
ख्रिस्ती जीवनात आशेची भूमिका
26/05/2026देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारतो काय?
आजच्या वर्तमान जगात, देवावर विश्वास ठेवणाऱ्या अनेक लोकांच्या मनात अशी धारणा सहजपणे घर करून बसलेली दिसते की, उपासक प्रामाणिक असेल तर देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारतो. तथापि, पवित्र शास्त्रात अशा दृष्टिकोनाला कोणताही पुरावा आढळत नाही. उलट, उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत पवित्र शास्त्र असे सत्य उघड करते जे या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध आहे.
हे दहा आज्ञांपैकी पहिल्या आज्ञेत स्पष्टपणे दिसून येते: “माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.” (निर्गम 20:3). इस्राएल ज्या प्राचीन निकट-पूर्वीय जगात राहत होता, ते सर्व प्रकारच्या धर्मांनी आणि “देवांनी” भरलेले होते. देव अशा इतर धर्मांना नाकारतो. का? कारण त्या इतर धर्मांचे “देव” प्रत्यक्षात दुष्ट आत्मे आहेत, आणि त्या दुष्ट आत्म्यांची उपासना करणे हे अमंगळ आहे (लेवीय 17:7; अनुवाद 32:16-17). प्रेषित पौल नवीन करारातही हेच शिकवतो (करिंथकरांस पहिले पत्र 10:20).
येशूची परीक्षा घेण्यात आली त्यावेळी, येशू सैतानाला अनुवाद 6:13 चा संदर्भ देऊन म्हणतो, “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर,
व केवळ त्याचीच उपासना कर.” (मत्तय 4:10). हा धार्मिक अनन्यतावाद आहे. देहधारणामध्ये, जो शब्द देवासह होता आणि जो शब्द देव होता, तो देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली (योहान 1:1, 14). तो आता देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे (तीमथ्याला पहिले पत्र 2:5), दुसरा कोणीही नाही.
देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारत असता, तर ख्रिस्ताच्या देहधारणाची, मरणाची आणि पुनरुत्थानाची गरजच उरली नसती.
येशूने स्वतः ख्रिस्ती धर्माची अनन्यता स्पष्टपणे अभिव्यक्त केली, जेव्हा तो म्हणाला: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही” (योहान 14:6). “कोणी नाही” म्हणजे खरोखर कोणीही नाही. म्हणूनच पेत्राने, पवित्र आत्म्याने पूर्ण झाल्यावर, येशूच्या संदर्भात पुढील घोषणा केली: आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रेषितांची कृत्ये 4:12). जे लोक तारण शोधत आहेत, त्यांच्यासाठी दुसरा कोणीही नाही.
जर देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारत असता, तर ख्रिस्ताच्या देहधारणाची, मरणाची आणि पुनरुत्थानाची काहीच गरज उरली नसती, कारण पहिल्या शतकात आधीच पुष्कळ धर्म अस्तित्वात होते. देव जर सर्व धर्मांची उपासना स्वीकारत असता, तर महान आज्ञेची आणि राष्ट्रांमध्ये सुवार्ताप्रसार करण्याचीही गरज उरली नसती. जर देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारत असेल, तर येशूने जो सुवार्ताप्रसार करायचे आज्ञापिले तो वेळेचा केवळ अपव्यय आहे.
देवाने कृपेने नीतिमत्त्वाचा जो धर्ममार्ग लावून दिला आहे, त्याखेरीज तो इतर कोणताही धर्म मान्य करत नाही. जे धर्म निर्माणकर्त्याच्या उपासनेऐवजी निर्मितीच्या उपासनेला प्राधान्य देतात, अशा धर्मांचा तो स्वीकार करत नाही. देव खोटी उपासना स्वीकारत नाही. तथापि, कोणत्याही धर्माचे उपासक जेव्हा त्या धर्मांचा पश्चात्तापी अंत:करणाने त्याग करून ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, तेव्हा देव त्यांचा स्वीकार करतो.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


