The Development of Roman Catholic Sacerdotal Soteriology

रोमन कॅथलिक याजकीय तारणशास्त्राचा विकास

09/07/2026
How to Read the Psalms of Ascents

आरोहण स्तोत्रे कशी वाचावीत

16/07/2026
The Development of Roman Catholic Sacerdotal Soteriology

रोमन कॅथलिक याजकीय तारणशास्त्राचा विकास

09/07/2026
How to Read the Psalms of Ascents

आरोहण स्तोत्रे कशी वाचावीत

16/07/2026

सोळाव्या शतकातील तारणशास्त्राची प्रोटेस्टंट सुधारणा

Reforming Soteriology in the Sixteenth Century

सोळाव्या शतकात तारणाच्या बायबलनिष्ठ सिद्धांताचा पुनर्शोध एकदम, एका क्षणात झाला नाही. प्रारंभीच्या धर्मसुधारकांनी प्रथम नीतिमान ठरविले जाणे या शब्दाचा बायबलमधील अर्थ पुन्हा शोधून काढला. त्यांना उमगले की त्याचा अर्थ “नीतिमान बनविणे” असा नसून “नीतिमान घोषित करणे” असा आहे. यामुळे त्यांना हे समजले की नीतिमान ठरविले जाण्याचे साधनीभूत कारण बाप्तिस्मा नसून केवळ विश्वास आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, धर्मसुधारकांना सर्वप्रथम हे दिसले की मनुष्याच्या सर्वात मोठ्या दुर्दशेवरील जो उपाय काढण्यात आला होता त्याविषयी उत्तर-मध्ययुगीन मंडळीची समज विकृत होती.

काळांतराने, त्यांनी पवित्र शास्त्राच्या मजकुराचा परिशीलनपूर्वक अभ्यास केला आणि त्यातील शिकवणीची रोमन कॅथलिक चर्चच्या शिकवणीशी तुलना केली, तेव्हा त्यांना असे दिसून आले की रोमची उपायाबद्दलची समज विकृत होती, कारण मानवाची नेमकी दुर्दशा काय ह्याविषयीच त्याची समज विकृतीने भरलेली होती. रोमचे तारणशास्त्र, म्हणजे तारणाचा सिद्धांत, ज्या प्रकारे विकसित झाले, त्यामागे आदामाच्या पापाच्या परिणामाविषयी रोमची समज कारणीभूत होती. मागील लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, रोमन कॅथलिक चर्चने असे शिकवले की आदाम पापात पडला तेव्हा त्याने नीतिमान ठरविणाऱ्या किंवा पवित्रीकरण करणाऱ्या कृपेची एक अतिरिक्त देणगी  गमावली. या दृष्टिकोनानुसार, आदाम आणि त्याची संतती अस्तित्वाच्या अलौकिक स्तरावर पुन्हा उन्नत होण्यासाठी त्यांना ती कृपा पुन्हा प्राप्त करणे आवश्यक होते. त्यांच्या मते, हे रोमन कॅथलिक चर्चच्या संस्कारांद्वारे साध्य केले जाते.

पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना धर्मसुधारकांना हे जाणवले की मनुष्याच्या पतनाविषयीचा रोमन कॅथलिक सिद्धांत पवित्र शास्त्राच्या मजकुराला पूर्ण न्याय देत नाही. त्यांना हे समजले की पतन झाले तेव्हा मनुष्याने केवळ अतिरिक्त कृपेची देणगी गमावली आणि मग त्याचे परिणाम म्हणून त्याच्या मूळ स्वभावाला फारशी इजा किंवा हानी झाली नाही, असे नव्हते. उलट, पुढे वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकाराने जसे व्यक्त केले त्याप्रमाणे, मनुष्याचे पतन झाले तेव्हा :

तो भ्रष्टतेचा परिणाम म्हणून आपल्या मूळच्या नीतिमत्वापासून आणि देवाशी असलेल्या सहवासापासून पूर्णपणे दूर झाला, आणि अशा प्रकारे पापात मृत झाला, आणि त्याचा आत्मा व शरीराच्या सर्व अवयवांत आणि शक्तींमध्ये पूर्णपणे अशुद्ध झाला. (डब्लूसीएफ 6.2)

या पतित अवस्थेचे वर्णन करण्यासाठी पुढे रूढ झालेला ईश्वरशास्त्रीय शब्द म्हणजे सर्वांगीण अधःपतन (Total Depravity).

