
आमोसच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
23/12/2025
नीतिसूत्रेच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
30/12/2025ईयोबाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
1. ईयोब हे एका परराष्ट्रीय कुलपतीविषयीचे प्राचीन पुस्तक आहे.
पवित्र शास्त्रातील जुन्या कराराच्या अधिकृत ग्रंथसूचीत ईयोबाचे पुस्तक एस्तेर आणि स्तोत्रसंहिता यांच्या मधोमध ठेवलेले आहे. या स्थानामुळे काहीवेळा ईयोब नेमका कोण होता आणि तो कोणत्या कालखंडात होऊन गेला याबाबत चुकीचे निष्कर्ष काढले जातात.
पहिला म्हणजे हा की, बहुतेक विद्वान मान्य करतात की ईयोब इस्राएल वंशाचा नव्हता. तो कनान देशात नव्हे, तर ऊस देशात राहत होता, या वस्तुस्थितीवरून हा निष्कर्ष निघतो (ईयोब 1:1). विलापगीत 4:21 मध्ये ऊसचा उल्लेख एदोमशी जोडलेला असल्यामुळे, ईयोब एदोम देशात राहत असावा, अशी दाट शक्यता आहे. ईयोब इस्राएली नसला, तरी तो इस्राएलाच्या देवाची उपासना करीत होता आणि त्याचीच सेवा करीत होता, यात किंचितही संशय नाही. ईयोब इस्राएलाबाहेर राहत होता, ही गोष्ट कदाचित या वस्तुस्थितीची सूचक असू शकते की ईयोबाच्या पुस्तकातील शहाणपण, नीतिसूत्रांप्रमाणेच, स्वभावतः सार्वत्रिक आहे, कारण ते दुःखासारख्या मानवी संघर्षांवर भाष्य करते, जे सर्व मानवांच्या अनुभवाचा भाग आहेत.
दुसरा गैरसमज ईयोबाच्या घटनांच्या कालखंडाविषयी आहे; त्या एस्तेरच्या पुस्तकातील घटनांशी (ख्रिस्तपूर्व 486–485) जुळत नाहीत. उलट, या घटना अब्राहाम व इतर कुलपतींच्या काळाशी, म्हणजे साधारण ख्रिस्तपूर्व 2100–1800 या कालखंडाशी अधिक सुसंगत ठरतात. इतकेच नव्हे, अनेक विद्वानांच्या मते ईयोब अब्राहामी करार होण्यापूर्वीच्या काळात होऊन गेला. ईयोब हा कुलपतींच्या काळातच होऊन गेला, या युक्तिवादाला अनेक घटक आधार देतात. पहिला म्हणजे, ईयोबाच्या पुस्तकात देवासाठी वापरलेली दैवी नावे कुलपतींच्या काळातील पुस्तकांत आढळणाऱ्या नावांशी साधर्म्य दर्शवतात. दुसरा म्हणजे, ईयोबाच्या संपत्तीचे वर्णन (उदा., गुरेढोरे, दास व दासी, तसेच मौल्यवान धातूंची संख्या) हेही कुलपतींच्या काळाशी सुसंगत आहे. तिसरा, ईयोबाचे 140 वर्षांचे आयुष्य (ईयोब 42:16) हे त्या काळातील कुलपतींच्या आयुष्यमानाला अनुरूप आहे. चौथा, आणि सर्वांत ठोस असा पुरावा म्हणजे, ईयोब आपल्या कुटुंबासाठी याजकाची भूमिका बजावतो; यावरून लेवीय याजकपद अद्याप स्थापित झालेले नव्हते, असे सूचित होते (ईयोब 1:5).
2. ईयोबाचे पुस्तक आपल्याला शिकवते की देव आपल्या बुद्धीयुक्त संकल्पांनुसार नीतिमान लोकांना दुःखाच्या अनुभवातून जाऊ देतो.
अनेकदा लोकांना वाटते की ईयोबाचे पुस्तक मानवी दुःखाचे रहस्य पूर्णपणे उलगडते; पण तसे नाही. तरीसुद्धा, ईयोब इतक्या दुःखातून का गेला, हे ते आपल्याला स्पष्ट करते (जरी हे कारण स्वतः ईयोबाला कधीही माहीत होऊ देण्यात आले नाही). ईयोब इतक्या दुःखातून गेला कारण सैतानाने असा वाद मांडला की ईयोब केवळ देवाची उपासना करतो कारण देवाने त्याला आशीर्वाद दिला आहे. देवाने हे आशीर्वाद काढून घेतल्यास ईयोब देवाच्या नावाचा धिक्कार करील, असे सैतानाने भाकीत केले होते (ईयोब 1:9–11). आपल्या संपूर्ण संप्रभुतेत देव सैतानाला त्याचा हा युक्तिवाद प्रत्यक्षात तपासून पाहू देतो; आणि सैतान चुकीचा ठरतो. त्यामुळे देव आणि ईयोब दोघांचीही सत्यता सिद्ध होते. देवाची सत्यता अशी प्रकट होते की तो स्वतः जो आहे त्या कारणासाठी उपासनेस योग्य आहे; आणि ईयोबाची सत्यता अशी सिद्ध होते की तो खरोखरच सरळ, प्रामाणिक आणि देवभक्त मनुष्य आहे.
