
होशेय या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
29/01/2026
दानियेलाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
05/02/2026यहेज्केल या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
यहेज्केलच्या ग्रंथाच्या पानांवर विविध प्रकारचा ताण आणि संघर्ष विखुरलेला आहे : परमेश्वराचे लोक दोन भागांत विखुरले आहेत, म्हणजे काही बाबेलमध्ये निर्वासित म्हणून घेऊन जाण्यात आलेले आहेत, तर काही यरुशलेममध्ये वेढ्यात अडकून बसले आहेत; तर याजकीय वंशातून आलेला, आतून ताणलेला असा एक संदेष्टा, जो 390 दिवस डाव्या कुशीवर पडून राहतो आणि आपल्या पत्नीच्या मृत्याविषयी शोक व्यक्त करण्यासही नकार देतो; तसेच गूढ प्रतीकांनी भरलेली दर्शन आणि दृश्यरूपाने ठळक, अस्वस्थ करणारी भविष्यवचने (यहेज्केल 4:4–8; 24:15–24). तरी कदाचित यहेज्केलमधील सर्वांत मोठा ताण हा परमेश्वराच्या स्वभावाच्या प्रकटीकरणातच दडलेला आहे: तो अतींद्रिय (सृष्टीपलीकडचा) आहे, पण तरीही आपल्या लोकांमध्ये निकटतेने उपस्थित राहतो; तो पवित्र आहे आणि पापामुळे संतप्त आहे, तरीही क्षमाशील आहे; तो न्याय करतांना भयप्रद आहे, परंतु दयासंपन्नतेत अद्भुत आहे. हे सगळे ताण वाचकाला व्याकुळ करून गोंधळात टाकू शकतात; तरीसुद्धा यहेज्केलचा ग्रंथ परमेश्वराचे नाम आणि त्याचे वैभव एका अद्वितीय आणि शिकवण देणाऱ्या पद्धतीने प्रकट करतो.
पुढील तीन गोष्टी यहेज्केलमधील या तणावांना उलगडून पाहण्यास आणि त्याच्या भविष्यवाण्यांचा आस्वाद घेण्यास तुम्हाला साहाय्य करतील.
1. यहेज्केलची विचित्र दर्शनं आणि वचने अशा देवाला प्रगट करतात, जो वैभवशाली तर आहे, पण तरीही मनुष्य त्याला ओळखू शकतो
यहेज्केलचे पुस्तक वाचण्यास सुरुवात करताच मन गोंधळून जाते. त्याच्या पहिल्या दर्शनात आणि त्याला मिळालेल्या पाचारणात चार जिवंत प्राणी (नंतर ज्यांची ओळख करूब म्हणून केली जाते) त्यांच्या भयप्रद वैशिष्ट्यांसह दिसतात; “परमेश्वराच्या तेजाच्या प्रतिरूपाचे” असे एक दैवी दर्शन आहे, जे नश्वर माणसाच्या इंद्रियांना हादरवून सोडते; आणि एक संदेष्टा म्हणून त्याच्या नियुक्तीसोबत जोडलेल्या अनेक घटना आहेत —ज्यात एक गुंडाळी गिळणे आणि मुक राहणे यांचा समावेश आहे (यहेज्केल 1:1–3:27; 10:20). ही तर फक्त सुरुवात आहे. प्रतीकात्मक कृती, प्रतिमा, जाहीर उच्चारलेली वचने, तसेच वैभवशाली परमेश्वराची व त्याच्या दूतांचे दर्शन, या सर्व गोष्टी संपूर्ण ग्रंथभर पुन्हा पुन्हा समोर येत राहतात (यहेज्केल 10:1–22; 40:1–4 पहा).
