Why Does Character Matter in Ministry?

सेवाकार्यात चरित्र का महत्त्वाचे आहे?

16/10/2026
How Can I Speak with Wisdom?

मी ज्ञान व शहाणपणाने कसे बोलावे?

22/10/2026
Why Does Character Matter in Ministry?

सेवाकार्यात चरित्र का महत्त्वाचे आहे?

16/10/2026
How Can I Speak with Wisdom?

मी ज्ञान व शहाणपणाने कसे बोलावे?

22/10/2026

अब्राहाम कोण होता?

Who Was Abraham?

सुमारे ख्रिस्तपूर्व 2000 मध्ये राहणारा कुलपती अब्राहाम हा पवित्र शास्त्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहे. उल्लेखनीय विश्वासाचा माणूस म्हणून चित्रित केलेला अब्राहाम देवाच्या तारणाच्या योजनेत मध्यवर्ती आहे. उत्पत्ती पुस्तकात नोंदवलेल्या नीतिमान पितृवंशपरंपरेचा एक अविभाज्य भाग असलेला तो अशा दैवी अभिवचनांचा प्राप्तकर्ता आहे, जी राजवंशाच्या स्थापनेद्वारे राष्ट्रांना मिळणाऱ्या आशीर्वादाची पूर्वसूचना देतात, आणि त्या राजवंशाची परिपूर्ती येशू ख्रिस्ताच्या आगमनात होणार आहे.   

दैवी अभिवचनांनी आकारलेले अब्राहामाचे जीवन

 अब्राहामाचा वृत्तांत उत्पत्ती 11 मध्ये सुरू होतो, जिथे तो खास्द्यांच्या ऊर शहरात राहणारा तेरहाचा मुलगा अब्राम म्हणून ओळखला जातो. जेव्हा देव त्याला पाचारण करतो, तेव्हा अब्राम अशा प्रवासाला निघतो, जो संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उत्पत्ती 12:1–3 मध्ये वर्णन केलेल्या या विशेष पाचारणाचा शेवट या उल्लेखनीय आश्वासनात होतो की, पृथ्वीवरील सर्व कुळे अब्रामच्या द्वारे आशीर्वादित होतील.

विश्वासू आज्ञाधारकतेने अब्राहाम एका अज्ञात प्रदेशात पाऊल ठेवण्यासाठी आपले ओळखीचे परिसर सोडतो. ही देवाबरोबरच्या एका दृढ संबंधाची सुरुवात होती. यशया संदेष्ट्याद्वारे देव या मूळपुरुषाचा प्रेमाने “माझा मित्र अब्राहाम” असा उल्लेख करतो (यशया 41:8).

अब्राहामाच्या जीवनाचा वृत्तांत आव्हाने, भटकंती आणि दैवी भेटींनी भरलेला आहे. तो कनान देशात प्रवास करतो, दुष्काळाचा अनुभव घेतो, मिसर देशात राहतो आणि शेजारच्या लोकांबरोबरच्या गुंतागुंतीच्या संबंधांतून मार्ग काढतो. तो राजांच्या सहवासात येतो, तरीही अर्ध-भटके जीवन जगत राहतो; त्यामुळे इब्री लोकांस पत्राचा लेखक म्हणतो की, अब्राहाम “कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.” (इब्री 11:10).

त्याची पत्नी साराय, जिला नंतर सारा म्हटले गेले, वंध्यत्वाचा सामना करते; त्यामुळे ताणतणाव आणि दुःख निर्माण होते. देव अब्राहामाला आश्वासन देतो की त्याची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी अगणित असेल आणि शेवटी कनान देशावर ताबा मिळवेल (उत्पत्ती 15). तरीही, वर्षे उलटून जातात आणि साराय वांझच राहते. अधीर होऊन, साराय आपली दासी हागार हिला अब्रामाला देते आणि तिच्याद्वारे इश्माएलचा जन्म होतो (उत्पत्ती 16). तथापि, देव हे निश्चित करतो की अब्राहामाचा खरा वारस साराद्वारेच येईल.

ज्यासंबंधी अभिवचन दिले होते तो पुत्र इसहाक याचा जन्म उत्पत्तीच्या पुस्तकातील एक महत्त्वाचा क्षण ठरतो. तथापि, जेव्हा देव अब्राहामाला इसहाकाचे अर्पण करण्याची आज्ञा देतो तेव्हा त्याच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाते (उत्पत्ती 22). अशा हृदयद्रावक आज्ञेनंतरही आज्ञा पाळण्याची अब्राहामाची तयारी देवावरील त्याचा विश्वास दर्शवते. शेवटच्या क्षणी देव हस्तक्षेप करतो, बळीसाठी एक मेढा पुरवतो आणि अब्राहामाबरोबर आपला करार निश्चित करतो की पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याच्या एका वंशजाद्वारे आशीर्वादित होतील (उत्पत्ती 22:18).

अब्राहामाचे जीवन दोषांशिवाय नाही. उत्पत्तीचे पुस्तक शंका, कपट आणि नैतिक अस्पष्टतेच्या प्रसंगांची नोंद करते. असे असले तरी, देवाच्या अभिवचनांवर त्याचा सातत्यपूर्ण विश्वास हा त्याचा कायमस्वरूपी वारसा ठरतो.

