Reforming Soteriology in the Sixteenth Century

सोळाव्या शतकातील तारणशास्त्राची प्रोटेस्टंट सुधारणा

14/07/2026
Reforming Soteriology in the Sixteenth Century

सोळाव्या शतकातील तारणशास्त्राची प्रोटेस्टंट सुधारणा

14/07/2026

आरोहण स्तोत्रे कशी वाचावीत

How to Read the Psalms of Ascents

आरोहण स्तोत्रे हे स्तोत्रसंहितेच्या पाचव्या पुस्तकात येणाऱ्या एकूण पंधरा स्तोत्रांचे (120–134) शीर्षक आहे. आरोहणाची, म्हणजे “वर जाण्याची” स्तोत्रे म्हणून, हा संग्रह इस्राएलमधील स्त्री-पुरुषांसाठी जणू एक आवडती गीतमालाच होती, विशेषतः जेव्हा ते वल्हांडण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण या तीन वार्षिक यात्रेकरूंच्या सणांसाठी यरुशलेमकडे प्रवास करीत असत (पाहा निर्गम 23:14–17; अनुवाद 16:16). 

विश्वासातील आपल्या पूर्वजांप्रमाणे आपणही एका यात्रेवर आहोत. आपला प्रवास या पतित जगातून नव्या यरुशलेमकडे चाललेला आहे. या कठीण आणि अनेकदा धोकादायक मार्गावर असताना ही स्तोत्रे आपल्याला सुज्ञ मार्गदर्शन आणि समृद्ध आध्यात्मिक पोषण देतात.

जर ही स्तोत्रे आपल्या यात्रेत आपल्याला सहाय्य करण्यासाठी असतील, तर आपण ती कशी वाचावीत? पुढील पाच मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला योग्य सुरुवात करण्यास मदत करू शकतात.

1. प्रत्येक स्तोत्र अनेक वेळा वाचा आणि त्याच्या मूलभूत रचनेची रूपरेषा तयार करा.

ही स्तोत्रे इब्री काव्यरूपात लिहिली गेली असल्यामुळे, अशा साहित्याचा अर्थ लावण्याच्या तत्त्वांशी तुम्ही परिचित झाले पाहिजे. समांतर ओळरचना आणि स्तोत्रातील ओळींमधील विविध संबंध यांसारखी वैशिष्ट्ये तुम्हाला प्रत्येक स्तोत्राच्या मूलभूत अर्थापर्यंत पोहोचण्यासाठी चांगली सुरुवात करून देतील. या तत्त्वांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मॅथ्यू एच. पॅटन यांचा “हाऊ टू रीड हिब्रू पोएट्री” हा लेख पाहा.

2. या स्तोत्रांमध्ये दिसणाऱ्या प्रतिमांचे मोल ओळखायला शिका.

एखाद्या प्रतिमेचा अर्थ लावताना तुम्हाला तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. पहिला, चर्चेचा विषय काय आहे? दुसरा, या विषयाचे वर्णन करण्यासाठी स्तोत्रकर्ता कोणती प्रतिमा वापरतो? तिसरा, विषय आणि प्रतिमा यांच्यातील साम्यबिंदू कोणता आहे?

स्तोत्रसंहिता 133 मध्ये दोन ठळक प्रतिमा दिसतात; या स्तोत्राचा विषय देवाच्या लोकांचे ऐक्य हा आहे. पहिली प्रतिमा तेलाची आहे:

पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे! ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे; (स्तोत्रसंहिता 133:1–2)

जर ऐक्य हा विषय असेल आणि तेल ही प्रतिमा असेल, तर त्यांच्यातील साम्यबिंदू कोणता आहे? दावीद ज्या तेलाचा उल्लेख करतो ते पवित्र अभिषेकाचे तेल आहे (निर्गम 30:22–38). हे तेल अतिशय सुगंधी होते आणि त्यातून सुखद सुवास दरवळत असे. म्हणजेच, देवाच्या लोकांमधील ऐक्य असेच सुगंधी, सुखद वातावरण निर्माण करते.

दुसरी प्रतिमा दहिवराची आहे:

सीयोन डोंगरावर उतरणार्‍या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. (स्तोत्रसंहिता 133:3)

जसे दहिवर (किंवा ज्याला दव देखील म्हणतात) गवताला ताजेतवाने आणि टवटवीत करते, तसेच विश्वासणारे जेव्हा देवाच्या कार्यासाठी एकच अंतःकरण आणि एकच मन धारण करतात, तेव्हा ते आत्म्याच्या ताजेतवाने करणाऱ्या नूतनीकरणाचा अनुभव घेतात. 

3. ही स्तोत्रे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण म्हणून वाचा.