परंतु ईयोबाच्या कथेतील धडे ऊस देशात राहणाऱ्या त्या एका प्राचीन व्यक्तीपुरते मर्यादित राहू नयेत. देवाचे संप्रभुत्व, मानवी दुःख आणि वैयक्तिक नीतिमत्व यांच्यातील या रहस्यमय संबंधाचे हे वर्णन मानवी स्थितीशी निगडित व्यापक व सार्वत्रिक स्वरूपाच्या प्रश्नांना स्पर्श करते आणि चुकीच्या ईश्वरशास्त्राला सुधारणारे साधन ठरते. ईयोबाची कथा हे तत्त्व उभारून असे करते की दुःख हे नेहमी पापाशी संबंधित नसते. ईयोबाचे पुस्तक आपल्याला शिकवते की पतित जगात नीतिमान लोकही दुःख भोगतील. ईयोब 1:1 आपल्याला दाखवते की ईयोब हा सात्त्विक, सरळ आणि नीतिमान मनुष्य होता; तरीही, पुस्तकाच्या उर्वरित भागातून दिसून येते की त्याने फार मोठे दुःख भोगले.
दुःख सहन करणाऱ्या एका नीतिमान मनुष्याचे उदाहरण आपल्यासमोर ठेवून, ईयोबाचे पुस्तक ज्याला “प्रतिफळाचे ईश्वरशास्त्र” म्हणून ओळखले जाते या विचारसरणीवरील एक उपयुक्त सुधार आपल्याला पुरवते. “प्रतिफळाचे ईश्वरशास्त्र” असे मानते की लोक त्यांच्या अधार्मिक कृत्यांचे प्रतिफळ म्हणून दुःख भोगतात आणि त्यांच्या नीतिमान कृत्यांचे प्रतिफळ म्हणून त्यांना चांगले प्रतिफळ मिळते. ईयोबाच्या मित्रांनी या चुकीच्या ईश्वरशास्त्राचा स्वीकार केला होता, आणि आपण आधुनिक विश्वासणारेही त्याच मोहात पडू शकतो. परंतु ईयोबाचे पुस्तक अशा विचारसरणीतील असत्यता उघड करून आपल्याला आठवण करून देते की देव त्याची बुद्धी व सत्संकल्पानुसार नीतिमान लोकांना दुःख सहन होऊ देतो, जरी त्या हेतूंचे तपशील असे दुःख सहन करणाऱ्यांना अनेकदा प्रकट केले जात नाहीत.
3. ईयोब येशू ख्रिस्ताच्या तारणकार्याचे पूर्वरूप आहे.
ईयोबाचे पुस्तक येशू ख्रिस्ताच्या कार्याकडे आपले लक्ष वेधण्याचा एक मार्ग हा की, ईयोब आपणासाठी देवापुढे कोणीतरी मध्यस्थ असावा अशी प्रखर तळमळ व्यक्त करतो. कथा जसजशी उलगडत जाते, तसतसे ईयोब देवाला प्रश्न विचारू लागतो आणि एका टप्प्यावर हताश होऊन देवासमोर आपले प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्यस्थासाठी तो आरोळी मारतो (ईयोब 9:32–35). अर्थात, नवा करार आपल्याला प्रकट करतो की देवाने येशू ख्रिस्ताच्या रूपात असा मध्यस्थ पुरवला आहे (1 तीमथ्य 2:5–6).
परंतु ईयोबाचे पुस्तक ख्रिस्ताच्या तारणकार्याचे पूर्वरूप दाखवण्याचा मुख्य मार्ग म्हणजे हा की ते आपल्याला पुढील सत्य शिकवते: देवाचे बुद्धीयुक्त हेतू पूर्ण व्हावेत यासाठी एखाद्या नीतिमान मनुष्याला मोठे दुःख भोगावे लागू शकते. आपण निरीक्षण केल्याप्रमाणे, देव आणि ईयोब दोघांचीही नीतिमत्ता सिद्ध व्हावी म्हणून त्या नीतिमान ईयोबाला दुःखातून जाऊ देण्यात आले. तसेच, प्रत्येक बाबतीत पूर्णपणे नीतिमान असलेल्या येशूला देवाच्या तारणयोजनेच्या बुद्धीयुक्त हेतूंची पूर्तता करण्यासाठी आणि त्याच्या लोकांचे तारण पूर्ण खातरीने मिळविण्यासाठी देवाचा कोप सहन करणे भाग पडले. ईयोबाची कथा वधस्तंभाच्या कथेची पूर्वछटा ठरते, आणि दुःखाचा खरा अर्थ व महत्त्व आपल्याला वधस्तंभाच्या या कथेतच सापडतो.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


