
नीतिमान ठरविले जाण्याचे साधनीभूत कारण
20/11/2025
देवाच्या करारशास्त्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
27/11/2025विवाहाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
विवाहाविषयी इतके काही बोलले जात असताना, त्यातील मूलभूत सत्ये आठवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही विवाहित असाल किंवा अविवाहित, तरी प्रसिद्ध पाच क च्या आधारे विवाहाविषयी तुम्ही जाणण्याजोग्या पाच गोष्टी येथे संक्षिप्तपणे दिल्या आहेत: कोण, काय, केव्हा, कोठे आणि का
1. कोण: विवाह देवाची योजना आहे—एक पुरुष आणि एक स्त्री, समान जू लावलेले (उत्पत्ति 2:24; मत्तय 19:4 –5).
विवाहसंस्था ही परमेश्वराने निर्माण केली आहे. विवाहावर देवाचा आशीर्वाद लाभावा अशी अपेक्षा जर आपण करत असू, तर त्यासाठी त्याचे नियम पाळणे शहाणपण ठरते. ख्रिस्ती लोकांसाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विवाह करणाऱ्या दोन्ही पक्षांमध्ये विश्वासाचे ऐक्य (2 करिंथकरांस 6:14). काही प्रसंगी ख्रिस्ती म्हणविणारे लोक बदलतात म्हणून एखादी ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्तीतर व्यक्तीशी विवाहबद्ध असलेल्या अवस्थेत येतो, म्हणजे असे की एक जोडीदार विश्वासात येतो, किंवा सुरुवातीपासूनच एखाद्याचा विश्वास खरा नव्हता हे उघड होते. पुष्कळ प्रकरणात देव जरी असे मिश्र-विश्वासी विवाह होऊ देतो आणि अशा विवाहांद्वारे तो आपले संकल्प देखील सिद्धीस नेतो; तरीही अशा विवाहाची स्वेच्छेने निवड करू नका, अशी त्याची आज्ञा आहे. ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्तीतर व्यक्तीशी विवाह करण्याची निवड करणे म्हणजे ख्रिस्ताकडे जाण्याऐवजी त्याच्यापासून दूर जाणे, आणि आत्म्याच्या पावलावर पाऊल टाकण्याऐवजी, उलट दिशेने जाणे होय (गलतीकरांस 5:16–19).
2. काय: विवाह हा पती-पत्नीमधील आजीवन एकीकृत संबंध आहे —जो ख्रिस्त आणि मंडळी यांच्यातील नात्याचे एक सजीव चित्र रेखाटतो.
विवाह म्हणजे दोन व्यक्तींनी एक नव्या कुटुंबाची सुरुवात करण्यासाठी आपल्या मूळ कुटुंबातून बाहेर पडणे. ख्रिस्ती विवाह म्हणजे ख्रिस्त आणि त्याची वधू असलेली मंडळी यांच्यातील नातेसंबंधाचे चित्र (इफिसकरांस 5:32; 2 करिंथकरांस 11:2). म्हणूनच पतींना, मंडळीचे मस्तक असलेल्या ख्रिस्ताच्या आदर्शावर आधारित, त्यागपूर्ण नेतृत्वाची आज्ञा दिली आहे, म्हणजे, ख्रिस्ताने जसे मंडळीसाठी आपले जीवन अर्पिले तसे आवश्यक असेल तर आपल्या पत्नीसाठी आपले प्राणही अर्पिणे (इफिसकरांस 5:25). त्याचप्रमाणे, पत्नींसाठीही मंडळीच्या, म्हणजे ख्रिस्ताच्या देहाच्या, भूमिकेशी सुसंगत अशी आज्ञा आहे: ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताच्या अधीन राहते, त्याप्रमाणे पत्नींनी आपापल्या पतीच्या अधीन असावे (इफिसकरांस 5:24). पती-पत्नीसाठी असलेल्या या दोन्ही भूमिका तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आपल्या विवाहबंधनातून ख्रिस्त आणि मंडळी यांच्यातील नाते प्रकट करणे हा किती महान सन्मान आणि पवित्र जबाबदारी आहे!
3. केव्हा: विवाह हा या जीवनापुरता आहे, अनंतकाळासाठी नाही (मत्तय 22:30).
विवाह हा वर्तमान जीवनाच्या वास्तवासाठी आहे—जसे की अनेक विवाह-विधी वचनांमध्ये म्हटले जाते: “आनंदात किंवा दुःखात, श्रीमंतीत किंवा दारिद्र्यात, आजारपणात किंवा आरोग्यात, जोपर्यंत तुम्ही दोघे जिवंत असाल.” विवाह हा फक्त आपण प्रेम अनुभवतो तेवढ्यापुरता किंवा प्रेम करावेसे वाटते तेवढ्यापुरता नसून—तो संपूर्ण आयुष्यासाठी आहे. काही विशिष्ट परिस्थितीत देव घटस्फोटाचा पर्याय उपलब्ध करतो; तरीही प्रत्येक नको असलेल्या, अनपेक्षित किंवा अन्यायकारक प्रसंगी तो उपाय म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करू नये. वैवाहिक आव्हानांची पूर्वकल्पना ठेवून, जोडपी शहाणपणाने देवाकडे प्रार्थना करतात की त्यांच्या परस्परप्रेमाचे नूतनीकरण होवो, ते वाढो आणि बहुगुणितही होवो (मत्तय 7:7), कारण अशा प्रार्थनांची उत्तरे देण्यास परमेश्वराला आनंद होतो, हे त्यांना ठाऊक असते (1 योहान 5:14–15).
