
पहिला वाद: ऑगस्टीन विरुद्ध पेलॅजियस
02/07/2026
रोमन कॅथलिक याजकीय तारणशास्त्राचा विकास
09/07/2026ख्रिस्ती तारणशास्त्रासमोर उभी असलेली समकालीन आव्हाने
डॉर्ट येथे झालेल्या धर्मसभेमध्ये डच धर्मसुधारित मंडळ्यांतील आर्मिनियनवाद अधिकृतपणे मिटवण्यात आला; परंतु आर्मिनियनवाद स्वतः मात्र अस्तित्वातून नाहीसा झाला नाही; उलट आर्मिनियनवादाचे पुरस्कर्ते पुढेही सातत्याने ख्रिस्ती तारणशास्त्रासमोर आव्हाने उभी करत राहिले. आजपर्यंत ते असेच करीत आहेत. तथापि, आर्मिनियनवाद हेच एकमेव महत्त्वाचे समकालीन आव्हान नाही. या लेखात आपण ख्रिस्ती तारणशास्त्रासमोरील आणखी पाच समकालीन आव्हानांकडे थोडक्यात पाहणार आहोत.
1. नीतिमान ठरविले जाण्याविषयी नव्याने व्याख्या
ख्रिस्ती तारणशास्त्रासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक म्हणजे नीतिमान ठरविले जाण्याविषयी नव्याने केलेल्या सैद्धांतिक व्याख्या. उदाहरणार्थ, पहिल्या शतकातील यहूदी धर्माविषयीच्या त्यांच्या बदललेल्या समजुतीचा आधार घेत, ‘पौलाविषयीचा नवा दृष्टिकोन’ मांडणाऱ्या समर्थकांनी, नावाप्रमाणेच, पौलाच्या तारणविषयक सिद्धांताविषयी एक नवा दृष्टिकोन मांडला आहे. उदाहरणार्थ, एन. टी. राईट यांच्या मते, “नीतिमान ठरविले जाणे” म्हणजे एखादी व्यक्ती आधीच देवाच्या लोकांमध्ये आहे, अशी देवाची घोषणा. तथापि, नीतिमान ठरविले जाण्याची वर्तमान आणि भविष्यकालीन अशा दोन्ही कृती आहेत, असे ते मानतात. आपले भविष्यकालीन नीतिमान ठरविले जाणे हे कराराप्रती असलेल्या आपल्या विश्वासूपणावर आधारलेले आहे.
फेडरल व्हिजन म्हणून ओळखले जाणाऱ्या शिकवणुकीच्या समर्थकांनीही नीतिमान ठरविले जाण्याच्या सिद्धांतातील आपल्या सुधारित आवृत्तीद्वारे ख्रिस्ती तारणशास्त्राला नव्याने आव्हान दिले आहे. त्यांच्या शिकवणीच्या मोठ्या भागाचे मूळ वेस्टमिन्स्टर थिओलॉजिकल सेमिनरीतील ईश्वरशास्त्राचे प्राध्यापक नॉर्मन शेफर्ड यांच्यापर्यंत मागे नेता येते. त्यांनी विश्वासाची व्याख्या विश्वासूपणा अशी केली, आणि त्यामुळे नीतिमान ठरविले जाण्याच्या आधारांत आपल्या कर्मांचाही काही अंश सामावून घेतला. फेडरल व्हिजनच्या पुरस्कर्त्यांपैकी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, शेफर्ड यांच्या सिद्धांतातील घटक पौलाविषयीचा नवा दृष्टिकोन’ यांतील घटकांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी, त्यांनी बायबलनिष्ठ सुवार्तेलाच खीळ घातली आहे. देवाचे आभार की सर्व प्रमुख धर्मसुधारित पंथांनी या खोट्या शिकवणी अधिकृतपणे नाकारून त्यांचा विरोध केला आहे.
