How Can I Grow in Wisdom?

मी ज्ञानात कसा वाढू शकतो?

29/09/2026
Was Mary Born Without Sin?

मरिया निष्पाप जन्माला आली होती का?

06/10/2026
How Can I Grow in Wisdom?

मी ज्ञानात कसा वाढू शकतो?

29/09/2026
Was Mary Born Without Sin?

मरिया निष्पाप जन्माला आली होती का?

06/10/2026

विवाह सार्वकालिक आहे का?

Is Marriage Eternal?

या प्रश्नासारखे फारच कमी प्रश्न आपल्या अंतःकरणाला व्याकुळ करतात: माझ्या जोडीदाराशी असलेले माझे वैवाहिक नाते  स्वर्गातही कायम राहील का? पवित्र शास्त्रात आपण विवाहाची सुरुवात, पती-पत्नीचा परस्पर संबंध, आणि या ऐक्याचा परिणाम देवाच्या गौरवात कसा भर घालतो, याविषयी वाचतो. परंतु एक प्रश्न अनेकदा मनात रेंगाळत राहतो: वैवाहिक नाते हे पुढे येणाऱ्या अनंतकाळात देखील असेच चालू राहते का? मी तेव्हाही  विवाहितच राहीन का? स्वर्गात विवाह करता येईल का? माझ्या आयुष्यात एकापेक्षा अधिक जोडीदार असतील, तर काय? पृथ्वीवरील माझ्या वैवाहिक जीवनाविषयीच्या सर्व गोष्टी मी विसरून जाईन का? यांपैकी काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण प्रथम हे समजून घेतले पाहिजे की देवाने मुळात विवाहाची स्थापना का केली.

मानवाचे पापात पतन होण्यापूर्वी, देवाने जग निर्माण केले तेव्हा दोन संस्था स्थापन केल्या. विवाह ही दुसरी संस्था होती; परंतु पहिली संस्था शब्बाथ होती. देवाने सहा दिवसांत जग निर्माण केल्यानंतर सातव्या दिवशी त्याने विश्रांती घेतली (उत्पत्ति 2:2–3). असे करून देवाने हे दाखवून दिले की आपण सहा दिवस श्रम करावेत; परंतु सातव्या दिवशी विश्रांती घेऊन त्याची उपासना करावी (निर्गम 20:8–11). यापलीकडे, साप्ताहिक शब्बाथ हा नव्या सृष्टीची पूर्वछाया होता, म्हणजे अशा युगाची, ज्यात देव आपल्या लोकांसाठी परिपूर्ण आणि सार्वकालिक तारण सिद्धीस नेईल (यशया 66:23). नवा करार दाखवतो की शब्बाथ आपल्याला ख्रिस्ताच्या कार्याकडे निर्देश करतो, कारण तो आपल्याला या वर्तमान समयी आणि येणाऱ्या युगात या सार्वकालिक विश्रांतीकडे घेऊन जातो (इब्रीकरांस 4:9–11). दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ख्रिस्त आम्हाला आध्यात्मिक शब्बाथ-विश्रांतीत घेऊन आला आहे; तरी आपण तिच्या पूर्ण परिपूर्तीची वाट पाहत आहोत. म्हणून, शब्बाथ ज्या सार्वकालिक विश्रांतीकडे निर्देश करतो, तिची वाट पाहत असताना आपण आठवड्याच्या पहिल्या दिवशी शब्बाथाचे पालन करीत राहतो (प्रेषितांची कृत्ये 20:7; 1 करिंथकर 16:1–2).

त्याचप्रमाणे, देवाने सृष्टीच्या अगदी आरंभीच विवाहाची स्थापना केली, जेणेकरून आमचे पापात पतन होण्यापूर्वीच त्याने आपल्याला स्वतःबरोबरच्या करारबद्ध नात्याकडे अंगुलीनिर्देश करावा. मनुष्य एकटा असावा हे बरे नाही (उत्पत्ति 2:18), म्हणून देवाने आदामासाठी पत्नी निर्माण केली. पण तो वैवाहिक संबंध स्वतःमध्येच अंतिम ध्येय नव्हता, कारण त्याचा उद्देश देव आणि त्याचे लोक यांच्यातील विवाहाचे एक दृश्य प्रतिनिधित्व सादर करणे हे होते. संपूर्ण जुन्या करारात देव आपल्या लोकांचे वर्णन स्वतःशी विवाहबद्ध असलेले लोक म्हणून करतो ज्यांनी त्याच्याविरुद्ध व्यभिचार केला आहे. (यशया 62:5; यिर्मया 2:2; 3:6–8; यहेज्केल 16:8–21; होशेय 2:2). त्याचप्रमाणे, येशू अनेकदा स्वतःला आपल्या अनुयायांचा ‘वर’ म्हणून संबोधतो. (मत्तय 9:15; 22:2; 25:1–13; योहान 3:29). येशूच्या उदाहरणाचे अनुसरण करून, पौल दाखवतो की विवाह हे एक गहन रहस्य आहे, जे ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांच्याकडे निर्देश करते. मंडळी ख्रिस्ताचा आदर करून त्याला अधीन राहते, तसे पत्नी आपल्या पतीचा आदर करून त्याला अधीन राहते; आणि ख्रिस्त मंडळीवर प्रीती करून तिच्यासाठी स्वतःला अर्पण करतो, तसे पती आपल्या पत्नीवर प्रीती करून तिच्यासाठी स्वतःला अर्पण करतो (इफिसकरांस 5:22–33; 1 करिंथकर 11:2–3). प्रकटीकरणाच्या पुस्तकात योहान ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांच्या अंतिम स्वर्गीय पुनर्मिलनाच्या उत्सवाचे वर्णन विवाहभोजन म्हणून करतो (प्रकटीकरण 19:7–9; 21:2; 22:16–17).

