
हाग्गय या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
27/01/2026
यहेज्केल या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
03/02/2026होशेय या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
1. होशेय, ज्याच्या नावाचा अर्थ “तारण” असा आहे, हा लेखन करणाऱ्या संदेष्ट्यांमध्ये या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे की, एक म्हणजे तो इस्राएलच्या उत्तरेकडील राज्याचा रहिवासी होता आणि दुसरे म्हणजे त्याची प्रचार-सेवा ह्या उत्तर राज्यालाच उद्देशून होती.
होशेय 1:1 हे होशेयाच्या सेवाकाळाची नोंद उत्तरेकडील राजा यराबाम दुसरा आणि दक्षिणेकडील राजे उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्किया यांच्या कारकीर्दीत दाखवते. त्यामुळे तो योनाचा समकालीन ठरतो (2 राजे 14:25). योना हा यराबाम दुसरा याच्या प्रशासनकाळात सेवा करणारा आणखी एक उत्तरेकडील संदेष्टा होता, जरी त्याचे आत्मचरित्रात्मक लेखन निनवेसोबत त्याला आलेल्या त्याच्या वैयक्तिक अनुभवाशी संबंधित आहे.
होशेय हा, उत्तरेकडे सेवा करण्यासाठी दक्षिणेकडून गेलेल्या आमोस या संदेष्ट्याचा, तसेच दक्षिणेकडील राज्यातील संदेष्टे यशया आणि मीखा यांचा देखील समकालीन होता. जरी या राजांच्या कारकिर्दीच्या वर्षांची बेरीज केली तर ती संख्या शंभराहून अधिक होते, तरी होशेयाची सेवा बहुधा यराबाम दुसरा ह्याच्या शेवटच्या वर्षांत (सुमारे इ.स.पू. 753 च्या आसपास) आणि हिज्कियाच्या सुरुवातीच्या वर्षांत (सुमारे इ.स.पू. 725 च्या आसपास), म्हणजेच इ.स.पू. 722 मध्ये अश्शूर लोकांच्या हाती शोमरोनचे पतन होण्यापूर्वीच सुरू झाली असावी. हा राजकीय संकट आणि धार्मिक अराजकतेचा काळ होता, आणि होशेयने राष्ट्रीय आपत्तीच्या काठावर उभ्या असलेल्या लोकांना तातडीच्या भावनेने संदेश दिला.
2. होशेयाच्या वैयक्तिक जीवनात त्याच्या संदेशाचे प्रतिबिंब होते.
होशेयाचा गोमेरसोबतचा विवाह हा त्याने ज्या संदेशाचा प्रचार केला त्याचे जिवंत दृश्यचित्र, एक प्रत्यक्ष वस्तुपाठच होता. होशेय 3:1 मध्ये होशेयाचा गोमेरसोबतचा विवाह आणि देवाचा इस्राएलाशी असलेला विवाह यांची स्पष्टपणे सांगड घातली आहे. गोमेरसोबत होशेयाचे नाते आणि इस्राएलाबरोबर देवाचे नाते हे दोन्ही प्रेमातून (दैवी कृपेने) सुरू झाले, पापामुळे (दैवी असंतोषामुळे) नाकारले गेले आणि निष्ठेमुळे (दैवी विश्वासूपणामुळे) टिकून राहिले. गोमेरबद्दल होशेयाचे अखंड, स्थिर प्रेम आणि न थकणारी निष्ठा हे इस्राएलसाठी परमेश्वराच्या अखंडित प्रेम आणि न ढळणाऱ्या निष्ठेचे सुंदर चित्र होते. याउलट, होशेयाप्रति गोमेरचा विश्वासघात हा परमेश्वरावरील इस्राएलाच्या घातकी अविश्वासूपणाचे दुःखद पण टोकदार चित्र होता. संपूर्ण जुन्या करारात विवाह हे देवाच्या त्याच्या लोकांशी असलेल्या नातेसंबंधाचे प्रतीक म्हणून उभे राहते, आणि होशेयच्या पुस्तकात हे प्रतीक विशेषत्वाने ठळक होते.
