
ओबद्याच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
18/12/2025
ईयोबाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
25/12/2025आमोसच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
काही संदेष्ट्यांविषयी आपल्याकडे फारच अल्प माहिती आहे; पण आमोसचे पुस्तक, त्याच्या समकालीन यशया संदेष्ट्याप्रमाणे, वेगळ्या प्रकारचे आहे. आमोस आपल्या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच सांगतो की तो तकोआ येथील होता आणि त्याचे सेवाकार्य उत्तरी इस्राएल राज्याला उद्देशून होते. तो असे नमूद करतो की हा संदेश भूकंप होण्याच्या दोन वर्षे आधी दिला गेला, त्या काळी यहूदामध्ये उज्जिया हा यहूदाचा राजा होता आणि इस्राएलमध्ये यराबाम राजसत्तेवर होता (आमोस 1:1). यावरून हे पुस्तक साधारण ख्रिस्तपूर्व 760 च्या आसपासचे मानले जाते, जरी त्या भूकंपाची नेमकी तारीख ठामपणे निश्चित करण्याचा आपल्याजवळ कोणताही मार्ग नाही. या पुस्तकातून आपण शिकल्या पाहिजेत अशा तीन विशेष गोष्टी आहेत.
1. संदेष्टा हा देवाकडून पाचारण प्राप्त असलेला होणे आवश्यक होते.
आमोस स्वतः इस्राएलचा नव्हता, तर दक्षिणेकडील राष्ट्र यहूदाचा रहिवासी होता. बेथेलचा याजक अमस्याह याने त्याला असा संदेश दिला होता: ““अरे द्रष्ट्या, जा, यहूदा देशात पळून जा; तेथे संदेश सांगून पोट भर” (आमोस 7:10–13). देवाने त्याला आपला संदेश घेऊन उत्तरेकडील इस्राएल राज्याकडे जाऊन तो तेथे घोषित करण्याचा आदेश दिला त्या आधी, आमोस एक शेतकरी म्हणूनच जीवन जगत होता.
संदेष्टा असणे हे व्यक्तीच्या कुलपरंपरेवर किंवा धर्माला पेशा बनवून जगणाऱ्या धार्मिक वर्गाच्या कोणत्याही संघाचा तो सदस्य आहे की नाही, यावर अवलंबून नव्हते; उलट, देवाचा प्रवक्ता म्हणून सेवा करण्यास जे देवाचे सार्वभौम पाचारण प्राप्त होते त्यावर ते आधारलेले असायचे. काळाच्या गरजेनुसार देवच संदेष्टे उभे करीत असे, आणि त्यांच्या श्रोत्यांसमोर त्यांना जी जाहीर करावी लागत असे ती वचने त्यांच्या तोंडी तोच देत होता. देव कोणतीही कृती करण्यापूर्वी, दैवीरीत्या निवडलेल्या दूतांना त्याचे वचन सोपविले जात असे. देवाचे गुप्त संकल्प आणि मसलती त्याचे सेवक, म्हणजे संदेष्टे, यांच्या द्वारे कळविले जात असे.
2. संदेष्ट्यांची भूमिका ही देवाने इस्राएलाबरोबर केलेल्या कराराच्या संदर्भात असायची.
संदेष्ट्यांची भूमिका ही होती, की त्यांनी देवाचे वचन घोषित करून आणि त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास लोकांना प्रोत्साहित करून देव आणि त्याचे करारबद्ध लोक यांच्यात मध्यस्थी करणे. ते राज्याचे राखणदार होते—राजे आणि इतर पुढारी यांच्या कृतींसाठी त्यांना देवापुढे जबाबदार धरण्याचा ते प्रयत्न करीत. देवाने आपल्या लोकांशी जो विशेष करारसंबंध स्थापिला होता, तो अखंड राखला जावा, यासाठी समर्पित, कराराची अंमलबजावणी करणारे मध्यस्थ म्हणून त्यांना पाहिले जाऊ शकते.
या करारामुळे इस्राएलाच्या संततीचे देवाबरोबर एक असे नाते होते ज्यामध्ये त्यांना अद्वितीय विशेषाधिकार प्राप्त होते. आमोसच्या पुस्तकातील सुरुवातीचे संदेश इस्राएलच्या सभोवतालच्या विविध राष्ट्रांना उद्देशून आहेत (अराम, गज्जा, सोर, एदोम, अम्मोन, मोआब आणि यहूदा; आमोस 1:1–2:16 पाहा). त्यानंतर, संदेष्टा जेव्हा शेवटी इस्राएलाला थेट संबोधित करतो, तेव्हा तो त्या पापी राष्ट्रापर्यंत परमेश्वराचा हा संदेश पोचवतो: “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून मी फक्त तुझीच निवड केली आहे” (आमोस 3:2). हिब्रू मजकूर या वाक्याला देव आणि त्याच्या लोकांतील विशिष्ट नात्याचे ठळक विधान बनवतो: “फक्त तुझीच . . .” इस्राएलला निवडले गेले, त्यांच्या संख्येच्या मोठेपणामुळे किंवा गुणांच्या श्रेष्ठतेमुळे नव्हे, तर केवळ देवाने तिच्यावर प्रेम केले म्हणून (अनुवाद 7:7).
