
यहेज्केल या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
03/02/2026
यिर्मयाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
10/02/2026दानियेलाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
दानियेलचे पुस्तक जुन्या करारातील एक आगळेवेगळे पुस्तक आहे. त्याची विषयवस्तू आणि इस्राएलच्या पुनर्स्थापनेविषयी जुन्या करारातील भविष्यवाण्या व त्या भविष्यवाण्यांची येशू ख्रिस्ताचे जीवन, मृत्यू, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहणामध्ये झालेली पूर्तता यांमध्ये त्या बजावणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिका ह्या सर्वांमुळे हे पुस्तक विशेष ठरते. हे पुस्तक गुंतागुंतीने व गहनतेने इतके समृद्ध आहे की, त्याचे संक्षिप्त सार सांगणे कठीण होते. तरीही, या पुस्तकातील तीन पैलू आधुनिक वाचकांसाठी त्याचा आशय अधिक उलगडून दाखवतात.
1. सुरुवातीचे वृत्तांत (अध्याय 1–6) पुस्तकातील पुढील भविष्यवाण्यांना (अध्याय 7–12) विश्वसनीयता देतात.
दानियेलच्या पुस्तकातील आरंभीचे अध्याय—मुख्यतः अरामी भाषेत रचलेले—ख्रिस्तपूर्व 605 मध्ये बाबेलमध्ये बंदिवासात नेण्यात आलेल्या यहूदाच्या तरुण पिढीचे चित्र दाखवतात. तेथे त्यांना त्यांच्या बंदीकर्त्यांकडून कठोर आणि भीषण छळ सहन करावा लागतो; पण त्याच बरोबर, ज्या परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्या हातून त्यांना लक्षणीय यश मिळते.
दानियेल आणि त्याचे सहकारी शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांचा वृत्तांत मिसरमधील योसेफाच्या वृत्तांताशी स्पष्ट साहित्यिक आणि भाषिक नाते दर्शवतो. उदाहरणार्थ, दोघांचेही वर्णन देखणे असे केले आहे (उत्पत्ती 39:6; दानियेल 1:4); दोन्ही वृत्तांतांमध्ये राजांच्या मनात अस्वस्थता उत्पन्न करणाऱ्या स्वप्नांचे अर्थ उलगडले जातात, आणि त्या अर्थांद्वारे देवाची आगामी योजना प्रकट होते; शिवाय, या दोन्ही वृत्तांतांत अनेक एकसारखे हिब्रू शब्द वापरले गेले आहेत, जे त्यांना परस्पर दृढपणे जोडतात. योसेफाप्रमाणेच, दानियेल आणि त्याचे मित्र परकीय राज्याच्या दरबारात सेवा करत असूनही देवाच्या पाचारणाशी स्थिर विश्वासू राहतात; परिणामी, त्यांना अद्भुत अशी प्रतिष्ठा व संपत्ती प्राप्त होते, अगदी त्यांच्या गळ्यात सोन्याची साखळी(सोन्याचा गोफ) घालण्यात येते (उत्पत्ती 41:42; दानियेल 5:29).
ज्या काळात त्यांचा छळ होत होता त्याकाळी त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या या अढळ विश्वासूपणामुळे दानियेलने निर्वासित यहुद्यांसाठी व बाबेलचा पराभव झाल्यानंतर ख्रिस्तपूर्व 536 मध्ये यरुशलेमला परतलेल्या लोकांसाठी ज्या पुनर्स्थापनाविषयक भविष्यवाण्या केल्या, त्या अधिक दृढपणे बळावल्या, हे विशेषतः महत्त्वाचे ठरते. कारण दानियेलाचा मुख्य संदेश असा होता की निर्वासितावस्थेतून होणारी पुनर्स्थापना सातपट विलंबित केली जाईल (दानियेल 9:24).
2. यरुशलेमेच्या पुनर्स्थापनेचा दानियेलमध्ये जाहीर झालेला सातपट विलंब हा जुन्या करारातील घटनांपासून येशूच्या सेवाकार्यापर्यंत एक सेतू उभारतो.
मोशेच्या काळापासूनच, इस्राएलापुढे राष्ट्र म्हणून बंदिवास व त्यानंतर होणारी पुनर्स्थापना हे पर्याय उघडे ठेवले गेले होते (अनुवाद 28:64–68; 30:1–10). लेवीय 26 मध्ये सर्वत्र परमेश्वर मोशेला सांगतो की, जर बंदिवासाच्या प्रसंगीही इस्राएलाने मनपरिवर्तन केले नाही, तर तो त्यांच्यावर चाललेली शिक्षा सातपट कडक करील (लेवीय 26:18, 21, 24, 28).
