3 Things You Should Know about James
याकोबाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
12/02/2026
3 Things You Should Know about Micah
मीखा संदेष्ट्याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3  गोष्टी
19/02/2026
3 Things You Should Know about James
याकोबाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
12/02/2026
3 Things You Should Know about Micah
मीखा संदेष्ट्याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3  गोष्टी
19/02/2026

जखर्‍याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

3 Things You Should Know about Zechariah

1. जखर्‍याविषयी प्रथम लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याची ओळख.

जुन्या करारात जखर्‍या हे नाव सर्वसामान्य आहे; परंतु पहिल्याच वचनात त्याची ओळख ठामपणे अशी दिलेली आहे की तो “इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्‍या” आहे. नेहेम्या 12:1–4 नुसार इद्दो हा त्या याजकांपैकी एक होता, जे बाबेलच्या बंदिवासानंतर जरूब्बाबेलसोबत पॅलेस्टाइनमध्ये परतले. निर्वासनानंतर यहूदाकडे परतलेल्या लोकांसमोरची पहिली महत्त्वाची जबाबदारी म्हणजे जे मंदिर बाबेलच्या लोकांनी उध्वस्त केले होते ते पुन्हा बांधणे. जरूब्बाबेलच्या नेतृत्वाखाली हे काम सुरुवातीला भरभराटीने पुढे गेले, पण बाहेरील विरोध आणि आंतरिक उदासीनता (एज्रा 4, 5) यांमुळे ते लवकरच ढासळू लागले. जखर्‍याचा आजोबा इद्दो बहुधा या पुनर्बांधणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात सक्रिय होता, आणि स्वतः जखर्‍याने त्या कामाच्या पूर्णत्वात एक महत्त्वाची भूमिका बजावली. विडंबना ही की, येशूच्या साक्षीनुसार (मत्तय 23:35–37) जखर्‍या ज्या मंदिराच्या पुनर्बांधणीत प्रभावी ठरला, त्याच मंदिरात त्याची हत्या करण्यात आली. 

परंतु त्याच्या हत्येपूर्वी, जखर्‍याची दीर्घ आणि व्यापक सेवा होती. आपल्या पहिल्या संदेशांची (जखर्‍या 1–6) तारीख तो दारयावेशाच्या दुसऱ्या वर्षी असल्याची सांगतो, म्हणजे अंदाजे ख्रिस्तपूर्व 520 वर्ष. तर दुसऱ्या मालिकेतील संदेशांची तारीख (जखर्‍या 7–8) तो दारयावेशाच्या चौथ्या वर्षी असल्याची सांगतो (ख्रिस्तपूर्व 518). अध्याय 9–14 हे अध्याय जरी विशिष्ट तारीख नसलेले नमूद केलेले असले, तरी ग्रीसचा उल्लेख पाहता(जखर्‍या 9:13) हे संदेश नंतरचे, कदाचित ख्रिस्तपूर्व 480–470 च्या दरम्यानचे असावेत, असे निदर्शनास येते. एकूणच, जखर्‍याने साधारण पन्नास वर्षे भविष्यवाणीची सेवा केली..  

2. जखर्‍याविषयीची दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्या संदेशाच्या विषयवस्तूशी संबंधित आहे.

बाबेलचा बंदिवास संपला होता, पण लोकांना अपेक्षित आशीर्वाद किंवा समृद्धी अनुभवास येत नव्हती. त्यांना शमरोनकडून विरोध, देशातील उध्वस्त अवस्था, कठीण परिश्रम आणि विविध प्रकारचे कष्ट सहन करावे लागत होते. परिस्थिती पूर्णपणे नाउमेद करणारी वाटत होती; असे भासत होते की जणू परमेश्वर त्यांना विसरला आहे. “जखर्‍या” या नावाचा अर्थच आहे “परमेश्वर स्मरण ठेवतो”; त्यामुळे त्याचे नाव ऐकणे हीच लोकांसाठी अशी आठवण ठरली असती की परमेश्वराला त्यांचा विसर पडलेला नाही.

