3 Things You Should Know about 1, 2, 3, John
योहानाचे  1, 2 आणि 3 पत्र यांविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
01/01/2026
3 Things You Should Know about Jude
यहूदाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
08/01/2026
3 Things You Should Know about 1, 2, 3, John
योहानाचे  1, 2 आणि 3 पत्र यांविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
01/01/2026
3 Things You Should Know about Jude
यहूदाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
08/01/2026

हबक्कूकविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

3 Things You Should Know about Habakkuk

देवाचा मान उंचावणाऱ्या न्यायासाठी हबक्कूकच्या अंतःकरणातील खोल तळमळ आणि तो न्याय दिसून येत नसल्यामुळे उमटणारी त्याची प्रखर विरोधी प्रतिक्रिया यांमुळे हे पुस्तक आजच्या वाचकांसाठी फारच प्रासंगिक ठरते. जगभरातून येणाऱ्या त्रासदायक बातम्या व दृश्यांनी आपण वेढलेलो असताना, जर आपण या समस्येकडे सुवार्तेच्या प्रकाशात पाहिले नाही, तर तिची प्रचंडता आपल्याला सहजपणे भारावून टाकू शकते. शिवाय, स्वतःच्या नैतिक उणिवांची आणि आपल्या देशबांधवांच्या नैतिक दुष्काळाची हबक्कूकला असलेली जाणीव हे दाखवते की पापाची समस्या मानवी स्वभावात खोलवर रुजलेली आहे आणि त्यामुळे त्यात आपणा सर्वांचा समावेश होतो. तरीही, यहूदामधील आणि त्याच्या सीमेपलीकडील परिस्थिती अत्यंत गंभीर असतानासुद्धा, संदेष्ट्याच्या हताश प्रार्थनांना देवाने दिलेली उत्तरे त्याला शंका आणि नैराश्याच्या अवस्थेतून ठाम विश्वास आणि आनंदाच्या अवस्थेत आणून उभी करतात—तेही यहूदामध्ये किंवा परदेशात प्रत्यक्ष काहीही बदल घडण्याच्या खूप आधी.

या लहानशा ग्रंथातील तीन घटक पुढील दोन गोष्टींमुळे विशेषत्वाने लक्षणीय ठरतात : एक म्हणजे त्यांनी संदेष्ट्याच्या आध्यात्मिक दृष्टीकोनाला नव्या दिशेने वळवण्यासाठी केलेले योगदान, आणि दुसरे म्हणजे ख्रिस्तपूर्व सातव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्राचीन निकट पूर्व जितके अस्थिर आणि आत्मघातकी वाटत होते, तितकेच अस्थिर व आत्मघातकी जाणवणाऱ्या वर्तमान जगात आपल्या वृत्ती, कृती आणि अपेक्षा यांना दिशा देण्याचे त्यांच्यात असलेले सामर्थ्य.

1. यहूदातील अन्यायाच्या बाबतीत देव उदासीन नाही.

हे सत्य पुस्तकाच्या सुरुवातीला हबक्कूक जणू गृहीत धरत असलेल्या गोष्टीचे थेट खंडन करते. तो देवावर अन्याय करीत असल्याचा उघड उघड आरोप करत नाही; परंतु देवाने काहीही केले नाही, तर शेवटी असा निष्कर्ष अपरिहार्य ठरेल असे त्याला वाटते (हबक्कूक 1:2–4). संदेष्ट्याला देवाचे उत्तर संयमी आणि शिक्षणात्मक आहे. पापी यहूदावर न्यायनिवाडा आणण्याचा देवाचा निर्धार (जो हबक्कूकची प्रारंभीची चिंता होती) हे दाखवतो की आपल्या लोकांबरोबर केलेली देवाची करारबद्ध बांधिलकी त्यांना पापाच्या परिणामांपासून अभेद्य बनविण्याची हमी देत नाही. देव अन्यायाबद्दल उदासीन नाही. परंतु जेव्हा देव संदेष्ट्याला हे उघड करतो की तो यहूदाला शासन करण्यासाठी बाबेलचा उपयोग करणार आहे, तेव्हा हबक्कूक पुन्हा भ्रमात पडतो. यहूदा बाबेलपेक्षा “अधिक नीतिमान” आहे असे गृहीत धरून (हबक्कूक 1:13), तो या निष्कर्षावर येतो की देवाने जर अशी गोष्ट होऊ दिली, तर ते देखील दुष्कृत्याला मान्यता देण्यासारखेच ठरेल (हबक्कूक 1:13).