2. देवाच्या सिद्धांताविषयी नव्याने केलेली व्याख्या
नीतिमान ठरविले जाण्याच्या सिद्धांताच्या नव्याने केलेल्या व्याख्यांचा तारणशास्त्रावर होणारा परिणाम जसा लगेच स्पष्ट दिसतो, तसा देवाविषयीच्या सिद्धांताच्या नव्याने केलेल्या व्याख्यांचा परिणाम कदाचित तितक्या लगेच दिसून येणार नाही; परंतु तो तितकाच महत्त्वाचा आहे. ज्याअर्थी पवित्र शास्त्रातील प्रत्येक सिद्धांत देवाविषयीच्या सिद्धांताशी संबंधित आहे, त्याअर्थी देवाविषयीच्या सिद्धांताची जेव्हा नव्याने व्याख्या केली जाते, तेव्हा इतर प्रत्येक सिद्धांत प्रभावित होतोच. अशा नव्याने केलेल्या व्याख्या आता केवळ उदारमतवादी ईश्वरशास्त्रज्ञांद्वारेच केल्या जात नाहीत. स्वतःला इव्हॅन्जेलिकल आणि धर्मसुधारित म्हणविणारे ईश्वर-शास्त्रज्ञही देवाविषयीच्या सिद्धांताची नव्याने व्याख्या मांडण्यात गुंतलेले आहेत. काहीजण आता देवाचे वर्णन काळाच्या प्रवाहात सहभागी असणारा, घटना घडत जातात तसे त्यांना प्रतिसाद देणारा आणि त्यांच्याशी जुळवून घेणारा, प्रत्येक क्षणी आपली इच्छा, भावना आणि हेतू बदलणारा, अशा शब्दांत करतात. या दृष्टिकोनानुसार, देव प्रतिसाद देतो असे म्हणणे ही केवळ मानवभाषेसाठी सोयीस्करपणे मांडलेली अभिव्यक्ती नाही; उलट, देव खरोखरच बदलतो, असेच हे मत प्रतिपादित करते.
थोडक्यात, देव आपल्या सृष्टीतील प्राण्यांइतकाच परिवर्तनशील आहे, असे या मतात मानले जाते. अशी नव्याने केलेली व्याख्या ख्रिस्ती तारणशास्त्रासाठी जे आव्हान निर्माण करते, ते अगदी स्पष्ट आहे. जर देवाची इच्छा परिवर्तनशील असेल, तर आपल्या तारणाविषयीची त्याची इच्छाही परिवर्तनशील ठरेल. मग आपली आशा विसंबून राहील असा खऱ्या अर्थाने स्थिर पाया राहत नाही. देवाने ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे तारण करण्याचे अभिवचन दिले आहे, परंतु जर देव आपले मन बदलत असेल, तर या अभिवचनाविषयी तो आपले मन बदलणार नाही, हे आपल्याला कशावरून कळणार? आपल्यावरील त्याचे प्रेम बदलणार नाही, हे आपल्याला कशावरून कळणार?
3. ख्रिस्ताच्या सिद्धांताविषयी नव्याने केलेली व्याख्या
देवाच्या सिद्धांताविषयी नव्याने केलेल्या व्याख्येप्रमाणेच, ख्रिस्ताच्या सिद्धांताविषयी नव्याने केलेल्या व्याख्या ह्या सुद्धा ख्रिस्ती तारणशास्त्रासमोर गंभीर आव्हान उभी करतात. अशा नवनव्या व्याख्यांचा परिणाम स्पष्ट असला पाहिजे, कारण शुभवर्तमान हे ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वावर आणि कार्यावर केंद्रित आहे (पहा 1 करिंथकरांस 15:3–8). ख्रिस्त कोण आहे याविषयी आपली समज जर आपण बदलली, तर त्याने काय केले आहे याविषयीची आपली समज देखील अपरिहार्यपणे बदलते.
