देवाच्या करारशास्त्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
27/11/2025
3 Things You Should Know about Colossians
कलस्सैकरांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा ३ गोष्टी
09/12/2025
देवाच्या करारशास्त्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
27/11/2025
3 Things You Should Know about Colossians
कलस्सैकरांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा ३ गोष्टी
09/12/2025

नरकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

5 Things You Should Know about Hell

नरकाचा विषय हा चिंतन करण्याच्या दृष्टीने कठीण असल्यामुळे, मंडळीत आणि मंडळीबाहेर असलेल्या अनेक लोकांनी या विचाराला सौम्य रूप देण्याचा प्रयत्न केला आहे —“प्रीतीपूर्ण देव लोकांना इतक्या क्रूर वेदनादायक ठिकाणी कसा काय पाठवू शकतो?” परंतु देवाने नरकाच्या कठोर सत्यापासून त्याला निर्दोष ठरविण्याची जबाबदारी आमच्यावर सोपविलेली नाही, आणि त्या सत्याची तीव्रता कमी करण्याचा अधिकार कोणालाही देत नाही. खरं तर, नरकाविषयी आपण जे काही शिकतो, त्यातील बराचसा भाग हा प्रीतीपूर्ण येशूकडूनच येतो, ज्याची नरकाविषयीची शिकवण जुना कराराच्या शिकवणीला अधिक व्यापक स्वरूप देते. येथे नरकाविषयी जाणून घेण्याजोग्या पाच गोष्टी आहेत. 

1. नरक हे एक असे वास्तविक ठिकाण आहे, जिथे पीडा ही जाणीवपूर्वक अनुभवली जाणारी आणि कधीही न संपणारी आहे.

“अनायहिलेशनिझम” (annihilationism म्हणजे नाशवाद) किंवा “कंडिशनल इम्मॉर्टॅलिटी” (conditional immortality म्हणजे सशर्त अमरत्व) या चुकीच्या मतानुसार शेवटच्या न्यायनिवाड्याच्या वेळी दुष्टांचा मुळासकट नाश होतो, त्यामुळे त्यांना पृथ्वीवरील जीवनानंतर जाणीवेने अनुभवाव्या लागणाऱ्या सार्वकालिक शिक्षेच्या वास्तवतेविषयी काहीही काळजी करण्याची गरज नाही. या मताच्या उलट, पवित्र शास्त्र नरकाला जाणीवपूर्वक आणि अखंड अशा सार्वकालिक  पीडेचे ठिकाण म्हणून दर्शवते. त्या यातना न थांबणाऱ्या आहेत (यहूदा 13; प्रकटीकरण 20:10). उदाहरणार्थ, लूक 16 मध्ये श्रीमंत मनुष्य अधोलोकात “यातना भोगत” (लूक 16:23) असल्याचे वर्णन आहे, म्हणजे त्याला आपल्या दुःखद परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे; आणि म्हणून अशा यातनेत राहण्यापेक्षा आपले अस्तित्वच नाहीसे व्हावे असे त्याला वाटणे स्वाभाविक ठरेल. 

तसेच “दुसरी संधी” यासाठीही शास्त्राधार नाही. नरकातील रहिवाशांचे निवासस्थान हे चिरस्थायीरीत्या निश्चित केलेले असते. मृत्यू म्हणजे कायमचा पत्ता बदलला जाण्याचा क्षण. म्हणून नरकातील आत्मे शेवटी नाहीसे होतील (नाशवाद) किंवा त्यांना पुन्हा संधी दिली जाईल, या दोन्ही विचारांना पवित्र शास्त्र पाठबळ देत नाही. 

2. नरक हे प्रत्येक मानवाच्या शक्य असलेल्या दोनच अंतिम ठिकाणांपैकी एक आहे.

एखादी व्यक्ती मरण पावल्यावर तिचा देह पृथ्वीवर पुरला जातो; पण तिचा आत्मा ताबडतोब देवाच्या उपस्थितीत पोहोचतो जिथे तिला एकतर स्वर्गात प्रवेश दिला जाईल किंवा नरकात टाकला जाईल. वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार 32.1 याचे वर्णन येणेप्रमाणे करतो: 