2. बाबेलमधील अन्यायाबद्दलही देव उदासीन नाही.

हबक्कूकच्या या आक्षेपावर दुसऱ्या अध्यायात दिलेले परमेश्वराचे विस्तृत उत्तर हे दाखवते की बाबेल यहूदावर हल्ला करण्यापूर्वीच परमेश्वराला त्यांच्या अपराधाची पूर्ण जाणीव होती. परमेश्वर येथे बाबेलच्या साम्राज्याला चालना देणाऱ्या खोल अभिमानाचा, हिंसेचा आणि आत्मगौरवाने पछाडलेल्या वृत्तीचा, ज्यामुळे हे साम्राज्य प्राचीन निकट पूर्वेत शक्य तितक्या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मागे लागले होते, तपशीलवार पर्दाफाश करतो. हबक्कूक 2:5 मध्ये याचा सारांश असा केला आहे की हे साम्राज्य स्वतःचे वैभव वाढवण्यासाठी इतर राष्ट्रांची क्रूरपणे लूटमार माजवली होती (हबक्कूक 2:6–13) आणि इतर राष्ट्रांकडून हवे ते मिळवण्यासाठी आपल्या हाती असलेल्या सर्व साधनांचा वापर करीत होते (हबक्कूक 2:15–17), आणि हे सर्व करत असताना आपल्या यशाचे श्रेय ते खोट्या देवांना देत होते (हबक्कूक 2:18–19). 

बाबेलच्या जागतिक वर्चस्वाच्या महत्त्वाकांक्षी धडपडीच्या विरोधात परमेश्वर असे जाहीर करतो की त्या साम्राज्यावर थरारक असा योग्य न्याय आता कोसळणार आहे. परंतु परमेश्वराचा हा हस्तक्षेप केवळ बाबेलच्या पापांची परतफेड करून थांबणार नाही—ज्यामुळे हबक्कूकची दुसरी चिंता दूर होते—तर त्यापेक्षा कितीतरी अधिक घडवून आणणार आहे. परमेश्वर अशी प्रतिज्ञा करतो की तो आपल्या तारणकारी राज्याची स्थापना संपूर्ण जगभर करील, जेणेकरून संपूर्ण पृथ्वी त्याच्या ज्ञानाने भरून जाईल (हबक्कूक 2:14). यामुळेच हबक्कूकला दिलेल्या परमेश्वराच्या उत्तराचा तिसरा घटक समोर येतो.

3. देवावरील विश्वासातून शांती प्राप्त होते आणि तो विश्वास जीवनाकडे घेऊन जातो. 

तिसऱ्या अध्यायात, विशेषतः हबक्कूक 2:14 मधील प्रतिज्ञेचा उलगडा करून परमेश्वर दाखवतो की त्याचा परिपूर्ण न्याय आणि त्याची विस्मयकारक कृपा पाप्यांना शिक्षा करील आणि पापाचा एकदाचा नायनाट करील (हबक्कूक 3:3–15); परंतु त्याआधीच परमेश्वराणे दिलेली पूर्ण न्याय आणि तारण यांची प्रतिज्ञा संदेष्ट्याच्या अंत:करणाला नव्या दिशेने वळवू लागली होती (हबक्कूक 3:2). ही नव्याने घडणारी अंत:करणाची पुनर्रचना पुढे येणाऱ्या त्या धाडसी दर्शनाने पूर्णत्वास जाते, जेव्हा देव आपल्या लोकांना तारण्यासाठी व दंड देण्यासाठी प्रकट होतो.

