प्रार्थनेचे स्थान

27/09/2025

खरे मनःपरिवर्तन कसे असते?

03/10/2025

प्रार्थनेचे स्थान

27/09/2025

खरे मनःपरिवर्तन कसे असते?

03/10/2025

येशू ख्रिस्त, देवाचा कोकरा!

“देवाचा कोकरा” ही संकल्पना एक असा धागा आहे जो तारणाच्या इतिहासात अखंडपणे विणलेला दिसून येतो. या संकल्पनेचे मूळ आपण थेट उत्पत्ती 22 मध्ये पाहू शकतो. तेथे देवाने अब्राहामाला पाचारण करून म्हटले की त्याने मोरिया पर्वतावर जाऊन तेथे आपला पुत्र इसहाक याला अर्पण करावे. देवाच्या आज्ञेप्रमाणे अब्राहाम ते करण्यास सिद्ध झाला होता. त्याने इसहाकाला वेदीवर बांधले आणि तो त्याच्या काळजात सुरी भोसकणारच होता की, अगदी त्या शेवटच्या क्षणी देवाने त्याला हाक मरून थांबवले, आणि म्हटले: “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले” (उत्पत्ती 22:12). त्याच क्षणी मागून एक सळसळ ऐकू आली, आणि अब्राहामाने वळून पाहिले असतं त्याला झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला. देवाने इसहाकाच्या ऐवजी अर्पण करण्यासाठी तो एडका पुरविला. उत्पत्ती 22 मध्ये कुठेही हे स्पष्ट सांगितलेले नाही की इसहाकाच्या जागी अर्पिलेला तो एडका हा पापक्षालनाच्या दृष्टीने प्रायश्चित्तार्थ अर्पण म्हणून होता; तरीही तो एक प्रतिस्थापनात्मक अर्पण होता—आणि हाच ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताचा पाया आहे. येशू ‘आमचा प्रतिस्थानी’ प्रायश्चित आहे, आणि आमच्या पापांमुळे जो क्रोध आम्हांवर प्रकट व्हायला पाहिजे होता तो देवाने त्याच्यावर ओतला. देव स्वतः कोकरा पुरवितो आणि त्या प्रतिस्थानीचे जीवन स्वीकारतो.

त्याचप्रमाणे, “देवाचा कोकरा” ही संकल्पना वल्हांडण सणामध्ये स्पष्टपणे पूर्वछायेच्या स्वरूपात दाखवली गेली होती. देव जेव्हा मिसरी लोकांवर आपली शेवटची पीडा आणणार होता—म्हणजे प्रत्येक प्रथमवत्साचा मृत्यू, ज्यात फारोच्या प्रथमपुत्राचा समावेश होता—तेव्हा त्याने आपले लोक, म्हणजे इस्राएलाला, निर्दोष कोकरे वधण्यास आणि त्यांचे रक्त त्यांच्या दारांच्या चौकटीवर लावण्यास सांगितले. देवाने वचन दिले की ज्या घरांच्या चौकटीवर कोकरांच्या रक्ताचे चिन्ह असेल त्यांना तो तारेल (निर्गम 12:3–13). ज्याप्रमाणे त्या कोकरांच्या रक्तामुळे इस्राएल लोक देवाच्या क्रोधापासून बचावले, अगदी त्याप्रमाणेच देवाच्या कोकऱ्याने आपल्या लोकांना त्यांच्या पापांच्या दंडापासून सोडवले.

उत्पत्ती 22, निर्गम 12 आणि जुन्या करारातील इतर अनेक शास्त्रलेखांमध्ये आढळणाऱ्या या प्रतीकचित्रांचा विचार करता, “देवाचा कोकरा” ही पदवी प्रेषित योहानाने अविष्करलेली स्वतंत्र नवकल्पना आहे असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मुखातून निघालेले हे शब्द त्याच्या जुन्या कराराच्या विद्वत्तापूर्ण ज्ञानातून प्रवाहित झाले होते, जे ख्रिस्ताच्या काळातील यहूदी लोकांचे पवित्र शास्त्र होते.

योहानाच्या शुभवर्तमानाच्या अगदी पहिल्या अध्यायात येशूसाठी प्रयुक्त झालेल्या “देवाचा कोकरा,” “देवाचा पुत्र,” “मशीहा,” “मनुष्याचा पुत्र” अशा अनेक महत्त्वपूर्ण पदव्या विपुलतेने आढळतात; तरीसुद्धा मला असे वाटत नाही की बाप्तिस्मा करणारा योहान, आंद्रीय, नथानेल किंवा इतर शिष्यांना या सर्व पदव्यांचा अर्थ पूर्णपणे समजला होता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येथे म्हटले: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहान 1:29). परंतु नंतर जेव्हा त्याला तुरुंगात टाकण्यात आले, त्यावेळी मात्र त्याने येशूकडे शिष्य पाठवून विचारले: “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” (लूक 7:20). या प्रश्नातून असे  दिसते की, जरी त्याने येशूविषयी इतकी प्रभावी साक्ष दिली होती, तरी त्याला येशूची खरी ओळख पूर्णपणे उलगडली नव्हती. अडचण ही होती की त्याच्या स्वतःच्या काही अपेक्षा होत्या ज्या भंग झाल्या. त्याला वाटत होते की देवाचा कोकरा येईल आणि जुलमी रोमी सत्ताधाऱ्यांना पराजित करील, जशी अपेक्षा इतरांचीही होती. परंतु जेव्हा त्याने पाहिले की येशू फक्त उपदेश आणि प्रचार करत आहे, तेव्हा तो गोंधळून गेला.

