
मलाखी या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
22/01/2026
होशेय या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
29/01/2026हाग्गय या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
1. आजच परमेश्वराच्या आज्ञापालनाला प्राधान्य देण्याचा अनुकूल दिवस आहे
हाग्गयचे पुस्तक अत्यंत निराश झालेल्या लोकांसाठी लिहिले गेले होते. बाबेलहून यहुदा येथे परत आलेल्या रहिवाशांना, आपल्या मूळ गावी परतल्यावरचे जीवन अत्यंत कठीण वाटत होते. चोहोबाजूंनी शत्रूंनी वेढलेले असताना आपल्या देशाची आणि पूर्वीच्या जीवनाची नव्याने उभारणी करणे त्यांच्या कल्पनेपेक्षाही फार कठीण असल्याचे सिद्ध झाले, आणि यशया 40–66 मधील महिमा-संपन्न अभिवचने त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवापासून खूप दूर असल्यासारखी वाटत होती. परिणामी, त्यांचे जीवन अधिक सोयीस्कर होईपर्यंत, त्यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प थांबवून ठेवला. अशा महत्त्वाकांक्षी योजनांसाठी ही योग्य वेळ नव्हती, हे त्यांना जणू उघडच स्पष्ट वाटू लागले होते (हाग्गय 1:2).
परमेश्वराचा दृष्टिकोन मात्र सर्वस्वी वेगळा होता. त्याने हे दाखवून दिले की लोकांनी स्वतःची लाकडी आच्छादन असलेली घरे बांधण्यासाठी साधने शोधून काढली होती (हाग्गय 1:4; 1 राजे 6:9; 7:3, 7 पाहा). दरम्यान, त्यांनी आज्ञा न पाळल्यामुळे त्यांच्या इतर सर्व कार्यांवर देवाचा शाप होता (हाग्गय 1:5–6). म्हणून त्यांनी आपल्या मार्गांचे परीक्षण करणे, सबबींचे उच्चाटन करणे, आणि परमेश्वराच्या आज्ञापालनाला प्राधान्य देणे आवश्यक होते (हाग्गय 1:8). राज्यपाल जरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोशवा यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी हाग्गयची वचने ऐकली आणि कामाला सुरुवात केली (हाग्गय 1:12). परमेश्वर त्यांच्या सोबत होता, आणि त्याने त्यांच्या आत्म्यांना चेतविले होते, जेणेकरून त्यांनी एकत्र येऊन मंदिराच्या पुनर्बांधणीचे कार्य हाती घेतले, जे परमेश्वराच्या आपल्या लोकांमध्ये असलेल्या उपस्थितीचे दृश्य प्रतीक होते (हाग्गय 1:14).
2. जे श्रेष्ठ, ते अद्याप येणे बाकी आहे.
लोक यरुशलेममधील मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी काम करत असताना, निराशेचा आणखी एक संभाव्य स्रोत समोर आला. वैभवाच्या दृष्टीने, ह्या नवीन मंदिराला पूर्वीच्या मंदिरासारखे वैभव लाभले नव्हते (हाग्गय 2:2–3). ते शलमोनाच्या मंदिराइतकेच मोठे असले तरी, त्यात विपुल चांदी आणि सोन्याची कमतरता तर होतीच, शिवाय शलमोनाच्या दिवसांत जसे ते राज्य आणि साम्राज्याचे मध्यवर्ती प्रतीक होते, तसे स्थान या मंदिराला आता उरले नव्हते. याहूनही वाईट म्हणजे, बाबेलच्या लोकांनी ते भवन उध्वस्त करण्यापूर्वीच परमेश्वराचे गौरव त्यातून निघून गेले होते (यहेज्केल 10). देवाच्या उपस्थितीचे अभिवचन पुन्हा मिळाल्यावाचून (यहेज्केल 43 पाहा) हे मंदिर एक निरुपयोगी, रिकामे कवच राहिले असते. तरीसुद्धा, संदेष्ट्याद्वारे आलेल्या परमेश्वराच्या शब्दांनी लोकांना हे पाहण्यास प्रोत्साहित केले की, जरी त्याचे परत येणे हे अजून डोळ्यांनी दिसत नव्हते, तरी तो खरोखरच त्यांच्या मध्ये परत आला आहे (हाग्गय 2:4–5). लोकांनी बळकट होऊन काम करावे, अगदी त्याच आज्ञा ज्या यहोशवा आणि शलमोन यांच्या काळातही प्रभूने दिल्या होत्या. (यहोशवा 1:6; 1 राजे 2:2). इस्राएली मिसरमधून बाहेर पडले तेव्हा जो देव त्यांच्या सोबत होता, तोच देव आजही त्यांच्या सोबत आहे, आणि त्यांचे श्रम व्यर्थ होऊ नयेत हे तोच सुनिश्चित करील (हाग्गय 1:13).