जरी होशेयाचा विवाह या पुस्तकाच्या संदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा असला, तरी अर्थ लावण्याच्या दृष्टीने तो एक मोठे प्रश्नचिन्ह उभे करतो. या अडचणीचा गाभा देवाने सुरुवातीला होशेयाला दिलेल्या या आज्ञेशी संबंधित आहे की, त्याने “जारकर्माची पत्नी” म्हणून एका स्त्रीशी विवाह करावा (होशेय 1:2). वरकरणी पाहता, ही आज्ञा नैतिक आणि नीतिसंबंधी पेच निर्माण करते, कारण याजकांसाठी देवाने विवाहाविषयी दिलेल्या स्पष्ट सूचना आणि निर्बंधांशी ती विसंगत असल्यासारखी दिसते; त्या सूचनांनुसार त्यांना व्यभिचारिणीशी विवाह करण्यास मनाई होती (लेवीय 21:7, 13). जर एखाद्या याजकाने वेश्यासोबत विवाह करणे लज्जास्पद ठरणार असेल, तर तेच लाजिरवाणेपण संदेष्ट्यासाठीही लागू होईल, असे वाटते. शिवाय, अनुवाद 22:13, 20–21 नुसार, विवाहाच्या वेळी अशुद्ध असल्याचे सिद्ध झालेल्या कोणत्याही स्त्रीस मृत्यूदंडाची शिक्षा होती; म्हणून होशेयाने विवाहाऐवजी अंत्यसंस्कारापासून आपली कहाणी सुरू करणेच जणू अधिक योग्य वाटले असते. या समस्येची निराकरणे साधारणपणे दोन प्रमुख अर्थलक्षणांमध्ये विभागली जातात: काहीजण या विवाहाला केवळ काल्पनिक, दृष्टांतात्मक मानतात, तर इतर काही त्याला प्रत्यक्ष, शब्दशः घडलेला विवाह समजतात.
काल्पनिक दृष्टिकोन हा विवाहाच्या प्रतिमेचा अर्थ असा लावतो की ती फक्त देवाचे इस्राएलाशी असलेले नाते आणि इस्राएलाचा देवाप्रती असलेला आत्मिक अविश्वासूपणा प्रतिकात्मकरित्या व्यक्त करण्याचे माध्यम आहे. या दृष्टिकोनाचा फायदा असा की तो नैतिक व आचारधर्माशी संबंधित समस्येला टाळतो, तरीही विवाहाच्या या प्रतिमेद्वारे अयोग्य व लायकी नसलेल्या लोकांवरील देवाच्या प्रेमाविषयीचा धार्मिक-अर्थपूर्ण मुद्दा स्पष्ट करता येतो. परंतु या मताची कमकुवत बाजू अशी आहे की मजकुरातील ठोस पुराव्याऐवजी ते मुख्यत्वे धर्मशास्त्रीय सोय आणि सोपेपणावर उभे आहे.
शब्दशः विवाहाच्या अर्थलक्षणाच्या अनेक आवृत्त्या आहेत. सर्वच प्रत्यक्ष विवाह घडून आल्याबाबत एकमत असले तरी, गोमेरवर लादण्यात आलेल्या व्यभिचाराचे स्वरूप काय होते किंवा तो नेमक्या कोणत्या काळाशी संबंधित होता याविषयी त्यांच्यात मतभेद आहेत. काहींचा दावा असा आहे की विवाहाच्या वेळीच गोमेर व्यभिचारी होती आणि देवाने अयोग्य पाप्यांवरील आपल्या कृपामय प्रेमाला ठळक करण्यासाठी, स्वतः पूर्वी सांगितलेल्या निकषांवर त्या विशिष्ट संदर्भात जणू मात केली. तर इतरांचा आग्रह असा आहे की येथे उल्लेखलेला व्यभिचार हा शारीरिक व्यभिचार नसून आत्मिक मूर्तिपूजेचा आहे. जर असे गृहीत धरले, तर लैंगिकदृष्ट्या अशुद्ध स्त्रीशी विवाह करण्याची समस्या काही अंशी दूर होते; तथापि, परमेश्वराने संदेष्ट्यास एका मूर्तिपूजक स्त्रीशी विवाह करण्याची आज्ञा दिली असेल, तर तेही तितकेच गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरते. कारण परधर्मीयांशी विवाह करण्यावरील देवाने लावलेली बंदी अगदी स्पष्ट होती (अनुवाद 7:3–4).
