
पापाची कबुली म्हणजे काय?
28/04/2026सेवेत येणारा थकवा कसा हाताळावा
हल्लीच्या काळात विश्वासू सुवार्ता-सेवेमध्ये सेवकाला येणारा थकवा दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. जे सुभक्त पाळक व शिक्षक सेवेत गुंतलेले असतात, त्यांना असा थकवा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आक्रमक जगाचे वाढते वैर हे मनोधैर्य खच्ची करणारे, आणि अंतःकरणावर निराशेचे सावट आणणारे ठरू शकते. त्याहीपेक्षा अधिक खिन्न करणारी गोष्ट म्हणजे, काही सुवार्तावादी म्हणवणाऱ्या लोकांची पवित्र शास्त्राऐवजी संस्कृतीनुसार आकार घेण्याची वृत्ती मनाला खोलवर निरुत्साहित करू शकते. या आध्यात्मिक लढायांसोबतच, काही चांगल्या स्त्री-पुरुषांचा स्वभाव इतका संवेदनशील असतो की, लहानमोठा कोणताही विरोध त्यांना असह्य व ग्रासून टाकणारा वाटू शकतो.
या संक्षिप्त लेखात, प्रभु येशू ख्रिस्ताच्या पवित्र मानवतेवर खोलवर परिणाम करणाऱ्या दुःख आणि थकव्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मी असे सुचवत नाही की त्याने सेवेत येणारा थकवा अनुभवला. परंतु पवित्र शास्त्रात आपला तारणारा विश्वासाचा एक आदर्श मनुष्य, आणि देवाचा दास म्हणून तो आपल्यासमोर मांडण्यात आला आहे, ज्याचे अनुकरण सुवार्तेच्या प्रत्येक सेवकाने केले पाहिजे. हे ध्यानात ठेवून, मी दोन गोष्टी करणार आहे: प्रथम, आपल्या निष्पाप प्रभूने भोगलेल्या कठीण, जवळजवळ ग्रासून टाकणाऱ्या सेवाकार्यातील परीक्षांच्या वास्तवावर प्रकाश टाकणे (ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते), आणि दुसरी, या अडचणींचा अनुभव घेत असताना येशूचे लक्ष किती अविचल होते, आणि ते कशावर स्थिर होते, हे स्पष्टपणे दाखवणे.
1. येशू आठवण ठेवतो आणि त्याला ठाऊक आहे.
प्रथम, या उल्लेखनीय शब्दांकडे लक्ष द्या:
तो मला म्हणाला, “तू माझा सेवक आहेस; मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस.” मी तर म्हणालो होतो की, “मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे; माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे.” (यशया 49:3-4)
मी शिकवत असताना अनेकदा माझ्या विद्यार्थ्यांना विचारतो, “हे शब्द कोण बोलला?” एकदाही कोणी योग्य उत्तर दिलेले नाही. हे शब्द यहोवाचा विश्वासू, निष्पाप दास बोलला होता, ज्याच्या ठायी तो “गौरविला” जाणार होता. हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून आले होते.
“उगीच” आणि “निरर्थक” हे दोन शब्द अंतःकरण हादरवणारे आहेत. हिब्रूमध्ये “उगीच” या अर्थछटेसाठी ‘तोहू’ हा शब्द येतो; तोच आपल्याला उत्पत्ती 1:2 मध्ये आढळतो: “पृथ्वी आकारहीन व शून्य होती.” आणि “निरर्थक” या अर्थछटेसाठी ‘हेबेल’ हा शब्द येतो; आणि हा शब्द उपदेशकाच्या पुस्तकात सर्वत्र वापरला आहे: “व्यर्थ हो व्यर्थ.” वधस्तंभावर जाण्याच्या उंबरठ्यावर असताना, आपल्या तारणाऱ्याने आपल्या सेवेचा आणि ध्येयाचा आढावा घेतला, तेव्हा त्याने सेवाकार्याचे तसेच वैयक्तिक दुःखाचे दिवस सोसले, तरी तो निष्पाप राहिला. विरोध इतका अविरत होता, आणि त्याचे स्वतःचे शिष्य इतके मंद व जडबुद्धीचे होते, की स्तोत्रकर्ता जेव्हा लिहितो की “माझ्या परिचयाचा काय तो अंधकारच आहे.” (स्तोत्रसंहिता 88:18 पहा), तेव्हा त्या दुःखाचा पूर्ण भार त्याने अनुभवला.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला हे कळलेच पाहिजे, आणि सुवार्तेच्या प्रत्येक सेवकाने तर हे विशेषतः ओळखलेच पाहिजे, की आपल्याकडे असा तारणारा आहे ज्याला आपल्या सेवकांचे दुःख आणि थकवा ठाऊक आहे, कारण त्याने स्वतः ते अनुभवले आहे. सुवार्तेच्या सेवेत विश्वासूपणाची मोठी किंमत मोजावी लागते. स्तोत्रकर्त्याच्या शब्दांचा विचार करा जेव्हा तो ओरडून म्हणतो:
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? (स्तोत्रसंहिता 42:5)
तो त्या खोल दरीत आहे, याचे कारण त्याने आज्ञा पाळली नव्हती असे नाही, तर प्रभूचा सेवक येशू ख्रिस्त याला ज्या दुःखातून जावे लागणार होते, त्या दुःखाच्या पूर्वछायेत तो उभा आहे.
