5 Things About Fighting Sin
“पापाविरुद्ध लढा” याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
24/03/2026
मोशेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
31/03/2026
5 Things About Fighting Sin
“पापाविरुद्ध लढा” याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
24/03/2026
मोशेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
31/03/2026

पवित्रतेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

5 Things About Holiness

1. देवाची पवित्रता निर्णायक आहे.

“पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर!” (यशया 6:3; व प्रकटीकरण 4:8 सुद्धा पहा). जेव्हा यशयाला प्रभूच्या राजासनासमोर आणले गेले, तेव्हा स्वर्गात जे शब्द घोषित करण्यात आले होते, ते हेच. स्वर्गीय प्राणी देवाचे ईश्वरीय गुणवैशिष्ट्ये आणि त्याची अतुल्य शुद्धता यांच्या प्रभावाखाली विस्मयाने थक्क अवस्थेत विचरण करतांना दिसतात. जेव्हा आपण सर्वसमर्थाला भेटतो आणि तो जसा आहे तसा त्याला ओळखतो, तेव्हा आपली प्रतिक्रिया देखील तशीच असते. त्याच्या तेजस्वी प्रकाशापुढे आपली भ्रष्टता उघड होते (यशया 6:5) आणि आमच्या पापामुळे येणारा जो भयंकर व निश्चित न्याय, त्याची आपल्याला खातरी पटते. तरीही, आश्चर्याची आणि पूर्ण खात्रीची गोष्ट म्हणजे ही की, त्याच्या ह्या पवित्रतेतूनच गौरवशाली तारणही प्राप्त होते (यशया 6:6–7).

मात्र, बऱ्याचदा देवाची पवित्रता ही गौण किंवा काहीशी अप्रासंगिक वाटते, आणि तिच्याविषयी फारसे स्वारस्य उरत नाही. जेव्हा आपण पापामुळे आंधळे होतो, तेव्हा त्याची पवित्रता आपल्याला चिंतेचा विषय वाटत नाही. तरीही देव पवित्रच राहतो, आणि सृष्टी, तारण, आणि न्याय या सर्वांमध्ये त्याची सर्व कामे त्याच्या पवित्रतेनुसारच असतात. आपण त्याची पवित्रता ओळखतो की नाही, याने काहीएक फरक पडत नाही, त्याची पवित्रता सर्वांसाठी निर्णायक आहे, कारण तिचा परिणाम सर्वांवर होणार आहे, एकतर देव जेव्हा न्याय करून पापाचे प्रतिफळ देतो तेव्हा, किंवा येशू ख्रिस्त, जो “तो पवित्र व नीतिमान” (प्रेषितांची कृत्ये 3:14) आहे, त्याच्याद्वारे मिळणाऱ्या तारणाच्या कृपेत.

2. तारणासाठी पवित्रता आवश्यक आहे.

देवाबरोबर चालण्यासाठी आणि त्याच्या न्यायासाठी तयारी करण्यासाठी आपल्याला पवित्रतेची गरज आहे. आपल्या दुष्टतेमुळे आपण स्वतःहून पवित्रता प्राप्त करू शकत नाही. परंतु एक आनंदाची बातमी आहे, कारण देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे, आणि म्हणून तो ती आपल्यामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे साध्य करतो (रोमकरांस पत्र 15:16). त्याच वेळी, आपण “सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न” करावा (इब्री लोकांस 12:14). याचा अर्थ आपल्या पवित्रतेत अंशाअंशाने विकास करणे होय. देव हे देखील स्वतःच घडवून आणतो, परंतु आपल्यामध्ये हे कार्य करण्यासाठी आपण सक्रियपणे देवाचा शोध घेतला पाहिजे. आपण त्याला संतुष्ट करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, आणि तसे करण्याची इच्छा व शक्ती केवळ तोच देतो (फिलिप्पैकरांस 2:12–13). यामध्ये आपल्या पापाची कबुली देणे, त्यापासून दूर राहणे, आणि देवाच्या नीतिमत्त्वाच्या मार्गावर चालणे अशा घटकांचा समावेश असतो. आपला बाप म्हणून देव जी आपली काळजी घेतो, त्यात त्याने आपल्या लोकांबरोबर स्वतःचे असे वैयक्तिक नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा संकल्प घेतला आहे, जिथे आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसाठी आपण मुक्तपणे त्याच्याकडे येऊ शकतो. जरी आपण वारंवार त्याला निराश करतो, तरीही आपण धीर धरू शकतो की त्याने जे कार्य सुरू केले आहे ते तोच पूर्ण करेल (फिलिप्पैकरांस 1:6).

3. पवित्रता म्हणजे तारणाचा केंद्रबिंदूच. 

जरी याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जात असले तरी, तारणामध्ये देवाच्या पवित्रतेची केंद्रिय म्हणजे मध्यवर्ती भूमिका आहे. ख्रिस्तामध्ये, देवाच्या पवित्रतेचा अर्थ नेमका काय आहे याचे दर्शन आपल्याला आमच्या पापाचे प्रकटीकरण आणि पापापासून तारण, या दोन्हीमध्ये घडून येते. महत्त्वाचे म्हणजे, देवाचे वचन वारंवार ठामपणे प्रतिपादन करते की ही त्याची पवित्रताच आहे जी ख्रिस्ती व्यक्तीचे तारण सुरक्षित करते (यशया 6:1–7; जखऱ्या 3; रोमकरांस पत्र 5:10).