यिर्मयाच्या काळापर्यंत, बंदिवासाचा हा इशारा केवळ संभाव्य परिणाम न राहता निकट येत असलेल्या विनाशाचे निश्चित आश्वासन बनला होता. पश्चात्ताप करण्याची वेळ आता संपली होती (यिर्मया 19), आणि संदेष्ट्याने हे घोषित केले की केवळ बंदिवास येणारच नाही, तर ते सत्तर वर्षे चालणार आहे (यिर्मया 25:11; 29:10). दानियेल अशी वचने वाचन करत होता, आणि त्यांच्यामुळेच दानियेल 9 मध्ये आपण जी पाहतो त्याची ती पश्चात्तापाची प्रार्थना आकार घेते. इस्राएल लोक आपापल्या पापांसाठी मनापासून पश्चात्ताप करून आपल्या तारणकर्त्या परमेश्वराकडे परत वळल्याशिवाय निर्वासनाचा काळ संपणार नाही, हे त्याला ठाऊक होते. त्याच्या नीतिमत्तापूर्वक प्रार्थनेच्या प्रत्युत्तरात परमेश्वर गब्रीएल या दूताला त्याच्याकडे पाठवतो आणि निर्वासनाचा कालावधी सातपट वाढविल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचवतो, म्हणजे आता “यरुशलेमच्या उध्वस्ततेचा” शेवट सत्तर वर्षांनी नव्हे, तर सत्तरचा सातपट, म्हणजे 490 वर्षांनी होणार होता. पुस्तकाचा उर्वरित भाग दानियेलाच्या काळापासून देवाच्या राज्याच्या आगमनापर्यंत, या 490 वर्षांच्या दरम्यान घडणाऱ्या घटनांचे वर्णन करणाऱ्या दर्शनांची मालिका मांडतो.
3. अध्याय 7–12 मधील दर्शनें जुन्या-नव्या करारांच्या मध्यांतरातील जागतिक हलचालींमध्येही देवाच्या लोकांना पुनर्स्थापनेच्या त्याच्या योजनेवर विश्वास ठेवण्यास धैर्य देतात.
दानियेलच्या पुस्तकाच्या उत्तरार्धातील एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे पुनर्स्थापनेच्या वेळी मशीहाच्या आगमनापूर्वी घडणाऱ्या घटनांविषयीची त्यातील दर्शनें किती नेमकी व तपशीलवार आहेत. भविष्यासंबंधी भविष्यवाणी करताना इतर संदेष्टे अनेकदा अधिक धूसर आणि संकेतात्मक भाषा वापरतात, पण दानियेलाचे ठळकपणे बोलणे विशेष लक्षणीय आहे. संदेष्ट्याने येणाऱ्या काळाचे असे सूक्ष्म चित्र का रंगवले आहे? याचे उत्तर पुनर्स्थापनेच्या सातपट विलंबाविषयी दानियेलच्या पुस्तकात दिलेल्या संदेशात दडलेले आहे. काळाच्या ह्या दीर्घ कालावधीचा अगदी स्पष्टपणे उलगडा करून, कराराच्या मंडळीला तो हा बोध करतो की जागतिक इतिहासात एकामागून एक साम्राज्ये उदय पावतील आणि लयास जातील, तरीदेखील परमेश्वरच इतिहासावर सार्वभौम आहे. म्हणून देवाच्या करारातील लोकांनी आपल्या जबाबदाऱ्या विश्वासूपणे पार पाडत राहावे आणि देवाचे लोक म्हणून त्यांना बहाल केलेल्या विशेषाधिकारांचा आनंद घ्यावा. या संपूर्ण प्रवासात त्यांनी आपल्या तारणकर्त्या परमेश्वरावर अखंडपणे भाव ठेवावा, आणि हे लक्षात ठेवावे की एक दिवस असा येईल जेव्हा तो त्यांचे पुनर्स्थापन सिद्धीस नेईल.
जसा इस्राएलाचा धार्मिक अवशेष इतिहासाच्या चढ-उतारांमध्येही टिकून राहिला, तसाच आज मशीहाचे अनुयायी असलेल्यांनी दानियेलच्या भविष्यवाण्यांत आश्रय व आशा शोधली पाहिजे. देवाचे लोक म्हणून आपल्यालाही कर्तव्ये आणि विशेषाधिकार आहेत—आपल्या राजाच्या पुनरागमनाची आणि त्याने दोन हजार वर्षांपूर्वी आरंभ केलेल्या पुनर्स्थापनेच्या योजनेच्या पूर्णतेची वाट पहावी (2 पेत्र 3:1–13). आपणही असे निर्वासित (प्रवासी) म्हणून ओळखले जातो, ज्यांनी मशीहा म्हणविलेल्या अभिषिक्त राजाला पाहिले आहे आणि जागतिक घटनांच्या उलगडणाऱ्या प्रवाहाच्या मध्यभागी त्याची सेवा करतो (1 पेत्र 1:1; याकोब 1:1 पहा). दानियेल आणि त्याच्या मित्रांप्रमाणेच आपण भू-राजकीय शक्तींच्या चक्रात चिरडले जाणार नाही, कारण आपण त्या महान राजाची सेवा करीत आहोत, ज्याने जे काही घडते ते मुक्तपणे आणि अपरिवर्तनीयपणे ठरविले आहे (वेस्टमिन्स्टर मतांगीकार 3.1).
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


