विवाहाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
25/11/2025
5 Things You Should Know about Hell
नरकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
02/12/2025
विवाहाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
25/11/2025
5 Things You Should Know about Hell
नरकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
02/12/2025

देवाच्या करारशास्त्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

काही विषय धर्मसुधारित मंडळ्यांमध्ये इतक्या वारंवार हाताळले जातात की त्यांच्या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष होण्याची जास्तच शक्यता असते. देवाचे करारशास्त्र हा त्यापैकीच एक विषय आहे. करारशास्त्राविषयी ख्रिस्ती लोकांना माहीत असाव्यात अशा पाच गोष्टी पाहू या.

1. देवाचे करारशास्त्र हे देवाबरोबर असलेले आपले नाते याविषयी आहे.

करार म्हणजे एक औपचारिक संबंध. विवाह हे अशा संबंधाचे सर्वोत्तम उदाहरण आहे (मलाखी 2:14). दोन व्यक्तींमधील हा सर्वाधिक जिव्हाळ्याचा बंध एकाच वेळी परम वैयक्तिक व प्रेमळ सहचर्य असून कायदेशीर व्यवस्थाही असते. करारही याच रीतीने कार्य करतो.

करारशास्त्रामुळे आपल्याला देव आपल्याशी कसा संबंध ठेवतो हे अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास मदत होते. प्रभूबरोबर चालणे कठीणच ठरले असते, जर देवाने आपला आणि त्याचा संबंध नेमका कसा आहे हे स्पष्ट केले नसते. देव आपल्याविषयी काय विचार करतो, तो आपला स्वीकार करतो का व कसा करतो, आणि त्याला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे—यांसारख्या गोष्टींचा आपल्याला केवळ अंदाज लावावा लागला असता, तर देवासमोर आपले काय स्थान आहे याविषयी आपल्यावर जणू कायमचेच शंका-कुशंकाचे सावट असते. 

यामुळे देवाचे करारशास्त्र हे पुष्टी करते की देव आपला आणि त्याचा संबंध कसा असावा हे उघडपणे समजावून सांगतो. पवित्र शास्त्र हे देवाचे लेखी व स्पष्ट प्रकटीकरण आहे की आपण त्याच्याशी योग्य नाते कसे ठेवू शकतो. करार हा एक औपचारिक संबंध असल्यामुळे, त्या स्थिर बंधनात देव आपल्याशी बांधिलकी पत्करतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्याशी असलेल्या नात्याची खात्री देतो. 

2. करारशास्त्रामुळे कर्मे आणि कृपा यांमधील संबंध समजून घेण्यास मदत होते.

इफिसकरांस 2:8–9 मध्ये धर्मसुधारणावादी प्रोटेस्टंट लोकांनी तारणाची जी महत्त्वपूर्ण बाजू समजून घेतली आहे तिचा गाभा अगदी स्पष्ट होतो: “कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे.” कृपेने मिळालेले तारणाचे हे विनामूल्य दान इफिसकरांस 2:10 मधील विधानाशी कसे जुळते हे समजावून सांगताना आपल्याला अनेकदा संघर्ष करावा लागतो: “’आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. कृपेने मिळालेले स्वातंत्र्य आणि  सत्कृत्ये करीत जीवन जगण्याची आपली जबाबदारी, या दोन्ही गोष्टीत आपण कसा समेट करू शकतो?

पारंपरिक धर्मसुधारित समजुतीनुसार, देवाचे करारशास्त्र कर्माचा करार आणि कृपेचा करार यांमध्ये भेद करते. पतनापूर्वी देवाने आदामाशी केलेल्या कर्माच्या कराराची अट परिपूर्ण आज्ञाधारकता अशी होती. तर कृपेचा करार, जो दुसरा आदाम, येशू ख्रिस्त याच्याद्वारे आणला गेला, त्यात देव आपला स्वीकार केवळ ख्रिस्ताच्या प्रायश्चित्तपर कार्यावरील विश्वासाद्वारे करतो. हे दोन करार स्पष्ट करतात की कर्मे आणि कृपा—ज्याद्वारे देवापुढे तारण व नीतिमान ठरविले जाणे साध्य केले जाते—दोन वेगळे व परस्परविरोधी मार्ग आहेत.  

त्यामुळे देवाचे करारशास्त्र कृपा आणि कर्मे यांचा योग्य संबंध जुळवून देते: आपली कर्मे देवाशी असलेल्या नात्याचा आधार असू शकत नाहीत—जरी खरे विश्वासणारे चांगली कृत्ये अवश्य उत्पन्न करतात. कारण तारणासाठी विश्वासींशी देवाच्या कराराची अट कर्मे नाहीत, म्हणूनच देवापुढे आपण नीतिमान ठरविले जातो यासाठी ती कारणीभूत ठरू शकत नाहीत.

3. करारशास्त्रामुळे आपल्याला संपूर्ण शास्त्रात ख्रिस्ताला पाहण्यास मदत होते.

