पालक म्हणून तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
18/11/2025
विवाहाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
25/11/2025
पालक म्हणून तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
18/11/2025
विवाहाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
25/11/2025

नीतिमान ठरविले जाण्याचे साधनीभूत कारण

नीतिमान ठरविले जाणे   (justification)  हा प्रोटेस्टंट धर्मसुधारणेचा (Reformation) मध्यवर्ती सिद्धांत अनेकदा ‘सोला फिडे’ या घोषवाक्याद्वारे थोडक्यात मांडला जातो, ज्याचा अर्थ “केवळ विश्वासाने” असा होतो. ‘सोला फिडे’ हा वाक्यांश केवळ विश्वासानेच नीतिमान ठरविले जाणे  या शिकवणीचे प्रतिनिधित्व करतो.

ऐतिहासिकदृष्ट्या, रोमन कॅथोलिक मंडळीने देखील असे शिकवले आहे की नीतिमान ठरविले जाणे विश्वासाने होते. रोमन कॅथोलिक मंडळी असे म्हणते की विश्वास ही नीतिमान ठरविले जाण्यासाठी प्रारंभिक पायरी आहे; तो आम्हांस नीतिमान ठरविले जाण्याचा पाया आणि मूळाधार आहे. रोम नीतिमान ठरविले जाण्यासाठी विश्वासाच्या आवश्यकतेवर आग्रह धरते. म्हणून, सोला फिडे या घोषवाक्यातील फिडे (विश्वास) या घटकास रोमने मान्यता दिली आहे. परंतु, सोला म्हणजे “केवळ” या घटकास ती मान्यता देत नाही. कारण, जरी विश्वास हा नीतिमान ठरविले जाण्यासाठी प्रारंभबिंदू, पाया आणि मुळाधार असला, तरी केवळ त्याचे अस्तित्व अंतिमरीत्या नीतिमान ठरविले जाण्यासाठी पुरेसे सिद्ध होत नाही. नीतिमान ठरविले जाण्यासाठी आपल्याकडे विश्वासाव्यतिरिक्त आणखी काहीतरी असणे आवश्यक आहे —एक अपरिहार्य अट. अपरिहार्य अट म्हणजे अशी गोष्ट जी परिणाम किंवा फलश्रुती प्राप्त होण्यासाठी आवश्यक असते, परंतु तिचे अस्तित्व त्या परिणामाची खात्री देत नाही.  

उदाहरणार्थ, सामान्य परिस्थितीत आग लागण्यासाठी ऑक्सिजनची उपस्थिती ही एक अपरिहार्य अट आहे. पण, आपले सुदैवच, की केवळ ऑक्सिजनची उपस्थिती आग लागण्यासाठी पुरेशी नाही. जर तसे असते, तर प्रत्येक वेळी आपण श्वास घेतल्यावर आपल्याला आग लागली असती. म्हणूनच आपण अपरिहार्य अट आणि पुरेशी अट यांच्यामध्ये स्पष्ट भेद करतो. पुरेशी अट ही अशा स्वरूपाची असते की तिचे अस्तित्व म्हणजे परिणाम होईलच हे निश्चित असते.

हा फरक लक्षात घेता, विश्वास आणि नीतिमान ठरविले जाणे (justification) यांच्यातील परस्परसंबंधाविषयी रोमन कॅथोलिक मंडळीची चिंतनप्रणाली आणि प्रोटेस्टंट धर्मसुधारणेवर स्थापित मंडळीची चिंतनप्रणाली यांच्यात किती मूलभूत फरक आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसते. रोमन कॅथोलिक दृष्टिकोनानुसार, विश्वासाने नीतिमान ठरविले जाण्यासाठी एक आवश्यक अट आहे; मात्र ती एकल स्वरूपात पुरेशी नाही. प्रॉटेस्टंट चिंतनप्रणालीत, विश्वास केवळ आवश्यकच नव्हे तर नीतिमान ठरविले जाण्यासाठी पुरेशी अट देखील आहे. म्हणजे, जेव्हा आपण ख्रिस्तावर आपला विश्वास आणि भरोसा ठेवतो, तेव्हा देव निश्चितपणे आपल्याला त्याच्या दृष्टीने नीतिमान ठरवलेले घोषित करेल. प्रोटेस्टंट धर्मसुधारणेची चिंतनप्रणाली, जी खरे तर बायबलनुसार अचूक चिंतनप्रणाली आहे, ती अशी की, जिथे खरा विश्वास आहे, तिथे नीतिमान ठरविले जाणे हे देखील अपरिहार्यपणे आहेच. 

