
पापक्षालन आणि कोपशमन यांचा नेमका अर्थ काय आहे?
26/09/2025
येशू ख्रिस्त, देवाचा कोकरा!
27/09/2025प्रार्थनेचे स्थान
ख्रिस्ती जीवनाचा उद्देश काय आहे? — ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेतून जन्मलेली सुभक्ती. आज्ञापालन हे ख्रिस्ती जीवनातील संपत्ती उघडण्याची किल्ली आहे. प्रार्थना हीच आज्ञापालनास प्रवृत्त करते आणि त्याचे पोषण करते, तसेच अंतःकरणाला अशा योग्य “मनःस्थितीत” आणते की जिथे आज्ञापालन करण्याची इच्छा निर्माण होते.
नक्कीच, ज्ञानही महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय देवाची मागणी काय आहे हे आपण जाणू शकत नाही. परंतु जर आपण देवाशी प्रार्थनेत संवाद साधला नाही, तर ज्ञान आणि सत्य हे केवळ तात्त्विक संकल्पना ठरतात. पवित्र आत्माच आपल्याला देवाचे वचन शिकवतो, त्याद्वारे प्रेरणा देतो आणि आपले अंतश्चक्षू प्रकाशित करतो. तो देवाचे वचन आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि प्रार्थनेद्वारे पित्याला प्रतिसाद देण्यासाठी आपले साहाय्य करतो.
प्रार्थनेचे ख्रिस्ती लोकांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रथम, प्रार्थना ही तारणासाठी एक अपरिहार्य अट आहे. काही लोक ऐकू शकत नाहीत; ते बहिरे असले तरी ते तारण पावू शकतात. काहीजण पाहू शकत नाहीत; ते आंधळे असले तरी तारण पावू शकतात. शुभवार्तेचे — म्हणजे येशू ख्रिस्ताचे पापक्षालन करणारे मरण आणि पुनरुत्थान यांद्वारे तारणाचे — ज्ञान कुठलाही मार्ग अवलंबून ऐकिवात येतेच; पण शेवटी मनुष्याने देवाजवळ दीन अंत:करणाने तारणप्राप्तीसाठी याचना केली पाहिजे. तारणप्राप्तीसाठीची प्रार्थना हीच ती दुष्टाकडून केली जाणारी एकमेव प्रार्थना आहे ज्याविषयी देवा म्हणतो की तो ती ऐकेल.
जे लोक स्वर्गात आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी एकसमान आहेत?इथे काही गोष्टी आहेत— ते सर्व ख्रिस्ताच्या पापक्षालन मृत्यूवर म्हणजे प्रायश्चित्तावर विश्वास ठेवून नीतिमान ठरले आहेत. ते सर्व देवाची स्तुती करत आहेत. आणि त्यां सर्वांनी तारणासाठी प्रार्थना केली आहे. प्रार्थनाविरहीत असणे म्हणजे देव, ख्रिस्त, पवित्र आत्मा आणि स्वर्गातील आशा व वास्तव यां पासून वंचित राहणे.
दुसरे म्हणजे, आपण ख्रिस्ती आहोत याची खात्री देणाऱ्या सर्वात ठळक चिन्हांपैकी एक म्हणजे त्याचे प्रार्थनायुक्त जीवन. एखादा मनुष्य प्रार्थना करू शकतो आणि तरीही ख्रिस्ती नसू शकतो; पण कोणीही ख्रिस्ती असूनही प्रार्थना न करणारा असू शकत नाही. रोमकरांस 8:15 मध्ये लिहिले आहे की आपण देवाची मुले आहोत हे आध्यात्मिक दत्तकत्व आपल्याला “अब्बा! पिता” अशी हाक मारण्यास प्रवृत्त करते. प्रार्थना ही ख्रिस्ती लोकांसाठी तशीच आहे जशी जीवनासाठी श्वासोच्छ्वास; तरीही ख्रिस्ती कर्तव्यांमध्ये सर्वाधिक दुर्लक्षित कर्तव्य म्हणजे प्रार्थना आहे.
किमान खाजगी प्रार्थना तरी खोट्या उद्देशांनी प्रवृत्त होऊन करणे कठीण आहे. कोणी खोट्या उद्देशांनी प्रवृत्त होऊन संदेश देऊ शकतो — जसे खोटे संदेष्टे करतात; ख्रिस्ती कार्यांमध्येही खोट्या उद्देशांनी प्रवृत्त होऊन सहभागी होऊ शकतो. धर्माचे कितीतरी बाह्य आचरण खोट्या हेतूने केले जाऊ शकतात; पण देवाशी संवाद साधणे खोट्या उद्देशांनी प्रवृत्त होऊन करण्याची शक्यता फारच कमी आहे. मत्तय 7 मध्ये लिहिले आहे की “शेवटच्या दिवशी” अनेकजण न्यायासनासमोर उभे राहून ख्रिस्ताला सांगतील की त्यांनी त्याच्या नावाने किती मोठी आणि उदात्त कृत्ये केली; पण तो त्यांना म्हणेल, “मी तुम्हाला ओळखत नाही.”