कलस्सैकरांस 2:17 स्पष्ट करते की इस्राएलाच्या धार्मिक जीवनातील अनेक गोष्टी “ही होणाऱ्या गोष्टींची छाया होती, पण सत्त्व ख्रिस्त आहे.” जुन्या कराराच्या काळात देवाच्या लोकांवर अनेक धार्मिक विधिविधान देण्यात आले होते, तरी त्या प्रथांनी त्यांना उत्पत्ति 3:15 मध्ये देवाने प्रतिज्ञा केलेल्या त्या मुक्तिदात्या विषयी शिकवले —म्हणजेच येऊ घातलेला तो मुक्तिदाता, ज्याच्यावर त्यांनी आपला विश्वास ठेवायचा होता. कारण पतनापासून तारणाचा एकमेव मार्ग ख्रिस्तावरील विश्वास हाच असल्यामुळे, करारशास्त्र आपल्याला स्मरण करून देते की पवित्र शास्त्रात देवाने आपल्याशी केलेल्या सर्व व्यवहारांचे खरे सत्त्व ख्रिस्तच आहे.

4. देवाचे करारशास्त्र मंडळीचे महत्त्व समजून घेण्यास मदत करते.

मत्तय 28:19–20 मधील महान आज्ञेत येशूने मंडळीला सर्व राष्ट्रांना शिष्य बनवण्याची आज्ञा दिली, ती म्हणजे “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा.” या बाह्य व्यवस्था, म्हणजे पवित्र विधींचे प्रशासन आणि देवाच्या वचनाचे शिक्षण, या देवाचे लोक म्हणून सेवाकार्यासाठी  प्रगती साधणारी साधने आहेत.

करारशास्त्र आपल्याला आठवण करून देते की, ख्रिस्त केवळ संपूर्ण शास्त्राचे सत्त्वच नाही, तर तो आपल्या मंडळीला त्याने दिलेल्या कृपेच्या सामान्य साधनांद्वारे आपल्यावर अध्यात्मिक कार्य करण्यासाठी आपल्या लोकांकडे येतो. वेस्टमिन्स्टर लघु प्रश्नोत्तरी आपल्याला आठवण करून देते की, मंडळीच्या कृपेची साधने म्हणजे वचन, विधी आणि प्रार्थना ही आहेत. ही बाह्य साधने, जी विश्वासणाऱ्यांपर्यंत कराराचे सत्त्व असलेला ख्रिस्त पोहोचवतात, त्यांना अनेकदा कराराचे “बाह्य प्रशासन” असे म्हटले जाते. म्हणूनच ख्रिस्ती जीवनाचा मंडळी हा आवश्यक भाग आहे, कारण या बाह्य प्रशासनात आपण ख्रिस्ताला भेटतो.

5. देवाचे करारशास्त्र आपल्याला पवित्रतेच्या मार्गावर चालताना अधिक सखोल खात्री प्राप्त करण्यास मदत करते.

इफिसकरांस 1:13–14 हे स्पष्ट करते की ख्रिस्तावरील विश्वासणाऱ्यांमध्ये पवित्र आत्म्याचा वास असणे ही आपल्या सार्वकालिक जीवनाची हमी आहे: 

‘तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे (इफिसकरांस पत्र 1:13-14).

ख्रिस्तासोबत चालत असताना पवित्रतेत प्रगती करण्यासाठी आपल्याला हा स्वर्गीय सहाय्यक दिला गेला आहे.करारशास्त्र आपल्याला आठवण करून देते की, आत्म्याच्या सामर्थ्याने साधलेली आपली पवित्रता हे एक दान आहे जे ख्रिस्ताने आपल्यासाठी मिळवले आहे. ख्रिस्ताने आपल्या वतीने परिपूर्ण आज्ञाधारकतेची प्रत्येक अट पूर्ण केली आहे. तो आपल्याला त्याचा आत्मा देतो, जेणेकरून आपण विश्वासूपणे  त्याचा शोध घेऊ. पवित्र आत्म्याचे हे दान या गोष्टीचा पुरावा आहे की, आपण आधीच ख्रिस्ताचे आहोत आणि त्याच्यासोबत सार्वकालिक जीवनाची खात्री आपल्याला मिळाली आहे.

हा लेख “तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी” या संग्रहाचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

हॅरिसन पर्किन्स
हॅरिसन पर्किन्स
डॉ. हॅरिसन पर्किन्स हे फार्मिंग्टन हिल्स, मिशिगन येथील ओकलँड हिल्स समाज मंडळीचे धर्मोपदेशक (पाळक) आहेत. त्याचबरोबर ते एडिनबर्ग धर्मशास्त्रीय विद्यापीठ येथे पद्धतशीर धर्मशास्त्राचे (Systematic Theology) अभ्यागत व्याख्याते आणि वेस्टमिन्स्टर धर्मशास्त्रीय विद्यापीठात मंडळीच्या इतिहासाचे ऑनलाईन शिक्षक आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यापैकी काही: "धर्मसुधारित करारशास्त्र: एक पद्धतशीर प्रस्तावना" आणि "धर्मसुधारित धर्मशास्त्र आचरणात आणणे: धर्मसुधारित धर्मशास्त्रानुसार जगण्यासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन".