
ख्रिस्ती तारणशास्त्रासमोर उभी असलेली समकालीन आव्हाने
07/07/2026
सोळाव्या शतकातील तारणशास्त्राची प्रोटेस्टंट सुधारणा
14/07/2026रोमन कॅथलिक याजकीय तारणशास्त्राचा विकास
पाचव्या आणि सहाव्या शतकांतील अनेक परिषदांनी पेलॅजियन वाद अधिकृतपणे ऑगस्टीन यांच्या बाजूने निकाली काढला. आदामाच्या पापाचा परिणाम त्याच्या सर्व वंशजांवर झाला आहे आणि तारण केवळ देवाच्या कृपेनेच होते, हे स्पष्ट करण्यात आले. पेलॅजियनवाद आणि निम-पेलॅजियनवाद या दोन्हींचा निषेध करण्यात आला. दुर्दैवाने, मंडळीमध्ये विचारांचे असे काही प्रवाह होते, जे मंडळीच्या अधिकृत घोषणांनंतरही अखेरीस मंडळीला पुन्हा निम-पेलॅजियन दिशेकडे ढकलणार होते.
उदाहरणार्थ, निओप्लॅटोनवादाने मनुष्याच्या तारणाची कल्पना अशी केली की मनुष्याचा आत्मा हा विविध तपस्वी आचारांद्वारे देवाकडे उन्नत होत जातो. अशा कल्पना ख्रिस्ती संन्यासी समुदायांमध्ये खोलवर मुळावल्या, आणि सिद्धांतांच्या विकासावर त्या समुदायांच्या ईश्वरशास्त्रीय प्रभावाचा परिणाम अत्यंत मोठा होता. या कल्पना ऑगस्टीन आणि स्यूडो-डायोनिसियस यांसारख्या प्रचंड प्रभावशाली ईश्वरशास्त्रज्ञांच्या लिखाणातही आढळतात.
धर्मसुधारणेच्या काळापर्यंत पेलॅजियनवादाविरुद्धच्या संघर्षात मिळवलेले अनेक लाभ लयास गेले होते. देवाच्या कृपेवर नव्हे, तर वैयक्तिक गुणवत्तेवर अधिक अवलंबून असलेली तारणाची एक संपूर्ण मंडळीय-याजकीय व्यवस्था प्रबळ झाली होती.
रोमन कॅथलिक तारणशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रोटेस्टंट धर्मसुधारित तारणशास्त्राचा सिद्धांत ज्या ईश्वरशास्त्रीय व्यवस्थेतून उदयास आला आणि ज्याला प्रत्युत्तर म्हणून तो उभा राहिला, ती व्यवस्था समजून घेतल्याशिवाय हा सिद्धांत पूर्णपणे समजता येत नाही.
रोमन कॅथलिक तारणाचा सिद्धांत समजून घेण्यासाठी आदामाच्या काळापर्यंत मागे जाणे आवश्यक आहे. रोमन कॅथलिक ईश्वरशास्त्रानुसार, जेव्हा देवाने आदामाला निर्माण केले त्यावेळी आदामाची उत्पत्ती एक सात्त्विक मनुष्य म्हणून करण्यात आली होती आणि तो आपल्या नैसर्गिक ध्येयांपर्यंत पोहोचू शकला असता, परंतु आपल्या स्वभाविक वृत्तीने तो आपल्या अंतिम अंतकाळविषयक ध्येयापर्यंत, म्हणजे देवाच्या धन्य दर्शनापर्यंत, पोहोचण्यास समर्थ नव्हता. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आदामाला अस्तित्वाच्या नैसर्गिक स्तरावरून अस्तित्वाच्या अलौकिक स्तरावर उन्नत केले जाणे आवश्यक होते. पापमय इच्छांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याची क्षमता त्याला दिली जाणे आवश्यक होते. हे देवाने आदामाला त्याच्या मानवी स्वभावाच्या वर आणि पलीकडे असलेली पवित्रीकरण करणारी कृपा देऊन साध्य केले. म्हणून ती एक “अधिकची” देणगी आहे (डोनुम सुपरअॅडिटुम). या देणगीने आदामाच्या मानवी स्वभावाला उन्नत केले आणि त्याला देवाशी जोडले. तसेच त्याच्या अंतिम अंतकाळविषयक ध्येयाचे पुण्य संपादन करण्यास तिने त्याला समर्थ केले.
