What Does the Bible Say About Women Pastors

स्त्रिया पाळक होऊ शकतात का? पवित्र शास्त्राचे उत्तर

23/06/2026
Why Reformed Soteriology Matters

धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे का आहे

30/06/2026
What Does the Bible Say About Women Pastors

स्त्रिया पाळक होऊ शकतात का? पवित्र शास्त्राचे उत्तर

23/06/2026
Why Reformed Soteriology Matters

धर्मसुधारित तारणशास्त्र महत्त्वाचे का आहे

30/06/2026

पवित्र शास्त्रात वर्णिलेले तारण

Salvation in Scripture

पवित्र शास्त्राचा प्रारंभ आकाश व पृथ्वी यांच्या निर्मितीच्या उल्लेखाने होतो (उत्पत्ती 1–2), आणि शेवट हा नवे आकाश व नवी पृथ्वी यांच्या निर्मितीच्या उल्लेखाने होतो (प्रकटीकरण 21–22). प्रारंभाची निर्मिती आणि नवी निर्मिती या दोन्ही गोष्टी पवित्र शास्त्रात नमूद तारणाच्या किंवा मुक्तीच्या संपूर्ण इतिहासाला सारगर्भित करण्यासाठी एक चौकट पुरवतात आणि त्याला देव केंद्रित संदर्भात योग्यरीत्या मांडतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, मनुष्याची मुक्ती हा अंतिम उद्देश किंवा ध्येय नाही; ती उपांत्य, म्हणजे त्या अंतिम ध्येयाच्या अगोदर येणारी गोष्ट आहे. पवित्र शास्त्र मनुष्यकेंद्रित नाही. ते देवकेंद्रित आहे. अंतिम हेतू किंवा ध्येय देव आणि त्याचे गौरव हेच आहे. मनुष्याची मुक्ती ही ते अंतिम ध्येय साधण्याचे माध्यम आहे.  

उत्पत्तीच्या पुस्तकात वर्णिलेल्या निर्मितीच्या सहा दिवसांचा कळस म्हणजे देवाने आदाम आणि हव्वा यांची केलेली निर्मिती होय. परंतु मनुष्य हा स्वतः त्यामागील अंतिम हेतू नाही. सातवा दिवस हे सूचित करतो की मनुष्याची निर्मिती आपल्या निर्माणकर्त्याची उपासना करण्यासाठी करण्यात आली आहे. देवाने पहिल्या मनुष्याशी एक करार केला; त्याला सामान्यपणे कर्मांचा करार असे म्हटले जाते. या करारात, “आदामाला जीवनाचे अभिवचन देण्यात आले होते; आणि त्याच्यामध्ये त्याच्या संततीलाही, परिपूर्ण आणि वैयक्तिक आज्ञापालनाच्या अटीवर” ते जीवन अभिवचनरूपाने देण्यात आले होते (वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार 7.2). शोकांतिका म्हणजे ही की, आदाम आणि हव्वा यांनी आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याच्या वचनापेक्षा सर्पाच्या शब्दावर विश्वास ठेवण्याची निवड केली. त्यांनी देवाविरुद्ध पाप केले आणि कर्मांच्या कराराद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यास ते असमर्थ ठरले (उत्पत्ती 3). त्यांचे वंशजही पूर्णतः हरवलेल्या याच अवस्थेत जन्माला येतात.

पवित्र शास्त्रातील तारणाचा वृत्तांत आदाम पापात पडताक्षणीच सुरू होतो. आदाम आणि हव्वा यांना स्वतःशी कायमस्वरूपी वैमनस्याच्या अवस्थेत सोडून देण्याऐवजी, देव सर्पाला सांगतो की, “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन;” त्यानंतर देव हे अद्भुत अभिवचन देतो: “ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.” (उत्पत्ती 3:15). ही सर्पाविरुद्ध देवाने केलेली युद्धघोषणा आहे, आणि आदाम व हव्वा यांच्यासाठी त्याच्या कृपा-प्रसादाची  घोषणा आहे. या बिंदूपासून पुढे आपण जे काही वाचतो, ते या प्रारंभीच्या अभिवचनांच्या अंतिम पूर्ततेकडे देव करीत असलेले कार्य आहे.

प्रारंभी मानवजात भ्रष्टता आणि पाप यांच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर बुडत गेली, आणि देवाने जलप्रलयाद्वारे जगाचा न्याय केला (उत्पत्ती 6–9). उरलेले थोडेसे लोकही पापातच पुढे चालत राहिले, म्हणून देवाने त्यांच्या भाषेचा गोंधळ केला आणि त्यांना पृथ्वीभर पांगवले (उत्पत्ती 11). परंतु त्यानंतर देव अब्रामाला पाचारण करतो आणि त्याच्याशी करार करतो. देवाने अब्राहामाला जी अभिवचने दिली त्यांपैकी एक पुढीलप्रमाणे आहे:

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील; तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ती 12:2–3)

अब्राहामाच्या पुत्राद्वारेच मनुष्याच्या तारणाचे कार्य सिद्धीस जाणार होते.