जोडप्यांना अशा प्रार्थनांची गरज असण्याचे एक कारण म्हणजे आपण अजूनही पापी आहोत; पण म्हणून निराश होण्याचे कारण नाही. ख्रिस्ताने दाखविलेल्या आदर्शानुसार, पवित्र आत्मा आपल्याला परस्परांवर त्यागपूर्ण प्रेम करण्यास समर्थ करतो. पापाची उपस्थिती विवाहाला अपात्र ठरवत नाही; ती तर अशा प्रकारे जगण्यासाठी संदर्भ आहे. जोडप्यांनी आपसांत एकमेकांना प्रेमाने सहन करावे असे देव आपल्या कृपेने त्यांना आव्हान देतो (इफिसकरांस 4:2). सुज्ञ जोडपे पापाने डागाळलेल्या अपूर्ण अशा वैवाहिक जीवनातही देवावर भिस्त ठेवतात की तो त्यांना त्यातून अधिकतम लाभ घेण्यास सहाय्य पुरवील, आणि ते त्यांच्या वैवाहिक जीवनात असलेल्या अनेक आशीर्वादांची दखल घेऊन देवाचे आभार मानतात (1 थेस्सलनीकाकरांस 5:18).
या जीवनात विवाहित असो वा अविवाहित, सर्व विश्वासणारे नक्कीच आणि पूर्णपणे कोकऱ्याच्या विवाहसोहळ्याचा आनंद घेतील—म्हणजे ख्रिस्त आणि स्वर्गात घेण्यात आलेली मंडळी यांच्यात घडून येणारा तो एकमेव कायमस्वरूपी आणि परिपूर्ण विवाह—जो सार्वकालिकरित्या टिकून राहणार आहे (प्रकटीकरण 19:6–9).
4. कोठे: विवाह एक नवे कुटुंब आणि नवे घर स्थापन करतो.
किंग जेम्स बायबल आवृत्ती काव्यात्मक रीतीने सांगते त्याप्रमाणे, देव पती-पत्नीला “सोडून आणि चिटकून राहणे” (उत्पत्ति 2:24) असे पाचारण देतो. आपल्या पालकांपासून जोडीदाराकडे प्राथमिक निष्ठा वळवणे हे आव्हानात्मक ठरू शकते, यांत वाद नाही. पती-पत्नी आणि त्यांच्या पालकांमध्ये थोडे भौतिक अंतर ठेवल्यास हा बदल सुलभ होऊ शकतो. विवाहित जोडप्यांनी आपली आई व आपला बाप यांचा मान सततपणे राखावा अशी देव त्यांना आज्ञा देतोच; परंतु त्यांनी त्यांचे आज्ञापालन करावे हे आवश्यक नाही (निर्गम 20:12; इफिसकरांस 6:2–3). हा फरक जोडप्यांनी शहाणपणाने ओळखला पाहिजे. ते पालकांचा सल्ला ऐकू शकतात, त्यांच्या शहाणपणाचे स्वागत करू शकतात; तरी त्यांनी स्वतंत्र कुटुंब म्हणून स्वतःचे निर्णय स्वातंत्र्याने घ्यावेत, कारण देवाच्या दृष्टीने ते तसेच आहेत, म्हणजे एक स्वतंत्र कुटुंब (उत्पत्ति 2:24).
5. का : परमेश्वर विवाहासाठी चार उद्देश देतो. विवाहित जोडपी संधी मिळाल्यावर या चारही उद्देशांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करून परमेश्वराचा आदर करतात.
- मुलांचे संगोपन. काही जोडप्यांना दैवी योजनेनुसार मुले होण्यात अडथळा येऊ शकतो; तरी पवित्र शास्त्र मुलांना आशीर्वाद मानते, ज्यासाठी देवाकडे पाहत राहावे (स्तोत्रसंहिता 127:3–5; मलाखी 2:15). पालकांनी मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवावे (इफिसकरांस 6:4).
- लैंगिक समाधान. देव विवाहाबाहेरील लैंगिक संबंधांवर आळा घालतो (1 करिंथकरांस 7:2). जोडप्यांनी विवाहाच्या चौकटीत राहून, देवाच्या इतर चांगल्या देणग्यांप्रमाणे याचा आनंद उपभोगावा.
- जग आणि मंडळीला आशीर्वाद. अनेकदा एक जोडपे त्यांच्या एकूणच व्यक्तीगत क्षमतेपेक्षा अधिक फलदायी ठरते—दोघे मिळून एकापेक्षा अधिक समर्थपणे सेवा करतात (उपदेशक 4:9–12; मत्तय 20:28).
- सहवास. देवाने सृष्टी केली तेव्हा सर्व काही “चांगले” आहे असे त्याने जाहीर केले (उत्पत्ति 1:31); हेच विवाहाच्या बाबतीतही खरे आहे. देवाने “चांगले नाही” असे जे एकच म्हटले ते म्हणजे मनुष्याचे एकटे असणे (उत्पत्ति 2:18).
लक्षात ठेवण्यासारखा एकच मुद्दा असेल, तर तो हा: विवाह चांगला आहे. विवाह हा एक महत्त्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे देव लोकांना सहवास पुरवतो; म्हणून आपण त्यात देवाचा मान राखतो तेव्हा, त्याच्या समृद्ध आशीर्वादाची अपेक्षा करणे योग्यच आहे.
हा लेख “तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी” या संग्रहाचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