शास्त्रातील ख्रिस्ताचे जीवन, मरण, पुनरुत्थान, आणि नवा जन्म यांचे वृत्तांत आपल्याला आणखी खात्री देतात की देवाची पवित्रता ही ख्रिस्ती तारणाच्या केंद्रस्थानी आहे. स्तोत्र 16:10 हा शास्त्रलेख त्याचे जीवन आणि मृत्यू यांमध्ये पवित्रतेचा संदर्भ देते: “तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;” “पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्‍चित ठरला.” (रोमकरांस पत्र 1:4). देव पवित्र आत्म्याची तरतूद करून आपल्याला नवा जन्म देतो (योहान 3:5–8). देवाच्या पवित्रतेचे वैशिष्ट्य आपल्या तारणाच्या या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर, खरं तर प्रत्येक बिंदूवर, दिसून येते. येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त देवाच्या कृपेने, आपण त्याच्या पवित्रतेचा विचार आपले तारण म्हणून करू शकतो.

4. पवित्रता म्हणजे “स्वतःला इतरांपेक्षा अधिक पवित्र समजणे” नव्हे.

“होलिअर दॅन दाऊ” (“मी तर तुझ्यापेक्षा अधिक पवित्र”) ही इंग्रजी म्हण अशा व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते जी आपल्या शेजाऱ्याशी नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्यासारखी वागते. ही पवित्रता नाही, तर पवित्रतेच्या अगदी विरुद्ध आहे. मनुष्यामधील पवित्रता म्हणजे देवाचे प्रतिरूप असणे होय, आणि येशूने प्रकट केल्याप्रमाणे तो “मनाचा सौम्य व लीन” आहे. ख्रिस्त (मत्तय 11:29), जो पवित्रतेत परिपूर्ण आहे, त्याने स्वेच्छेने सर्वात खालची जागा घेतली आणि वधस्तंभावर तो शाप ठरला. आम्हांसाठी त्याने आमच्या पापांची लाज सहन केली. त्याच्या शिकवणीचे विश्वासूपणे अनुसरण करणे म्हणजे इतरांशी वागताना उच्च स्थान घेणे नव्हे, तर खालचे स्थान घेणे होय (लूक 14:1011; 22:2430; योहान 13:1417; 1 पेत्र 5:6). 

“मी तर तुझ्यापेक्षा अधिक पवित्र” ही चित्तवृत्ती स्वतःला नीतिमान समजण्याचे लक्षण आहे. येशूने दिलेल्या परुशी व जकातदार यांच्या दृष्टांतात (लूक 18:914), स्वतःला नीतिमान मानणाऱ्या परुशाचा असा विश्वास होता की तो देवाच्या जवळ आहे, परंतु तो स्वतःला आपल्या शेजाऱ्यापेक्षा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ समजत होता. आपण जकातदारासारखे नाही म्हणून त्याने देवाचे आभार मानले, परंतु तो जकातदारच होता ज्याने देवाकडे दयेसाठी हाक मारली  आणि नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. पवित्रता नैतिक गुणांद्वारे प्रकट होते, यांत संशय नाही, परंतु ती ख्रिस्ताने दाखविल्याप्रमाणे व शिकविल्याप्रमाणे, ती कुठल्याही प्रकारच्या आध्यात्मिक फुशारकी मारण्याद्वारे नाही, तर नेहमीच नम्रतेमध्येच दिसून येते.  

5. ख्रिस्ती लोक पवित्रतेत वाढावे, यासाठीच ईश्वरी नियोजन आखले गेले आहे.

देवाच्या लेकरांनी  पवित्रतेमध्ये त्याचे प्रतिरूप व्हावे ही देवाची प्रकट इच्छा असल्यामुळे, त्याचे ईश्वरी नियोजन हे आपल्याकरिता हेच घडवून आणण्यास, आणि आपल्याला त्यात वाढण्यास समर्थ करण्यास, रचलेले आहे. त्याच्या ईश्वरीनियोजनामध्ये तो आपल्याला येशू ख्रिस्तावरील विश्वासाकडे आणतो. त्याच्या ईश्वरीनियोजनामध्येच तो आमच्या पापांबद्दल आपल्याला शिस्त लावतो, यासाठी की आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. त्या वेळी ती शिस्त वेदनादायक वाटत असली, तरी ती शेवटी नीतिमत्वाचे पीक देणारी ठरते (इब्री लोकांस 12:10–11). आम्हाला पवित्रतेचा मार्ग दाखविण्यास व शिकविण्यासाठी तो आपला पवित्र आत्मा, आपले पवित्र शास्त्र, आणि जिला त्याने पवित्र ठरविले आहे,  ती मंडळी आम्हांस देतो. पवित्रतेत आपली वाढ व्हावी यासाठी देवाने आठवड्याची रचना देखील केली आहे: “शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ” (निर्गम 20:8). हा असा दिवस आहे, जो त्याने पवित्र केला आहे (निर्गम 20:11). प्रभूच्या दिवसाविषयी देव काय सांगतो त्याप्रमाणे वागल्याने, पुढील आठवड्यासाठी आपल्याला बळ मिळते; आणि आपण आपल्या स्वर्गीय पित्याने कृपेने आपल्याकरिता तयार करीत असलेल्या पवित्र नगरात आपल्या तारणकर्त्याला पाहण्याच्या अधिक जवळ जात असताना, आपल्याला साहाय्य मिळते.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

जॉन सी.ए. फर्ग्युसन
जॉन सी.ए. फर्ग्युसन
डॉ. जॉन सी.ए. फर्ग्युसन हे स्कॉटलंडमधील इन्व्हरनेस येथे असलेल्या इन्व्हरनेस असोसिएटेड प्रेस्बिटेरियन चर्चचे पाळक आहेत.