
धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे का आहे
30/06/2026
ख्रिस्ती तारणशास्त्रासमोर उभी असलेली समकालीन आव्हाने
07/07/2026पहिला वाद: ऑगस्टीन विरुद्ध पेलॅजियस
तारणाच्या सिद्धांताशी संबंधित प्रारंभीच्या मंडळीतील सर्वांत महत्त्वाचा वाद म्हणजे पेलॅजियन वाद होय. पाचव्या शतकातील या वादाच्या निकालाने या विषयावरील पुढील प्रत्येक चर्चेला आकार दिला, इतकेच नव्हे, तर सोळाव्या शतकातील धर्मसुधारणेच्या काळातील तारणशास्त्रीय वादांनाही त्याने दिशा दिली. पेलॅजियन वादाच्या एका बाजूला पेलॅजियस, केलेस्टियस, आणि एक्लॅनमचा ज्युलियन यांसारख्या व्यक्ती आपल्याला दिसतात, तर विरोधी बाजूला ऑगस्टीन आणि जेरोम यांसारख्या व्यक्ती दिसतात. या वादाच्या पुढील टप्प्यात जॉन कॅशियन यांनी अशी भूमिका घेतली, जी पुढे निम-पेलॅजियनवाद किंवा सेमी-पेलॅजियनवाद या नावाने ओळखली जाऊ लागली, परंतु आपल्या उद्देशासाठी आपण मूळ प्रमुख व्यक्तींच्या सर्वांत महत्त्वाच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करू.
पेलॅजियस कोण होता?
पेलॅजियस हा ब्रिटिश संन्यासी होता, आणि पेलॅजियन वादाचा संदर्भ समजून घेण्यासाठी संन्यासवादाविषयी काही समज असणे आवश्यक आहे. तिसऱ्या शतकात एक ख्रिस्ती तपस्वी मठवासी चळवळ सुरू झाली, आणि तिचे प्रकटीकरण संन्यासवादाच्या विकासात झाले. संन्यासी, व्यक्तिगतरीत्या असोत किंवा समुदायांमध्ये असोत, कठोर तपस्वी जीवनशैली स्वीकारत असत; त्यामागील हेतू असा होता की त्या जीवनशैलीद्वारे त्यांना तारण प्राप्त करण्यास साहाय्य व्हावे. तपश्चर्येमध्ये अशा सर्व प्रकारच्या आचारांचा समावेश होता, ज्यांचा उद्देश संन्याशाला शारीरिक वासनांवर आत्मसंयम प्राप्त करून देणे हा होता, जेणेकरून तो देवाशी एकरूपता साधू शकेल.
ऑगस्टीन यांनी संन्यासी आचार किंवा प्रथा यांचा पूर्णपणे नकार केला नाही; मात्र, आपल्या प्रसिद्ध ‘कन्फेशन्स’ या ग्रंथाच्या 10 व्या पुस्तकात त्यांनी आता प्रसिद्ध झालेली ही प्रार्थना लिहिली: “तू जे आज्ञापितोस ते दे, आणि तुला जे हवे ते आज्ञापित कर.” देवाने आपल्या आज्ञांचे पालन करण्याची क्षमता ऑगस्टीन यांना द्यावी, अशी ही विनंती होती. पेलॅजियसच्या मते अशी प्रार्थना कठोर आत्मसंयमावर उभ्या असलेल्या संपूर्ण संन्यासी जीवनशैलीलाच दुर्बल करते, कारण ती आळशी संन्याशांना देवाच्या आज्ञांचे पालन न करण्यासाठी निमित्त देते: “हा देवाचा दोष आहे. आज्ञापालन करण्यास मला समर्थ करणारी कृपाच त्याने मला दिला नाही.” म्हणून पेलॅजियसने ऑगस्टीन यांचा दृष्टिकोन नाकारला.
पेलॅजियसने मूळ पापाचा केलेला अव्हेर
या वादाचे मूळ समजून घेण्यासाठी पेलॅजियस आणि केलेस्टियस यांच्या काही मूलभूत शिकवणी समजून घेणेही आवश्यक आहे. प्रथम, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पेलॅजियसने मूळ पापाची प्रत्येक संकल्पना नाकारली. त्याने मॅनिकीय लोकांशी बराच काळ वाद घातला होता. त्यांचे म्हणणे असे होते की मनुष्याला भौतिक शरीर असल्यामुळे तो स्वभावतः दुष्ट आहे. त्याला प्रत्युत्तर देताना पेलॅजियसने असा युक्तिवाद केला की मनुष्य स्वभावतः चांगला आहे, कारण देवाने त्याची निर्मिती केली आहे.
