
कलस्सैकरांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा ३ गोष्टी
09/12/2025
नहूम या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
16/12/2025पेत्राचे दुसरे पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
1. प्रेषित पेत्र खोटे उपदेश आणि त्यातून उद्भवणारी अभक्ती या धोक्यांविषयी मंडळ्यांना ताकीद देतो.
पेत्र या खोट्या शिक्षकांची नावे घेत नाही, परंतु 2 पेत्र 2:1–3 मधील त्याच्या विधानांवरून हे स्पष्ट होते की हे लोक एकेकाळी ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे होते, पण त्यानंतर ते विश्वासापासून बहकून माघारी गेले. पेत्र त्यांचे वर्णन या शब्दांत करतो : की ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणणारे, ज्या प्रभूने “त्यांना विकत घेतले” असे ते म्हणतात, त्यालाही नाकारणारे, आणि ज्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण करणारे पुष्कळ लोक प्रभूची थट्टा करीत मोठ्या संख्येने त्यांच्या मागे लागतात. खोटे सिद्धांत अपरिहार्यपणे पापमय आचरणाकडे घेऊन जातात. त्यांच्या धर्मत्यागामुळे त्यांच्या विषयी देवाचा न्याय निश्चित आहे.
पेत्राने दिलेल्या अनेक संकेतांवरून हे लक्षात येते की हे लोक नियमशास्त्र-विरोधी (antinomian) वर्तन योग्य ठरवण्यासाठी पौलाच्या पत्रांचा विपरीत अर्थ लावत होते. 2 पेत्र 2:19 मध्ये पेत्र लिहितो, “ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत.” पुढे प्रेषित 2 पेत्र 3:15–16 मध्ये असे म्हणतो की पौलाच्या पत्रांमध्ये “समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात; अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.” यावरून स्पष्ट दिसते की पौलाच्या पत्रांतील मजकूराचा प्रेषितांच्या काळातसुद्धा विपर्यास केला जात होता, जसा की आजही केला जातो.
2. पेत्र आपल्या वाचकांबद्दल बोलतो की त्यांना विश्वासाद्वारे देवापुढे नीतिमत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
पेत्र लिहितो, “आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना” (2 पेत्र 1:1). असे स्थान देणारा विश्वास हा देवाची देणगी आहे, जी येशू ख्रिस्ताद्वारे दिली जाते, जो देवाच्या नीतिमत्वाचा उगम आहे, आणि म्हणून तो मनुष्याने कमावलेला नसून प्राप्त झालेला आहे (इफिसकरांस 2:8–9). ज्यांना असा विश्वास देण्यात आला आहे, ते सर्व “आमच्या” (म्हणजे प्रेषितांच्या) सारख्याच विश्वासाचे मानले जातात. विश्वासणाऱ्यांना देवापुढील हे नीतिमत्वाचे स्थान विश्वास या साधनाद्वारे, आणि येशू ख्रिस्तामुळे प्राप्त होते, आणि पेत्र आपल्याला सांगतो की हाच ख्रिस्त देव आहे.
नीतिमत्वाचे हे स्थान 2 पेत्रच्या उरलेल्या भागामध्ये अनीतिमानांच्या—म्हणजे खोट्या शिक्षकांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या तीव्र विरोधात दाखविलेले आहे. त्यांनी एकेकाळी नीतिमत्वाचा मार्ग ओळखला होता आणि पेत्र व इतर प्रेषितांनी गाजवलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवत असल्याचा दावा केला होता, पण नंतर ते त्या मार्गापासून दूर गेले. पेत्र लिहितो की त्यांनी सत्याचा मार्ग कधीच ओळखला नसता, तर तेच त्यांच्यासाठी अधिक बरे ठरले असते (2 पेत्र 2:21); आणि तो या खोट्या शिक्षकांची तुलना जुन्या करारातील पवित्र पुरुष नोहा याच्याशी करतो, ज्याला तो “नीतिमत्त्वाचा उपदेशक” म्हणतो (2 पेत्र 2:5). विश्वासाची देणगी प्राप्त करणे हे नीतिमानांना त्या लोकांपासून वेगळे करते, जे सत्यापासून माघार घेतल्यामुळे अपरिहार्यपणे देवाच्या न्यायापुढे उभे राहतील —एक इतकी गंभीर गोष्ट की पेत्र या पत्राच्या पूर्ण दुसऱ्या अध्यायात याच विषयावर लक्ष केंद्रित करतो.
3. खोटे शिक्षक येशूच्या दुसऱ्या येण्याचा नकार करतात, अशी माहिती पेत्र आपल्याला देतो.
पेत्राने आधीच रूपांतराच्या पर्वतावर आपण प्रभूसोबत होतो या त्याच्या अनुभवाचे वर्णन केले आहे (2 पेत्र 1:16–21), जिथे त्याने प्रभुच्या तेजाचे दर्शन घेतले. हाच अनुभव प्रभुच्या वचनांविषयी पेत्राच्या दृढ विश्वासाचा पाया बनतो.
2 पेत्र 3:3–7 मध्ये पेत्र आपल्या वाचकांना ताकीद देत असे म्हणतो:
“प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील, “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.’”
पेत्र पुढे दाखवून देतो की पूर्वीचे जग (नोहाच्या दिवसांतले) “पाण्याने बुडून नाश पावले.” परंतु त्याच वचनाद्वारे जे आकाश आणि पृथ्वी आता अस्तित्वात आहेत, ती अग्नीसाठी राखून ठेवलेली आहेत आणि न्यायदंड व दुर्जनांच्या नाशाच्या दिवसापर्यंत सुरक्षित ठेवलेली आहेत.
आपल्या प्रभूच्या परत येण्याबद्दलचा गोंधळ आरंभीच्या मंडळीत सामान्य होता (पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या दोन पत्रांमध्ये शेवटल्या काळाबद्दल दिलेली प्रश्नोत्तरे स्मरण करा), आणि तो गोंधळ आज आपल्या काळातही तितकाच आहे. पवित्र शास्त्रातील भविष्यवाणीचे काही भाष्यकार येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी इतके मनमानी आणि बेजबाबदार अंदाज लावत आले आहेत की ख्रिस्तीतर लोक येशू मेलेल्यांना उठवण्यासाठी, जगाचा न्याय करण्यासाठी आणि सर्वकाही नवीन करण्यासाठी परत येणार आहे या पवित्र शास्त्राच्या शिकवणीकडे आता काहीही लक्ष देत नाहीत.
आपल्या ऐकणाऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी, पेत्र त्यांना आठवण करून देतो:
“कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील” (2 पेत्र 3:9–10).म्हणून पेत्र असे म्हणतो, की एकीकडे थट्टा करणाऱ्यांना ताकीद दिली जावी, तर दुसरीकडे देवाच्या लोकांनी पुढे येणाऱ्या गौरवाची आशा दृढ धरून ठेवावी, कारण “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे ‘नवे आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.” (2 पेत्र 3:13).
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


