The Motivation for Love

प्रीतीची प्रेरणा

11/06/2026
The Motivation for Love

प्रीतीची प्रेरणा

11/06/2026

आळस आणि उद्योगीपणा

Sloth and Diligence

जेव्हा सोळाव्या शतकातील प्रोटेस्टंट धर्मसुधारणेच्या चिरस्थायी वारशाचा विचार केला जातो, तेव्हा अनेक गोष्टी सहजपणे मनात येतात, जसे की केवळ विश्वासाद्वारे, केवळ ख्रिस्तामध्ये, केवळ देवाच्या वचनानुसार, आणि केवळ त्याच्या गौरवासाठी असलेले आमचे नीतिमान ठरविले जाणे. परंतु धर्मसुधारणेचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो अनेकदा लक्षात न येता आपल्या दृष्टीआड राहतो; आणि तो टप्पा “प्रोटेस्टंट कार्यनीती” या वाक्प्रचारात जतन झालेला आहे. ह्या अभिव्यक्तीचा संबंध “प्रामाणिक कामासाठी प्रामाणिक मोबदला” अशा म्हणींसारख्या विचारांशीही जोडला जातो. परंतु याला प्रोटेस्टंट कार्यनीती म्हणण्याचे कारण मुळात हे आहे की, धर्मसुधारकांनी पुन्हा स्पष्ट केलेल्या किंवा पुनर्स्थापित केलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे ही कल्पना की सर्व कायदेशीर कामे, केवळ धार्मिक किंवा मंडळीशी संबंधित कामेच नव्हे, तर सर्वच, देवाकडून पवित्र केली जातात. थोडक्यात सांगायचे तर, सुधारकांनी मानवी श्रमाच्या प्रतिष्ठेची पवित्र शास्त्रीय संकल्पना पुन्हा उजेडात आणली. 

पवित्र शास्त्रात मानवी श्रमाचे महत्त्व काय आहे, हे समजून घ्यायचे असेल, तर आळस आणि सुस्तपणाचा अत्यंत कठोर शब्दांत निषेध करणारे अनेक शास्त्रभाग पाहिले, की ते पुरेसे ठरते: “उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते.” (नीतिसूत्रे 12:24). “हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही; म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही.” (नीतिसूत्रे 20:4). “उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.” (नीतिसूत्रे 21:25). “कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हादेखील आम्ही तुम्हांला अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वत:चेच अन्न खावे.” (2 थेस्सलनीकाकरांस 3:10-12). हे शास्त्रभाग सूचित करतात त्याप्रमाणे, काम करण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीने काम न करणे हे काही लहानसहान पाप नाही. प्रेषित पौल 1 तीमथ्य 5:8 मध्ये ही बाब अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडतो: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणार्‍या माणसापेक्षा वाईट आहे.”

प्रोटेस्टंट कार्यनीति ही संकल्पना केवळ प्रामाणिक श्रमाचा गुण अधोरेखित करत नाही, तर त्या श्रमांतील उद्योगीपणावरही ती तितकाच भर देते. नीतिसूत्रे 18:9 या सत्याला ठळकपणे अधोरेखित करते: “आपल्या कामात हयगय करणारा, नासधूस करणार्‍याचा भाऊ होय.” नीतिसूत्रांच्या संपूर्ण ग्रंथात केवळ काम करणाऱ्या माणसाचीच प्रशंसा केली जात नाही, तर जो परिश्रमपूर्वक काम करतो त्याचीही प्रशंसा केली जाते. म्हणजेच, आपण आपल्या श्रमात सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले पाहिजेत. 

जेव्हा आपण आपल्या श्रमातून विश्रांती घेतो आणि 
त्याच्यावर व आपल्यासाठी त्याने केलेल्या कार्यावर चिंतन करतो,
तेव्हा आपली कृतज्ञता पुन्हा प्रज्वलित होते आणि जीवन व कामाकडे पाहण्याचा 
आपला दृष्टिकोन ख्रिस्त-केंद्रित राहतो.

परंतु आपल्या पतित अवस्थेमुळे काही जण आळशी असतात आणि काम करण्यास नकार देतात, तर काही जण काम करीत असूनही त्यात सुस्त व निष्काळजी राहतात. पापामुळे काही जण कामाकडे स्वार्थी रीतीने पाहतात, म्हणजे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देवाला ते देऊ शकतील अशी सेवा, किंवा आपल्या कामामुळे त्याला जो गौरव मिळतो, यांविषयी त्यांना फारशी काळजी नसते. ते कामाकडे फक्त पैसा मिळवण्याचा, आणि त्या पैशातून स्वतःसाठी वस्तू मिळवण्याचा, एक मार्ग म्हणून पाहतात.  