अखेरीस, अब्राहामाचे वंशज मिसरमध्ये गुलाम झाले. तेथे असताना त्यांची संख्या खूप वाढली (निर्गम 1:7). पुढे चारशे वर्षांनंतर, देव मोशेला आपण काय करणार आहोत हे सांगतो आणि त्याने ते इस्राएली लोकांना सांगावे अशी मोशेला आज्ञा देतो:

म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन; मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल. आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हांला नेईन आणि तो तुम्हांला वतन करून देईन; मी परमेश्वर आहे.”’ (निर्गम 6:6–8).

“मी तुम्हांला….ओझ्याखालून काढीन….दास्यातून तुम्हांला मुक्त करीन… जो देश त्यात मी तुम्हांला नेईन.” जुन्या करारातील मुक्तीच्या आपल्या नमुनादर्शक कार्यात देव हेच करतो. नंतर जेव्हा संदेष्टे भविष्यातील अधिक महान मुक्तीच्या कार्याविषयी बोलतात, तेव्हा त्याचे वर्णन निर्गमाच्या शब्दावलीत केले जाते.

निर्गमाच्या काळात देव आपल्या लोकांना आपले नियमशास्त्र देतो आणि पुढे जे येणार आहे, म्हणजे अभिवचन दिलेल्या देशातील राज्य, त्याचा पाया घालतो. तथापि, राजांच्या आणि लोकांच्या पापांमुळे ते राज्य टिकत नाही. देव संदेष्ट्यांद्वारे त्यांना इशारा देतो, परंतु ते पश्चात्ताप करण्यास नकार देतात आणि देव त्यांना बंदिवासात पाठवतो. तरीसुद्धा, येणाऱ्या न्यायाविषयी संदेष्ट्यांनी दिलेले इशारे हा शेवटचा शब्द ठरत नाहीत. देव अभिवचन देतो की न्यायाच्या पलीकडे तो पहिल्या निर्गमापेक्षाही अधिक महान अशा मुक्तीचे किंवा तारणाचे कार्य करील. तो आपल्या लोकांना तारण्यासाठी त्यांच्याकडे एक मशीहा राजा पाठवील. तो नवा करार प्रस्थापित करील आणि नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करील.

शेकडो वर्षांनंतर, इस्राएलामधील एका तरुण स्त्रीला देवदूत दर्शन देतो आणि तिचा पुत्र हाच तो अभिवचन दिलेला मशीहा राजा असेल, अशी घोषणा करतो (लूक 1:26–33). त्याचे नाव येशू असेल, “कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील” (मत्तय 1:21). येशू हाच तो आहे, जो सर्पाचे डोके ठेचण्यासाठी आला आहे. तोच तो अब्राहामाचा पुत्र आहे, ज्याच्याद्वारे राष्ट्रे आशीर्वादित होतील (मत्तय 1:1). तोच अभिवचन दिलेला दुःख सहन करणारा सेवक आहे, जो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला आणि आमच्याच दुष्कर्मांमुळे ठेचला गेला (यशया 53:5). तो आमच्या पापांसाठी मरण पावला (1 करिंथ 15:3), आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होईल (योहान 3:16; प्रेषितांची कृत्ये 16:31).

दुसरा आदाम हा नव्या मानवजातीचा मस्तक आहे; आणि त्या महान निर्गमात तो आपल्या लोकांना पाप व अंधकार यांतून बाहेर काढतो, आणि देवाची उपासना करण्यासाठी, देवाशी एकरूपतेत व सहभागितेत राहण्यासाठी, आणि देवाचा सर्वकाळ आनंद घेण्यासाठी त्यांना आपल्या राज्यात आणतो. येशू ख्रिस्ताचे तारणदायी कार्य आणि त्याचे त्याच्या लोकांसाठीचे लागूकरण, हा पवित्र शास्त्रातील सर्वांत गौरवशाली सिद्धांतांपैकी एक आहे. लेखांच्या या मालिकेत, मंडळीने तारणाच्या बायबल-सम्मत सिद्धांताला कसे समजून घेतले आहे (आणि कधीकधी चुकीचे समजून घेतले आहे), हे आपण पाहू; तसेच या सिद्धांताची योग्य समज आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी इतकी महत्त्वाची का आहे, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

कीथ ए. मॅथिसन

कीथ ए. मॅथिसन

डॉ. कीथ ए. मॅथिसन हे सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील रिफॉर्मेशन बायबल कॉलेजमध्ये सुनियोजित ईश्वरशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते द लॉर्ड्स सपर: आन्सर्स टू कॉमन क्वेश्चन्स यासह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.