“मनुष्यांचे देह मरणानंतर धुळीत परत जातात व क्षय पावतात; परंतु त्यांचे आत्मे— जे मरत नाहीत किंवा झोपतही नाहीत, तर ज्यांचे अस्तित्व अमर राहते, ते त्वरित त्या देवाकडे परत जातात ज्याने त्यांना ते अस्तित्व दिले आहे. नीतिमानांचे आत्मे, त्या वेळी पवित्रतेत सिद्ध केलेले, सर्वोच्च स्वर्गात घेतले जातात; तेथे ते देवाचे मुख पूर्ण तेज व वैभवाने  न्याहाळतात आणि आपल्या देहांच्या पूर्ण मुक्तीची प्रतीक्षा करतात. तर दुष्टांचे आत्मे नरकात टाकले जातात, जिथे ते त्या मोठ्या दिवसाच्या भयंकर न्यायनिवाड्यासाठी राखून ठेवलेले, यातनात आणि पूर्ण अंधारात राहतात. देहापासून विलग झालेल्या आत्म्यांसाठी या दोन ठिकाणांशिवाय शास्त्र इतर कोणतेही स्थान मान्य करत नाही.” 

शेवटल्या दिवशी प्रत्येक आत्मा आपल्या देहाशी पुन्हा मिळविला जाईल. त्या वेळी नीतिमानांना अनंतकाळचे जीवन प्राप्त होईल, व दुष्टांना “सार्वकालिक यातनेत” (वेस्टमिन्स्टर विश्वास 33.2) टाकले जाईल. पुनरुत्थानानंतर देहाशी पुन्हा एकत्र झालेल्या आत्म्यांसाठीही या दोन ठिकाणांशिवाय शास्त्र दुसरे कोणतेही स्थान मान्य करत नाही. 

3. नरक हे देवाच्या क्रोधपूर्ण उपस्थितीचे ठिकाण आहे.

नरकातील “सार्वकालिक यातना” याचे वर्णन वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार 33.2 मध्ये “प्रभूची उपस्थिती व त्याच्या सामर्थ्याचे गौरव यांपासून दूर असे सार्वकालिक नाशाच्या शिक्षेचे ठिकाण” असे केलेले आहे. बऱ्याचदा, नरक हे देवाच्या उपस्थितीपासून वेगळे होण्याचे ठिकाण म्हणून मानले जाते. पण देव सर्वव्यापी आहे—तो कोठेही अनुपस्थित राहू शकत नाही. त्याऐवजी, पवित्र शास्त्रामध्ये नरकाचा अनुभव त्याच्या अनुपस्थितीचा नव्हे, तर त्याच्या क्रोधयुक्त उपस्थितीचा—कधीही न संपणारा त्याचा रोष व शिक्षा—अशा शब्दांत चित्रित केलेला आहे. आपला देव, जो “भस्म करणारा अग्नि” आहे (इब्री लोकांस 12:29), तो नरकातील दुष्टांवर आपला “कोप व क्रोध” (रोमकरांस 2:8) ओतेल.

हे जर ख्रिस्ती व्यक्तीला कठोर वाटत असेल, तर त्याचे कारण असे की देवाचा हा पैलू आपल्या त्या अनुभवाशी जुळत नाही जो आपण त्याची प्रिय लेकरें म्हणून घेतो. दुष्टांना नरकात जो अनुभव येईल, तो देवाचा तोच कोप असेल, जो ख्रिस्ताने आपल्या लोकांसाठी शांत केला होता; पण तिरस्कृतांसाठी नरकाचे वास्तव त्याच्या प्रतीकात्मक वर्णनांपेक्षाही अधिक गहन आणि पीडादायक आहे, कारण कोणतेही चिन्ह वास्तवाचे संपूर्ण आणि अचूक स्वरूप प्रकट करू शकत नाही. कदाचित पवित्र शास्त्रातील नरकाची प्रतीकात्मक वर्णने याकरिता दिली आहेत की एका पवित्र देवाकडून येणारी सार्वकालिक शिक्षा ही मानवी भाषेच्या पलीकडील वेदना आहे.

4. नरकाचे रहिवासी तेच आहेत ज्यांनी तेथे जाणे निवडले आहे.

नरक हे त्यांच्यासाठीचे ठिकाण आहे ज्यांनी प्रकाशाऐवजी अंधारावर प्रेम करणे निवडले आहे (योहान 3:18–21). हे श्रीमंत माणसाच्या आर्त हाकेशी विसंगत वाटू शकते: “पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर, आणि लाजरला पाठवून त्याच्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड कर, कारण मी या ज्वालांमध्ये यातना भोगत आहे” (लूक 16:24). परंतु लक्षात घ्या की त्या श्रीमंताला अचानक देवाची उत्कंठा लागलेली नाही; त्याला केवळ देवाच्या शिक्षेतून सुटका एवढीच हवी आहे.

