
ईयोबाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
25/12/2025
योहानाचे 1, 2 आणि 3 पत्र यांविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
01/01/2026नीतिसूत्रेच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
1. हा सुज्ञतेचा संग्रह आहे, हमीपत्रांचा संग्रह नाही.
प्राथमिक दृष्ट्या, नीतिसूत्रेचं पुस्तक हे जीवनातील सर्व समस्यांवर सोपे, झटपट आणि सूत्रबद्ध समाधान देत असल्यासारखे भासते. जे लोक यातील “समीकरण” आपल्या जीवनात वापरतात, त्यांना हे पुस्तक समृद्धी आणि यशाची जणू हमीच देत आहे असे वाटू शकते. दुसऱ्या शब्दांत, नीतिसूत्राच्या पुस्तकाचे वरवरचे वाचन केल्यास तुम्हाला असा निष्कर्ष सहज सुचू शकतो की जर तुम्ही “X” केले, तर तुम्हाला “Y” मिळेल—इथे “X” म्हणजे शहाणपण किंवा सुज्ञता आणि “Y” म्हणजे मानवी यश व समृद्धी. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे 3:1–2 मध्ये आपल्याला सांगितले आहे की जो कोणी नीतिसूत्राची शिकवण लक्षात ठेवतो आणि त्यात दिलेल्या मार्गांचे अनुसरण करतो, त्याला दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होईल. हा भाग वेगळा काढून वाचला, तर तो हमखास परिणामाचे वचन देत असल्यासारखा वाटतो, नाही का? नीतिसूत्रे अशा साध्यासोप्या पद्धतीने वाचण्याचा मोह किती तीव्र असू शकतो हे तुम्ही पाहू शकता; पण नीतिसूत्रे अशा प्रकारे वाचणे चुकीचेच नव्हे, तर संभाव्यतः घातकही आहे.
नीतिसूत्रे हे पुस्तक आपल्याला अशी काही जादूची सूत्रे देत नाही जी प्रत्येक प्रसंगी आणि सर्वच परिस्थितींमध्ये अचूकपणे तशीच कार्य करतील; उलट, ते आपल्यासमोर अशी सुज्ञ तत्त्वे सादर करते की ज्यांचे चिंतन करणे आणि ज्यांची विवेकपूर्ण अंमलबजावणी करणे आपल्यासाठी योग्य ठरते. नीतिसूत्रे वाचताना आपण हे सामान्य पवित्र-शास्त्रीय तत्त्व डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे की आज्ञापालनानंतर बक्षीस नेहमीच तात्काळ मिळत नाही. कधी कधी आज्ञापालनाचे पारितोषिक पुढील काळासाठी, किंवा येणाऱ्या युगासाठी राखून ठेवलेले असते. लक्षात ठेवा, येशू स्वतः शहाणपणाचे मूर्त रूप होता आणि सर्व आज्ञांचे परिपूर्ण आज्ञापालन करूनही त्याने काही काळ प्रचंड दुःख सहन केले. केवळ आज्ञापालनात दुःख सोसल्यानंतरच त्याला उंच करण्यात आले (फिलिप्पैकरांस 2:5–11). म्हणून आपण नीतिसूत्रातील शहाणपणाचा पाठपुरावा करावा तो तत्काळ आणि हमखास परिणाम मिळवण्यासाठी नव्हे, तर ती या जगात आपल्या जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी देवाने दिलेली एक अमूल्य देणगी म्हणून.
2. नीतिसूत्रेचे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की देव आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूची काळजी घेतो.
नीतिसूत्रे या ग्रंथाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची व्यापक व्याप्ती. नीतिसूत्रे मानवी जीवनाच्या अनेक पैलूंना अत्यंत व्यावहारिक रीतीने हाताळते. जर तुम्ही नीतिसूत्रांतील विषयांचा नकाशा तयार केला, तर तुम्हाला दिसून येईल की हा ग्रंथ संपत्ती (नीतिसूत्रे 3:9, 13–14; 11:4; 13:7, 11, 22; 14:31; 21:5; 28:6, 20; 30:8–9), तोंडून निघणारे शब्द (नीतिसूत्रे 10:19; 12:19; 15:23, 28; 17:27–28; 25:11; 26:20), काम (नीतिसूत्रे 6:6–11; 12:11; 19:15; 20:4, 13; 26:13–16), मैत्री (17:17; 18:24; 27:6, 9), विवाह (नीतिसूत्रे 12:4; 18:22; 19:14; 27:15; 31:30), मुलांचे संगोपन (नीतिसूत्रे 13:24; 17:6; 19:18; 22:6; 23:13–14; 29:17) आणि मानव लैंगिक संबंध (नीतिसूत्रे 5:3; 8–9, 15–19; 6:27–29) अशा अनेक क्षेत्रांतील विविध विषयांवर भाष्य करतो. हे सर्व आपल्याला आठवण करून देते की देव आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राविषयी काळजी बाळगतो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्याच्या वचनाची व सुज्ञतेची अंमलबजावणी आपण करावी, अशी त्याची इच्छा आहे.