अनेक राष्ट्रांचा पिता: सुंतेचा करार

अब्राहामाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या दैवी भेटींपैकी एक म्हणजे  सुंतेच्या कराराची स्थापना होय (उत्पत्ती 17). या कराराच्या केंद्रस्थानी देवाने अब्राहामाला “अनेक राष्ट्रांचा पिता” बनवण्याचे अभिवचन दिले आहे, ज्यामध्ये राजेशाही अर्थ समाविष्ट आहे. देवाने यापूर्वी दुसऱ्या कराराद्वारे हमी दिली होती की अब्राहाम एका राष्ट्राचा पिता होईल आणि त्याची शारीरिक संतती कनान देशाचा ताबा घेईल (उत्पत्ती 15). महत्त्वाची गोष्ट अशी की, सुंतेचा करार अब्राहामाच्या पितृत्वाचा रूपकात्मक विस्तार करतो आणि त्यात अनेक राष्ट्रांचा समावेश करतो. अब्राहाम त्यांचा आत्मिक पिता असेल. ज्यांचा विश्वास अब्राहामासारखा आहे, ते त्याची मुले होतील (गलतीकरांस 3:1-9).

उत्पत्ती 17 मध्ये, देव अब्राहामाला त्याच्या घरातील प्रत्येक पुरुषाची, ज्यामध्ये परकीयांकडून विकत घेतलेल्यांचाही समावेश आहे, “कराराचे चिन्ह” म्हणून सुंता करण्याची आज्ञा देतो (उत्पत्ती 17:10-14). उत्पत्तीच्या सुरुवातीच्या अध्यायांच्या पार्श्वभूमीवर पाहिले असता, सुंता ही देवाच्या अभिवचनाची सतत आठवण करून देण्याचे काम करते की, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याद्वारे चालत आलेला हा अद्वितीय वंश अशा एका राजामध्ये परिपूर्णतेस पोहोचेल, जो दुष्ट शक्तींवर मात करेल आणि पृथ्वीवर देवाचे राज्य स्थापन करून राष्ट्रांना आशीर्वाद देईल. या गोष्टी मनात ठेवून, मत्तयाचे शुभवर्तमान अब्राहामापर्यंत मागे जाणारी राजेशाही वंशावळ देऊन आरंभ करते; आणि अशा रीतीने अब्राहामाला दिलेली अभिवचने येशूमध्ये कशी पूर्ण होतात हे ठळकपणे दाखवते (मत्तय 1:1-17).

विश्वासाद्वारे नीतिमत्व: अब्राहामाचा चिरस्थायी वारसा

अब्राहामाच्या जीवनाचा वृत्तांत विश्वासाद्वारे गणल्या जाणाऱ्या नीतिमत्वाची संकल्पना स्पष्ट करतो. उत्पत्ती 15:6 मध्ये असे घोषित केले आहे, “अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला.” हे वचन नंतरच्या ईश्वरशास्त्रीय चिंतनासाठी एक कोनशिला बनते, विशेषतः पौलाच्या लिखाणात, जिथे अब्राहामाला विश्वासाचा उदाहरणरूप आदर्श म्हणून सादर केले जाते (रोमकरांस 4).

देवासमोर अब्राहामाचे नीतिमान स्थान सुरक्षित करणारी गोष्ट त्याचे कर्तृत्व किंवा परिपूर्णता नव्हे, तर देवाच्या वचनावरील त्याचा विश्वास आणि त्या वचनानुसार कृती करण्याची त्याची तत्परता आहे. नीतिमत्वाची ही मूलगामी समज, जी नियमशास्त्राच्या पालनाऐवजी विश्वासात रुजलेली आहे, ती येशू ख्रिस्ताच्या अनुयायांसाठी मार्गदर्शक तत्त्व बनून राहते.

तरीही अब्राहामाचा विश्वास निष्क्रीय नाही; तो त्याला नीतिमत्वाने वागण्यास प्रवृत्त करतो. आपला मायदेश सोडण्याची, अदृश्य अभिवचनांवर विश्वास ठेवण्याची आणि देवाच्या आज्ञेवरून आपल्या प्रिय पुत्राचे अर्पण करण्याची त्याची तयारी असा विश्वास प्रकट करते, जो आपल्या कृतींतून स्पष्टपणे दिसून येतो (याकोब 2:20-24 पहा). अब्राहाम केवळ विश्वासाद्वारे गणल्या गेलेल्या नीतिमत्वाचा नव्हे, तर देवाच्या आज्ञांप्रती विश्वासातून उद्भवलेल्या आज्ञाधारकतेने आकार घेतलेल्या जीवनाचाही आदर्श म्हणून उभा राहतो.

निष्कर्ष

अब्राहाम ही अशी व्यक्ती आहे, ज्याच्या जीवनाला चिरंतन महत्त्व आहे. त्याचा वृत्तांत केवळ दूरच्या काळातील घटना नाही; तर तो देव आणि अशा एका मूळपुरुषामधील संबंध आहे, जो जगासाठी असलेल्या देवाच्या मुक्तीच्या योजनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होणाऱ्या दैवी अभिवचनांचा प्राप्तकर्ता आणि विश्वासाद्वारे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाचा आदर्श म्हणून, अब्राहामाचा वारसा प्रत्येक कुळातील आणि राष्ट्रातील अगणित लोकांना प्रेरणा देत, आव्हान देत आणि एकत्र आणत राहतो.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

डॉ टी डेस्मंड अलेक्झांडर

डॉ टी डेस्मंड अलेक्झांडर

हे युनियन थिऑलॉजिकल कॉलेज बेलफास्ट, नॉर्दर्न आयर्लंड येथे बायबलसंबंधी अभ्यासाचे वरिष्ठ संशोधन संशोधक आहेत. ते द न्यू डिक्शनरी ऑफ बिब्लिकल थिऑलॉजी चे सह-संपादक आहेत आणि फ्रॉम पॅराडाईज टू द प्रॉमिस लँड आणि फ्रॉम ईडन टू द न्यू जेरुसलेम यासह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.