
नहूम या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
16/12/2025
आमोसच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
23/12/2025ओबद्याच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
ओबद्याचे पुस्तक जुन्या करारातील सर्वांत लहान ग्रंथ असून लघुग्रंथीय संदेष्ट्यांच्या ग्रंथसमुहात दडलेले असल्यामुळे, ओबद्याची भविष्यवाणी अनेक बायबल-वाचकांच्या दृष्टीत सहजपणे दुर्लक्षित होऊ शकते आणि त्यांच्या दृष्टीने हा भाग जणू अजूनही उलगडा न झालेला प्रदेशच ठरतो. ओबद्याच्या पुस्तकाविषयीची मूलभूत तथ्ये मात्र लवकर शिकता येतात, कारण ते वाचून काढायला फक्त एक-दोन मिनिटांचा वेळ लागतो.
हा संदेष्टा एदोम राष्ट्राविरुद्ध देवाच्या न्यायनिवाड्याची घोषणा करतो (ओबद्या 1–4, 8–10). हा देश आकाराने लहान असला तरी, सुस्थिती आणि सुरक्षिततेच्या भावनेत तो असा जगत होता की त्या भावनेने पुढे घमेंडखोर अभिमानाचे स्वरूप धारण केले होते (ओबद्या 3, 12). अशा आत्मविश्वासाची दोन कारणे होती: एक म्हणजे, तो डोंगराळ देश असल्यामुळे मानवी दृष्टीने सहजपणे बचाव करता येईल असा मानला जात होता (ओबद्या 3–4). याखेरीज, एदोमला (ज्याचा उल्लेख अनेकदा त्याच्या प्रमुख नगरी तेमान या नावाने होतो) महान मानवी शहाणपणाचा धनी अशी ख्याती होती (ओबद्या 8–9; यिर्मया 49:7). दुसऱ्या शब्दांत, एदोमकडे अशी सर्व धोरणात्मक साधने होती की ज्यायोगे त्यातील रहिवासी सुरक्षितपणे राहू शकत होते. तरी प्रभू जाहीर करतो की एदोमींवर न्यायनिवाडा येईल, केवळ एवढ्यासाठी नव्हे की बाबेलच्या लोकांनी यहूदावर हल्ला केला तेव्हा (ज्याचा शेवट ख्रिस्तपूर्व 587/586 मध्ये यरुशलेमच्या नाशाने आणि निर्वासनाने झाला) त्यांनी यहूदाला मदत केली नाही; तर त्याहूनही अधिक म्हणून, पळून जाणाऱ्या यहूदी लोकांना पकडून आक्रमणकर्त्यांच्या स्वाधीन करून त्यांनी त्या आक्रमकांना सक्रिय साहाय्य केले (ओबद्या 11–14; स्तोत्रसंहिता 137:8–9; येहेज्केल 25:12; 35:5). न्यायनिवाड्याच्या या वचनांसोबतच, प्रभू ‘आपल्या लोकांना मुक्त केले जाईल आणि ते त्याच्या राजकीय सामर्थ्याद्वारे पुन्हा उठवले जातील’, अशी प्रतिज्ञाही करतो (ओबद्या 17–21).
ओबद्याच्या पुस्तकाविषयी खालील 3 गोष्टी जर आपण समजून घेतल्या, तर त्याचा संदेश आपल्याला अधिक पूर्णपणे समजून घेण्यास मदत होते.
1. ओबद्याची भविष्यवाणी ही परमेश्वराने इसहाकाला त्याच्या दोन पुत्रांविषयी—याकोब आणि एसाव—दिलेल्या त्या सार्वभौम सनातन ठरावाची, की “वडील धाकट्याची सेवा करील” (उत्पत्ति 25:23), कार्यरूप पूर्तता दाखवते.
एदोम आणि यहूदा ही राष्ट्रे अनुक्रमे एसाव आणि याकोब यांच्यापासून उद्भवलेली होती (उत्पत्ति 36:1–43; 49:1–28). जो तणावपूर्ण संबंध या दोन भावंडांमध्ये होता (उत्पत्ति 27:41–45), तोच त्यांच्या वंशातून निर्माण झालेल्या या दोन राष्ट्रांमध्येही होता (एसावपासून एदोम, आणि याकोबपासून यहूदा). अप्रामाणिक आणि कपटी असूनही, याकोबाला त्याच्या ज्येष्ठ भावाचा जन्मसिद्ध हक्क आणि आशीर्वाद प्राप्त झाला (उत्पत्ति 25:29–33; 27:1–40). त्याचप्रमाणे, त्यांच्या संघर्षपूर्ण इतिहासभर एदोमींवर वर्चस्व यहूदा राष्ट्राला देवाच्या कृपेने बहाल केले गेले (गणना 24:18–19; उदा. 1 शमुवेल 14:47; 2 शमुवेल 8:11–14; 1 राजे 22:47; 1 इतिहास 18:11). याकोब आणि इस्राएलाशी परमेश्वराने केलेला व्यवहार हेच स्पष्ट करतो की देव अयोग्य असणाऱ्यांवरच आपली विनामूल्य कृपा प्रकट करतो (मलाखी 1:1–4; रोमकरांस 9:10–16).