परंतु त्या अद्वितीय नात्याबरोबर अद्वितीय जबाबदाऱ्याही आल्या होत्या. विशेषाधिकाराच्या स्थानासाठी झालेली निवड म्हणजे जबाबदारीसाठी झालेली निवड हे त्यांना ओळखावे लागणार होते. इस्राएलाला कधीही स्वयंचलित आशीर्वाद प्राप्त होणार नव्हता; उलट, त्यांच्या अधर्मांसाठीची शिक्षा टाळू न शकल्यामुळे ते दैवी न्यायनिवाड्याच्या धोक्यात उभे होते (आमोस 3:2). पवित्र शास्त्राचा सिद्धांत असा आहे की न्यायनिवाडा देवाच्या घराण्यापासूनच सुरू होतो (1 पेत्र 4:17). आमोस आपल्याला शिकवतो की करारामुळे मिळालेला विशेषाधिकार देवाच्या आज्ञांचे पालन करण्याच्या मागण्यांपासून कधीही वेगळा केला जाऊ शकत नाही.
3. आमोसचा अंतकाळविषयक दृष्टिकोन अनेक पैलूंनी समृद्ध आहे.
जवळजवळ नेहमीच संदेष्ट्यांचा संदेश भविष्यातील परिणामांशी संबंधित असतो. लोकांनी परमेश्वराचा येणारा दिवस तेज आणि प्रकाशाने भरलेला असा दिवस म्हणून रंगवला होता; त्यांच्या हे लक्षात आले नव्हते की तो “परमेश्वराचा दिवस अंधकारमय असणार, प्रकाशमय नसणार, तो अगदी काळोखाचा असणार; त्यात मुळीच चमक नसणार” (आमोस 5:20). त्यांना हे शिकावे लागले की आनंदोत्सवाचे सण आणि अर्पणांची मिरवणूक करून रुष्ट देवाला शांत करता येणार नाही. त्यांच्या पापांमुळे—ज्यात मूर्तीपूजाही समाविष्ट होती—शेवटी त्यांना दिमिष्काच्या पलीकडे हद्दपार केले जाईल (आमोस 5:26–27). इस्राएलचे वचनदत्त प्रदेशातून निघून जाणे हे देखील देवाचेच आणखी एक सार्वभौम कृत्य ठरणार होते (“आणि मी तुम्हांला पाठवीन . . .”).
परंतु ‘शेवट व अंतकाळविषयक’ असलेल्या या दृष्टिकोनाचे आणखी दोन पैलू आहेत, जे फारच अधिक सकारात्मक चित्र आपल्या समोर उभे करतात. यांपैकी पहिला पैलू दाविदाच्या “पडलेल्या तंबू” विषयीच्या उताऱ्याशी संबंधित आहे (आमोस 9:11–12). दाविदाचे घराणे इस्राएल आणि यहूदा यांच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान व्यापून होते. आमोसच्या चित्रणात ते घराणे जीर्ण, पडझड झालेल्या अवस्थेत दिसते; परंतु पुनर्स्थापनाद्वारे ती अवस्था शेवटी बदलून जाईल आणि त्याचे फलित म्हणून परराष्ट्रीयांचा समावेश घडून येईल. यरुशलेममधील सभेत याकोबाने या उताऱ्याचा ज्या रीतीने उपयोग केला, तो या अर्थाला पुष्टी देतो (प्रेषितांची कृत्ये 15:16–17). नवा करारातील मंडळीत परराष्ट्रीयांचा समावेश होणे हे आमोसच्या सेवाकार्यातून व्यक्त झालेल्या देवाच्या हेतूची पूर्तता होय.
आशेचा अंतिम घटक हा आहे की देव त्याच्या लोकांना एका नवीन एदेनात स्थापित करेल. इस्राएलच्या पापांनंतरही देवाने त्यांना पूर्णतः नाकारणे टाळले, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तो आपल्या लोकांची भरभराट पुन्हा प्रस्थापित करील—आणि ही कृती बहुधा त्या अंतकाळीन घटनेला सूचित करते, जेव्हा देवाचे विखुरलेले लोक त्याच्या सार्वकालिक राज्यात एकत्र केले जातील. या भविष्यवाणीतील अंतिम वचने या करारसंबंधाची जणू पुन्हा एकदा नव्याने पुष्टीकरण करतात; कारण कराराचा प्रभू (येथे देवाच्या कराराचे नाव, म्हणजे याव्हे वापरले आहे, हे लक्षात घ्या) हा त्यांचा देव म्हणूनच कायम राहतो आणि त्यांच्या संदर्भात आपला हेतू तो नक्की पूर्ण करील (आमोस 9:11–15).
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


