गर्भपाताचा स्वेच्छा-हक्क  (प्रो-चॉइस): म्हणजे काय?

14/10/2025

प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळ संपुष्टात आली का?

14/10/2025

गर्भपाताचा स्वेच्छा-हक्क  (प्रो-चॉइस): म्हणजे काय?

14/10/2025

प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळ संपुष्टात आली का?

14/10/2025

देव जर सार्वभौम अधिपती आहे, तर मनुष्य स्वतंत्र इच्छा असलेला कसा असू शकतो?

xr:d:DAFXk0WDSFg:25,j:45162075609,t:23011320

देव हा एकमेव पूर्ण स्वायत्त सत्ता आहे; म्हणजेच, त्याचे स्वातंत्र्य अमर्याद, निरंकुश आणि अबाधित आहे. तो सार्वभौम आहे. परंतु, याच सार्वभौमतेविषयी एक सार्वत्रिक आक्षेप मांडला जातो—तो असा की, जर देव खरोखरच सार्वभौम असेल, तर मग मनुष्य स्वतंत्र असण्याचा प्रश्नच उरत नाही. पवित्र शास्त्रात मानवी स्थितीचे दोन परस्परभिन्न अर्थांचे स्पष्टीकरण करण्यासाठी ‘स्वातंत्र्य’ या संज्ञेचा उपयोग केला गेला आहे : एक म्हणजे सक्तीपासून मुक्त असलेले स्वातंत्र्य, ज्यामुळे मनुष्य कोणत्याही बाह्य दडपणाखाली न येता आपले निर्णय घेऊ शकतो; आणि दुसरे म्हणजे नैतिक स्वातंत्र्य, जे आपण पापात पडल्यानंतर गमावले आणि ज्यामुळे आपण आपल्या देहातील दुष्ट पातकप्रवृत्तीचे गुलाम झालो. मानवतावादी असा विश्वास करतात की मनुष्य फक्त सक्तीपासूनच नव्हे, तर नैतिकदृष्ट्याही स्वतंत्र आहे, म्हणजेच, त्याच्याकडे कोणत्याही वाईट प्रवृत्तींचा नैसर्गिक कल नसतानाही तो निःपक्षपाती निर्णय घेऊ शकतो. आपण ख्रिस्ती या नात्याने अशा मानवतावादी किंवा मूर्तिपूजक स्वातंत्र्याच्या कल्पनांपासून सावध असले पाहिजे.  

ख्रिस्ती दृष्टिकोन असा आहे की देवाने आपल्याला इच्छाशक्ती दिली आहे, म्हणजे निवड करण्याची व स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता दिली आहे. आपण वैचारिक बुद्धी असलेले स्वेच्छाधारी प्राणी आहोत. पण आपल्या निर्मितीच्या वेळी आपल्याला प्राप्त झालेले स्वातंत्र्य हे मर्यादित स्वरूपाचे आहे. अखेरीस आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा घालणारे एकमेव तत्त्व म्हणजे देवाचे स्वातंत्र्य. याच बिंदूवर देवाचे सार्वभौमत्व आणि मानव-स्वातंत्र्य यांच्यातील ताण निर्माण होतो. काही लोक असा युक्तिवाद करतात की मनुष्याची स्वतंत्र इच्छाशक्ती ही देवाच्या सार्वभौमतेवर मर्यादा घालते. पण जर तसे खरे असेल, तर देव नव्हे, तर मनुष्यच सार्वभौम ठरतो. धर्म-सुधारित विश्वास (Reformed faith) हे शिकवतो की मनुष्याचे स्वातंत्र्य खरे असले तरी ते देवाच्या सार्वभौम अधिपत्याखाली असते. आपण आपल्या इच्छेच्या बळावर देवाच्या सार्वभौम निर्णयांवर मात करू शकत नाही, कारण देवाचे स्वातंत्र्य हे आपल्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि व्यापक आहे. 

मानव-कौटुंबिक संबंधांमध्ये याचे एक रूपक पहायला मिळते. आई-वडील आपल्या मुलांवर अधिकार गाजवतात. मुलाला काही प्रमाणात स्वातंत्र्य असते, पण आई-वडिलांना ते अधिक असते. ज्या प्रकारे आई-वडिलांचे स्वातंत्र्य मुलाच्या स्वातंत्र्याला आळा घालते, तसे मुलाचे स्वातंत्र्य आई-वडिलांच्या स्वातंत्र्याला मर्यादा घालत नाही. आपण देवाच्या गुणधर्मांविषयी विचार करत असताना हे लक्षात ठेवले पाहिजे की देव हा एकमेव पूर्ण स्वायत्त सत्ता आहे.

जेव्हा आपण म्हणतो की देव सार्वभौम आहे, तेव्हा प्रत्यक्षात आपण त्याच्या स्वातंत्र्यावर भाष्य करत असतो, जरी आपल्याला असे वाटते की सार्वभौमत्व म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा काहीतरी वेगळे आहे. इच्छा देवाच्या अस्तित्वाचा  (volitional) भाग; त्याला इच्छाशक्ती आहे आणि तो निर्णय घेतो. हे निर्णय घेताना आणि आपली इच्छा राबवताना तो अंतिम आणि सर्वोच्च अधिकाराच्या स्वरूपात कार्य करतो. त्याचे स्वातंत्र्य म्हणजे सर्वस्वी आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे. केवळ त्यालाच सर्वोच्च स्वायत्तता प्राप्त आहे; तो स्वतःच स्वतःसाठी नियम आहे. 

मनुष्य सतत स्वायत्ततेच्या शोधात राहतो, म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य, जिथे त्याला कोणालाही जबाबदार राहण्याची गरज पडणार नाही. खरे पाहता, मनुष्य पापात पडला त्यावेळी नेमके हेच तत्व कार्यरत होते. सैतानाने आदाम व हवेला स्वायत्ततेकडे वाटचाल सुरू करण्यासाठी फूस लावली : देवासारखे व्हा, आणि कोणत्याही शिक्षेस पात्र न होता तुम्हाला जे हवे ते करा. सैतान एदेन बागेत मानवाला त्याच्या दोषभावनेपासून आणि देवासमोर त्याच्या उत्तरदायित्वापासून मुक्त करण्यासाठी एक स्वातंत्र्य चळवळ सुरू करू पाहत होता. परंतु खरे स्वायत्त आणि आधिपत्य केवळ देवच आहे.

हा उतारा आर.सी. स्प्रौल यांच्या ‘ट्रुथ्स वी कन्फेस’ या पुस्तकातून घेतला आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आर. सी. स्प्रौल

आर. सी. स्प्रौल

डॉ. आर. सी. स्प्रौल हे 'लिगोनियर मिनिस्ट्रीज'चे संस्थापक, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील 'सेंट अँड्र्यूज चॅपल'चे मुख्य उपदेशक आणि शिक्षक, तसेच 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'चे पहिले अध्यक्ष आणि 'टेबलटॉक' या मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा 'रिन्यूइंग युअर माइंड' हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ केंद्रांवर दररोज प्रसारित केला जातो आणि तो ऑनलाइन देखील ऐकता येतो. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये 'द होलिनेस ऑफ गॉड' , 'चोजन बाय गॉड' आणि 'एव्हरीवन्स अ थिओलॉजियन' यांसारख्या प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश आहे. पवित्र शास्त्राच्या अचूकता यावर प्रभावीपणे बचाव करण्यासाठी आणि देवाच्या लोकांनी त्यांच्या वचनावर ठाम विश्वासाने उभे राहण्याच्या गरजेवर भर देण्यासाठी ते जगभरात ओळखले जात होते.