नीतिमान ठरविले जाण्याच्या प्रोटेस्टंट धर्मसुधारणेच्या चिंतनप्रणालीत अशी कल्पनाच अशक्य आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये विश्वास हा नीतिमान ठरविले जाण्यावाचून असू शकतो. आपल्याला विश्वासावाचून नीतिमान ठरविले जाऊ शकत नाही, आणि तसंच नीतिमान न ठरता आपल्याकडे खरा विश्वास असू शकतो, हे देखील अशक्य आहे. रोमन कॅथोलिक मंडळी मात्र असे म्हणते की नीतिमान ठरविले जाण्यासाठी विश्वास आवश्यक आहे, परंतु विश्वास असूनही आपण नीतिमान न ठरविलेले असू शकतो. म्हणजे, एखाद्याने खरा विश्वास ठेवलेला असला तरीही, तो जर एखादे गंभीर पाप करतो, तर अशाने नीतिमत्त्वाची कृपा नष्ट होते, आणि तो (योग्य प्रायश्चित्त केल्याशिवाय) नाशास पात्र ठरतो. परंतु धर्मसुधारकांच्या मते, नीतिमान ठरविले जाण्यासाठी आणि त्या स्थितीत टिकून राहण्यासाठी, केवळ खरा विश्वास असणे हेच पुरेसे आहे. 

वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार असे म्हणतो :

अशाप्रकारे, ख्रिस्तावर आणि त्याच्या नितीमत्वावर विश्वास ठेवणे आणि त्याच्यावर संपूर्णपणे विसंबून राहणे, हेच नीतिमान ठरविले जाण्याचे एकमेव साधन किंवा माध्यम आहे.

साधन किंवा माध्यम म्हणजे असे एक वाहक जे विशिष्ट उद्देशासाठी वापरले जाते. जेव्हा वेस्टमिन्स्टर कन्फेशनच्या निर्मात्यांनी लिहिले की विश्वास हे नीतिमान ठरविले जाण्याचे एकमेव माध्यम आहे, तेव्हा त्यांना नीतिमान ठरण्याच्या साधनीभूत कारणाविषयीच्या (instrumental cause) सोळाव्या शतकातील वादाची जाणीव होती. नीतिमान ठरविले जाण्याच्या या सिद्धांताची, —म्हणजे नीतिमान ठरविले जाण्याचे साधनीभूत कारण काय आहे याची—स्पष्ट समज असणे आवश्यक आहे, कारण ते ‘आपण कसे तारल्या जातो’ याविषयी आहे.  

साधनीभूत कारण (instrumental cause) ही संज्ञा इतिहासात ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातील तत्वचिंतक ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानात दिसून येते. त्याच्या चिंतनाचा गाभा हा होता: गती आणि परिवर्तन यांचा उलगडा करणे. त्याकरिता त्याने अशा अनेक कारणांचा शोध घेतला, जी कोणत्याही गोष्टीच्या स्थिती किंवा स्वरूपात परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. याचा नीतिमान ठरविले जाण्याच्या आपल्या प्रश्नाशी कसा संबंध आहे? आपली स्वाभाविक अवस्था ही अशी आहे की आपण नीतिमान नाही. आपण अनीतिमान आहोत, आणि देवाच्या दृष्टीने आपली अवस्था अशी आहे की आपण त्याच्या पूर्ण व कठोर क्रोधास पात्र ठरतो. म्हणून, आपली अवस्था शापाधीन स्थितीवरून नीतिमत्त्वाच्या स्थितीकडे बदलली जाणे अत्यावश्यक आहे.   

ॲरिस्टॉटलने चार विभिन्न प्रकारच्या कारणांचा उल्लेख केला होता: औपचारिक कारण, कार्यकारण कारण, अंतिम कारण, आणि भौतिक कारण. त्याने “साधनीभूत कारण” असा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, त्याच्या या चौकटीच्या आधारावरच नंतर “साधनीभूत कारण” या संकल्पनेचा पाया घातला गेला.  

त्यांनी खाणीतील दगडाच्या ठोकळ्यापासून घडणाऱ्या पुतळ्याचे उदाहरण दिले. ॲरिस्टॉटलने त्या ठोकळ्याला द्रव्य-कारक (material cause) म्हटले, म्हणजे ज्या पदार्थापासून वस्तू तयार होते. आकारात्मक-कारक (formal cause) म्हणजे शिल्पकाराच्या मनातील संकल्पना, म्हणजे आराखडा/रेखाचित्र, ज्यानुसार त्याला त्या वस्तूला आपल्या कल्पनेप्रमाणे अंतिम स्वरूप द्यायचे असते; कोणताही परिणाम प्रत्यक्षांत येण्यापूर्वी त्यामागे कल्पना असणे भाग आहे. कार्यसक्षम-कारक (efficient cause) म्हणजे दगडाचे पुतळ्यात रूपांतर घडवून आणणारा घटक, आणि या उदाहरणात तो कार्यसक्षम-कारक शिल्पकार आहे; बदल प्रत्यक्ष घडवणारा तोच. अंतिम उद्देश-कारक (final cause) म्हणजे वस्तू निर्माण करण्यामागचा हेतू; येथे, उदाहरणार्थ, एखाद्या बागेची शोभा वाढवणे. 