पापामुळे काही जण कामात इतके गुरफटून जातात की ते आपल्या कुटुंबाकडे, आणि अगदी स्वतःच्या आध्यात्मिक कल्याणाकडेही, दुर्लक्ष करतात. आजच्या काळात अनेकांचे वैशिष्ट्य ठरलेली ‘कामालाच सर्वस्व मानणारी’ वृत्ती पवित्र शास्त्रात आज्ञापिलेल्या उद्योगीपणाचे रूप धारण केल्यासारखी दिसते. परंतु हे स्वतःची फसवणूक करणे आहे. आपले परिश्रमपूर्वक काम देव आणि कुटुंबाशी स्पर्धा करण्यासाठी नाही.

पापामुळे काही जण आपण करत असलेल्या कामाच्या प्रकारामुळे स्वतःविषयी उच्च विचार बाळगतात, आणि त्याच अनुषंगाने इतरांना कमी लेखतात. आपल्या संस्कृतीत अशा झगमगत्या नोकऱ्या भरपूर आहेत, ज्या आपल्या पदामुळे आपण इतरांपेक्षा स्वभावतःच श्रेष्ठ आहोत, असा भ्रम निर्माण करतात. यामुळे ज्यांच्याकडे “मोहक” किंवा “झगमगत्या” नोकऱ्या नाहीत, त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या चारित्र्याविषयी, आणि त्यांच्या प्रतिष्ठेविषयी, तुच्छतापूर्ण मते बनवली जातात.

ख्रिस्ती लोकांनी कामाविषयीच्या अशा विकृत मानसिकतेपासून सावध राहिले पाहिजे, आणि असे विचार आपल्या अंतःकरणात उद्भवू लागतात, तेव्हा पश्चात्ताप केला पाहिजे. या कारणास्तव, ख्रिस्ती दृष्टीकोनातून कामाविषयी होणाऱ्या कोणत्याही चर्चेत शब्बाथाचा विचार करणे आवश्यक आहे. उत्पत्ति 2:3 असे सांगते: “मग देवाने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला व तो पवित्र केला; देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.” आपण आपल्या श्रमातून जसे आपल्या निर्माणकर्त्याचे प्रतिबिंब पाडतो आणि त्याला गौरवितो, तसेच आपण शब्बाथ पाळताना देखील त्याच्यावर मनन करणे आणि त्याला गौरविणे, हे आपले कर्तव्य आहे. तिथेच आपल्या श्रमाला योग्य दृष्टिकोन मिळतो. इब्री लोकांस पत्राचा लेखक घोषित करतो की ख्रिस्त हा आपला अंतिम विसावा आणि शब्बाथ आहे (इब्री 3:7-4:10). जेव्हा आपण आपल्या श्रमातून विश्रांती घेतो आणि त्याच्यावर व आपल्यासाठी त्याने केलेल्या कार्यावर चिंतन करतो, तेव्हा आपली कृतज्ञता पुन्हा प्रज्वलित होते आणि जीवन व कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ख्रिस्त-केंद्रित राहतो. 

तर मग, प्रोटेस्टंट कार्यनीतिचे काही परिणाम काय आहेत? आळस, रिकामटेकडेपणा आणि सुस्तपणा ही आपल्या निर्माणकर्त्याविरुद्धच्या मानवी बंडाची अभिव्यक्ती आहेत, आणि त्याच्या गौरवाचा अपमान आहेत.

कामाविषयीच्या आपल्या विचारांना जर आपण जगाकडून आकार घेऊ दिला, तर आपल्या व्यवसायालाच मूर्ती बनवण्याची प्रवृत्ती आपल्यात सहज येईल. केवळ काम करणे पुरेसे नाही, तर ते उद्योगीपणाने करणे आवश्यक आहे, जेणेकरून आळसाला जागा मिळू नये, आणि आपण केवळ माणसांना खूश करणारेही ठरू नये. 

आळस आणि सुस्तपणाविषयी पवित्र शास्त्र जे कठोर शब्द वापरते, ते आपण मनावर घेतले पाहिजे. आपल्या श्रमांत, आणि आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रांत, आपण देवाच्या गौरवासाठी जगले पाहिजे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

केन जोन्स

केन जोन्स

रेव्ह. केन जोन्स हे मायामी येथील ग्लेनडेल मिशनरी बॅप्टिस्ट चर्चचे पास्टर आहेत. ते 'एक्सपेरिन्सिंग द ट्रुथ: ब्रिंगिंग द रिफॉर्मेशन टू द आफ्रिकन-अमेरिकन चर्च' यासह अनेक पुस्तकांचे योगदानकर्ते आहेत. रेव्ह. जोन्स हे 'सेन्ट्स अँड सिनर्स अनप्लग्ड' या पॉडकास्टचे सह-यजमान आहेत.