परंतु, जेव्हा आदामाने पाप केले, तेव्हा तो अस्तित्वाच्या अलौकिक अवस्थेतून पतन पावला. या पतनात कृपेच्या अधिकच्या देणगीचा लोप झाला, परंतु यामुळे त्याचा स्वभाव नष्ट झाला नाही. मध्ययुगीन काळात आदामाच्या मानवी स्वभावाचे, विशेषतः त्याच्या बुद्धी आणि इच्छाशक्तीच्या सामर्थ्यांचे, किती नुकसान झाले याविषयी मतभेद होते. काहींचे म्हणणे असे होते की त्याच्या मानवी स्वभावाला अजिबात हानी पोहोचली नाही; कृपेची देणगी मिळण्यापूर्वी ज्या अवस्थेत तो निर्माण करण्यात आला होता, त्याच अवस्थेत आदाम फक्त परत गेला. इतरांनी असा युक्तिवाद केला की त्याचा स्वभावावर घाव झाले होते. कोणताही दृष्टिकोन स्वीकारला, तरी आदामाची संतती या पतित अवस्थेतच जन्माला येते.
ईश्वरशास्त्रात मनुष्य ज्या गोष्टीकडे समस्या म्हणून पाहतो, समाधानाचे स्वरूप देखील त्यावरूनच ठरविले जाते. म्हणून तारणाचा सिद्धांत मोठ्या प्रमाणात मानवाची निर्मिती, त्याचे पाप आणि त्या पतनाचे दूरगामी परिणाम यांविषयीच्या सिद्धांतावर अवलंबून असतो. मध्ययुगीन रोमन कॅथलिकांच्या मते, मनुष्याच्या दुर्दशेचे मूळ हे पवित्रीकरण करणाऱ्या कृपेची देणगी गमावण्यातच होते, म्हणून त्यांनी तारणालाही त्या देणगीची पुनर्प्राप्ती असेच स्वाभाविकपणे समजले. मग रोमन कॅथलिक व्यवस्थेत तारण म्हणजे पतित मनुष्यांना अस्तित्वाच्या अलौकिक स्तरावर पुन्हा उन्नत केले जाणे होय. हे कसे साध्य होते? हे साध्य होते रोमन कॅथलिक चर्चच्या संस्कारांद्वारे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, चर्च आणि संस्कारांविषयीचा रोमन कॅथलिक सिद्धांत हाच रोमन कॅथलिक तारणसिद्धांत आहे. मी याचा उल्लेख रोमन कॅथलिक चर्च-याजकीय तारण व्यवस्था असा केला आहे. “एक्लेसियो” हा शब्द चर्चकडे निर्देश करतो, आणि “सॅसर्डोटल” हा शब्द धर्मसंस्कारांकडे निर्देश करतो.
रोमन कॅथलिक व्यवस्थेत बाप्तिस्मा हा असा संस्कार आहे, जो आदामाच्या संतानातील व्यक्तीला त्या अलौकिक अस्तित्वस्थितीत उन्नत करतो, जिच्यातून आदामाचे पतन झाले होते. हा संस्कार त्या व्यक्तीला देवाशी जोडतो आणि तिला सर्व पापांपासून शुद्ध करतो. बाप्तिस्म्याद्वारे पवित्रीकरण करणाऱ्या कृपेची देणगी आत्म्यात रोवली जाते, आणि बाप्तिस्मा घेतलेली व्यक्ती नीतिमान केली जाते. या पवित्रीकरण करणाऱ्या कृपेला नीतिमान ठरवणारी कृपा म्हणूनही ओळखले जाते. याच कारणामुळे रोमन कॅथलिक तारणव्यवस्थेत बाप्तिस्मा हा संस्कार नीतिमान ठरविले जाण्याचे साधनात्मक माध्यम मानला जातो.