येथे पुन्हा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ईश्वरशास्त्रात मनुष्य ज्या गोष्टीकडे समस्या म्हणून पाहतो, समाधानाचे स्वरूप देखील त्यावरूनच ठरविले जाते, म्हणजे तारणशास्त्राला, दिशा देते. पेलॅजियसचा तारणाचा सिद्धांत जसा आहे, तसा तो त्याच्या समस्येविषयीच्या आकलनामुळेच आहे. रोमचा तारणसिद्धांत जसा आहे, तसा तो त्याच्या समस्येविषयीच्या आकलनामुळेच आहे. पापात मृत असलेल्या मनुष्याचे तारण आणि पापामुळे केवळ घायाळ झालेल्या मनुष्याचे तारण, यांसाठी मुक्तीचे समाधान हे पूर्णपणे परस्पर विरोधी असणे आवश्यक असते. 

धर्मसुधारित मंडळ्यांनी मनुष्याच्या दुर्दशेवरील देवाचा उपाय देवाने स्वतः आणि मनुष्य यांच्यामध्ये केलेल्या कराराच्या संदर्भात स्पष्ट केला. वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार पवित्र शास्त्रातील तारणसिद्धांताचे एक अतिशय स्पष्ट विधान सादर करतो. पुढे जे दिले आहे, ते प्रामुख्याने याच विश्वास-अंगीकारातून घेतलेले आहे. वाचकांनी बायबलमधील प्रमाणवचने असलेली प्रत शोधून ती सर्व काळजीपूर्वक अभ्यासावी, असे उत्तेजन मी त्यांना इथे देऊ इच्छितो. 

वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार जसे स्पष्ट करतो, त्याप्रमाणे पतनापूर्वी देवाने आदामाशी एक करार केला होता, “ज्यामध्ये आदामाला जीवनाचे अभिवचन देण्यात आले होते; आणि त्याच्यामध्ये त्याच्या संततीलाही, परिपूर्ण आणि वैयक्तिक आज्ञापालनाच्या अटीवर” (डब्लूसीएफ 7.2). येथे विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, रोमच्या शिकवणीच्या उलट, पतनापूर्वी आदामाकडे नियमशास्त्राचे पालन करण्याची शक्ती आणि क्षमता होती (डब्लूसीएफ 4.2; 19.1). शिवाय, मूळ नीतिमत्व हे त्याच्या स्वभावाचाच भाग होते, कारण त्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते (डब्लूसीएफ 4.2; 6.2). रोमन कॅथलिक चर्चने शिकवल्याप्रमाणे ती त्याच्या स्वभावात जोडलेली एखादी अतिरिक्त देणगी नव्हती.

मनुष्याच्या पतनामुळे तो आता नियमशास्त्राचे परिपूर्ण पालन करण्यास समर्थ राहिला नाही, आणि त्यामुळे पहिल्या कराराच्या अटी पूर्ण करण्यासही समर्थ राहिला नाही. म्हणून देवाला “दुसरा करार करण्यास संतोष झाला, ज्याला सामान्यपणे कृपेचा करार म्हणतात; ज्यामध्ये तो येशू ख्रिस्ताद्वारे पाप्यांना जीवन आणि तारण विनामूल्य देऊ करतो; त्यांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्याकडून तो ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची मागणी करतो; आणि ज्यांची सार्वकालिक जीवनासाठी नेमणूक झाली आहे, त्या सर्वांना विश्वास ठेवण्यास इच्छुक आणि समर्थ करण्यासाठी आपला पवित्र आत्मा देण्याचे अभिवचनही देतो” (डब्लूसीएफ 7.3).

आपला एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्त, ह्याला देव आणि मनुष्य यांच्यामधील एकमेव मध्यस्थ होण्यासाठी सनातन काळापासून नेमण्यात आले होते (डब्लूसीएफ 8.1). देवाने आपल्या मुक्त कृपेने आणि प्रेमाने, “जगाच्या स्थापनेपूर्वीच, त्याच्या सार्वकालिक आणि अपरिवर्तनीय उद्देशानुसार आणि त्याच्या इच्छेच्या गुप्त सत्संकल्पाप्रमाणे ख्रिस्तामध्ये ज्यांना निवडले, त्या आपल्या लोकांचे तारण करण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली होती (डब्लूसीएफ 3.5). 

प्रभू येशूने आपल्या परिपूर्ण आज्ञापालनाने आणि स्वतःच्या यज्ञार्पणाद्वारे, जे त्याने सार्वकालिक आत्म्याद्वारे एकदाच देवाला अर्पण केले, आपल्या पित्याच्या न्यायाचे पूर्ण समाधान केले आहे; आणि पित्याने त्याला दिलेल्या सर्वांसाठी केवळ समेटच नव्हे, तर स्वर्गाच्या राज्यातील सार्वकालिक वतनही विकत घेतले आहे” (डब्लूसीएफ 8.5).