शब्बाथ आणि विवाह या दोन्ही निर्मिती आधारित व्यवस्था आहेत. देवाकडून मिळालेले मोठे आशीर्वाद म्हणून आपण सध्या त्यांचा आनंद घेतो; पण त्या दोन्ही अशा स्वर्गीय वास्तवांकडे निर्देश करतात, ज्यांची येणाऱ्या युगात परिपूर्ती व्हावी अशी आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. ख्रिस्ती शब्बाथाच्या दिवशी आपण उपासनेसाठी एकत्र येत राहतो, कारण ख्रिस्तामधील आपल्या सार्वकालिक शब्बाथ-विश्रांतीची पूर्ण परिपूर्ती आपण अजूनही वाट पाहत आहोत. . त्याचप्रमाणे, आपण या जगात विवाह करतो आणि विवाहात देतो याचे कारण हे आहे की आपण कोकराच्या सार्वकालिक विवाहाच्या पूर्ततेची वाट पाहत आहोत. परंतु जेव्हा वास्तव पूर्णपणे प्रकट होईल, तेव्हा ती सावली नाहीशी होईल.

म्हणूनच, आपल्या विश्वासघातापूर्वी येशू यरुशलेमेत असताना त्याने विवाहाविषयी एक अतिशय महत्त्वाचे विधान केले. सदूकी, मृत्यूनंतरचे जीवन नाकारणारा उच्चवर्गीय गट, यांनी येशूला विवाहाविषयी प्रश्न विचारला (मत्तय 22:23–33; मार्क 12:18–27; लूक 20:27–38). पुनरुत्थान ही कल्पना किती निरर्थक आहे हे दाखविण्याच्या प्रयत्नात त्यांनी येशूला विचारले की एखादी स्त्री सहा वेळा विधवा झाली, तर काय होईल? स्वर्गात त्या व्यक्तीचे एकाच वेळी अनेक जोडीदार असतील का? उत्तरादाखल येशूने त्यांना केवळ पुनरुत्थानाच्या वास्तवाकडेच निर्देश केले नाही, तर पृथ्वीवरील विवाह सार्वकालिक नाही, हेही स्पष्ट केले: “कारण मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत; तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात.” (मार्क 12:25). येशूच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवर विवाहित असलेला मनुष्य स्वर्गात आपल्या जोडीदाराशी विवाहित राहणार नाही. त्याऐवजी, त्यांचे  एकमेव ध्येय  दूतांप्रमाणेच असेल: सार्वकालिक काळासाठी देवाची उपासना करणे आणि त्याचा गौरव करणे. दुसऱ्या शब्दांत, स्वर्गात आपल्यासाठी जो एकमेव विवाह महत्त्वाचा असेल तर तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताशी आपला आध्यात्मिक विवाह.

तर मग, विवाह किंवा वैवाहिक जीवन हे सार्वकालिक आहे का? केवळ ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांचा विवाह सर्वकाळ टिकतो. जर पृथ्वीवर होणारे मानवी विवाह अनंतकाळपर्यंत टिकणारी गोष्ट आहे असे आपण समजत असू, तर विवाहाचा मूळ हेतूच आपण चुकविला आहे. पृथ्वीवरील जोडीदार ही देवाकडून मिळालेली मौल्यवान देणगी आहे; तिचा आपण जिव्हाळ्याने मान राखला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. स्वर्गात आपण आपल्या पृथ्वीवरील विवाहांची आठवण ठेवू, असे मला वाटते; तरीही स्वर्गात आपण विवाहित असणार नाही. वास्तव सावलीपेक्षा श्रेष्ठ आहे. आपण सिंहासनासमोर एकत्र उभे राहू, तेव्हा आपल्या पृथ्वीवरील जोडीदाराच्या शेजारी आपण उभे असू; पण एकमेकांशी विवाहबद्ध म्हणून नव्हे, तर ख्रिस्ताशी विवाहबद्ध असलेली मंडळी म्हणून. गौरवात, कोकराशी असलेल्या आपल्या गौरवशाली विवाहाच्या प्रकाशात या जगातील विवाहांचे तेज फिके पडेल.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

लेव्ही बर्नट्सन

लेव्ही बर्नट्सन

डॉ. लेव्ही बर्नट्सन हे सॅन्फोर्ड, फ्लोरिडा येथील 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'मध्ये धर्मशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत आणि 'प्रेस्बायटेरियन चर्च इन अमेरिका'मधील एक शिक्षक वडील आहेत.