंट स्टीफन रिफॉर्म्ड मंडळीचे वरिष्ठ पाळक आहेत.