शब्दशः विवाहाच्या अर्थलक्षणाविषयीचे आणखी एक मत आहे ज्याला “पूर्वसूचक दृष्टिकोन” (proleptic view) म्हटले जाते. या मतानुसार, लग्नाच्या वेळी गोमेर शुद्ध होती, पण नंतर व्यभिचारीणी बनली. परंतु मजकूर गोमेर पुढे काय होणार होती हे सांगत नाही, तर ती त्या वेळी काय होती हेच सांगतो. आणखी एक उपाय असा सुचवला जातो की “व्यभिचार” हा शब्द बाह्य वर्तनाचे नव्हे, तर अंतर्गत स्वभाववैशिष्ट्याचे वर्णन करतो. बहुधा तो गोमेरच्या अनैतिकतेकडे असलेल्या सुप्त प्रवृत्तीकडे निर्देश करतो, जी विवाहानंतर काही काळातच प्रत्यक्ष वर्तनरूपाने प्रकट झाली. होशेय 3:1 मध्ये ती प्रत्यक्षात व्यभिचारी स्त्री बनलेली दिसते, यावरून तिच्या त्या प्रवृत्ती प्रत्यक्ष व्यभिचारात प्रकट झाल्या हे स्पष्ट होते. या दृष्टिकोनात मुद्दा असा आहे की देवाने होशेयाला सुरुवातीलाच गोमेरच्या अंतःकरणातील अशा गोष्टीचे ज्ञान दिले, जी त्यांच्या विवाहाच्या पवित्रतेला धोका निर्माण करू शकत होती. सुरुवातीपासूनच ती त्याला खोलवर दुखावू शकते, याची जाणीव असूनही होशेयाने तिच्यावर प्रेम केले, यामुळे त्याच्या प्रेमाचा निःस्वार्थ स्वभाव उठून दिसतो. आणि हाच विश्वासणाऱ्यांसाठीचा आत्मिक समांतर मुद्दा आहे: देवाला आपल्याबद्दल सर्व काही ठाऊक असूनही तो आपल्यावर प्रेम करतो.
3. होशेयाचा संदेश ख्रिस्तामधील देवाच्या कृपेचे पूर्वदर्शन घडवतो.
होशेयाचे इशारे आणि पश्चात्तापासाठी त्याची आवाहने यांकडे लोकांनी कानाडोळा करून दुर्लक्ष केले, आणि राष्ट्रावरचा न्याय अटळ झाला. तरीसुद्धा, संदेष्ट्याच्या संदेशाला इस्राएलाने आपल्या अज्ञान व मूर्खपणामुळे दिलेल्या नकाराचे परिणाम सुवार्तेतील कृपेचे अगोदरच दिलेले संकेत ठरले. 2 राजे 15:29 नुसार, नफतालीचा प्रदेश हा देवाच्या न्यायाचा अनुभव घेणारा पहिला प्रदेश होता; परंतु मत्तय 4:12–16 नुसार, येशूच्या सेवाकार्याची साक्ष सर्वप्रथम ज्याने पाहिली तो प्रदेशही हाच होता. होशेयाच्या दिवसांतील अंधकार अखेरीस ख्रिस्ताच्या प्रकाशासाठी जागा करून देणार होता. अंधाराचा तो काळ हा समयाच्या त्या पूर्णत्वाकडे नेणारा एक टप्पा होता, ज्यात हा प्रकाश चमकून निघणार होता. यातून हे प्रकट होते की देवाचे हेतू आणि त्याच्या योजना अखेरीस नेहमी परिपूर्ण रीतीने एकत्र जुळून येतात.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