देव पापाचा पूर्ण न्याय करील आणि आपल्या लोकांचे पूर्ण तारण सिद्धीस आणील या संदेशाचे दोन परिणाम हबक्कूक आणि त्याच्या वाचकांसाठी विशेषतः महत्त्वाचे ठरतात. पहिला म्हणजे, ही सत्यता हबक्कूकच्या अंत:करणाच्या मुळापर्यंत पोहोचते आणि त्याच्या दृष्टिकोनात संपूर्ण परिवर्तन घडवते. त्याची चिडचिड आणि शंका नाहीशा होतात, आणि त्यांच्या जागी अशी शांत, स्थिर खातरी येते की जी देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवते आणि विश्वासाच्या डोळ्यांनी संपूर्ण सृष्टीचे शुद्धीकरण आणि परिपूर्णता होताना पाहते. या नव्या आंतरिक मनस्थितीत हा संदेष्टा देवाने आपल्या सार्वभौम इच्छेनुसार ठरवलेल्या वेळी आणि त्याने निश्चित केलेल्या मार्गांनी आपली करारवचने पूर्ण करावी, याची धीराने प्रतीक्षा करू शकतो.

दुसरे म्हणजे, आपल्या कृपामय प्रतिज्ञांवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी देव जो तारणकर्ता आणि मुक्तिदायक असा जो न्याय सिद्धीस नेणार आहे (हबक्कूक 2:4), तो अखेरीस जीवनाकडे नेणारा ठरतो. अध्याय 3 मधील उन्नत आणि प्रभावशाली भाषा देवाच्या तारणकारी हस्तक्षेपाचे चित्रण दुसऱ्या निर्गमाप्रमाणे करते—ज्यामध्ये देवाचे लोक बाबेलच्या पंजातून इतके नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या पापामुळे आलेल्या दोषारोपणातून आणि गुलामगिरीतून मुक्त होतात. हे सर्व फक्त मसीहा, म्हणजे ख्रिस्त येशूद्वारेच शक्य आहे (हबक्कूक 3:13), ज्याला देवाने आपल्या लोकांच्या वतीने दु:ख सोसण्यासाठी पाठविले आणि ज्याला त्याने मृत्यूपासून उठवून गौरवाने उंचावले (प्रेषितांची कृत्ये 17:3).

हबक्कूकचा संदेश संदेष्ट्याला अत्यंत व्याकुळ करणाऱ्या पापाच्या समस्येला दिलेले एक निर्णायक उत्तर आहे. येशू ख्रिस्ताचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान या तिन्ही गोष्टी देवाच्या दुष्टावरच्या अंतिम विजयाची निश्चितता आणि त्याच्या मसीहाद्वारे तारणाची शक्यता या दोन्ही गोष्टी उघड करतात. या सत्यांच्या प्रकाशात देव न्याय रोखून धरतो, त्या त्याच्या धीराचे उत्सवपूर्वक स्मरण करू शकतो आणि तो परत येईपर्यंत पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्ता पोहोचवण्यासाठी आपले पूर्ण सामर्थ्य लावू शकतो (2 पेत्र 3:9).

हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

डॅनियल सी. टिम्मर
डॅनियल सी. टिम्मर
डॉ. डॅनियल सी. टिम्मर हे ग्रँड रॅपिड्स, मिशिगन येथील प्युरिटन रिफॉर्म्ड थियोलॉजिकल सेमिनरी येथे बायबल अभ्यासाचे प्रोफेसर आणि पीएच.डी. पदवी-अभ्यासक्रमाचे संचालक आहेत. ते क्वेबेकच्या रिफॉर्म्ड चर्चमधील एक प्रशासकीय वडील आहेत आणि मॉन्ट्रियलमधील फॅकुल्टे दे थिओलॉजी एव्हांजेलिक येथे सेवा करतात. ते एक्सेगेटिकल कॉमेन्टरी ऑन द ओल्ड टेस्टामेंट' मालिकेतील 'नहूम' यासह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.