3 Things You Should Know about Proverbs
नीतिसूत्रेच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
30/12/2025
3 Things You Should Know about Habakkuk
हबक्कूकविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
06/01/2026
3 Things You Should Know about Proverbs
नीतिसूत्रेच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
30/12/2025
3 Things You Should Know about Habakkuk
हबक्कूकविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
06/01/2026

योहानाचे  1, 2 आणि 3 पत्र यांविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

3 Things You Should Know about 1, 2, 3, John

पवित्र शास्त्र हे लपवलेल्या रत्नांनी भरलेले आहे. यांपैकी बरीच रत्ने पवित्र शास्त्रातील लहान ग्रंथांमध्ये दडलेली आहेत. देवाच्या वचनाचे वाचन गांभीर्याने घेणारे अनेक ख्रिस्ती लोक पवित्र शास्त्राच्या “मोठ्या ग्रंथांशी” (जसे की, उत्पत्ति, स्तोत्रसंहिता, यशया, योहानाचे शुभवर्तमान, रोमकरांस पत्र आणि इफिसकरांस पत्र) बर्‍यापैकी परिचित असतात. पण योएल, हग्गय, सफन्या आणि योहानाची तीन पत्रे यांसारख्या लघु ग्रंथांशी मात्र फारसे लोक इतके जवळून सुपरिचित नसावेत, अशी माझी कल्पना आहे. या संक्षिप्त चिंतनात आपण योहानाच्या तीनही पत्रांविषयी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टींवर मनन करणार आहोत.

या संक्षिप्त चिंतनात आपण योहानाच्या तीनही पत्रांविषयी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टींवर मनन करणार आहोत. 

1. हे ग्रंथ जरी लहान असले तरी, ते ख्रिस्ती व्यक्तीच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि परिपक्वतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. 

चाळीस वर्षांच्या पाळकीय सेवेनंतर, मला हे उमगले आहे की आजचे ख्रिस्ती लोक पूर्वीच्या पिढ्यांइतके पवित्र शास्त्राशी परिचित आहेत, असे गृहीत धरता येत नाही. पवित्र शास्त्र-वाचनाची सवय आणि पवित्र शास्त्राचे उलगडात्मक उपदेश पूर्वीइतके सामान्य राहिलेले नाहीत. आजच्या युगाच्या आत्म्यामुळे अगदी विश्वासणारे म्हणून ओळख असलेल्या लोकांचीही सर्वसाधारण लक्ष टिकवून ठेवण्याची क्षमता दूषित झाली आहे. संस्कृतीच्या मध्यभागी सुसंगत पद्धतीने सेवा करण्याची चांगली इच्छा, अनेकदा अशा उपदेशांकडे घेऊन गेली आहे की जे उलगडात्मक उपदेशापेक्षा विषयाधारित जास्त असतात. या सर्वांमुळे विश्वासणारे देवाच्या वचनाच्या त्या ज्ञानापासून वंचित राहिले आहेत, जे पवित्र शास्त्राच्या संपूर्ण साक्षीसारखेच व्यापक आणि खोल आहे.

पौल तीमथ्याला आठवण करून देतो: “ ‘प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे, ‘;ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (2 तीमथ्य 3:16–17). पौल विशेषतः देवाच्या या तरुण सेवकावर हे सत्य बिंबवत होता, की त्याने देवाचे लिखित वचन त्याच्या संपूर्णतेमध्ये आत्मसात करावे. आणि त्याद्वारे आपल्या जीवनाला व सेवेला सार्थक रूप घडवू द्यावे. तीमथ्याच्या बाबतीत जी गोष्ट खरी होती, तीच गोष्ट प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या बाबतीतही तितकीच खरी आहे.

म्हणूनच, आपल्याला 1, 2, 3 योहान ही पत्रे जाणून घेतलीच पाहिजेत, जेणेकरून आपल्याला नीतिशिक्षणात पारंगत केले जाईल आणि आपण प्रत्येक चांगल्या कार्यासाठी सुसज्ज व परिपूर्ण असे ख्रिस्ती बनू.

2. योहानाची ही तीन संक्षिप्त पत्रे मंडळीच्या शुद्धतेला, शांतीला आणि कार्याला धोक्यात टाकणाऱ्या पाखंडी मतांच्या अंधाऱ्या पार्श्वभूमीवर लिहिली गेली.