माझा मूळ मुद्दा इतकाच आहे: जेव्हा प्रभूचे विश्वासू सेवक स्वतःला खोल दरीत फसलेले पाहतात, आणि जीवन व सेवाकार्याच्या लाटा त्यांच्या मनावरून आणि हृदयावरून उसळत-वाहत असतात (स्तोत्रसंहिता 69:1-2 पहा), तेव्हा त्यांच्याकडे असा विश्वासू तारणारा आहे, जो अत्यंत थकवा आणि खोल दुःखाचा मार्ग चालून गेला आहे. तो तुमची प्रकृती जाणतो, तो आठवण ठेवतो, आणि तुम्ही केवळ माती आहात हे त्याला ठाऊक आहे (स्तोत्रसंहिता 103:14).
2. येशूच्या विश्वासाने त्याच्या कृतींना दिशा दिली.
दुसरे म्हणजे, आता यानंतरच्या शब्दांकडे लक्ष द्या:
तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे; माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे.” (यशया 49:4)
देवाचा निष्पाप पुत्र आणि त्याचा विश्वासू सेवक प्रभू येशू ख्रिस्त, जेव्हा सेवाकार्यात येणाऱ्या परीक्षा आणि क्लेश यांच्या खोल गर्तेत उतरला, तेव्हाही त्याने आपले व्याकुळ हृदय व मन यहोवाच्या विश्वासूपणात दृढ रोवून ठेवले. दुःख आणि क्लेशाने वेढलेले असतानाही त्याने देवाच्या उत्तमतेवर आणि त्याच्या श्रमांच्या मोबदल्याच्या अभिवचनावर अढळ विश्वास ठेवला. स्वर्गीय पित्याच्या उत्तमतेवर आणि प्रेमावरचा हाच विश्वास आपल्यालाही वादळात टिकून राहण्यास, आणि जेव्हा आपल्या जीवाभोवती सर्व काही ढासळू लागते तेव्हाही उभे राहायला सामर्थ्य देईल.
परमेश्वराच्या काही सर्वोत्तम, निवडक सेवकांना अंधारातून चालण्यास पाचारण केले जाते; एवढेच नव्हे, तर अशा अंधारातूनही, ज्यात प्रकाशाचा किरणही दिसत नाही. यशया 50:10 मधील या धक्कादायक शब्दांवर विचार करा:
परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.
यशयाद्वारे परमेश्वर आपल्या मनावर हे ठसवतो की, देव कोण आहे याची आपण आठवण ठेवणे, आणि त्याचे खरे स्वरूप मनाशी घट्ट बांधून ठेवणे, हेच आपल्याला सर्वाधिक आधार देते, जेव्हा सेवेचा थकवा आपल्या जीवनाचा संथपणा विस्कळीत करण्यास, आणि आपल्याला प्रभू व त्याच्या मंडळीच्या सेवेतून जणू निरुपयोगी ठरवण्यास धजावतो.
हा आपल्या तारणाऱ्याच्या अनुभवाचा कळस होता. कलवरीच्या वधस्तंभावर एकटे आणि सोडून दिलेले असताना त्याच्यासाठी संपूर्णतः प्रकाश मावळला होता, तेव्हा देवावर असलेल्या त्याच्या विश्वासानेच त्याला पराजय पत्करण्यापासून आणि मागे फिरण्यापासून वाचवले. त्या सर्वस्वी निराधार अवस्थेतही, त्याने विश्वासाने देवाला घट्ट धरून ठेवले, “माझ्या देवा, माझ्या देवा…” (स्तोत्रसंहिता 22:1; मत्तय 27:46; मार्क 15:34). अंधकाराने त्याला वेढले, तरी त्या अंधकारात त्याचा विश्वास गौरवीपणे तेजाळत होता.
निष्कर्ष
सेवेत येणाऱ्या थकव्याची अनेक कारणे असू शकतात: वैयक्तिक संघर्ष, कौटुंबिक कलह, मंडळीतील तणाव, राष्ट्रीय अस्थिरता, आंतरराष्ट्रीय संकटे. कारणे कोणतीही असोत, येशू त्याच्या रक्ताने विकत घेतलेल्या आणि अत्यंत प्रिय अशा प्रत्येकाला हेच सांगतो: देवावर विश्वास ठेवा, त्या पित्यावर, जो तुमच्यावर सार्वकालिक प्रीतीने प्रेम करतो, त्या पुत्रावर, ज्याने स्वतःला तुमच्यासाठी अर्पिले, आणि जो तुमच्यासाठी मध्यस्थीही करायला सर्वकाळ जिवंत आहे, आणि त्या पवित्र आत्म्यावर, जो तुमच्यात वस्ती करून तुम्हाला सहाय्य पुरवितो (यिर्मया 31:3; रोमकरांस 8:26; इब्री 7:25). देवावर विश्वास ठेवा, आणि आपल्या तारणाऱ्याप्रमाणेच त्याला घट्ट धरून राहा.”
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


