What Is an Assurance of Pardon?

पापक्षमेची खातरी म्हणजे काय?

09/04/2026
Does God Really Care?

देव खरोखरच आमची काळजी घेतो का?

16/04/2026
What Is an Assurance of Pardon?

पापक्षमेची खातरी म्हणजे काय?

09/04/2026
Does God Really Care?

देव खरोखरच आमची काळजी घेतो का?

16/04/2026

पवित्र शास्त्राधारित निर्णय घेण्याबद्दल तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

5 Things You Should Know About Biblical Decision-Making

निर्णय, निर्णय, निर्णय. आपण सगळे एका दिवसात असंख्य निर्णय घेत असतो. काही निर्णय वरवर पाहता सामान्य वाटतात (उदाहरणार्थ, आज नेहमीप्रमाणे चहा घ्यावा की कॉफी?), तर काही निश्चितपणे आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारे असतात, जसे की मी कोणत्या विद्यालयात प्रवेश घ्यावा? मी ही नोकरी स्वीकारावी का? माझा आयुष्यभराचा जोडीदार म्हणून मी कोणाची निवड करावी? अशा प्रत्येक प्रसंगी विश्वासणाऱ्यांना परमेश्वराचे सहाय्य आणि मार्गदर्शन हवे असते. ही यादी संपूर्ण नसली तरी, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने पवित्र शास्त्राशी सुसंगत आणि योग्य निर्णय घेण्यासाठी विचारात घ्याव्यात अशा पाच गोष्टी येथे दिल्या आहेत.

1. पवित्र शास्त्राधारित निर्णय हे पवित्र शास्त्रावरच आधारित असतात.

हे स्पष्ट सांगायचे झाल्यास, पवित्र शास्त्र हे अनेक वाणींपैकी एक पर्यायी वाणी नाही, जी आपण आपल्या सोयीप्रमाणे स्वीकारू किंवा नाकारू शकतो. ते अचूक ज्ञान, सल्ला, दिशा आणि उपदेशाचे एकमेव उगमस्थान आहे. पवित्र शास्त्र हे केवळ माहितीचे पुस्तक नाही; ते आपल्या देवाची जिवंत वाणी आहे—जणू तो स्वतःच्या श्वासाने आपल्याशी प्रत्यक्षपणे बोलत आहे (2 तीमथ्य 3:16). दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, पवित्र शास्त्र हे केवळ माहितीपूर्ण नाही, तर ते नातेसूत्रांवर उभारलेले आहे. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता आपल्याला निर्णय घेण्यामध्ये आपले मार्गदर्शन देत असतो. म्हणून, जो निर्णय पवित्र शास्त्राचे स्पष्ट उल्लंघन करतो, तो केवळ पवित्र शास्त्राला नव्हे तर आपल्या पित्यालाच नाकारतो. आणि अपरिहार्यपणे, अशा निर्णयांचे परिणाम भोगावेच लागतात.

2. पवित्र शास्त्राधारित निर्णय प्रार्थनापूर्वक घेतले जातात.

पवित्र शास्त्राधारित निर्णय हे नातेसूत्रांवर बांधलेले असतात. देव ऐकतो, काळजी करतो आणि उत्तर देतो. आपण केवळ एका निर्जिव मार्गदर्शिकेचा शोध घेत नाही; तर आपण मार्गदर्शन हे स्वतः मार्गदर्शकाकडून मागतो. आपला संबंध लेखकाशी आहे. शास्त्रलेख हे त्याचे ज्ञान आहे; तो त्याचा सल्ला आहे; आणि तो त्याच्या त्या लेकरांसाठी लिहिला आहे, ज्यांच्यासाठी येशू मरण पावला, ज्यांना त्याने दत्तक घेतले आणि ज्यांच्यावर तो प्रीती करतो. आपण मागतो तेव्हा आपल्याला मदत करण्यात त्याला आनंद वाटतो.

“तुमच्यापैकी असा कोणता मनुष्य आहे की, त्याच्या मुलाने भाकर मागितली असता, तो त्याला दगड देईल? किंवा मासा मागितला असता त्याला साप देईल? तर तुम्ही वाईट असूनही, आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या द्यायला जाणता; मग तुमचा जो स्वर्गातील पिता तो मागणाऱ्यांना चांगल्या गोष्टी कितीतरी अधिक देईल!” (मत्तय 7:9-11).

3. पवित्र शास्त्राधारित निर्णय सल्लामसलतीने घेतले जातात.

