
सेवेत येणारा थकवा कसा हाताळावा
30/04/2026संतान-विरहाच्या दुःखात देवाचे सांत्वन
स्वर्गाच्या या बाजूला ख्रिस्ती लोकांना आरोग्य, संपत्ती आणि सुख यांची हमी दिलेली नाही. पतित जगातील जीवनाचे दु:खद वास्तव असे की, आम्हा सर्वांनाच विरहाच्या अनेक रूपांतून जावे लागते: आपले आरोग्य, नोकरी, नातेसंबंध, किंवा सर्वात वाईट म्हणजे, आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या व्यक्तीचा विरह. अशा प्रसंगांच्या अनुभवांतून जात असतांना, आपल्याला त्या विरहाच्या पलीकडे काहीच दिसत नाही. तो विरह इतका सर्वग्रासी होऊ शकतो की, शोकाच्या प्रवाहात इतर सर्व काही गिळंकृत होते, अगदी पवित्र शास्त्रातील जीवनदायी सत्येही.
माझी मुलगी ‘लैला’ तिच्या जन्माच्या नियोजित तारखेच्या एक आठवड्यापूर्वी मृत अवस्थेत जन्माला आली, तेव्हा मी हे अनुभवलं. मी माझ्या विरहाच्या भयावहतेवर पूर्णपणे लक्ष खिळून बसले होते : ज्या बाळाची मी इतक्या उत्कंठेने वाट पाहत होते ते मरण पावले होते; मी तिला भरवू शकणार नव्हते, तिला वस्त्रे घालू शकणार नव्हते, की तिची काळजीही घेऊ शकणार नव्हते; माझा मुलगा ‘बेन’ एकुलताच राहिला; कदाचित मी पुन्हा वंध्यत्वाच्या गर्तेत ढकलली जाईन; माझ्या मुलीचे दफन थडग्यात झाले होते; आणि असेच पुढे माझ्या आत्म्याचे डोळे एका भयाण वास्तवाकडून दुसऱ्या भयाण वास्तवाकडे पाहतच राहिले. पण या विरहाकडे आणि त्याच्या अनेक पदरांकडे पाहता पाहता, माझ्या दु:खाला सांत्वन आणि माझ्या अंधाराला प्रकाश देऊ शकणाऱ्या त्या ‘एकमेव’ व्यक्तीकडे पाहणे मी थांबवले. भजनकर्ती ‘हेलन लेमेल’ हिला माझ्या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्ग माहीत होता:
येशूकडे वळवा नेत्र आपुले,
त्याच्या अद्भुत मुखाकडे पहा नित्ये;
त्याच्या गौरवी-कृपेच्या प्रकाशपुंजात,
पृथ्वीच्या तेजाळ गोष्टी होतील धूसर आभास.
जेव्हा मी माझे डोळे येशूकडे वळवले, तेव्हा त्याच्या प्रकाशाने अंधार उजळून टाकल्यामुळे माझ्या मुलीचा विरहसुद्धा विलक्षणपणे धूसर झाला. त्याच्याकडे पाहिल्याने माझे दुःख बधिर झाले नाही, परंतु त्या वेदनेमध्ये मला अफाट सांत्वन मिळाले.
कळवळ्याने भरलेला काळजीवाहू तारणारा
माझ्या मुलीच्या विरहात जेव्हा मी येशूकडे वळले, तेव्हा मला एक असा तारणारा आढळला जो करुणेने भरलेला होता. शुभवर्तमानांत असे नोंदवले आहे की, अनेक प्रकारच्या हानीचा अनुभव घेतलेल्या पीडित लोकांना पाहताच येशूचे अंत:करण कळवळ्याने भरून येत असे. याचे एक अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे, कुष्ठरोगाने पीडित असलेल्या एका मनुष्याने येशूला ‘मला शुद्ध कर’ अशी आर्त विनंती केली तेव्हा घडलेला प्रसंग मार्क आपल्या शुभवर्तमानात नोंदवतो: “तेव्हा त्याने कळवळा येऊन आपला हात पुढे केला व त्याला शिवून म्हटले, ‘माझी इच्छा आहे, शुद्ध हो’” (मार्क 1:41). लेवीय नियमांनुसार तो मनुष्य अशुद्ध होता (लेवीय 13), म्हणून त्याला बहिष्कृतासारखे वागवले जाई; इतरांपासून शारीरिक अंतर कायम राखणेच त्याचे जीवन बनले होते. पण येशूने, करुणेने भरलेले अंत:करण हालले म्हणून, त्या विलगतेच्या पोकळीत हात पुढे केला आणि त्याला स्पर्श केला. त्या मनुष्याला दुसऱ्या कोणाचा स्पर्श होऊन किती काळ लोटला असेल?
शुभवर्तमान आपल्याला पतित जगाच्या ओझ्याखाली आणि भग्नवस्थेखाली जगणाऱ्यांच्या जीवनाला येशूने स्पर्श केल्याची अनेक उदाहरणे देतात. करुणेने प्रेरित होऊन येशू त्या आईकडे गेला जिचा एकुलता एक मुलगा मरण पावला होता (लूक 7:11-15), तो आजारी लोकांकडे गेला (मत्तय 14:14), भुकेल्यांकडे गेला (मत्तय 15:32), आंधळ्यांकडे गेला (मत्तय 20:30-34), तसेच गांजलेल्या व पांगलेल्या लोकांकडेही गेला (मत्तय 9:35-36). जेव्हा आपण हे वृत्तांत पाहतो, तेव्हा दुःख भोगणाऱ्यांविषयी भावनाशून्य असा तारणारा आपल्याला दिसत नाही; उलट, आपल्याला एक तारणारा दिसतो कळवळा येऊन करुणेने आपल्याकडे “आपला हात पुढे करतो.”