पण हे मात्र लक्षात ठेवा: तुम्हाला आश्चर्याने थक्क व्हायलाच हवे. परात्पर देवाच्या तेजस्वी गौरवाला भिडल्यावर मनात आदरयुक्त विस्मय आणि खोल नम्रता जागृत होणे स्वाभाविकच आहे. हे दर्शन प्राप्त होताच यहेज्केल आपल्या मुखावर कोसळतो (यहेज्केल 1:28). आत्म्याने परिपूर्ण त्याच्या त्या सेवाकार्याची ही नोंद ठेवण्यामागचा एक हेतू असा आहे की आपल्यातही तोच विस्मय आणि नम्रतेने भरलेला प्रतिसाद निर्माण व्हावा. यहेज्केल असो, बाबेलमधील निर्वासित असोत किंवा आपण स्वत:, मनुष्यांपैकी कोणीही देवाला आपल्या अटींवर ओळखू शकत नाही; देवानेच स्वतःला प्रकट करणे आवश्यक आहे. तरीही, या बाबतीत आपण चूकता कामा नये की आपला सार्वभौम देव हा निकटवर्ती आहे, आणि तो संपूर्ण जगभरात स्वतःला प्रकट करतो, हे यहेज्केल स्पष्ट करतो. कारण “तुम्हांला कळेल की मी परमेश्वर आहे” हा वाक्यांश इस्राएलविरुद्ध आणि इतर राष्ट्रांविरुद्ध उच्चारलेल्या भविष्यवचनेत वारंवार आढळतो (यहेज्केल 7:4, 9; 11:10; 13:9 इ.).
दुःखाची गोष्ट म्हणजे ही की मानवाचे पाप आणि धर्मत्याग यांमुळे पवित्र देव स्वतःला प्रथम न्यायाद्वारेच प्रकट करण्यास बाध्य होतो; आणि इथूनच आपण पुढील मुद्द्याकडे जातो.
2. देवाच्या पवित्रतेवर दिलेला जोर यहेज्केलच्या याजकीय वंशातून उगम पावतो.
यहेज्केल आपल्या ग्रंथाच्या अगदी सुरुवातीलाच स्वतःची ओळख याजक म्हणून करून देतो (यहेज्केल 1:3); परंतु बहुधा त्याला यरुशलेममध्ये या पदावर प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी कधीच मिळाली नसावी. त्याऐवजी, परमेश्वराने त्याला आपला संदेष्टा म्हणून बोलावले—प्रथम स्वतःच्या बंडखोर लोकांविरुद्ध, आणि नंतर दुष्ट राष्ट्रांविरुद्ध न्यायाची वचने सांगण्यासाठी (यहेज्केल 1:1–24:27; 25:1–32:32). या सेवाकार्यातील या बदलानंतरही, विशेषतः न्यायात प्रगट होणाऱ्या देवाच्या पवित्रतेविषयी बोलताना, यहेज्केल आपल्या याजकीय ज्ञानाचा विपुल उपयोग करतो.
आत्म्याने भरलेल्या अभियोगकर्त्याच्या भूमिकेत कार्य करताना, यहेज्केल जुन्या करारातील मंडळीने देवाच्या करारसंहितेविरुद्ध केलेल्या अपराधांचा आणि मूर्तिपूजेमुळे झालेल्या त्यांच्या अपवित्रतेचा निर्भयपणे उलगडा करतो (यहेज्केल 5:6; 16:59). या कृत्यांमुळे परमेश्वराच्या पवित्र नावाला अपवित्र होण्याचा धोका निर्माण झाला होता; म्हणून आपले नाव पवित्र राहावे यासाठी परमेश्वराने आपली तेजस्वी उपस्थिती—जिचे प्रतीक त्याचे स्वर्गीय, वहनयोग्य सिंहासन होते—यरुशलेममधून दूर केली आणि त्या नगरासाठी विनाशाचा दिवस निश्चित केला (यहेज्केल 20:9, 14). इस्राएलाच्या बंडखोरीची घृणास्पदता दाखवण्यासाठी यहेज्केल अनेक प्रकारच्या साहित्यिक रूपक-शैलींचा उपयोग करतो; त्यांपैकी दोन अविश्वासू बहिणींचे रूपक (यहेज्केल 23:1–49) विशेषतः धक्कादायक आहे. आणि आजूबाजूची राष्ट्रे यरुशलेमच्या पतनावर आनंद व्यक्त करून स्वतःला अभेद्य समजू नयेत म्हणून, तो सात शेजारील राज्यांवरही न्यायाची तशीच घोषणा करतो —जी संपूर्ण जगातील सर्व राष्ट्रांचे प्रतीक आहेत. त्यांच्या दुष्टतेसाठी आणि पवित्र देवाविरुद्धच्या बंडासाठी त्यांनाही हिशोब द्यावा लागेल, आणि त्यांच्यावर आलेल्या या न्यायाद्वारे जगाला परमेश्वराच्या वैभवाची ओळख होईल.
