
पवित्र शास्त्रात वर्णिलेले तारण
25/06/2026धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे का आहे
या लघु लेखमालेत आपण सर्वत्र पाहिले आहे, त्याप्रमाणे बायबलशी निष्ठावान असलेले तारणशास्त्र टिकवून ठेवणे ही गृहीत धरता येण्यासारखी गोष्ट नाही. जुन्या करारात अनेक इस्राएली लोकांनी मोशेच्या कराराच्या स्वरूपाचा चुकीचा अर्थ लावला आणि ते तारणाच्या कट्टरपंथी/नियमवादी समजुतीमध्ये पडले. इतर काहीजण उघड मूर्तिपूजेत पतन पावले. आपल्या सेवाकार्यात पौलाने याविषयी आश्चर्य व्यक्त केले की, ज्यांना त्यांनी स्वतः शिकवले होते ते इतक्या लवकर एका वेगळ्याच सुवार्तेकडे कसे काय वळत होते (गलतीकरांस 1:6).
प्रारंभीच्या मंडळीत पेलॅजियनवाद आणि निम-पेलॅजियनवाद ही एक अशी समस्या बनली जी खऱ्या अर्थाने कधीही पूर्णपणे नाहीशी झाली नाही. या दोन्ही पाखंडी मतांचा सुरुवातीला निषेध करण्यात आला असला तरी, चौदाव्या आणि पंधराव्या शतकांपर्यंत येता येता निम-पेलॅजियनवाद हा प्रबळ दृष्टिकोन झाला होता, आणि काहीजण तर पूर्ण विकसित पेलॅजियनवादाशी जवळीक साधू लागले होते. विविध मूर्तिपूजक कल्पनांच्या प्रभावाखाली, तारणाचा अर्थ मानवी स्वभावाच्या उन्नत्तीच्या संदर्भात लावला जाऊ लागला, जे रोमन कॅथोलिक चर्चच्या नियुक्त याजकवर्गाद्वारे संस्कारांच्या प्रशासनाद्वारे पूर्ण केले जात असे. या मंडळीय-याजकीय तारणशास्त्रीय व्यवस्थेने मध्ययुगाच्या प्रवासात बायबलनिष्ठ तारणशास्त्राची पूर्णपणे जागा घेतली. आजही नीतिमान ठरविले जाणे या बायबलनिष्ठ सिद्धांतावर हल्ले सुरूच आहेत, आणि तो सिद्धांत कधी नाकारला जातो, तर कधी त्यात सुधारणा करून नवनवी व्याख्या दिली जाते.
1. धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे आहे, कारण ते बायबलनिष्ठ शिक्षणानुसार आहे.
या शिकवणीद्वारे धर्मसुधारकांनी कर्मांनी मिळणारे तारण आणि कृपेने मिळणारे तारण यांतील फरक स्पष्टपणे अधोरेखित केला, आणि त्यावर ठाम आग्रह धरला. तसेच या शिकवणीद्वारे त्यांनी पेलॅजियन आणि निम-पेलॅजियन विचारसरणीला ऑगस्टीनच्या परंपरेनुसार ठामपणे फेटाळून लावले, आणि रोमन कॅथोलिक मंडळीत शिरकाव केलेल्या नीतिमान ठरविले जाण्याच्या तत्त्वमीमांसात्मक संकल्पनेलाही त्यांनी या शिकवणीद्वारेच फेटाळून लावले, आणि मंडळीला पुन्हा देवाच्या मुक्तिदायी कृपेच्या बायबलनिष्ठ कराराची नव्याने समज दिली.
2. धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे आहे, कारण ते शेकडो धर्मसुधारित ईश्वर-शास्त्रज्ञ आणि सेवकांनी अनेक दशके केलेल्या सखोल व व्यापक शास्त्रार्थपर परिश्रमांत मुळावलेले आहे.
हे एखाद्या बेछूट ‘इन्फ्लुएन्सर’ने (प्रभावकाने) पुरेसा विचार न करता पुढे मांडलेले मत नव्हते. अनेक दशकांच्या काळजीपूर्वक शास्त्रार्थपर परिश्रमांतून व्यापक करारशास्त्र आकाराला आले, ज्याने पतनापूर्वीची अवस्था आणि पतनानंतरची अवस्था यांतील भेद पूर्णपणे स्पष्ट केला. त्याने मंडळीला कर्मे आणि कृपा, तसेच नियमशास्त्र आणि सुवार्ता यांतील बायबलनिष्ठ भेद पुन्हा लक्षात ठेवण्यास भाग पाडले.
3. धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे आहे, कारण ते ईश्वरशास्त्रातील इतर प्रत्येक विषयविभागाशी घनिष्ठपणे जोडलेले आहे.
धर्मसुधारित तारणशास्त्र हे त्रैक्याचा सिद्धांत, देवाचा संकल्प, निर्मिती, ईश्वरनियोजन, मानवशास्त्र, आणि पतन, ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व आणि कार्य, तारणक्रमात तारणाचे लागूकरण, मंडळी आणि तिचे संस्कार, तसेच शेवटचा काळ , यांतील बायबलनिष्ठ संबंध जपून ठेवते. उदाहरणार्थ, आर्मिनिअन तारणशास्त्राप्रमाणे धर्मसुधारित तारणशास्त्र आपल्या ईश्वरशास्त्रीय व्यवस्थेत विसंगती आणि आत्मविरोध निर्माण करत नाही. तारणाविषयी पित्याचा हेतू एक आणि पुत्राचा हेतू पूर्णपणे वेगळा, असे ते मानत नाही.
4. शेवटी, धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे आहे, कारण सुवार्ता महत्त्वाची आहे.
देव काही करत नाही, तोपर्यंत आदाम आणि हव्वा यांचे सर्व पुत्र व कन्या पापात मृत, देवाचे शत्रू आणि आशाविरहीत अशा अवस्थेत जन्मास येतात. परंतु देवाचे उपकार-स्तवन असो, येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि कार्यामध्ये, तसेच त्याच्याद्वारे, त्याने खरोखरच काहीतरी केले आहे, आणि आता हीच सुवार्ता घोषित करण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आले आहे. पौल करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात या सुवार्तेचा सारांश मांडतो. तो संदेश असा आहे की,
“कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की,शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला;तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले;आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत.त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला;” (1 करिंथकरांस 15:3–7)
येशू हाच हरवलेल्या मानवजातीसाठी तारणाचा एकमेव मार्ग आहे. त्याच्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणीही येत नाही (योहान 14:6).
कॅनन्स ऑफ डॉर्ड स्पष्ट करतो त्याप्रमाणे,
“सुवार्तेचे अभिवचन हे आहे की, जो कोणी वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळचे जीवन मिळावे. हे अभिवचन, पश्चात्ताप करण्याच्या आणि विश्वास ठेवण्याच्या आज्ञेसह, त्या सर्व राष्ट्रांना आणि लोकांना जाहीर व घोषित केले गेले पाहिजे, ज्यांच्याकडे देव आपल्या सदिच्छेनुसार सुवार्ता पाठवतो.” (दुसरा मुख्य सिद्धांत, कलम 5)
धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्याला ही बायबलनिष्ठ सुवार्ता दृढपणे टिकवून ठेवण्यास भाग पाडते, आणि शतकानुशतके ज्या अनेक धोक्यांनी मंडळीला मोहपाशात पाडले, त्या अनेक सापळ्यांपासून दूर राहण्यास आपल्याला साहाय्य करते. गौरव केवळ देवाचे!
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