तरीही, त्यांच्या दृष्टीसमोर उभी असलेली दृश्य परिस्थिती ही परमेश्वराच्या कार्याची अंतिम कसोटी नव्हती. भूतकाळात त्याने जे अद्भुत केले त्याकडे मागे वळून पाहून ते आधार आणि धीर मिळवू शकत होते; पण परमेश्वर पुढे काय करणार आहे, हे लक्षात ठेवणे देखील त्यांच्यावर बंधनकारक होते (हाग्गय 2:6–9). कारण एक दिवस असा येणार होता, जेव्हा परमेश्वर या वर्तमान जगव्यवस्थेचे रूपांतर करील—तिला उलथून टाकून राष्ट्रांना त्यांच्या खऱ्या ठिकाणी उभे करील—आणि आपल्या लोकांसाठी असा आशीर्वाद निश्चित करील की त्याच्या मंदिरातून शांती (शालोम) सतत वाहत राहील.
3. परमेश्वराची अभिवचने वर्तमान आणि भविष्य यांना जोडून ठेवतात.
परमेश्वराने आपल्या लोकांबरोबर राहण्याचे दिलेले अभिवचन, ज्याने यरुशलेमच्या मंदिरामध्ये मूर्त स्वरूप धारण केले होते, आणि मशीहाविषयीचे त्याचे अभिवचन, ज्याने दाविदाच्या वंशामध्ये मूर्त रूप घेतले होते, ही दोन्ही अभिवचने हाग्गयच्या भविष्यवाणीत सर्वत्र धाग्याप्रमाणे एकमेकांत गुंफलेली आढळतात (2 शमुवेल 7 पाहा). संदेष्ट्याच्या कार्याच्या सुरुवातीला ही दोन्ही अभिवचने जणू संशयाच्या धुक्यात हरवलेली भासू लागली होती : यरुशलेमचे मंदिर अद्यापही उध्वस्त अवस्थेत होते, परमेश्वराच्या गौरवाने त्याचा त्याग केला होता, आणि दाविदाचा वंश जणू छाटून टाकलेला वाटत होता, जणू टाकून दिलेल्या शिक्क्याच्या अंगठीसारखा, जो परमेश्वराने नाकारलेला आहे (यिर्मया 22:24–26 पाहा). पुस्तकाच्या शेवटास पुनर्स्थापनेचे प्रत्यक्ष, दृष्यमान पुरावे दिसतात—मंदिर पुन्हा उभे राहिले आहे, आणि राज्यपाल जरुब्बाबेल, जो दाविदाचा वंशज आहे, त्याची देवाच्या निवडलेल्या शिक्क्याच्या अंगठी म्हणून पुष्टी केली जाते (हाग्गय 2:23). तरीसुद्धा, मंदिरात अजूनही गौरवाची अनुपस्थिती आहे, आणि राज्यपाल हा ना राजा आहे, ना अभिवचन दिलेला मशीहा. लोकांनी विश्वासाने जगणे भाग होते—देव त्यांच्या मध्यभागी जे चांगले कार्य करीत आहे, ते अंतिम दिवशी पूर्णत्वाला जाईल, यावर त्यांनी विश्वास ठेवणे आवश्यक होते.
दोन्ही अभिवचने अखेरीस येशू ख्रिस्ताकडेच निर्देश करीत होती. तोच देवाचे खरे मंदिर आहे (योहान 2:19), ज्याच्यामध्ये देवाचे गौरव आपल्या सोबत वस्ती करण्यासाठी आले आहे (योहान 1:14). इम्मानुएल (“आम्हाबरोबर देव”) म्हणून, येशूने आपल्या लोकांमध्ये देवाच्या उपस्थितीचे देही प्रतिनिधित्व केले. आता येशू स्वर्गात गेला आहे आणि त्याने मंडळीवर आपला आत्मा ओतला आहे, त्यामुळे या जगात देवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व त्याच्या लोकांद्वारे केले जात आहे. ख्रिस्ताचे शरीर म्हणून, मंडळी हे नवीन मंदिर आहे, जे यहुदी आणि परराष्ट्रीय यांपासून बनलेले आहे, आणि जे देवाचे पवित्र निवासस्थान होण्यासाठी एकत्र बांधले गेले आहे (इफिसकरांस 2:16–22; 2 करिंथकरांस 6:16–7:1 पाहा).आपणही जरुब्बाबेलच्या त्या महान पुत्राकडे, ज्याच्यामध्ये आपली आशा स्थिर आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताकडे पाहतो (मत्तय 1:13). लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जावे असे कोणतेही रूप किंवा ऐश्वर्य त्याच्यामध्ये नव्हते; त्याने सेवकाचे रूप धारण केले आणि त्यानंतर स्वतःला अजून अधिक खालच्या स्तरावर नम्र करून मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण पत्करेपर्यंत आज्ञाधारक राहिला (फिलिप्पैकरांस 2:5–8). तरी, त्या आज्ञाधारकतेच्या कृतीच्या फलस्वरूप, देवाने आपल्या अभिषिक्ताला प्रत्येक नावापेक्षा श्रेष्ठ असे नाव दिले आहे (फिलिप्पैकरांस 2:9–11). वर्तमान समयी, आपण परमेश्वर पुन्हा एकदा आकाश व पृथ्वी हलवून सोडील त्या अंतिम दिवसाची प्रतिक्षा करीत असताना, आपले कर्तव्य विश्वासात स्थिर राहणे होय, हे लक्षात ठेऊन की ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थानाच्या प्रकाशात, परमेश्वरामधील आपले कष्ट व्यर्थ जाणार नाहीत (1 करिंथकरांस 15:58).
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


