Resolving Abortions Guilt

गर्भपाताच्या अपराध-भावनेतून मुक्तता

21/05/2026
Does God Accept the Worship of All Religions?

देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारतो काय?

28/05/2026
Resolving Abortions Guilt

गर्भपाताच्या अपराध-भावनेतून मुक्तता

21/05/2026
Does God Accept the Worship of All Religions?

देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारतो काय?

28/05/2026

ख्रिस्ती जीवनात आशेची भूमिका

The Role of Hope in the Christian Life

ख्रिस्ती जीवनातील तीन मुख्य सद्गुण—विश्वास, आशा आणि प्रीती—हे सर्व महत्त्वाचे आहेत. प्रीती जितकी महत्त्वाची आहे (1 करिंथकरांस पत्र 13:13), तितकाच विश्वासही  महत्वाचा आहे, हे आपण जाणतो. आपण विश्वासाच्या महत्त्वावर बारकाईने विचार करीत आहोत, प्रीतीचे महत्त्वही आपल्याला उमगले आहे, तरीही या सद्गुणांच्या त्रिसूत्रातला तिसरा घटक म्हणजे आशा, ख्रिस्ती अनुभवात कित्येकदा दुर्लक्षितच राहतो .

रोमकरांस पत्र 5 मध्ये आपण जर कोणत्या एका शब्दाचा अर्थ सहज पूर्णपणे चुकवू शकतो, तर तो ‘आशा’ हा शब्द आहे. पौलाने हा शब्द जसा वापरला आहे, त्याचा नेमका अर्थ काय याविषयीच्या आमच्या समजुतीवर अनेकदा संभ्रमाचे धूसर सावट पडते. आपण ‘आशा’ हा शब्द वापरतो, तेव्हा सामान्यतः आपण त्याचा उपयोग एखादी गोष्ट घडावी अशी इच्छा किंवा आकांक्षा व्यक्त करण्यासाठी करतो, पण ती प्रत्यक्षात घडेलच याची खात्री आपल्याला नसते. नवीन करारात हा शब्द अशा अर्थाने काम करीत नाही. जेव्हा आपण पवित्र आत्म्याद्वारे नव्याने जन्म पावतो, तेव्हा आपण एका अशा आशेसाठी नव्याने जन्म पावत असतो जी ख्रिस्ती जीवन जगण्यामधील आपल्या धैर्याचा आधार बनते. आशा आणि विश्वास यांच्यातील एकमेव फरक हा आहे की, विश्वास जे आधीच घडले आहे त्याकडे पाहतो आणि आपण त्यावर आपला भरवसा ठेवतो, तर आशा म्हणजे केवळ भविष्याकडे पाहणारा विश्वास आहे. 

आशेच्या स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी नवीन करारात वापरलेले रूपक म्हणजे ‘नांगर’ हे आहे. आपल्याला सांगितले जाते की आशा हा आत्म्याचा नांगर आहे. नवीन करारात हे नौकानयनाचे रूपक वारंवार दिसते. जे अस्थिर असतात त्यांची तुलना नांगर नसलेल्या नौकांशी केली जाते, जे शिकवणुकीच्या प्रत्येक वाऱ्याने इकडे तिकडे हेलकावे खातात. अशा लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे डळमळीतपणा आणि अनिश्चितता असते, परंतु पवित्र आत्म्याद्वारे आत्म्यात रोपण केलेली आशा तशी नसते. ही आशा एक पाया, स्थिरता आणि खात्री देते. आशा हा असा नांगर आहे जो आपल्याला वाऱ्याने उडून जाण्यापासून वाचवतो. ही अशी आशा आहे की, देवाने भविष्यात जे काही करीन असे म्हटले आहे, त्यातील प्रत्येक गोष्ट तो नक्कीच पूर्ण करणार आहे.

नीतिमान ठरविले जाण्याचे फळ म्हणजे याच प्रकारची आशा होय. एका अर्थाने, नीतिमान ठरविले जाणे ही देवाने आपल्या मुक्तीच्या कार्यात आपल्यासाठी दिलेल्या सर्व अभिवचनांची जणू आगाऊ ठेव, म्हणजेच विसार आहे. आपल्या ठायी आशा पवित्र आत्म्याद्वारे निर्माण होते. इतर ठिकाणी पौल पवित्र आत्म्याचा ‘विसार’ किंवा ‘आगाऊ ठेव’ आपल्याला देण्याविषयी बोलतो, आणि त्यामुळे आपल्याला भविष्याविषयी संपूर्ण खात्री प्राप्त होते. आशा म्हणजे दीर्घ श्वास घेऊन गोष्टी कशातरी ठीक होतील अशी धूसर इच्छा बाळगणे नव्हे, तर देव जे म्हणतो ते तो अवश्य करीलच, याची ती ठाम खात्री आहे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आर. सी. स्प्रौल

आर. सी. स्प्रौल

डॉ. आर. सी. स्प्रौल हे 'लिगोनियर मिनिस्ट्रीज'चे संस्थापक, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील 'सेंट अँड्र्यूज चॅपल'चे मुख्य उपदेशक आणि शिक्षक, तसेच 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'चे पहिले अध्यक्ष आणि 'टेबलटॉक' या मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा 'रिन्यूइंग युअर माइंड' हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ केंद्रांवर दररोज प्रसारित केला जातो आणि तो ऑनलाइन देखील ऐकता येतो. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये 'द होलिनेस ऑफ गॉड' , 'चोजन बाय गॉड' आणि 'एव्हरीवन्स अ थिओलॉजियन' यांसारख्या प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश आहे. पवित्र शास्त्राच्या अचूकता यावर प्रभावीपणे बचाव करण्यासाठी आणि देवाच्या लोकांनी त्यांच्या वचनावर ठाम विश्वासाने उभे राहण्याच्या गरजेवर भर देण्यासाठी ते जगभरात ओळखले जात होते.