Preaching and Teaching
उपदेश व शिक्षण : एक तुलनात्मक विवेचन
17/03/2026
5 Things About Fighting Sin
“पापाविरुद्ध लढा” याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
24/03/2026
Preaching and Teaching
उपदेश व शिक्षण : एक तुलनात्मक विवेचन
17/03/2026
5 Things About Fighting Sin
“पापाविरुद्ध लढा” याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
24/03/2026

प्रीती जी सहनशील आणि दयाळू आहे

Love That Is Patient and Kind

1 करिंथकर 13 हा शास्त्र भाग संपूर्ण पवित्र शास्त्रातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रभागांपैकी एक आहे, कारण त्यामध्ये प्रेषित पौल दैवी प्रीतीच्या चारित्र्यगुणांचे एक विलोभनीय विवरण आपल्याला देतो. तो प्रथम प्रीतीचे महत्त्व ठळकपणे मांडतो; तो लिहितो की, जर आपल्याकडे सर्व प्रकारची दाने, क्षमता आणि यश असतील, परंतु प्रीती नसेल, तर आपण काहीच नाही (वचने 1–3). त्यानंतर, वचन 4 मध्ये, तो दैवी प्रीती कशी दिसते याचे वर्णन करू लागतो आणि म्हणतो, “प्रीती सहनशील व दयाळू आहे,” किंवा अधिक पारंपारिक भाषांतराच्या शब्दांत, “प्रीती दीर्घकाळ सोसते आणि परोपकारी असते” (NKJV). सहनशीलता आणि दयाळूपणा यांची ही सांगड माझ्या मनात विशेष कुतूहल निर्माण करते. पौलाने प्रीतीच्या वर्णनात हे गुण प्रथम का ठेवले, आणि त्यांची जोडी का केली?  

पौल आपल्याला सांगतो की प्रीती सहनशील आहे, ती “दीर्घकाळ सोसते.” मला हे अधिक पारंपारिक भाषांतर आवडते, कारण ते हा विचार स्पष्ट करते की इतरांवर प्रीती करणे कधी कधी कठीण असू शकते. लोकांवर प्रीती करणे म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आपल्याला दुखावले की आपण त्यांना लगेचच बाजूला सारत नाही. आपल्या नात्यांमध्ये, आपण काही लोकांच्या बाबतीत इतरांपेक्षा अधिक सहनशील असतो. जर एखाद्या जुन्या मित्राने मला चिडवणारे किंवा त्रास देणारे काही केले, तर मी सहसा म्हणतो, “अरे, त्याची रीतच तशी आहे, त्याचे व्यक्तिमत्वच तसे आहे; आपण सर्व मानव आहोत, आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही.” मी त्याच्यासाठी सवलत देतो. पण जर मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला भेटलो आणि ती व्यक्ती अगदी माझ्या मित्रासारखीच वागली, तर कदाचित मला तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नसतो. आपण मित्रांच्या ज्या गोष्टी सहन करतो, त्या अनोळखी व्यक्तींच्या बाबतीत सहन करत नाही.

दीर्घकाळ सोसणारी प्रीती “गुणाकाराचा हिशोब” ठेवत नाही. तुम्ही मला पहिल्यांदा दुखावले, तर मी म्हणू शकतो, “हा पहिला स्ट्राइक,” आणि मग तुम्हाला बाद करण्यापूर्वी आणखी दोन संधी देऊ शकतो. पण जर माझी प्रीती दीर्घकाळ सोसणारी असेल, तर तुम्ही सत्त्याहत्तरव्या स्ट्राइकपर्यंत पोहोचलात तरी मी धीर न सोडता तुमच्यासोबत कसेही करून निभावून घेईल.

ख्रिस्ती प्रीती दीर्घकाळ का सोसत राहते? कारण ख्रिस्ती लोक ख्रिस्ताचे अनुकरण करतात; आणि ख्रिस्त देवपित्याचे अनुकरण करतो; तसेच दीर्घकाळ सोसणे हे देवाच्या स्वभावाचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. पवित्र शास्त्र वारंवार हेच दाखविते की देव मंदक्रोध आहे, आणि तो आपल्या ताठ मानेच्या लोकांशी दीर्घकाळ सोसणारा आहे. उदाहरणार्थ, देव स्वतःचे वर्णन असे करतो: “’परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली : “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,” (निर्गम 34:6). त्याचप्रमाणे, पौल त्याची “ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा ” उल्लेख करतो (रोम 2:4).

जर तुम्ही ख्रिस्ती असाल, तर तुमच्या तारणापूर्वी देवाने तुमच्या अविश्वासाचा किती काळ धीर धरला? आणि तुमच्यात रेंगाळत राहणाऱ्या पापाचा तो किती काळ धीर धरत आला आहे? जर ही देवाची दीर्घकाळ सोसणारी सहनशीलता नसती, तर आपला नाश झाला असता. देव जर आपल्याशी तितक्याच अधीरतेने वागला असता, जशी अधीरता आपण इतर लोकांशी वागताना दाखवितो, तर आपण आत्ता नरकात यातना सोसत असतो. त्याने आपला आज्ञाभंग, आपली ईश्वरनिंदा, आपला नालायकपणा, आपला अविश्वास आणि आपले पाप सहन केले आहे, आणि तरीही तो आपल्यावर प्रीती करतो. देव असाच आहे. तो आपली प्रीती अशा रीतीनेच प्रकट करतो. तो आपली सहनशीलता दाखवून त्याची प्रीती प्रकट करतो, जी दीर्घकाळ टिकणारी सहनशीलता आहे.