ख्रिस्तशास्त्रातील सर्वांत महत्त्वाच्या समकालीन पुनर्व्याख्यांपैकी एक “पुत्राची सार्वकालिक अधीनता” म्हणून सामान्यपणे ओळखल्या जाणाऱ्या सिद्धांतात दिसून येते. या दृष्टिकोनानुसार पुत्र सार्वकालिकरीत्या पित्याच्या अधिकाराखाली आहे, आणि तो केवळ आपल्या देहधारी भूमिकेतच नव्हे, तर आपल्या सार्वकालिक दैवी स्वभावातही पित्याला अधीन आहे. ही शिकवण ख्रिस्ताविषयीच्या सनातन सिद्धांताला आणि त्रैक्याच्या बायबलनिष्ठ सिद्धांताला थेट आव्हान देते. या नव्या शिकवणीचे पुरस्कर्ते जरी नायसीन विश्वास-अंगीकाराशी आणि अथानासियस यांसारख्या व्यक्तींशी सातत्य असल्याचा दावा करीत असले, तरी चौथ्या शतकातील त्रैक्यविषयक वादांचे अधिक निकट वाचन केल्यास असे दिसते की अशा कल्पना नायसीन त्रैक्यवादी लेखकांच्या लिखाणात आढळत नाहीत, तर त्या एरियन आणि निम-एरियन यांच्या युक्तिवादांत आढळतात. हे तेच गट होते ज्यांनी विश्वास-अंगीकाराला आणि त्याद्वारे परिभाषित केलेल्या सनातन भूमिकेला विरोध केला होता.
4. धार्मिक बहुलवाद
धार्मिक बहुलवाद (सर्व धर्म सारखेच सत्य आहेत असा विचार ) एकतर वर्णनात्मक मार्गाने किंवा आदेशात्मक मार्गाने समजला जाऊ शकतो. वर्णनात्मक अर्थाने, हे खरे आहे की देवाविषयी आणि तारणाविषयी परस्परविरोधी दृष्टिकोन मांडणारे विविध धर्म मोठ्या संख्येने अस्तित्वात आहेत तथापि, काहीजण वर्णनात्मकतेकडून आदेशात्मकतेकडे वळतात आणि असा युक्तिवाद करतात की सर्व धर्म आणि सर्व धार्मिक दावे समान रीतीने वैध आहेत. हा आदेशात्मक दृष्टिकोन ख्रिस्ती तारणशास्त्रासाठी एक आव्हान आहे कारण तो येशू हाच तारणाचा एकमेव मार्ग आहे या ख्रिस्ती दाव्याच्या अनन्यतेच्या थेट विरोधात आहे.
मनुष्याच्या पतनानंतर अनेक खोटे धर्म उदयास आलेले आहेत. ख्रिस्ती धर्म या खोट्या धर्मांचे खंडन येशू ख्रिस्ताच्या अनन्य दाव्यांच्या आधारावरच करतो. हे सर्व खोटे धर्म एकाच देवाकडे जाणारे केवळ विविध मार्ग आहेत, असे म्हणून ख्रिस्ती लोकांनी आपल्या प्रभूचा विश्वासघात करू नये.
5. सार्वत्रिक तारणवादाचे पुनरुज्जीवन
सार्वत्रिक तारणवाद म्हणजे शेवटी कोणीही न वगळता सर्व मनुष्यांचे तारण होईल, मग त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचलेली असो, वा नसो, ही कल्पना. काहीजण तर त्यात सर्व देवदूतांचाही समावेश करतात. मंडळीच्या इतिहासात सार्वत्रिक तारणवाद विविध रूपांत अस्तित्वात राहिला आहे, आणि अलीकडच्या काळात त्याची लोकप्रियता पुन्हा वाढताना दिसते. पारंपरिक ख्रिस्ती तारणशास्त्रासमोर तो उभे करीत असलेले आव्हान स्पष्ट आहे; कारण शेवटी सर्वांचे तारण होणारच असेल, तर सुवार्ता घोषित करण्याची प्रेरणा फारच क्षीण होते. नरकाचे वास्तव आणि तारणाचा मार्ग म्हणून ख्रिस्ताची अनन्यता यांविषयी पवित्र शास्त्रात इतक्या भरपूर प्रमाणात सांगितलेले आहे की सार्वत्रिक तारणवादी “सुवार्तेवर” विश्वास ठेवणे अशक्य सिद्ध होते. ती केवळ मानव-भावनेतून उद्भवलेली मनाला हवे तसे मानून घेतलेली कल्पना आहे.”
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


