Love That Is Patient and Kind
प्रीती जी सहनशील आणि दयाळू आहे
19/03/2026
5 Things About Holiness
पवित्रतेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
26/03/2026
Love That Is Patient and Kind
प्रीती जी सहनशील आणि दयाळू आहे
19/03/2026
5 Things About Holiness
पवित्रतेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
26/03/2026

“पापाविरुद्ध लढा” याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

5 Things About Fighting Sin

1. धोका खरा आहे.

पवित्र शास्त्र हे स्पष्टपणे दाखवते की हे जग, आपला स्वतःचा देह आणि सैतान या तिन्हींकडून येणाऱ्या गंभीर मोहांना आपल्याला सामोरे जावे लागते. हे तिन्हीही बलाढ्य शत्रू आहेत.

जग आपल्या बाजूने नाही. जगाची व्यवस्था अनेकदा आपल्याला एका ठराविक दिशेने ढकलण्यासाठी जणू कट रचत असते. म्हणूनच पौल सर्व ख्रिस्ती लोकांना चेतावणी देतो, “म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका” (रोम. 12:2). हे जग ज्याला महत्त्व देते, ते जे सहन करते, आणि यशाची जी व्याख्या ते स्थापित करते त्यानुसार त्याच्याशी समरूप होणे ही गोष्ट संस्कृतीप्रमाणे बदलू शकते; परंतु प्रत्येक टप्प्यावर पवित्र शास्त्राच्या कसोटीवर ते तपासून, त्याला प्रतिकार केलाच पाहिजे.

आमचा देह देखील आमच्याविरुद्ध युद्ध करतो. आपण स्वभावतः पापी आहोत, देवापासून दूर गेलेले आणि आपल्या पापी वासनांकडे झुकलेले (प्रवृत्त) आहोत. कधी कधी, नव्याने जन्म होण्याचे जे अद्भुत काम आमच्यात होते, त्यावेळी, देव त्याच्या कृपेने आपल्यातील काही पापी प्रवृत्ती काढून टाकतो; तरीही आपल्या पापी जीवनाचे अवशेष उरतातच. म्हणून आपण फक्त आपल्या अंतःकरणाचे ऐकावे म्हणजे ते आपल्याला योग्य दिशेने नेईल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.

त्यानंतर सैतान आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सावध राहण्याची चेतावणी देते, कारण “तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.” (1 पेत्र 5:8). जर तुम्हाला मारण्यासाठी एखाद्या कुशल मारेकऱ्याला नियुक्त केले गेले आहे हे जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हा तुम्ही सतत सावध राहिला असता; तुम्ही प्रत्येक दाराला कुलूप लावाल आणि त्याची चाहूल लागते का म्हणून प्रत्येक कोपरा तपासत राहिला असता. सैतान कोणत्याही माणसापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आहे; म्हणून आपण नेहमी शुद्धबुद्धीने सावध आणि जागृत राहिले पाहिजे.

2. तुमच्या लक्षात येण्यापूर्वीच मोहाचे आक्रमण सुरू होते. 

जेव्हा आपण पापात पडतो, तेव्हा त्याचे कारण अनेकदा हे असते की आपण आधीच स्वतःचे संरक्षण करण्यास अपयशी ठरलेले असतो. आपण आपल्या रोजच्या सामान्य दैनंदिन कामांत या वृत्तीने गुंतू शकत नाही की जणू आपण पापाला बळी पडण्याच्या धोक्यापासून अलिप्त आहोत. अनेकदा पापाविरुद्ध लढण्याचा सर्वोत्तम मार्ग हाच असतो की ज्या जागा व ज्या क्रिया आपल्याला मोहाच्या दिशेने घेऊन जातात, त्या टाळाव्यात. काहींसाठी याचा अर्थ असा की त्यांनी स्वतःला कामात गुंतवून ठेवणे आवश्यक असते, कारण एकाकीपणामुळे येणारा कंटाळा त्यांना मोहाकडे ढकलतो. काहींना विशिष्ट लोकांपासून दूर राहण्याची गरज आहे, ज्यांच्या प्रभावामुळे ते पापाच्या मार्गावर जातील. काहींना विशिष्ट सामग्रीपासून दूर राहण्यासाठी संरक्षणात्मक यंत्रणेची आवश्यकता असते. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कधीही पाहू नयेत, अशी काही ठिकाणे आहेत जिथे आपण कधीही जाऊ नये आणि अशी काही वेळ असते जेव्हा आपण कधीही एकटे असू नये. जरी हे लोक, ठिकाणे आणि प्रसंग स्वतःच्या स्वरूपात पाप नसले, तरी त्यांत गुंतल्याने आपण मोहाला अधिक सहजपणे बळी पडू शकतो, आणि पापात पडण्याचा मोठा धोका आपल्या अंगावर येऊ शकतो. 