जखर्‍याच्या उपदेशाचा मुख्य विषय हा होता : देवाचा कधीही निष्फळ न ठरणारा किंवा कधी न फसणारा हेतू यावर असलेली आशा. आशा ही विश्वासाने भविष्याकडे टाकलेली दृष्टी आहे. जसा प्रत्येक खरा विश्वास हा वस्तुनिष्ठ असतो, तशीच आशाही वस्तुनिष्ठ असते, आणि तिच्या विषयावरच तिचे मूल्य अवलंबून असते. आशा म्हणजे थरथरणारी, संकोचलेली, “कदाचित होईल” अशी इच्छा नव्हे; उलट ती देवाची वचने काहीही असोत, ती असत्य ठरूच शकत नाहीत, याविषयीची खात्रीपूर्वक जाणीव आहे. देवाकडे खिळलेली दृष्टी हीच आशेची गुरुकिल्ली आहे; म्हणूनच जखर्‍या लोकांचे लक्ष देवाकडे वळवतो—त्याचे सामर्थ्य, त्याचे सार्वभौमत्व, त्याची करारनिष्ठा आणि त्याने देऊ केलेला ख्रिस्त.

हीच आशा जखर्‍याच्या पुस्तकात केंद्रस्थानी असल्यामुळे, हे पुस्तक संपूर्ण जुन्या करारातील सर्वांत स्पष्ट आणि ठोस मशीहा–केंद्रित पुस्तकांपैकी एक ठरते. ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताद्वारे शाप उलटवण्याच्या देवाच्या मुक्तीच्या उद्देशावर लोकांचे लक्ष केंद्रित करणे—हे त्या काळातील निराशाजनक परिस्थितीमुळे अनेक प्रकारे आशा सोडून बसलेल्या लोकांच्या अंतःकरणात आशा निर्माण करण्यासाठी व तसेच पुनरुज्जीवन घडवून आणण्यासाठी अत्यावश्यक होते. ख्रिस्ताकडे पाहणे म्हणजे साक्षात देवाच्या अभिवचनाच्या गाभ्यात डोकावणे आणि त्याने दिलेल्या इतर प्रत्येक अभिवचनाविषयी निश्चयशील खात्री प्राप्त करणे; कारण देवाची वचने कितीही असोत, ती सर्व ख्रिस्तामध्ये “हो” आणि “आमेन” अशीच आहेत (2 करिंथ 1:20).   

येणारा जो ख्रिस्त त्याच्याकडे लोकांचे लक्ष वळवताना, जखर्‍या ख्रिस्ताच्या मध्यस्थीय कार्यावर, म्हणजे एक अंतिम आदर्श संदेष्टा, अंतिम याजक आणि राजा म्हणून त्याचे कार्य, यावर विशेष भर देतो. देवाचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे संदेष्टेपद हे जखर्‍या 13:7 मध्ये स्पष्टपणे दिसते, जिथे सेनाधीश परमेश्वर मशिहाचा उल्लेख “माझा मेंढपाळ” आणि “माझ्या बरोबरीचा पराक्रमी पुरुष” असा करतो, ज्यावर तो स्वतः प्रहार करतो. मत्तय 26:31 हे वचन थेट ख्रिस्त आणि वधस्तंभावरील त्याचे मरण याशी संबंधित  आहे. हे ख्रिस्ताने “उत्तम मेंढपाळा” विषयी केलेल्या विवरणाशीही समांतर आहे, जिथे तो जाहीर करतो की तो मेंढरांसाठी आपला जीव अर्पण करतो आणि “मी व पिता एक आहोत” असे म्हणतो (योहान 10:30). त्यांची याजकीय सेवा जखर्‍या 3:8 आणि जखर्‍या 6:12 मध्ये “कोंब” किंवा “डहाळी” या महत्त्वपूर्ण मशीहावाचक पदवीतून, प्रमुख याजक यहोशवाच्या सादृश्याने अत्यंत स्पष्ट होते.  याव्यतिरिक्त, यहोशवा स्वर्गीय न्यायालयासमोर उभा आहे, ही संपूर्ण दर्शनमालिका देव पाप्यांना कसा क्षमा करतो आणि त्यांना नीतिमान ठरविले जाणे कसे प्राप्त होते याचे सुंदर चित्र उभे करते: नीतिमान ठरविले जाण्याची गरज फार मोठी आहे, नीतिमान ठरविले जाण्याची कृती पूर्णपणे कृपायुक्त आहे, नीतिमान ठरविले जाण्याचा पाया (ती डहाळी) भक्कम आहे आणि नीतिमान ठरविले जाण्याची मागणी तर्कशुद्ध आहे. ख्रिस्ताचे राजपद जखर्‍या 10:4 मध्ये (कोनशिला, खुंटी, युद्धधनुष्य, सर्वसत्ताधीश अधिपती) आणि जखर्‍या 9:9 मध्ये दिसते—जे पाम संडेच्या दिवशी नेमकेपणाने पूर्ण झालेले भविष्यवचन आहे. ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याशी संबंधित राजेपदाचे पैलू देखील (जखर्‍या 14) या आशेचा अविभाज्य भाग आहेत. या भविष्यवाणीला “जखर्‍यानुसार सुवार्ता” असे संबोधणे मुळीच अतिशयोक्ती ठरणार नाही. 