2. ओबद्याचे दर्शन (ओबद्या 1) देवाच्या न्यायनिवाड्याच्या कृती आणि त्याच्या तारणाच्या कृती यांना दूरदर्शकासारखे संक्षिप्त करून एकत्र उभे करते, ज्यामुळे त्या जणू समकालीन घडामोडी असल्यासारख्या दिसतात.
ओबद्या केवळ एदोमावरील न्यायनिवाड्याबद्दलच नव्हे, तर “परमेश्वराचा दिवस” (ओबद्या 15) याविषयी देखील बोलतो, जो सर्व राष्ट्रांवर न्यायनिवाडा (ओबद्या 16) आणि देवाच्या लोकांसाठी सुटका असे दोन्ही प्रसंग घेऊन येईल (ओबद्या 17). प्राथमिक दृष्ट्या, या दोन्ही घटना जणू एकाच वेळी घडणार असल्यासारख्या वाटतात. तरी, पवित्र शास्त्रातील संदेष्टे देवाच्या न्यायाच्या आणि तारणाच्या कृतींना नेहमीच एकत्र आणून मांडतात—जसे एखादा मनुष्य एक लांब दूरदर्शक आत सरकवून त्याला एका संक्षिप्त रूपात बदलतो. या प्रकारच्या मांडणीला सामान्यतः “भविष्यवाणीतील संक्षेप” किंवा “दूरदर्शकात्मक शैली” असे म्हटले जाते, आणि या तंत्राची जाणीव असल्यास वाचकाला गोंधळ टाळण्यास मदत होते. भविष्यवाणीच्या वचनांमधील या सर्वसाधारण वैशिष्ट्याची समज आल्यावर हे लक्षात येते की ओबद्याची भविष्यवाणी वेगवेगळ्या काळांत पूर्ण होत जाते. उदाहरणार्थ, एदोमचा नाश आधीच झालेला आहे; परंतु विश्वासणारे अजूनही “परमेश्वराचा दिवस” येण्याची प्रतीक्षा करत आहे, जेव्हा सर्व राष्ट्रे न्यायासाठी देवापुढे उभी केली जातील आणि मंडळीचे तारण अंतिमरीत्या पूर्णत्वास येईल.
3. ओबद्याची भविष्यवाणी नवीन करारात थेट उद्धृत केलेली नाही, पण पवित्र शास्त्र तिची विलक्षण पूर्तता येशू ख्रिस्तामध्ये दाखवते.
ओबद्याचे पुस्तक, एस्तेर आणि सपन्याह यांसारख्या जुन्या करारातील काही इतर पुस्तकांप्रमाणेच, नवीन करारात कुठेही थेट उद्धृत केलेले नाही. तरीही, पवित्र शास्त्र दाखवते की ओबद्याची भविष्यवाणी एका अनपेक्षित रीतीने पूर्ण झाली. कालांतराने एदोमींना परकीय शक्तींनी जिंकले आणि यहूदी इतिहासकार जोसेफस यांच्या मते, ते पुन्हा यहूदी शासनाखाली आले आणि ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकाच्या शेवटी जॉन हिरकॅनस (हस्मोनियन शासक आणि यहूदी महायाजक) याने त्यांना विधीनुसार सुंता करण्यास भाग पाडले (अँटीक्विटीज़./Antiquities 13:256). परिणामी, हे “आयड्युमियन” (Idumeans) म्हणून ओळखले जाऊ लागलेले लोक यहूदा लोकांमध्ये विलीन होऊ लागले. त्यांच्या पूर्वजांच्या भूमीचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा हा तोटा प्रत्यक्षात आशीर्वाद ठरला, कारण आयडूमियातील लोक मसीहा येशूचे अनुसरण करण्यासाठी आकर्षित झालेल्यांमध्ये होते (मार्क 3:8–9), आणि त्यामुळे कलस्सैकरांस 3:11 मधील हे सत्य सिद्ध झाले: “ह्यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वांत आहे.” जसे ओबद्याने घोषित केले होते, मुक्तीचा शोध सियोन डोंगरावरच झाला (ओबद्या 17)—म्हणजे, येशूवर, जो उत्तम कराराचा मध्यस्थ आहे, विश्वास ठेवणाऱ्या जिवंत देवाच्या लोकांमध्ये (इब्री 12:22–24).
ओबद्याच्या पुस्तकाबाबत जुनी म्हण खरी ठरते: चांगल्या गोष्टी बहुधा लहान रूपातच येतात.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