“प्रभू येशूने आपल्या परिपूर्ण आज्ञापालनाने आणि स्वतःच्या यज्ञार्पणाद्वारे, जे त्याने सार्वकालिक आत्म्याद्वारे एकदाच देवाला अर्पण केले, आपल्या पित्याच्या न्यायाचे पूर्ण समाधान केले आहे; आणि पित्याने त्याला दिलेल्या सर्वांसाठी केवळ समेटच नव्हे, तर स्वर्गाच्या राज्यातील सार्वकालिक वतनही विकत घेतले आहे” (डब्लूसीएफ 8.5).

ख्रिस्ताने विकत घेतलेली ही मुक्ती इतिहासातील सर्व निवडलेल्यांना लागू केली जाते (डब्लूसीएफ 8.8).

पतित मनुष्य केवळ पापाने जखमी किंवा आजारी नसून पाप आणि मृत्यूच्या अवस्थेत असल्यामुळे, ख्रिस्ताने विकत घेतलेली मुक्ती स्वतःहून स्वीकारण्यासाठी तो काहीही करू शकत नाही. म्हणून, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने लाजराला कबरेतून बाहेर बोलावले, त्याचप्रमाणे देव निवडलेल्यांना मृत्यूतून प्रभावकारक पाचारण करतो. तो त्यांना नवा जन्म देतो, त्यांना आध्यात्मिक जीवन देतो आणि येशू ख्रिस्ताकडे त्यांना ओढून घेतो (डब्लूसीएफ 10.1). ज्यांना देव पाचारण करतो, त्यांना तो विनामूल्य नीतिमान ठरवितो. ते नीतिमान ठरविले जातात, म्हणजे नीतिमान घोषित केले जातात, ते त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही कृत्यांच्या आधारावर नव्हे, तर केवळ विश्वासाद्वारे प्राप्त झालेल्या ख्रिस्ताच्या नीतिमत्वाच्या आधारावर, जे त्यांच्यासाठी नीतिमत्व म्हणून गणिले जाते  (डब्लूसीएफ 11.1; 14.2). ज्यांना प्रभावीपणे पाचारण करण्यात आले आहे आणि नीतिमान ठरविण्यात आले आहे, त्यांचे आयुष्यभर पवित्रीकरणही केले जाते:

“पापाच्या संपूर्ण देहाची सत्ता नष्ट केली जाते, आणि त्यातील निरनिराळ्या वासना अधिकाधिक क्षीण व मृत केल्या जातात; तसेच ते सर्व तारणदायी कृपेमध्ये अधिकाधिक सजीव आणि बळकट केले जातात, जेणेकरून त्यांनी खऱ्या पवित्रतेचे आचरण करावे, ज्यावाचून कोणीही प्रभूला पाहू शकत नाही”  (डब्लूसीएफ 13.1; तसेच 16.1–7 पाहा)

रोमन कॅथलिक चर्चच्या उलट, धर्मसुधारित मंडळ्यांनी असेही शिकवले की,

ज्यांना देवाने आपल्या प्रिय पुत्रात स्वीकारले आहे, ज्यांचे त्याच्या आत्म्याद्वारे प्रभावीपणे पाचारण झाले आहे आणि ज्यांचे पवित्रीकरण झाले आहे, ते कृपेच्या अवस्थेतून पूर्णपणे किंवा कायमचे पतन पाऊ शकत नाहीत, तर ते नक्कीच शेवटपर्यंत टिकून राहतील आणि त्यांचे सार्वकालिक तारण होईल. (डब्लूसीएफ 17.1)

आमच्या पुढील लेखात, आपण नेदरलँड्समधील काही धर्मसुधारित ईश्वरशास्त्रज्ञ धर्मसुधारित कबुलीजबाबाच्या ईश्वरशास्त्रावर कसे असंतुष्ट झाले आणि त्या धर्मशास्त्राला पुन्हा रोमच्या दिशेने कसे वळवू लागले, हे पाहणार आहोत. शिवाय, आपण डॉर्डच्या सिनडमधील धर्मसुधारित मंडळीने दिलेल्या प्रत्युत्तराचाही आपण विचार करू.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

कीथ ए. मॅथिसन

कीथ ए. मॅथिसन

डॉ. कीथ ए. मॅथिसन हे सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील रिफॉर्मेशन बायबल कॉलेजमध्ये सुनियोजित ईश्वरशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते द लॉर्ड्स सपर: आन्सर्स टू कॉमन क्वेश्चन्स यासह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.