तथापि, इस्राएलाने पूर्ण निराशेच्या गर्तेत पडू नये म्हणून, पुनर्स्थापनेची आशा देताना यहेज्केल आणखी एका याजकीय संकल्पनेचा, म्हणजे मंदिराचा, उल्लेख करतो.
3. देवाचे मंदिर म्हणून येशू यहेज्केलच्या पुनर्स्थापनाविषयक भविष्यवाण्या पूर्ण करतो.
न्यायाच्या अशा कठीण अवस्थेतही इस्राएलचा गौरवशाली, पवित्र देव पुनर्स्थापनेची अभिवचने देतो. ज्याप्रमाणे यहेज्केलने शुष्क हाडांना पुन्हा जिवंत होताना पाहिले, अगदी त्याप्रमाणे तो आपल्या कराराच्या लोकांना पुन्हा जिवंत करील (यहेज्केल 37:1–14). परंतु तो त्यांना फक्त न्यायापूर्वीच्या त्यांच्या जुन्या स्थितीत परत आणणार नाही; तर तो त्यांना शुद्ध करील, त्यांना नवे हृदय देईल, त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या राज्यात पुन्हा बसवील, त्यांच्या वर एक नीतिमान दाविदाच्या घराण्याचा राजकुमार नेमील आणि त्यांच्यात सर्वकाळासाठी वास करील (यहेज्केल 36:22–37:28). करारातील शांततेची ही बदललेली स्थिती यहेज्केल नव्या मंदिराच्या दर्शनातून सर्वांत ठळकपणे मांडतो—जे देवाच्या शाश्वत उपस्थितीचे प्रतीक आहे. म्हणूनच त्या नगराचे नाव आहे: “याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे)” (अध्याय 40–48).
या भविष्यवाण्यांची पूर्णता केवळ दुसऱ्या मंदिराच्या पुनर्बांधणीपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती प्रभु येशू ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास गेली. प्रेषित योहानाचे आत्म्याने प्रेरित लेखन याची साक्ष देते. देवाच्या तेजाची पूर्णता देहधारी देवपुत्रामध्ये प्रकट झाली, ज्याने आपल्या लोकांमध्ये “वस्ती केली” आणि देवाला प्रकट केले (योहान 1:14–18). येशू स्वतःला मंदिराशी जोडतो—म्हणजे तो मंदिराच्या नाशाला आपल्या वधाशी आणि त्या मंदिराच्या पुनर्स्थापनेला आपल्या पुनरुत्थानाशी जोडतो (योहान 2:18–22). आणि जसे यहेज्केल मंदिरातून वाहणारी, संपूर्ण जगाला जीवन देणारी नदी पाहतो, तसेच येशू स्वतःला जिवंत पाण्याचा उगम म्हणून घोषित करतो (योहान 4:1–43; 7:37–39). आणि आपल्या अंतिम दर्शनात योहान हीच नदी देव आणि कोकर्याच्या सिंहासनातून वाहताना पाहतो; ती राष्ट्रांमध्ये विखुरलेल्या त्याच्या लोकांसाठी शुद्धीकरण व आरोग्य घेऊन येते (प्रकटी 22).
यहेज्केलच्या पुस्तकातील तो मोठा ताण अखेरीस एका अतुलनीय, आपल्या कल्पनेपलीकडील शक्यतेत परिवर्तित होतो : देव आणि कोकर्याची सार्वकालिक उपस्थिती.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