या चार कारणांबरोबर आपण “साधनीभूत-कारक” (instrumental cause) जोडू शकतो, म्हणजे ज्या माध्यमातून तो बदल प्रत्यक्ष घडतो. जर शिल्पकाराला दगडाच्या ठोकळ्याचे पुतळ्यामध्ये रूपांतर करायचे असेल, तर त्याला आकार देण्यासाठी, रूप देण्यासाठी आणि गुळगुळीत करण्यासाठी दगड कोरून काढावा लागतो; त्याची छिन्नी आणि हातोडा ही साधने आहेत ज्यांच्या मदतीने हा बदल साधला जातो. इंग्रजीमध्ये असे माध्यम दाखवण्यासाठी by आणि through हे शब्द प्रामुख्याने वापरले जातात, आणि मराठीत ‘द्वारे’ किंवा ‘ने’ किंवा ‘जोगे’ या शब्द-प्रयोगांनी अनेकदा माध्यम/साधनाकडे निर्देश केला जातो.

जेव्हा धर्मसुधारकांनी असे प्रतिपादन केले की नीतिमान ठरविले जाणे हे “विश्वासाने” किंवा “विश्वासाद्वारे” होते, तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केले की आपण नीतिमान ठरतो त्या साधनाचे स्वरूप म्हणजे—विश्वास आणि केवळ विश्वास. शापाच्या अवस्थेमधून नीतिमान ठरविले जाण्याच्या स्थितीकडे होणाऱ्या प्रवासासाठी आवश्यक असलेले एकमेव साधन विश्वास आहे. मात्र, नीतिमान ठरविले जाण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली एकमेव गोष्ट फक्त विश्वास नाही. नीतिमान ठरविले जाण्यासाठी, ख्रिस्त देखील आवश्यक आहे. म्हणजेच, आपल्याला नीतिमान ठरविले जाण्यासाठी त्याचे परिपूर्ण नीतिमत्व आणि क्रूसावरील त्याचे प्रायश्चित्त अनिवार्य आहे. नीतिमत्व  आणि न्यायाच्या (justice) त्याच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी देव जे काही मागणी करतो, ते ख्रिस्ताच्या कार्याद्वारे आणि त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठपणे (objectively) पूर्ण झाले आहे. हे सर्व त्यानेच साध्य केले आहे. रोमन कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यातील नीतिमत्वासंबंधीचा संपूर्ण वाद हा केवळ ख्रिस्ताच्या वस्तुनिष्ठ कार्याभोवती केंद्रित नाही; तर त्या कार्याचे लाभ आपल्यापर्यंत कसे पोहोचतात, या विषयाभोवती फिरतो. ख्रिस्ताचे वस्तुनिष्ठ कार्य हे व्यक्तिनिष्ठपणे (subjectively) आपल्यावर  कसे लागू केले जाते? प्रेषित पौलाच्या शिकवणुकीचा आधार घेत धर्मसुधारकांनी दिलेले उत्तर होते—“ केवळ विश्वासामध्ये आणि त्याच्यामार्फत” किंवा “केवळ विश्वासाद्वारे आणि विश्वासाने.” परंतु, केवळ विश्वास आपल्याला तारत नाही. जेव्हा आपण म्हणतो की नीतिमान ठरणे “केवळ विश्वासाने” होते, तेव्हा आपण असे म्हणत असतो की नीतिमान ठरणे हे ख्रिस्तावरील आपल्या विश्वासाद्वारे आणि त्याच्यामार्फत होते.     