आपल्या पापांमुळे देवाचा क्रोध आमच्यावर यायला हवा होता, पण तो येशूवर ओतला गेला.

येशूने शिष्यांना  सांगितले:

“तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. (लूक 7:22).

आपण कोण आहो, याविषयी शंका घेणाऱ्या योहानाला खात्री पटवून देण्यासाठी येशूने आपल्या अद्भुत कृत्यांकडे निर्देश केला. त्याने यशया 61:1–2a मधील मशीहाविषयी असलेल्या भविष्यवाणीचा सुद्धा संदर्भ दिला, जेथें आपण वाचतो:

प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे;  कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे;

भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता  व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;

परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा;

जणू येशू असे सांगत होता: “योहाना, जर तू खरोखरच पवित्र शास्त्राचा नीट अभ्यास केला असतास, तर “जे येणार आहेत ते आपणच का” असा प्रश्न तू मला विचारला नसता. तुला दुसऱ्याची वाट पाहण्याची गरज नाही. तू माझ्याविषयी जे प्रथमदर्शनी बोललास  तेच खरे आहे. मीच तो ‘देवाचा कोकरा’ आहे.”

बाप्तिस्मा करणारा योहानच नाही, तर पेत्र देखील असाच गोंधळलेला होता. कैसरिया फिलिप्पी येथे येशूने शिष्यांना जेव्हा विचारले की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, तेव्हा पेत्राने उत्तर दिले : “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात” (मत्तय 16:16). येशूने पेत्राचा हा विश्वासंगिकार खरा असल्याचे मान्य करीत त्याला धन्य म्हटले, कारण त्याला येशूची खरी ओळख उमगली होती. परंतु लगेच, जेव्हा येशूने सांगितले की तो यरुशलेमेला जाऊन दु:ख भोगणार आहे आणि त्याला जीवे मारले जाणार आहे, तेव्हा पेत्राने त्याचा निषेध करून म्हटले: “असे काहीही आपल्याबरोबर होऊच नये!” (मत्तय 16:22b). एकीकडे पेत्राने मशीहा म्हणून येशूचा अंगीकार केला, पण दुसरीकडे लगेचच त्याने दाखवून दिले की मशीहा असण्याचा खरा अर्थ त्याला अजूनही पूर्णपणे समजलेला नव्हता.

स्वाभाविकच, आपल्यामध्येही त्या गोंधळाकडे नेणारी प्रवृत्ती आहे. जोपर्यंत आपण वधस्तंभ, पुनरुत्थान, स्वर्गारोहण आणि पेंटेकोस्टच्या दिवशी आत्म्याचे आगमन, या सर्वांचा विचार करून संपूर्ण चित्र पाहत नाही, तोपर्यंत देवाने आपल्या दूतामार्फत दिलेल्या “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” या घोषणेत दडलेली अगाध खोली आणि संपन्नता आपल्याला खऱ्या अर्थाने समजणारच नाही.

हा लेख आर सी स्प्रोल यांच्या योहानाचे शुभवर्तमान’ या भाष्यग्रंथातून घेतलेला अंश आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आर. सी. स्प्रौल

आर. सी. स्प्रौल

डॉ. आर. सी. स्प्रौल हे 'लिगोनियर मिनिस्ट्रीज'चे संस्थापक, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील 'सेंट अँड्र्यूज चॅपल'चे मुख्य उपदेशक आणि शिक्षक, तसेच 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'चे पहिले अध्यक्ष आणि 'टेबलटॉक' या मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा 'रिन्यूइंग युअर माइंड' हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ केंद्रांवर दररोज प्रसारित केला जातो आणि तो ऑनलाइन देखील ऐकता येतो. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये 'द होलिनेस ऑफ गॉड' , 'चोजन बाय गॉड' आणि 'एव्हरीवन्स अ थिओलॉजियन' यांसारख्या प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश आहे. पवित्र शास्त्राच्या अचूकता यावर प्रभावीपणे बचाव करण्यासाठी आणि देवाच्या लोकांनी त्यांच्या वचनावर ठाम विश्वासाने उभे राहण्याच्या गरजेवर भर देण्यासाठी ते जगभरात ओळखले जात होते.