कधीकधी ख्रिस्ती लोक आपले जीवन विभागून टाकतात—आपला विश्वास केवळ रविवार सकाळच्या उपासनेपुरता किंवा वैयक्तिक भक्ती, प्रार्थना आणि सुवार्ताप्रचार अशा तथाकथित “आध्यात्मिक” बाबीं पुरताच मर्यादित ठेवतात. आध्यात्मिक शिस्तींमध्ये विश्वासू असणे हे देवासाठी आणि आपल्या कल्याणासाठी महत्त्वाचे असले, तरी आपण आपल्या संपत्तीचे व्यवस्थापन कसे करतो आणि ती कशी वापरतो, बोलतांना आपण कोणते व कसे शब्द उपयोगात आणतो, आपले काम कसे करतो आणि मित्र व आयुष्याचे जोडीदार कसे निवडतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांसाठी देवाकडून येणारी सुज्ञता पुरवून, नीतिसूत्रे आपल्या विश्वासाला वेगवेगळ्या खाचाखोचांत विभागून टाकण्याच्या आपल्या प्रवृत्तीला आव्हान देते आणि तिच्यात सुधारणा करते.
शिवाय, आपल्या जीवनातील सर्व पैलूंविषयी देवाला वाटणारी पितृतुल्य काळजी या मानवी अनुभवाच्या प्रत्येक क्षेत्राला गहन अर्थ आणि महत्त्व प्राप्त करून देते. नीतिसूत्रे आपल्याला “जे काही तुम्ही करता, ते देवाच्या गौरवासाठी करा” (1 करिंथ 10:31) या दृष्टिकोनाकडे नेते. ते आपल्याला आठवण करून देते की आपण जे काही करतो ते देवाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, आणि आपल्यासाठी सर्वोत्तमच गोष्टींची प्राप्ती व्हावी हीच त्याची आपल्याविषयी इच्छा आहे. शेवटी, नीतिसूत्रांतील सुज्ञतेची सर्वसमावेशक व्याप्ती ही देवाने दिलेली अशी देणगी आहे जी आपल्या जीवनाला बहर, स्थैर्य आणि समृद्धीच्या दिशेने घडवत पुढे जाण्यास सहाय्य करते.
3. सुज्ञतेवर भर देऊन, नीतिसूत्रे आपल्याला येशूकडे निर्देशित करतात.
येशू ख्रिस्ताच्या कार्यासंबंधी पूर्वचित्रण किंवा प्रकारशास्त्र (typology) म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जात असले तरी, ते अत्यंत प्रभावी रीतीने येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देते. प्रथम, शुभवर्तमान दाखवतात की येशूमध्ये महान सुज्ञता होती. लहानपणीच, जेव्हा तो मंदिराच्या आवारात वडीलधाऱ्यांना शिकवत होता, तेव्हा त्याने स्वतःच्या सुज्ञतेचे प्रकटीकरण केले, आणि आपल्याला सांगितले आहे की तो “ज्ञानात वाढत गेला” (लूक 2:47–52). याव्यतिरिक्त, जेव्हा येशूने आपली सार्वजनिक सेवा सुरू केली, तेव्हा त्याने लोकांना शिकवण्यासाठी प्रामुख्याने दृष्टान्तांचा उपयोग केला जो सुज्ञतेच्या शिक्षणाचा एक प्रकार आहे. त्यामुळे शुभवर्तमान येशूला नीतिसूत्रांतील ज्ञानी पुरुषाप्रमाणेच सुज्ञतेचा शिक्षक म्हणून चित्रित करतात. येशू आणि नीतिसूत्रे यांच्यातील दुसरा संबंध हा आहे की नीतिसूत्रे आपल्याला सुज्ञतेचे अमूल्य मूल्य शिकवते. नीतिसूत्रे आपल्याला चांदी व सोन्यापेक्षा सुज्ञतेला अधिक मौल्यवान मानण्याचे आवाहन करते (नीतिसूत्रे 3:14–35). वाचकांना ते सुज्ञतेचा शोध घेण्यासाठी आणि ती प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करते, कारण ते अमूल्य आहे. नवा करार आपल्याला सांगतो की येशू “देवाचे ज्ञान” आहे (1 करिंथ 1:30) आणि “त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत” (कलस्सैकर 2:3). म्हणून, नीतिसूत्रे आपल्याला सर्वात वर सुज्ञतेचा पाठपुरावा करण्याचे आवाहन करते, म्हणजेच हे पुस्तक प्रत्यक्षात आपल्याला जो स्वतः सुज्ञता आहे, त्याचा शोध आपण घ्यावा असे आव्हान करते. येशूमध्ये केवळ सुज्ञता नव्हती आणि त्याने केवळ सुज्ञता शिकवली नाही; तो स्वतः सुज्ञता आहे. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करण्यात अयशस्वी होणे हा सर्व मानवी मूर्खपणापैकी सर्वात गंभीर मूर्खपणा ठरतो.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