कॅल्विनवादी सहज व ठामपणे मान्य करतात की प्रत्येक व्यक्तीला शेवटी तेच प्राप्त होते जे त्याने स्वेच्छेने निवडले आहे—एक तर पवित्र आत्म्याच्या नव्या जन्माद्वारे देवाची उपासना करणे, किंवा देवाला शाप देणे. जे नरकात आहेत ते अन्याय झाल्याचा दावा करू शकत नाहीत, कारण त्यांना नेमके तेच मिळाले आहे जे त्यांचे वेतन आहे, आणि नेमके तेच जे त्यांनी निवडले आहे. पवित्र शास्त्राला यात कोणतीही विसंगती दिसत नाही की नरक एकीकडे दुष्टांवर देवाने केलेली शिक्षा आहे आणि दुसरीकडे मानवांनी स्वेच्छेने निवडलेले गंतव्य. त्यामुळे, नरक ही आपल्या स्वतःच्या वासनांना व देहवासनांना संपूर्णपणे “सोपवून देणे” आहे (रोमकरांस 1:24). 

5. नरक हे देवाच्या स्वभावाशी सुसंगत आहे.

नरक हा देवाच्या चारित्र्यावर काळा डाग नाही. हे त्याच्या चरित्रातील असे लाजिरवाणे कामही नाही जे तो खरोखर कोण आहे त्याशी विसंगत ठरेल. उलट, नरक हे देवाच्या पवित्र न्यायाशी सुसंगत आहे, जो पापाची शिक्षा त्या शिक्षेस पात्र ठरलेल्या व्यक्तीच्या दोषानुसार योग्य प्रमाणात असावी अशी मागणी करतो. देवाचा न्याय आणि त्याचे औदार्य हे परस्परविरोधी गुण नाहीत; ते पूर्णपणे सुसंगत आहेत, आणि स्वर्ग व नरक ही त्या पवित्र एकत्वाचीच अभिव्यक्ती आहेत. देव जर न्यायी नसता, तर नाशवाद, सार्वत्रिकवाद, किंवा परलोकाशी संबंधित इतर कोणताही अशास्त्रीय दृष्टिकोन शक्यतेच्या कक्षेत आला असता.

त्याच्या पुत्राच्या कार्यात देवाचे औदार्य आणि न्याय विचारात घ्या. जर नरकच नसता, तर ख्रिस्ताचे कार्य व्यर्थ गेले नसते काय? दुष्टांचा केवळ नाश झाला असता किंवा त्यांना कशाप्रकारे तरी स्वर्गात प्रवेश मिळाला असता, तर ख्रिस्ताचे बलिदान अनावश्यक ठरले नसते काय? खरंच, नरक नाकारणे हे केवळ देवाच्या स्वभावाशी विसंगत नसून, देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवण्यासारखे आहे (इब्री लोकांस 10:29). देवाचा स्वभाव—त्याचा न्याय आणि त्याचा चांगुलपणा—याची मागणी अशी आहे की पापाची संपूर्ण शिक्षा दुष्टांवर नीतिसंगत प्रमाणात सर्वकाळासाठी अंमलात आणली जावी.

नरकाविषयी आणखी बरेच काही सांगता येईल; तरी, कदाचित आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पवित्र शास्त्रातील नरकाची अनेक वर्णने ही ख्रिस्ताने, ज्याने त्यातून आमची सुटका केली, त्याच्या कृपेचे महत्त्व वाढवण्यासाठी दिलेली आहेत, आणि इतरांनीही खऱ्या विश्वासाने व पश्चात्तापी अंत:करणाने ख्रिस्ताकडे वळून नरकाच्या यातनांपासून पळ काढावा असा त्यांना इशारा देण्याची तीव्र इच्छा आपल्यामध्ये जागवण्यासाठी आहेत..

हा लेख “तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी” या संग्रहाचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आरोन गॅरियट
आरोन गॅरियट
रेव्ह. आरोन एल. गॅरियट हे टेबलटॉक मासिकाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील रिफॉर्मेशन बायबल कॉलेजमध्ये निवासी संलग्न प्राध्यापक आहेत आणि व्हीटन महाविद्यालय व ओरलँडो, फ्लोरिडा येथील रिफॉर्म्ड थिऑलॉजिकल सेमिनरीतून पदवीधर आहेत. ते प्रेस्बिटेरियन चर्च इन अमेरिका या मंडळी-पंथातील एका मंडळीमध्ये नियुक्त शिक्षण देणारे पाळक आहेत.