जेव्हा पेलॅजियसने ऑगस्टिनसारख्या शिक्षकांना असे म्हणताना ऐकले की मनुष्य हा मुळात सात्त्विकच निर्माण करण्यात आला होता, परंतु आदामाच्या पतनाचा परिणाम म्हणून तो भ्रष्ट झाला, तेव्हा त्याला ते मॅनिकीय मतासारखेच वाटले (मॅनिकी मत म्हणजे चांगुलपणा आणि वाईटपणा या दोन समान शक्ती जगावर राज्य करतात असा प्राचीन चुकीचा धार्मिक विचारप्रवाह). त्याला प्रत्युत्तर म्हणून पेलॅजियस म्हणाला की आदामाच्या पापाचा परिणाम केवळ आदामावरच झाला. त्याने असा युक्तिवाद केला की आपण आदामाचे अनुकरण करून पाप करतो, पण आपल्या स्वभावात भ्रष्टता आली म्हणून आपण पाप करतो, असे नाही. उलट, आदामाची मुले म्हणून आपण अनुकरणाद्वारे पापाची सवय आत्मसात करतो, जसे मुले नैसर्गिकरित्या आपल्या आईवडिलांच्या सवयी आणि बोलण्याच्या लकबी आत्मसात करतात. कालांतराने, एखाद्या उच्चारछटेप्रमाणे पापाची सवयही मनुष्याच्या अंगवळणी पडते.
पेलॅजियसचा कृपेविषयीचा विलक्षण दृष्टिकोन
आपल्या दृष्टिकोनात तारणामध्ये देवाच्या कृपेला काहीच स्थान नाही, हे पेलॅजियस नाकारणार होता, परंतु त्याचा कृपेविषयीचा दृष्टिकोन समजून घेणे कठीण असू शकते कारण तो रोमन कॅथोलिक किंवा धर्मसुधारणा काळातील इतर कोणत्याही कृपेच्या सिद्धांतापेक्षा खूप वेगळा आहे.
प्रथम, पेलॅजियसच्या मते, पवित्र शास्त्रातील देवाचे प्रकटीकरण ही कृपापूर्ण देणगी आहे. देवाने आपल्याला त्याचे नियमशास्त्र द्यावेच, हे आवश्यक नव्हते. दुसरे म्हणजे, येशूची देणगी ही कृपापूर्ण आहे. अनुकरण करण्यासाठी आता आपल्याजवळ नवा आदाम आहे. आपण येशूचे अनुकरण केले, तर आपण हळूहळू आज्ञापालनाची नवी सवय अंगी विकसित करतो, आणि ख्रिस्त पापरहित असल्यामुळे, आपणही योग्य निवड केली, तर पापविरहितपणा साध्य करू शकतो. तिसरे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपला मानवी स्वभाव हाच कृपेची देणगी आहे. निर्माण केले जावे, अशी मागणी आपण केली नव्हती. चांगले किंवा वाईट निवडण्याची क्षमता हा आपल्या स्वभावाचा एक भाग आहे. ती क्षमता देवाकडून मिळालेली अशी देणगी आहे, जी आपण स्वकष्टाने मिळवलेली नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आदामाऐवजी येशूचे अनुकरण करावे अशी निवड करण्यासाठी जे मुक्त इच्छास्वातंत्र्य आवश्यक आहे, ते देवाने आपल्याला कृपेने दिले आहे. म्हणून पेलॅजियससुद्धा तारण कृपेनेच आहे, असा दावा करतो.
ऑगस्टीन यांचे प्रत्युत्तर
ऑगस्टीन यांनी प्रत्युत्तर देताना असे दाखवून दिले की पेलॅजियसला मानवजातीच्या समस्येचे स्वरूपच पूर्णपणे समजले नव्हते; आणि परिणामी, त्या समस्येवरील उपायही त्याला पूर्णपणे समजला नव्हता. मूळ पाप आणि आदामाच्या पतनातून उद्भवलेली मानवी स्वभावाची भ्रष्टता नाकारून पेलॅजियसने कृपेचा असा सिद्धांत उभा केला, जो मुळीच कृपादान नाही. ऑगस्टीन यांनी आग्रहाने सांगितले की आदामाच्या पतनापूर्वीची मानवस्थिती आणि पतनानंतरची मानवस्थिती यांत प्रचंड फरक आहे. आदामाचा भ्रष्ट स्वभाव त्याच्या सर्व संततीत उतरतो, यावरही त्यांनी ठाम भर दिला. ऑगस्टीन यांच्या दृष्टीने, कृपा ही अशा पापी लोकांना दिलेली देणगी आहे जे तिच्यासाठी पात्र नाहीत.
हे समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे की ऑगस्टीन यांनी कृपेचा सिद्धांत अशा काही प्रकारांनी विकसित करण्यास सुरुवात केली ज्यामुळे पुढे मध्ययुगीन मंडळीय-याजकीय तारणशास्त्रीय व्यवस्थेच्या विकासाला हातभार लावला, आणि आज हीच व्यवस्था रोमन कॅथोलिक धर्माची ओळख झाली आहे. परंतु येथे आपल्या उद्देशासाठी पेलॅजियन वादातील मुख्य मुद्दा हा होता की मूळ पापाच्या सिद्धांताच्या बायबलनिष्ठ सत्यावर ठाम आग्रह धरणे आवश्यक आहे. ऑरेंज परिषदेच्या नियमांमध्ये हे सविस्तरपणे मांडण्यात आले होते (529). जोपर्यंत समस्येचे अचूक निदान होत नाही, तोपर्यंत उपायाचे, म्हणजे तारणाच्या सिद्धांताचे, योग्य आकलन होण्याची कोणतीही शक्यता नसते.
आपल्या पुढील लेखात आपण पाहू की, मूळ पापाचा सिद्धांत मान्य असूनही, मनुष्याच्या समस्येतील दुसरा एक पैलू चुकीचा समजल्यामुळे रोमने विकृत तारणशास्त्र कशा प्रकारे विकसित केले.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