पहिली दोन मार्गदर्शक तत्त्वे आपले लक्ष प्रत्येक स्तोत्राच्या साहित्यिक वैशिष्ट्यांकडे वळवतात. तिसरे मार्गदर्शक तत्त्व मात्र आपले लक्ष साहित्यिक बाजूकडून ईश्वरशास्त्रीय बाजूकडे नेते. येशू म्हणाला, “मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यांत माझ्याविषयी जे काही लिहिले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे” (लूक 24:44). स्तोत्रे ख्रिस्ताविषयी आहेत. स्तोत्रसंहिता 1 बाबतीत ही कल्पना समजून घेणे वाचकांना सहसा कठीण जात नाही, कारण येशू हा वचनातील धन्य पुरुष आहे. स्तोत्रसंहिता 22 मध्ये तो त्यागलेला पुरुष आहे. स्तोत्रसंहिता 23 मध्ये तो उत्तम मेंढपाळ आहे.

परंतु आरोहण स्तोत्रांमध्ये आपल्याला येशू कोठे पाहावयास मिळतो? यरुशलेमकडे जाणाऱ्या वाटेवर, विश्वासू यात्रेकरू म्हणून ही स्तोत्रे गाताना त्याला आपण पाहू शकतो. वयाच्या 12 व्या वर्षापासून, जेव्हा तो प्रथम वल्हांडणासाठी यरुशलेमेला गेला (लूक 2:41–51), तेव्हापासून आमचा हा तारणकर्ता नियमितपणे यात्रेकरूंचे सण पाळत असे (पाहा योहान 2:13; 6:4; 7:1–24; 13:1). त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूची वेळ जवळ आली, तेव्हा प्रभूने वल्हांडणासाठी यरुशलेमकडे जाण्याचा निश्चय दृढ केला (लूक 9:51). आपल्या विश्वासूपणाचा शेवट दुःखसहन आणि मृत्यूत होईल, हे माहीत असूनही तो दृढनिश्चयी यात्रेकरू होता (लूक 9:21–22). ही स्तोत्रे वाचताना स्वतःला विचारा: येशूने ही स्तोत्रे कशी गायली असतील? किंवा ही स्तोत्रे तुम्हाला येशूविषयी गाण्यास कशी प्रवृत्त करतात? 

4. स्तोत्राचा संदर्भ समजून घेतल्यानंतर, लागूकरणाकडे वळा.

चौथे मार्गदर्शक तत्त्व साहित्यिक आणि ईश्वरशास्त्रीय विचारांवरून वैयक्तिक लागूकरणाच्या प्रश्नांकडे लक्ष वळवते. पवित्र नगराकडे जाणाऱ्या एखाद्या इस्राएली यात्रेकरूच्या पादत्राणांत स्वतःला उभे करा, आणि स्वतःला हे प्रश्न विचारा:

● नव्या यरुशलेमेकडे प्रवास करणारा विश्वासू यात्रेकरू असणे, याचा माझ्यासाठी काय अर्थ आहे?
● माझ्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांतून मी कसा मार्ग काढला पाहिजे? (पाहा स्तोत्रसंहिता 121:1)
● माझ्या जीवनात उपासनेची आतुरता आणि आनंदोत्सव कसा दिसला पाहिजे?

5. या स्तोत्रांमध्ये दिसून येणारी देवाच्या लोकांची सामूहिक भूमिकेचे मोल करायला शिका.

इस्राएली लोक सणांसाठी यरुशलेमेला जात असत, तेव्हा ते समूहाने प्रवास करीत. वल्हांडणानंतर नासरेथला परतताना येशू दिसला नाही, तेव्हा मरिया आणि योसेफ यांना सुरुवातीला काही विशेष काळजी वाटली नाही, कारण तो उत्तरेकडे चाललेल्या यात्रेकरूंच्या घोळक्यात इतरांसोबत असेल, असे त्यांनी गृहीत धरले होते (लूक 2:43–44). आपण प्रत्येकजण यात्रेकरू असलो, तरी या प्रवासात आपण एकटे चालत नाही. म्हणून आपण एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे (स्तोत्रसंहिता 122:1), आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या सर्वांच्या हितांची काळजी घेतली पाहिजे (स्तोत्रसंहिता 122:8), आपण सर्वजण संकटांना सामोरे जातो हे ओळखले पाहिजे (स्तोत्रसंहिता 123:2–4), आणि बंधूसहवासात मिळणाऱ्या आनंदाची चव घेण्यास शिकले पाहिजे (स्तोत्रसंहिता 133).

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

रेट पी. डॉडसन

रेट पी. डॉडसन

डॉ. रेट पी. डॉडसन हे हडसन, ओहायो येथील ग्रेस प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये वरिष्ठ पाळक आहेत. ते ‘मार्चिंग टू झायन’ आणि ‘विथ अ माईटी ट्रायम्फ’ यांसह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.