3. जखर्‍याविषयी जाणून घेण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे त्याची कार्यपद्धत. 

जखर्‍या 1:1 सांगते की जखर्‍या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. त्या वचनाच्या प्राप्त होण्याचे एक प्रमुख साधन म्हणजे दर्शनमालिका. पहिल्या सहा अध्यायांमध्ये नोंदवलेली ही दर्शनांची मालिका देवाने आपल्या लोकांसाठी आखलेल्या उद्देशाचे विस्तृत, व्यापक चित्र उभी करते—त्या काळातील तात्कालिक परिस्थितीं पासून ते अंतिम पूर्णत्वापर्यंत.

प्रकट केलेल्या संदेशाव्यतिरिक्त, जखर्‍याचे पुस्तक हे देवाने दर्शनांद्वारे आपले वचन कशा प्रकारे प्रकट केले याचे एक उत्तम उदाहरणसंग्रह आहे. पहिली गोष्ट म्हणजे, ही दर्शनें वैयक्तिक आणि अंतर्गत स्वरूपाची होती—ती पाहण्याचा विशेषाधिकार केवळ संदेष्ट्यालाच होता. दुसरी गोष्ट, दर्शन प्राप्त करणारा व्यक्ती हा त्यात सक्रिय सहभाग घेणारा असतो; जखर्‍या त्या दर्शनांचा अर्थ समजावून सांगणाऱ्या देवदूताशी संवाद साधतो, आणि तो देवदूत त्याला त्या दर्शनाचा अर्थ व आशय समजून घेण्यास मार्गदर्शन करतो. तिसरी गोष्ट, ही दर्शनें अत्यंत प्रतीकप्रधान होती: रंगीबेरंगी घोडे, चार कारागीर, समया (दिवट्या) आणि जैतुनाची झाडे, उडणारा पट (गुंडाळी) आणि घोड्यांनी सज्ज युद्धरथ, ही सर्व प्रतीके काही विशिष्ट आध्यात्मिक सत्याकडे निर्देश करीत होती.

जखर्‍याच्या कार्यपद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रलयकालीन (युगांत-अपॉकलिप्टिक) सूर; ही अशा प्रकारची भविष्यवाणी होती जी दूर भविष्याशी आणि काळाच्या अंतिम पूर्ततेशी  संबंधित होती. म्हणूनच, जखर्‍याचा संदेश केवळ बंदिवासानंतरच्या इस्राएलपुरता मर्यादित राहत नाही, तर त्यापलीकडेही पोहोचतो. तो मंडळीला आश्वासन देतो की सर्वकाही देवाच्या नियंत्रणाखाली आहे आणि देवाची सनातन योजना व उद्देश पूर्ण व्हावेत यासाठी सर्व गोष्टी योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत. 

हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ :याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

मायकल पी. व्ही. बॅरेट
मायकल पी. व्ही. बॅरेट
डॉ. मायकल पी.व्ही. बॅरेट हे ग्रँड रॅपिड्स, मिशिगन येथील प्युरिटन रिफॉर्म्ड थियोलॉजिकल सेमिनरीमध्ये जुन्या कराराचे वरिष्ठ संशोधन प्राध्यापक आहेत. ते 'बिगिनिंग विथ मोशेस: अ गाईड टू फाइंडिंग ख्राईस्ट इन द ओल्ड टेस्टामेंट' आणि 'व्हिसडम फॉर लाईफ: 52 ओल्ड टेस्टामेंट मेडिटेशन्स' यासह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.