3. पापाविरुद्धच्या लढाईत अंतःकरणावर लक्ष दिले पाहिजे.

येशू हे स्पष्ट करतो की पाप हे आमच्या आतून येते (मत्तय 15:19). स्त्रोत अंतःकरणच आहे; म्हणून पापाविरुद्ध लढताना आंतरिक मनुष्यावर उपचार करणे आवश्यक आहे. देवाच्या वचनाच्या अनुरूप आपले अंतःकरण जोपासत असताना आपण सावध राहिले पाहिज.

स्तोत्र 119:11 ही गोष्ट थोडक्यात मांडते:

मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. 

स्तोत्रकर्त्याला माहीत होते की, पापापासून दूर राहण्यासाठी त्याचे अंतःकरण देवाच्या वचनाने ओसंडून वाहणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या बाबतीतही तेच खरे आहे.

आपण फक्त आपल्या अंतःकरणाचे ऐकल्यास ते आपल्याला योग्य दिशेने नेईल अशी अपेक्षा करू शकत नाही. म्हणूनच दररोज पवित्र शास्त्राचे वाचन करणे, पवित्र शास्त्राचे पाठांतर करणे, आणि देवाच्या वचनानुसार प्रार्थना करणे हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण ज्यावर मन केंद्रित करतो, त्याचे प्रतिबिंब आपल्या शब्दांत व कृतींत उतरते. याच प्रकाशात प्रेषित पौल लिहितो, “बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.” (फिलिप्पै. 4:8).

4. त्रैक्य देव आपल्याला सामर्थ्य देतो.

ख्रिस्ती या नात्याने आपणावर ज्या परीक्षा येतात, त्यांमध्येही प्रभू आपल्या बाजूने आहे. बायबल म्हणते की जे पुन्हा जन्मलेले आहेत, ते “पण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत; आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.” (2 करिंथ 3:18). ख्रिस्ती लोकांना हे अभिवचन दिलेले आहे की, “ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे.” (फिलिप्पैकर 1:6). आणि पुढे तो म्हणतो, “कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे” (फिलिप्पैकर 2:13).

त्याहीपेक्षा अधिक म्हणजे, आपल्याला ठळकपणे, अगदी विशिष्ट रीतीने सांगितले आहे: 

मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. (1 करिंथ 10:13)

आपण ज्यांचा सामना करतो ते शत्रू बलाढ्य असले, तरी देव अधिक सामर्थ्यवान आहे. त्याचा पवित्र आत्मा, म्हणजे ज्याने येशूला मेलेल्यांतून उठविले, तो आज आपल्या शरीरांत कार्य करीत आहे. बायबल ख्रिस्ती लोकांना आठवण करून देते की, “कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे.” (1 योहान 4:4).

5. स्वर्गात आपला गौरव होईपर्यंत हा लढा थांबणार नाही.

जोपर्यंत आपण आपल्या तारणकर्त्याच्या सानिध्यात प्रवेश करत नाही, तोपर्यंत आपण पापाविरुद्ध या लढ्यात राहू, अशी अपेक्षा ठेवावी लागते. पवित्र शास्त्र हे स्पष्ट करते की, “आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही.” (1 योहान 1:8).

पापाविरुद्धचा लढा म्हणजे पृथ्वीवरील आपला काळ हा आध्यात्मिक युद्धाचा काळ आहे; आणि स्वर्गाच्या सार्वकालिक विश्रांतीत आपला प्रवेश होईपर्यंत “विसावा” मिळेल, अशी अपेक्षा आपण कधीही करू नये.

परंतु एक दिवस, आपण बदलले जाऊ. जेव्हा येशू मोठ्या वैभवाने आम्हाला आपल्या सार्वकालिक घरात घेईल, तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. युद्ध संपलेले असेल आणि लढाई जिंकलेली असेल.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

जोनाथन एल. मास्टर
जोनाथन एल. मास्टर
डॉ. जोनाथन एल. मास्टर हे साऊथ कॅरोलिना येथील ग्रीनव्हिल प्रेस्बिटेरियन थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत आणि प्रेस्बिटेरियन चर्च इन अमेरिकामध्ये एक 'टीचिंग एल्डर' आहेत. ते ‘ग्रोइंग इन ग्रेस: बिकमिंग मोअर लाईक जीझस’ व ‘रिफॉर्म्ड थिऑलॉजी: ब्लेसिंग्स ऑफ द फेथ' यांसह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.