रडणारा तारणारा
कदाचित पवित्र शास्त्रातील सर्वांत लहान वचनातच येशूच्या कोमल हृदयाचे दर्शन आपल्याला सर्वाधिक ठळकपणे घडते: “येशू रडला” (योहान 11:35). जेव्हा तो शोकाच्या त्या घरी पोहोचला, जिथे त्याचा मित्र लाजर मृत पडला होता, तेव्हा येशूने फक्त एखादा चित्रपटवजा एकच अश्रू ढाळला नाही; तो खरोखर रडला. जरी त्याला ठाऊक होते की तो लाजराला पुन्हा जिवंत करणार आहे, तरीही त्याला दुःख आणि रागाच्या खोल भावना जाणवल्या.
‘लैला’ मृत जन्माला आल्यानंतर, मी पूर्वी कधीही रडले नव्हते इतकी रडले; परंतु माझा तारणारा देखील मृत्यूच्या प्रसंगी रडला, या सत्याने मला सांत्वन मिळाले. या वचनावर भाष्य करताना जॉन कॅल्विन लिहितात, “आपल्या संकटांनी तो इतका हेलावतो, जणू काही त्याने ती स्वतःच सोसली आहेत.” तुमच्या विरहात आणि माझ्याही विरहात, आपला प्रभू येशू आपल्या शोकात आनंद मानत नाही. तो देहधारी झालेला ‘शब्द’ आहे, ज्याने आपल्या उरात दुःखाची धडधड अनुभवली आणि आपल्या गालांवर अश्रूंची ऊबही जाणली.
विजय मिळवणारा तारणारा
येशू काळजी घेतो आणि रडतो, हे जाणून घेणे विरहाच्या काळात सांत्वनदायक आहे; परंतु ते स्वतःमध्ये पुरेसे नाही. कारण शेवटी जर येशू या गोष्टींवर आपल्याकरिता विजय मिळवू शकत नसेल, तर आपल्या दुःखात आणि शोकात तो आपल्या सोबत येण्याचा उपयोग काय? जर येशू विजेता नसेल, तर अखेरीस तो सांत्वनकर्ता ठरत नाही. जेव्हा आपण दुखावले जातो, तेव्हा आपल्याला केवळ सहानुभूती दाखवणाऱ्याची गरज नसते—आपल्याला एका तारणाऱ्याची गरज असते.
येशू आपल्या वेदनांवर केवळ पट्टी लावण्यासाठी आला नाही; तो आपल्या सर्व दुःखाच्या मूळ कारणाकडे गेला—म्हणजेच पाप. “त्याने स्वतः आपल्या शरीरात आपली पापे वधस्तंभावर वाहिली” यासाठी की, पतनाचा शाप त्याने उलटवून टाकावा (1 पेत्र 2:24). पापाने सर्वत्र आपला कुरूप डाग पसरवण्यापूर्वी कोणताही विरह नव्हता. तिथे रडणे नव्हते, निराशा नव्हती, अंत:करणाची भग्नता नव्हती, मृत्यू नव्हता. जेव्हा येशूने लाजराला मृत्यूतून जीवनाकडे पाचारण केले, तेव्हा तो आपल्याला हेच दाखवत होता की तो कशासाठी आला आहे: “ह्यासाठी की, मृत्यूवर सत्ता मिळविलेल्याला, म्हणजे सैतानाला, त्याने मृत्यूच्याद्वारे नष्ट करावे” (इब्री 2:14). ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला; म्हणून त्याने आपल्याला येऊ घातलेल्या जगाची नवी आशा दिली, जिथे सर्व शोक आणि उसासे पळून जातील, जिथे मृत्यू आणि विरह पुन्हा असणार नाही.
सांत्वन करणारा तारणारा
जेव्हा मला कळले की ‘लैला’ माझ्या गर्भातच मरण पावली आहे, तेव्हा मी अशा शोकात बुडाले की तो मला गिळंकृत करील अशीच भीती वाटू लागली. पण जेव्हा मी येशूकडे पाहिले, त्या तारणाऱ्याकडे जो पाप, दुःख आणि शोकाने भरलेल्या जगात आमची काळजी घेतो, रडतो आणि विजय मिळवतो, तेव्हा मला सांत्वन मिळाले, जीवनात आणि मृत्यूत माझे एकमेव सांत्वन. जेव्हा मी माझी दृष्टी त्याच्याकडे वळवली, तेव्हा माझा विरह “त्याच्या गौरवी-कृपेच्या प्रकाशपुंजात निर्वाच्यपणे धूसर” झाला.
हे जिवा, तू थकला व व्याकुळ झालास का?
अंधकारात तुला प्रकाश दिसत नाही का?
तारणाऱ्याकडे पाहा, म्हणजे प्रकाश मिळे,
आणि जीवन अधिक विपुल व मुक्त होते.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