बाप्तिस्म्यानंतर नव्या विश्वासणाऱ्याला दृढीकरणाचा संस्कार दिला जातो; तो त्याच्यातील पवित्रीकरण करणारी कृपा वाढवतो आणि बळकट करतो. युखॅरिस्टच्या संस्कारात सहभागी होण्याद्वारेही विश्वासणारा आपल्यातील पवित्रीकरण करणारी कृपा वाढवतो आणि बळकट करतो. जोपर्यंत विश्वासणारा पवित्रीकरणाच्या किंवा नीतिमान ठरविले जाण्याच्या या उन्नत अवस्थेत राहतो, तोपर्यंत शेवटी तारणास पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेली सत्कर्मे तो करू शकतो. आणि जोपर्यंत एखादी व्यक्ती कृपेच्या या अवस्थेत मरण पावते, तोपर्यंत तिच्याबाबत घडू शकणारी सर्वांत वाईट गोष्ट एवढीच की स्वर्गात जाण्यापूर्वी तिला शुद्धीकरणस्थानात (purgatory) काही काळ घालवावा लागेल.
तथापि, जर एखाद्या विश्वासणाऱ्याने मर्त्य पाप केले, म्हणजे गंभीर अपराध मानले जाणारे पाप केले, तर ती व्यक्ती कृपेच्या अवस्थेतून बाहेर पडते. जर कोणी कृपेच्या अवस्थेबाहेर मरण पावले, तर ती व्यक्ती शुद्धीकरणस्थानात जात नाही; त्याऐवजी ती नरकात जाते. तारणाची कोणतीही आशा ठेवायची असेल, तर त्या व्यक्तीला कृपेच्या उन्नत अवस्थेत परत आणले गेले पाहिजे. मग त्या व्यक्तीचा पुन्हा बाप्तिस्मा केला पाहिजे का? नाही. एखाद्या व्यक्तीचा बाप्तिस्मा एकदाच होऊ शकतो. मग पापी व्यक्ती पूर्णपणे आशाहीन राहते का? नाही; कारण या हेतूसाठी रोमन कॅथलिक चर्चकडे आणखी एक संस्कार आहे. कृपेच्या अवस्थेतून बाहेर पडलेल्या पापी व्यक्तीने चर्चकडे जाऊन प्रायश्चित्ताचा संस्कार स्वीकारला पाहिजे. या संस्काराद्वारे पापी व्यक्ती पुन्हा नीतिमान ठरविले जाण्याच्या अवस्थेत उन्नत केली जाते, ज्या अवस्थेत ती अंतकाळविषयक तारणास पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेली कृत्ये करू शकते.
धर्मसुधारणेच्या काळापर्यंत तारणाची ही मंडळीय-याजकीय व्यवस्था पाश्चात्य चर्चवर प्रभुत्व गाजवत होती. ख्रिस्ती लोकांना आध्यात्मिक अनिश्चिततेच्या अवस्थेत जगण्यास भाग पाडले गेले; आपण कृपेच्या अवस्थेत आहोत की नाही, याची खातरी त्यांना कधीच मिळू शकत नव्हती. आणि कृपेच्या अवस्थेत मरण पावल्यासच मनुष्य स्वर्गात जाऊ शकतो, असे मानले जात असल्यामुळे लोकांच्या आध्यात्मिक जीवनावर त्याचा फार मोठा ताण पडत होता. आपल्या पुढील लेखात आपण धर्मसुधारकांनी केलेल्या त्या महान शोधाकडे पाहू, ज्यामुळे त्यांना युरोपातील लोकांपर्यंत पुन्हा एकदा खरी सुवार्ता पोहोचविणे शक्य झाले.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