म्हणूनच, आपल्याला प्रार्थनेसाठी बोलावले गेले आहे, इतकेच नव्हे तर आज्ञाही दिली आहे. प्रार्थना ही एक विशेष कृपा आहे आणि एक कर्तव्यही आहे; आणि कोणतेही कर्तव्य हे परिश्रमाचे ठरू शकते. ख्रिस्ती जीवनातील इतर वाढीच्या माध्यमांप्रमाणेच प्रार्थनेसाठीही परिश्रम आवश्यक आहेत. एका अर्थाने, प्रार्थना आपल्यासाठी स्वाभाविक वृत्ती नाही. आपण देवाशी संगती आणि संवाद याकरिता निर्माण झालो असलो, तरी पापाच्या परिणामामुळे आपल्यातील बहुतेकजण प्रार्थनेच्या बाबतीत आळशी आणि उदासीन झाले आहेत. नव्या जन्मामुळे देवाबरोबर सहवासाची नवी इच्छा पेटते; पण पाप आत्म्याला विरोध करते.
आपण या गोष्टीत धीर धरू शकतो की देव आपली अंतःकरणे ओळखतो, आणि तो आपल्या ओठांतून निघालेल्या शब्दांपेक्षा आपल्या न उच्चारलेल्या विनंत्याही ऐकतो. जेव्हा आपण आपल्या आत्म्याच्या खोल भावना व्यक्त करू शकत नाही किंवा कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी हेही उमगत नाही, तेव्हा पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करतो. रोमकरांस पत्र 8:26–27 म्हणते :
“तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. आणि अंतर्यामे पारखणार्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.”
एखाद्या परिस्थितीत कशी प्रार्थना करावी किंवा कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी हे जेव्हा आपल्याला उमगत नसते, तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला साहाय्य करतो. या वचनावरून असा विश्वास ठेवण्याचे कारण आहे की आपण चुकीच्या पद्धतीने प्रार्थना केली, तरी पवित्र आत्मा ती प्रार्थना पित्यापुढे नेण्याआधी तिच्यातील चुका सुधारतो; कारण वचन 27 सांगते की तो ‘पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.’
प्रार्थना ही पवित्र जीवनाचे रहस्य आहे—जर पवित्रतेत खरोखर काही गुपित असेल तर. जर आपण मंडळीच्या इतिहासातील महान पवित्र जनांचे जीवन पाहिले, तर असे दिसते की ते प्रार्थना-समर्पित लोक होते. जॉन वेस्ली यांनी एकदा म्हटले होते की जे सेवक दररोज किमान 4 तास प्रार्थना करत नव्हते, त्यांना ते जास्त महत्त्व देत नसत. लुथर म्हणाले की ते दररोज नियमितपणे 1 तास प्रार्थना करायचे; पण जर दिवस खूप व्यस्त असेल तर ते दोन तास प्रार्थना करायचे.
प्रार्थनेकडे दुर्लक्ष करणे हे ख्रिस्ती जीवनातील, गतीशून्यता किंवा ठप्पपणाचे एक मोठे कारण आहे. लूक 22:39–62 मध्ये पेत्राचे उदाहरण पाहा. येशू नेहमीप्रमाणे प्रार्थनेसाठी जैतुन पर्वतावर गेला आणि शिष्यांना सांगितले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” पण शिष्य मात्र झोपी गेले. त्यानंतर पेत्राने रोमी सैन्याला तलवारीने रोखण्याचा प्रयत्न केला; आणि पुढे त्याने ख्रिस्ताला नाकारले. पेत्राने प्रार्थनेकडे दुर्लक्ष केले, आणि परिणामी तो परीक्षेत पडला. पेत्राबद्दल जे खरे आहे, ते आपल्याबाबतही खरे आहे—आपण सार्वजनिकरीत्या पतन पावण्याआधी गुप्तरित्या पतन पावतो.
प्रार्थनेसाठी योग्य वा अयोग्य असा वेळ आहे का? यशया 50:4 असे सांगते की पहाट ही ती वेळ आहे, ज्यावेळी देव दररोज प्रार्थनेची इच्छा जागवतो आणि आपल्यातील देवावरील विश्वास नव्याने दृढ करतो. पण पवित्र शास्त्रातील इतर उतारे दिवसाच्या विविध प्रसंगांकडे देखील प्रार्थना करण्याची वेळ म्हणून संकेत देतात. दिवसातील कोणताही प्रहर इतर प्रहरांपेक्षा अधिक पवित्र असा मानलेला नाही. येशू सकाळी, दिवसा, आणि कधी कधी संपूर्ण रात्रभर प्रार्थना करीत असे. त्याच्याकडे प्रार्थनेसाठी वेगळा वेळ राखून ठेवलेला असायचा याचे पुरावे आहेत; तरीसुद्धा येशू व पिता यांच्यात असलेल्या नात्याचा विचार करता, त्यांच्या संगतीत कधीही खंड पडत नव्हता, हे स्पष्ट होते.
1 थेस्सलनीकर 5:17 मध्ये आपल्याला “निरंतर प्रार्थना करा” अशी आज्ञा दिली आहे. म्हणजेच आपण आपल्या पित्याशी अखंड संगतीच्या अवस्थेत असले पाहिजे.
हा लेख पूर्वी डझ प्रेयर चेंज थिंग्स? ह्या पुस्तकात प्रकाशित झाला होता.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