आपल्याला केवळ सहनशील राहण्यासाठीच नव्हे, तर दीर्घकाळ सोसण्यासाठी पाचारण केले आहे. लोकांची पापे, उणिवा आणि चुका जोपर्यंत आपल्याला वेदना देत नाहीत, तोपर्यंतच आपण त्यांच्याविषयी सहनशील राहावे, असे नाही. दीर्घकाळ सोसणे म्हणजे आपण दुःख आणि वेदना अनुभवत असतानाही प्रीती करणे होय. याचा अर्थ असा की आपण ‘मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती” करतो, “कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’” (1 पेत्र 4:8). अशा प्रकारे, आपण देवाच्या प्रीतीचे प्रतिबिंब पाडतो, जो दीर्घकाळ सोसणारा आहे.

मग पौल सहनशीलता, म्हणजेच दीर्घकाळ सोसणे, याची सांगड दयाळूपणाशी का घालतो? होऊ शकते की आपण दीर्घकाळ इजा किंवा शत्रुत्व सहन करू, आणि तरीही मनात शत्रुत्व साठवत, परतफेडीचा सूड उराशी धरून ठेवत, उलट कारस्थाने रचत राहू; परंतु पवित्र शास्त्र “दीर्घकाळ सोसणे” याचा अर्थ असा घेत नाही. दीर्घकाळ सोसण्यात दयाळूपणा किंवा परोपकारीपणाचाही समावेश असतो, कारण ज्यामुळे आपल्याला दुःख सहन करावे लागते त्या कारणास प्रतिसाद देताना आपण दयाळू राहिले पाहिजे. दयाळू लोक उद्धट नसतात, कठोर मनाचे नसतात, क्षुद्र नसतात; त्यांचे अंतःकरण उदार असते; आणि ते इतर लोकांविषयी संवेदनशील व मनाचे सौम्य असतात.

माझे वडील या सद्गुणाचे एक जिवंत आदर्श होते, असा माझा विश्वास आहे. ते खरोखर दयाळू होते; आणि त्यांनी मला देवाचा दयाळूपणा प्रत्यक्ष दाखवून दिला. शाळेतून घरी आलो आणि मी केलेल्या एखाद्या गोष्टीमुळे मी अडचणीत आहे, हे कळले, की मला ते अजिबात आवडत नसे. माझी आई म्हणायची, “तुझ्या वडिलांना तुझ्याशी थोडी बैठक करायची आहे.” मग मला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन दरवाजा बंद करावा लागायचा; आणि ते म्हणायचे, “ये बाळा, आपल्याला बोलायचे आहे.” ते कधीही आवाज न चढवता, कधीही माझ्यावर राग व्यक्त न करता, माझी चूक इतकी नेमकी उलगडून दाखवित असत, की माझ्या मनाचा आरसा अगदी स्वच्छ व्हायचा; आणि तरीही, ती चूक उघड करून दाखवल्यानंतर, ते मला अतिशय हळुवारपणे पुन्हा सावरून उभे करीत. नंतर मी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडायचो तेव्हा पाय जमिनीवर लागत नाहीत असा मला हलकेपणा वाटायचा; मला आनंद व्हायचा, पण पुढच्या वेळी अधिक चांगले वागले पाहिजे, हेही मला स्पष्ट कळत असे. त्यांची पद्धत इतकी दयाळू होती की त्यांनी त्यातून मला प्रेरणा दिली.  

खरोखर दयाळू व्यक्ती मिळणे दुर्मिळ आहे, हे दुर्दैवाने खरे आहे. तरीही, प्रीतीचे प्रकटीकरण म्हणून दयाळूपणा हा दीर्घकाळ सोसण्याशी जोडलेलाच असला पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर, प्रीती ही अधीर नसते किंवा निर्दयी नसते. हे देवाच्या प्रीतीचे चित्र आहे, आणि हीच प्रीती पवित्र आत्मा देवाच्या लोकांमध्ये जोपासत असतो.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

आर. सी. स्प्रौल
आर. सी. स्प्रौल
डॉ. आर. सी. स्प्रौल हे 'लिगोनियर मिनिस्ट्रीज'चे संस्थापक, सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील 'सेंट अँड्र्यूज चॅपल'चे मुख्य उपदेशक आणि शिक्षक, तसेच 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'चे पहिले अध्यक्ष आणि 'टेबलटॉक' या मासिकाचे कार्यकारी संपादक होते. त्यांचा 'रिन्यूइंग युअर माइंड' हा रेडिओ कार्यक्रम आजही जगभरातील शेकडो रेडिओ केंद्रांवर दररोज प्रसारित केला जातो आणि तो ऑनलाइन देखील ऐकता येतो. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये 'द होलिनेस ऑफ गॉड' , 'चोजन बाय गॉड' आणि 'एव्हरीवन्स अ थिओलॉजियन' यांसारख्या प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश आहे. पवित्र शास्त्राच्या अचूकता यावर प्रभावीपणे बचाव करण्यासाठी आणि देवाच्या लोकांनी त्यांच्या वचनावर ठाम विश्वासाने उभे राहण्याच्या गरजेवर भर देण्यासाठी ते जगभरात ओळखले जात होते.