ही पाखंडी मते योहानाच्या काळात काही नवीन नव्हती. ख्रिस्ताची मंडळी मार्गभ्रष्ट व्हावी, ती स्वतःमध्ये विलीन करून घ्यावी आणि तिची सुवार्तेवरील विश्वासार्हता हिरावून घ्यावी, या हेतूपूर्तीसाठी सैतान ही मते वेळोवेळी पुन्हा जिवंत करीत राहतो. आपले पहिले पत्र सुरू करताना योहान लिहितो:

जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हांला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही.त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही; पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही.जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. (1 योहान 1:5-10)

“जर आपण म्हणतो…” (1 योहान 1:6, 8, 10) या त्रिस्वरी रचनेकडे  लक्ष द्या. योहानाला असे लिहिण्याची गरज का भासली? कारण मंडळीतील काही लोक देवाबरोबर आपली सहभागिता आहे असे म्हणत होते, पण प्रत्यक्षात ते अंधारात चालत होते. पुढे 1 योहान 2:19 मध्ये योहान लिहितो, “ते आमच्यातून निघून गेले, पण ते आमचे नव्हते.” एक विश्वासू पाळक म्हणून योहान आपल्या “प्रिय मुलांना” (जसे तो त्यांना संबोधतो) खोट्या शिकवणीपासून सावध राहण्याची चेतावणी देतो: “देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही” (1 योहान 1:5; तसेच 1 योहान 2:22; 4:1–3 पाहा).

2 आणि 3 योहान या पत्रांत आपण या प्रेषिताची, आपल्या प्रिय मुलांना खोट्या शिक्षणापासून दूर राखण्याची आणखी तीव्र चिंता पाहतो. 2 योहान 7 मध्ये आपण वाचतो: “कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असाच आहे.” 3 योहान 9 मध्ये योहान आपल्या प्रिय मुलांना एका विशिष्ट व्यक्तीबद्दलही चेतावणी देतो, “दीयात्रफेस … ज्याला स्वतःला प्रथम स्थान द्यायला आवडते.” देवाच्या लोकांचे जीवन भ्रष्ट करण्याच्या बाबतीत चुकीचा सिद्धांत जितका घातक आहे, तितकेच वाईट चारित्र्य देखील किती प्राणघातक असते, हे योहान फार चांगल्या प्रकारे जाणतो.

3. योहानाची तीन पत्रे प्रत्येक सुवार्तेच्या सेवकामध्ये आणि खर्‍या ख्रिस्ती व्यक्तीमध्ये असले पाहिजे असे प्रेम, करुणा आणि धैर्य यांचे आदर्श प्रतिरूप उभे करतात.

देवाचा सन्मान करणारी आणि मेंढ्यांचे पोषण करणारी सेवा ही केवळ अचूक आणि धर्मशुद्ध उपदेशातच नव्हे, तर करुणा, धैर्य आणि कोमलतेने समृद्ध अशा उपदेशातही रुजलेली असते. योहान आपल्या वाचकांना कितीदा “माझ्या लहान मुलांनो” (1 योहान 2:1, 12, 28; 3:18; 4:4; 5:21) असे संबोधतो, हे लक्षात घेणे उल्लेखनीय आहे. त्याचे शिक्षण हे त्यांच्या विषयी असलेल्या त्याच्या प्रेमातूनच वाहून येते. जर मंडळीतील लोकांना हे खरेच कळले, आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाले, की त्यांचे पाळक त्यांना आपल्या अंतःकरणात घेऊन फिरतात आणि त्यांच्या कल्याणाला स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक जपतात, तर आपल्यातील अनेक मंडळ्या आज जशा आहेत त्याहून किती वेगळ्या दिसल्या असत्या.

योहानाची तीन पत्रे शुभवर्तमानाची रत्ने आहेत. त्यांचे वाचन करा, त्यांवर मनन करा आणि शक्य असेल तर त्यांचे पाठांतर करून ठेवण्याचाही प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही आपल्या प्रभूच्या कृपेत सातत्याने वाढत जाल.

हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

इयान हॅमिल्टन
इयान हॅमिल्टन
डॉ. इयान हॅमिल्टन हे न्यूकॅसल, इंग्लंड येथील वेस्टमिन्स्टर प्रेस्बिटेरियन थियोलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत आणि ग्रीनविले, एस.सी. येथील ग्रीनविले प्रेस्बिटेरियन थियोलॉजिकल सेमिनरीमध्ये संलग्न प्राध्यापक आहेत. ते वर्ड्स फ्रॉम द क्रॉस, आवर हेवन्ली शेफर्ड, आणि दि लेक्तिओ कॉन्टिन्यूआ एक्स्पोजिटरी कॉमेण्टरी ऑन द न्यू टेस्टामेंट मधील इफिस यांवरील भाष्यग्रंथ यासह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.