God’s Comfort in the Loss of a Child

संतान-विरहाच्या दुःखात देवाचे सांत्वन

05/05/2026
3 Things You Should Know About Hebrews

इब्री लोकांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

12/05/2026
God’s Comfort in the Loss of a Child

संतान-विरहाच्या दुःखात देवाचे सांत्वन

05/05/2026
3 Things You Should Know About Hebrews

इब्री लोकांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

12/05/2026

योएलच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

3 Things You Should Know About Joel

योएलच्या पुस्तकाविषयी बहुतेक लोकांना जेवढे माहीत असते, ते म्हणजे योएल 2:28-29 मधील ती महान भविष्यवाणी, ज्यात देव सर्व मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करण्याचे अभिवचन देतो, ज्यामुळे देवाच्या लोकांच्या समुदायातील सर्व सदस्य संदेश देतील. परंतु त्या अभिवचनांचा अर्थ या पुस्तकाच्या संदेशाच्या पूर्ण संदर्भावाचून स्पष्ट होत नाही. म्हणूनच योएलच्या पुस्तकाविषयी अशा तीन गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, ज्या तुम्हाला त्याचा संदेश समजून घेण्यास उपयुक्त ठरतील.  

1. योएलच्या पुस्तकाची लेखनकाल अनिश्चित आहे.

पहिली गोष्ट, बहुतेक संदेष्ट्यांच्या पुस्तकांचा ऐतिहासिक संदर्भ त्या पुस्तकाच्या संदेशासाठी महत्त्वाचा असतो, परंतु योएलच्या पुस्तकाची लेखनकाल निश्चित सांगता येत नाही. मंदिराची सेवा-आराधना सक्रिय आहे, यावरून ते बंदिवासापूर्वीचे शलमोनाचे मंदिर (586 BC मध्ये नष्ट झालेले) असावे, किंवा बंदिवासातून परतल्यानंतर समर्पित झालेले मंदिर (516 BC) असावे, अशा दोन्ही शक्यता आहेत. येथे कोणत्याही राजाचा उल्लेख नाही, आणि इस्राएल किंवा यहूदाच्या कोणत्याही प्रमुख शत्रूंचा उल्लेख नाही. अभ्यासकांनी या पुस्तकाच्या लेखनकालाविषयी विविध पर्याय सुचवले आहेत, परंतु कोणत्याही एका लेखनकालाला सर्वमान्यता मिळालेली नाही. हे पुस्तक बंदिवासापूर्वीचा असा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतांना दिसते, जो पहिल्या मंदिराच्या विनाशाशी संबंधित घटनांशी निगडित आहे, जसे की यज्ञ अर्पणे बंद होणे (योएल 1:9), उत्तरेकडील सैन्याकडून असलेला धोका (योएल 2:20), आणि भविष्यातील सुटकेचे वर्णन (योएल 2:23-29). काहींच्या मते, या पुस्तकाची नेमका लेखनकाल ठरवणे अवघड आहे ते या कारणाने की हे पुस्तक राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात वारंवार वापरले जाणारे एक भक्तीसाहित्याचे अंग बनले होते. 

2. या पुस्तकाचा प्रसंग टोळधाडीच्या पीडेशी संबंधित आहे. 

योएलच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असावी अशी दुसरी गोष्ट ही की, या पुस्तकाचा प्रसंग आणि त्याचा संदेश हे परस्परांशी घट्ट जोडलेले आहेत. या पुस्तकाचा प्रसंग टोळधाडीची पीडा हा आहे. अध्याय 1 हा टोळधाडीच्या अशा विनाशकारी पीडेमुळे सामूहिक विलापासाठीचे आवाहन आहे की, जी इतकी विनाशकारी होती की त्यापूर्वी तसे कधीही घडले नव्हते. या पीडेचे वर्णन योएल 1:4 मध्ये केले आहे, जिथे टोळधाडीने खाण्यायोग्य असलेले सर्व काही उध्वस्त केले आहे. या परिणामांमुळे वेगवेगळ्या गटांना शोक करण्यास बोलावले आहे: मद्यपींनी शोक करावा, कारण द्राक्षवेली नष्ट झाल्या आहेत (योएल 1:5-7); याजकांनी शोक करावा, कारण यज्ञ अर्पणे बंद झाली आहेत (योएल 1:8-10); आणि शेतकऱ्यांनी शोक करावा, कारण कोणतेही पीक येणार नव्हते (योएल 1:11-12). याजकांना उपवास आणि रडणे यांनी युक्त अशा शोकसभेत देवाच्या लोकांचे नेतृत्व करण्यासाठीही पाचारण केले आहे (योएल 1:13-14).

टोळधाडीच्या पीडेचा हा गोंधळ परमेश्वराच्या दिवसाचेच एक वर्णन ठरतो. जे देवाला नाकारतात त्यांच्यासाठी तो न्यायाचा दिवस असेल आणि जे देवाकडे परततात त्यांच्यासाठी तो आशीर्वादाचा दिवस असेल. टोळधाडीची ही पीडा त्या दिवशी येणाऱ्या न्यायाची पूर्वसूचना देते. त्या दिवसाचा पहिला उल्लेख योएल 1:15 मध्ये येतो:  

“त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे.”