इतरांच्या शहाणपणाचा सल्ला घेऊन शहाणपणाचे निर्णय घेण्याचे पवित्र शास्त्र वारंवार समर्थन करते. “प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो” (नीतिसूत्रे 20:18). “पण चांगली मसलत घेणार्‍यांजवळ ज्ञान असते” (नीतिसूत्रे 13:10). अर्थातच, आपण ज्यांच्याकडून चांगली मसलत घेतो ते “इतर” लोक हे देवभक्त, परिपक्व, पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान असलेले आणि आपल्याला नीट ओळखणारे ख्रिस्ती असावेत. जे आपल्या निर्णयाची पुष्टी करू शकतात किंवा ज्या संभाव्य धोक्यांची, अडचणींची किंवा दृष्टीआड राहिलेल्या बाबींची आपण दखल घेतली नसेल, त्याबाबत आपल्याला सावध करू शकतात, अशा व्यक्तींचा सल्ला घेण्यात मोठा लाभ आहे. उलट, जेव्हा आपण कमी परिपक्व किंवा ख्रिस्तीतर मित्रांचा सल्ला घेतो, जे अनेकदा आपल्याला फक्त आपल्याला जे ऐकायला आवडते तेच सांगतात, तेव्हा या नियमाचे सर्वाधिक उल्लंघन होते. म्हणूनच आपण “पवित्र शास्त्राचे ज्ञान असलेल्या” या आवश्यक अटीचे पालन करतो, कारण “दुष्टांचे बेत कपटी असतात” (नीतिसूत्रे 12:5).

4. पवित्र शास्त्राधारित निर्णय ईश्वरी प्रयोजनावर आधारित असतात.

पवित्र शास्त्राधारित निर्णय घेताना देव आपल्या सार्वभौम प्रयोजनात्मक व्यवस्थेत काय कार्य करीत आहे, याकडे लक्ष दिले जाते. कारण तो असा देव आहे, जो सक्रियपणे “आपल्या सर्व निर्मितीचे आणि त्यांच्या सर्व कृतींचे रक्षण व शासन करणारा” आहे (वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझम 11). हे नक्कीच देवाची इच्छा जाणून घेण्यासाठीचा एकमेव किंवा अंतिम घटक नाही. तरीसुद्धा, देव आपल्या सार्वभौम प्रयोजनात्मक व्यवस्था व कृपेने, आपल्या प्रार्थनांना उत्तर देत, अशा संधी निर्माण करू शकतो की ज्यामुळे आपण ते मार्ग पाहू शकतो ज्यांची आपण पूर्वी दखल घेतलेली नसते. देवाचे लोक त्याच्या ईश्वरी नियोजनावर व मार्गदर्शनावर विश्वास ठेवू शकतात, कारण तो आपल्या विश्वासाचा प्रतिसाद देत आपल्याला योग्य दिशेने चालवितो. 

5. पवित्र शास्त्राधारित निर्णय घेणे म्हणजे देवाने दिलेल्या आणि बायबलने मान्य केलेल्या या (आणि इतर) तत्त्वांचा एकत्रितपणे उपयोग करणे होय.

चांगल्या हेतूने निर्णय घेणारे ख्रिस्ती लोकही काही वेळा असे निर्णय घेऊन बसतात, जे शेवटी पवित्र शास्त्राशी पुरेसे सुसंगत नसतात. याचे एक कारण असे की ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील केवळ एकतर्फी घटकावर भर देतात आणि उरलेल्या सर्व घटकांकडे दुर्लक्ष करतात. देवाच्या इच्छेचा पाठपुरावा करतांना लोक ज्या दोन “एकमेव स्रोत” उपायांचा अवलंब करतात  आणि ज्यावर ते चुकीचा विश्वास ठेवतात, ते असे: 1) आपण देवाच्या ईश्वरीनियोजनाचे अगदी अचूक अर्थ लावणारे आहोत हा समज (“मला हे चिन्ह दिसले” किंवा “मला असे स्वप्न पडले”), आणि 2) आपल्या भावना (“मला असे वाटते की देव मला हेच करायला सांगत आहे”). या दोन्हींपैकी एकावरच, इतर सगळ्यांना बाजूला सारून अवलंबून राहिल्यास, होणारा निर्णय असंतुलित ठरतो. निर्णयप्रक्रियेत तुमची मदत करीन, असे अभिवचन देत देवाने आपल्याला आपले संपूर्ण वचन दिले आहे, आणि आपण त्याचा एकत्रित व सुसंगतपणे  वापर करावा अशीच त्याची इच्छा आहे.आपल्याला निर्णय घेताना मिळणारी शांती आणि देवावरील भरवसा याचे मूळ या सत्यात आहे की देव आपल्यावर प्रेम करतो आणि आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तो त्याची सर्वोच्च योजना सिद्धीस नेतो. आणि जरी आपण चुकीचा निर्णय घेतला, ज्याचे नकारात्मक परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील, तरीसुद्धा देव आपले जीवन, आपली सर्व पापें आणि चुका यांसह, आपल्या भल्यासाठी आणि त्याच्या गौरवासाठी नियंत्रणात ठेवतो. आपल्या चिंतेच्या वादळांपासून संरक्षण देणारी खरी शांती आणि दिलासा याच गोष्टीत आहे—की तो अजूनही तोच सार्वभौम देव आहे, जो “देवावर प्रीती करणार्‍यांसाठी म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांसाठी” आपल्या “करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक” अशा घडवून आणतो (रोमकरांस 8:28).

हा लेख “तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी” या संग्रहाचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

डेव्हिड बॉक्सरमन्

डेव्हिड बॉक्सरमन्

रेव्हरंड डेव्हिड बॉक्सरमन् हे साउथलेक, टेक्सास येथील लेकसाइड प्रेस्बिटेरियन चर्चचे माजी पाळक आहेत, जिथे त्यांनी बावीस वर्षे मुख्य पाळक म्हणून सेवा केली.