रोमन कॅथॉलिक मंडळीच्या  मते, नीतिमान ठरविले जाण्याचे साधनीभूत कारण म्हणजे बाप्तिस्मा (baptism) आणि तपश्चर्या/प्रायश्चित्ताची (penance) पूर्तता. रोमन मंडळी या संस्कारांना अशी साधने मानते ज्यांच्याद्वारे आणि ज्यांच्यामधून एखादी व्यक्ती नीतिमान ठरते. यामध्ये पायाभूत फरक हा आहे: एकीकडे असे तारण जे मंडळीद्वारे पवित्र संस्कारांचे प्रशासन करून पुरोहितीय रीतीने प्राप्त होते, तर दुसरीकडे असे तारण जे केवळ ख्रिस्तावरील विश्वासाने अनुभवले जाते. आणि या दोघांतील फरक म्हणजे आकाश व अधोलोक यांमध्ये असलेला फरक. वेस्टमिन्स्टर विश्वास अंगीकार असे प्रतिपादन करतो की नीतिमान ठरण्याचे एकमेव साधन म्हणजे विश्वास, कारण केवळ विश्वासाद्वारेच आपण ख्रिस्ताच्या नीतिमत्त्वावर विसंबून राहतो आणि त्याचे नीतिमत्व प्राप्त करतो. ख्रिस्ताचे नीतिमत्व, त्याच्या प्रायश्चित्ताचे लाभ, आणि आपल्या नीतिमान ठरण्याचे वस्तुनिष्ठ गुण किंवा शाश्वत आधार, हे सर्व त्या प्रत्येकाला विनामूल्य प्राप्त होतात जो विश्वास ठेवतो. “नीतिमान विश्वासाने जगेल” (रोमकरांस. 1:17). आपल्याला नीतिमान ठरवले जाते ते केवळ विश्वासाद्वारे, विश्वास आणि कर्माच्या एकत्रीकरणामुळे नव्हे. देवाच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक सर्वकाही म्हणजे केवळ ख्रिस्ताच्या कार्यावर ठेवलेला विश्वास किंवा त्याच्यावरील दृढ भरवसा.  

विश्वास हा आम्हाला नीतिमान ठरविले जाण्याचा पाया नाही. आम्हाला नीतिमान ठरविले जाण्याचा खरा पाया म्हणजे ख्रिस्ताचे नीतिमत्व आणि त्याची सद्गुणी योग्यता. धर्मसुधारकांनी ठामपणे मांडले की, आम्हाला नीतिमान ठरविले जाण्याचे गुणवंत कारण केवळ ख्रिस्ताचे नीतिमत्वच आहे. आम्हाला नीतिमान ठरवण्याचे साधनीभूत कारण म्हणजे विश्वास; परंतु जेव्हा आपण म्हणतो की आपण केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जातो, तेव्हा याचा अर्थ असा अजिबात होत नाही की विश्वास ही अशी कोणतीतरी गुणवंत कृती आहे, जी आम्हाला नीतिमान ठरविण्याच्या पायामध्ये काहीतरी भर घालते.  

यामुळे व्यावहारिक जीवनात प्रत्यक्ष काय फरक पडतो? काही लोक असे म्हणतात की ते केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाण्यावर विश्वास ठेवतात; परंतु प्रत्यक्षात ते आपल्या विश्वासावर अशा प्रकारे अवलंबून असतात, जणू तो विश्वासच एक गुणवंत किंवा पुण्यवान कार्य आहे, जे देवाच्या न्यायाची मागणी पूर्ण करील. एखाद्या व्यक्तीकडे विश्वास असणे, ही वस्तुस्थिती स्वतः त्याच्या खात्यात कोणतीही योग्यता जोडत नाही. हो, त्याच्या खात्यात अनंत योग्यता गणली जाते, पण ती त्याच्या स्वतःच्या विश्वासाची नसून, ख्रिस्ताची योग्यता आहे, जी त्याला लावून दिली जाते. आपण ख्रिस्ताची ही योग्यता केवळ विश्वासाद्वारेच प्राप्त करू शकतो — आणि त्या विश्वासाच्या कृतीत स्वतः काहीही योग्यता नाही. जो आपल्याला तारतो  तो केवळ ख्रिस्त आहे; आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विश्वास. आपल्या तारणासाठी, आपण आपल्या जीवनातील इतर कोणत्याही गोष्टीवर नव्हे, तर केवळ ख्रिस्तावर आणि त्याच्या नीतिमत्वावरच पूर्णपणे विसंबून राहतो.

हा अंश आर.सी. स्प्रौल यांच्या ‘ ट्रुथ वी  कंफेस’ मधून घेतला आहे .


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आर. सी. स्प्रौल
आर. सी. स्प्रौल
डॉ. आर. सी. स्प्रौल हे लिगोनियर मिनिस्ट्रीज या संस्थेचे संस्थापक होते. ते सेंट अँड्र्यूज चॅपे, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील प्रथम उपदेशक आणि शिक्षक होते. ते रिफॉर्मेशन बायबल कॉलेजचे पहिले अध्यक्ष होते आणि टेबलटॉक मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा रिन्यूइंग युवर माइंड हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ स्टेशनवर दररोज प्रसारित केला जातो आणि ऑनलाइनही ऐकता येतो. त्यांनी द होलीनेस ऑफ गॉड, चोजन बाय गॉड, आणि एव्हरीवन्स अ थिओलॉजियन या सह शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. डॉ. स्प्रौल यांना संपूर्ण जगभर देवाचे वचन अचूक आणि त्रुटीरहित आहे या सत्याचे प्रभावी आणि स्पष्ट समर्थन करणारे म्हणून ओळखले जाते. देवाच्या लोकांनी त्याच्या वचनावर ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे — या गोष्टीवर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भर दिला.