त्या दिवसाच्या विनाशाचे वर्णन योएल 1:16-20 मध्ये केले आहे; आणि योएल 2:1-2 मध्ये तातडीचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढे जाऊन त्या “दिवसाचे” स्वरूप ठळकपणे असे मांडले जाते की तो “अंधाराचा व औदासिन्याचा दिवस” आहे आणि “मेघमय अभ्राच्छादित दिवस” आहे. हा अंधकार पर्वतांवर पसरलेला आहे, आणि त्यातून युद्धासाठी सज्ज असलेल्या एका महान व सामर्थ्यवान सैन्याचे चित्र उभे राहते, असे योद्धे ज्यांना कोणीही आवरू शकत नाही. त्या सैन्याला सामोरे जाण्याच्या कल्पनेने लोक व्याकुळ होतात, कारण हे केवळ पृथ्वीवरील सैन्य नाही; हे यहोवाचे सैन्य आहे. परमेश्वर या सैन्यापुढे आपला शब्द बोलत गर्जना करतो, ज्यामुळे पृथ्वी कापते, आकाश थरथरते, सूर्य व चंद्र काळे पडतात. (योएल 2:10-11). कोणीही ते सहन करू शकत नाही, कारण “परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे; त्या वेळी कोण टिकेल?” (योएल 2:11). 

योएलमध्ये, परमेश्वराचा दिवस हा फक्त एका ऐतिहासिक घटनेपुरता मर्यादित नाही; तो इतिहासाचा अंत करणाऱ्या, शेवटच्या काळातील घटनेचे वर्णन करतो. परमेश्वराच्या दिवशी होणाऱ्या देवाच्या न्यायाच्या आगामी संहाराच्या पार्श्वभूमीवर योएल देवाच्या लोकांना पश्चात्तापासाठी पाचारण करतो (योएल 2:15-17). तो टोळधाडीच्या पीडेमुळे झालेल्या विध्वंसाच्या उलट भौतिक आशीर्वादांचे वचन देतो (योएल 2:21-27), आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या वर्षाव होईल तेव्हा येणाऱ्या आध्यात्मिक आशीर्वादांचेही वचन देतो (योएल 2:28-32).  

3. प्रेषित पेत्र पेन्टेकॉस्टच्या दिवसाच्या घटनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी योएलचा संदर्भ देतो.

या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असायला हवी अशी तिसरी गोष्ट म्हणजे ही की, पेन्टेकॉस्टच्या दिवसाच्या घटनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रेषित पेत्र प्रेषितांची कृत्ये 2:17-21 मध्ये योएल 2:28-32 मधील वचनांचा उल्लेख करतो. योएलने आधीच भाकीत केलेले आध्यात्मिक आशीर्वाद त्या वेळी पूर्ण होत होते, कारण देवाने सर्व मनुष्यांवर आपला आत्मा ओतला, आणि म्हणून जो कोणी प्रभूचे नाव घेईल त्याचे तारण होईल.  

याव्यतिरिक्त, देवाचे वचन सांगण्याचे संदेष्ट्याचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत विस्तारले; त्यात परराष्ट्रीयांचाही समावेश झाला. आत्म्याने त्यांना ज्या प्रकारे बोलावयास दिले, त्या प्रकारे ते आपापल्या भाषांत परस्परांना समजेल अशा रीतीने संभाषण करीत होते. (प्रेषितांची कृत्ये 2:4). परंतु त्या क्षणी देवाच्या शत्रूंवर अंतिम न्याय तात्काळ घडून आला नाही (योएल 3:1-8), आणि देवाच्या लोकांचे संपूर्ण पुनर्स्थापन होणेही तत्काळ झाले नाही  (योएल 3:17-21). उलट, येशू ख्रिस्ताची शुभवार्ता सर्व जगाला जाहीर करण्याद्वारे देव आपले तारणविषयक उद्देश उलगडत आणि कार्यान्वित करत होता. म्हणूनच, आपण येशू ख्रिस्तामध्ये आपल्या तारणाचा विसार अनुभवला आहे. आता आपण आपल्या तारणाच्या पूर्णत्वाची वाट पाहत आहोत, जेव्हा आपला तारणकर्ता या जगात परत येईल आणि देवाच्या शत्रूंवर अंतिम न्याय करून, आणि आपल्या लोकांचे संपूर्ण पुनर्स्थापन करून परमेश्वराचा तो दिवस पूर्णत्वास नेईल. त्या वेळी, आपण सर्वकाळासाठी त्याच्या परिपूर्ण उपस्थितीचा आनंद घेऊ, आणि त्याच्या उपस्थितीबरोबर येणाऱ्या विपुल आध्यात्मिक व भौतिक आशीर्वादांचा पूर्ण अनुभव घेऊ.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

रिचर्ड पी. बेल्चर

रिचर्ड पी. बेल्चर

डॉ. रिचर्ड पी. बेल्चर ज्युनिअर हे अटलांटा, डॅलस आणि ह्यूस्टन येथील रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीमध्ये जुन्या कराराचे जॉन डी. आणि फ्रान्सेस एम. ग्विन प्राध्यापक आणि अकॅडमिक डीन आहेत. तसेच ते प्रेस्बिटेरियन चर्च इन अमेरिका मध्ये शिक्षण एल्डर म्हणून सेवा करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये द फुलफिलमेंट ऑफ द प्रॉमिसेस ऑफ गॉड: अ‍ॅन एक्स्प्लनेशन ऑफ कोव्हनंट थिओलॉजी आणि प्रॉफेट, प्रीस्ट, अँड किंग ही पुस्तके समाविष्ट आहेत.