The Transforming Power of God’s Holiness in Everyday Life?

दैनंदिन जीवनात देवाच्या पवित्रतेची रूपांतर घडविणारी शक्ती

03/11/2026
6 Kinds of Hearers of God’s Word

देवाचे वचन ऐकणाऱ्या लोकांचे 6 प्रकार

10/11/2026
The Transforming Power of God’s Holiness in Everyday Life?

दैनंदिन जीवनात देवाच्या पवित्रतेची रूपांतर घडविणारी शक्ती

03/11/2026
6 Kinds of Hearers of God’s Word

देवाचे वचन ऐकणाऱ्या लोकांचे 6 प्रकार

10/11/2026

येशू हा नवीन मंदिर आहे

Jesus Is the New Temple

पवित्र शास्त्रातील मंदिराचा विचार करताना तुम्ही कशाची कल्पना करता? तुम्ही अरण्यातील एका सुशोभित तंबूचा विचार करत असाल, ज्यात पवित्र जागेला चौकट देणारे सोन्याचे खांब आणि सुंदर पडदे होते. किंवा बहुधा तुम्ही परम पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करणाऱ्या करुबांची आणि सोन्याचे नक्षीकाम असलेल्या भिंतींवर कोरलेल्या डाळिंबाच्या झाडांची भव्य रचना असलेल्या मंदिराची कल्पना करत असाल. तुम्ही यरुशलेमवर उंच उठलेले, काळजीपूर्वक बसवलेले भव्य कोरीव दगडही मनात आणत असाल, जे प्राचीन जगातील हेरोदच्या काळातील एक अद्भुत वास्तू होते. ही सर्व चित्रे पवित्र शास्त्रात उल्लेख केलेल्या मंदिराच्या वेगवेगळ्या रूपांचे योग्य चित्रण करतात. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, मंदिराचा विचार करताना आपण येशूचा विचार केला पाहिजे, असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. मंदिराशी संबंधित इतर सर्व गोष्टी त्याच्याकडे निर्देश करणाऱ्या सावल्या आहेत.

पवित्र शास्त्रात दिसणारे पहिले मंदिर म्हणजे एदेन बाग होय. नंतर निवासमंडप आणि मंदिराप्रमाणेच, देवाने एदेन बागेला आपले पवित्र स्थान, म्हणजेच असे निवासस्थान बनवले, जिथे तो आपल्या लोकांबरोबर राहील. पतनापूर्वी, एदेन हे तेच पवित्र स्थान असणे अपेक्षित होते. याच कारणास्तव, देव एदेन बागेत चालत असे, जसा तो नंतर निवासमंडपात चालत असे (उत्पत्ती 3:8; लेवीय 26:12; अनुवाद 23:14; 2 शमुवेल 7:6-7 देखील पाहा). एदेन आणि निवासमंडप यामध्ये पूर्वेकडून प्रवेश केला जात असे (उत्पत्ती 3:24; निर्गम 26:18-22), एदेन आणि शलमोनाच्या मंदिराचे रक्षण करुबांद्वारे केले जात असे (उत्पत्ती 3:24; निर्गम 26:31; 1 राजे 6:23-29) आणि ते झाडांनी भरलेले होते (उत्पत्ती 2:16; 1 राजे 6:20-36). आदामाने आणि याजकांनी त्यांच्या पवित्र स्थानांची “सेवा करावी व त्यांचे रक्षण करावे” असे होते (उत्पत्ती 2:15; गणना 3:8; 8:26; 18:5-6). एदेन हे एक मंदिर होते.

आदाम पापामध्ये पडल्यामुळे, त्याला पवित्र स्थानातून बाहेर काढून देण्यात आले. देवाने जेव्हा आपल्या लोकांना मिसरमधून सोडवले, तेव्हा त्याने कृपेने पुन्हा एकदा एक पवित्र स्थान स्थापन केले, जिथे पापी लोक वारंवार यज्ञार्पणे अर्पण करून पश्चात्तापाने आणि उपासनेने त्याच्याजवळ येऊ शकत होते (इब्रीकरांस 10:1). देवाने आपल्या लोकांबरोबर राहण्यासाठी हा “दर्शनमंडप” म्हणजेच निवासमंडप स्थापन केला (निर्गम 29:45-46). परंतु एकदा निवासमंडप पूर्ण झाल्यावर, इस्राएलाने पाहिले की देवाच्या उपस्थितीच्या पवित्र मेघाने जवळ येणाऱ्या प्रत्येकाकडून पवित्रतेची मागणी केली. त्यामुळे, कोणीही आत प्रवेश करू शकले नाही, अगदी मोशेही नाही (निर्गम 40:35). राजा शलमोनाने निवासमंडपाची अधिक भव्य आवृत्ती उभारली, आणि त्याच मेघाने या मंदिरावर छाया केली; यातून हे सूचित झाले की याजकही पवित्र देवाच्या उपस्थितीत प्रवेश करू शकत नव्हते (1 राजे 8:10-11).

नबुखद्नेस्सराने शलमोनाचे मंदिर नष्ट केल्यानंतर आणि इस्राएलाला बंदिवासात नेल्यानंतर, नंतरचा पारसाचा राजा, महान कोरेश याने इस्राएलाला त्यांच्या मायदेशी परतण्याची आणि नवे मंदिर उभारण्याची परवानगी दिली (एज्रा 1; 2 इतिहास 36:22-23). तरीही, ज्या वृद्ध पुरुषांनी पूर्वी शलमोनाचे मंदिर पाहिले होते, त्यांनी जेव्हा हे नवे बांधकाम पाहिले, तेव्हा ते शोकाने रडले, कारण त्यांना माहीत होते की हे दुसरे मंदिर संदेष्ट्यांनी पूर्वी जे वर्तवलेले होते ते पूर्ण करणार नाही (एज्रा 3:12). जुन्या करारातील संदेष्ट्यांना अपेक्षा होती की अनेक राष्ट्रे, यहुदी आणि परराष्ट्रीय, यरुशलेमला येतील आणि मंदिरात उपासना करतील (यशया 2:1-5 पाहा). तरीही त्यांना समजले होते की येणारे ते मंदिर शलमोनाच्या मंदिरापेक्षा खूप मोठे असेल; हे नवे मंदिर आकाश आणि पृथ्वी हादरवून सोडेल, आणि सर्व लोकांसाठी गौरव आणि तारण बनेल (हाग्गय 2:5-9), आणि हीच ती घटना जिथे देव म्हणतो, “मी तुमच्याबरोबर आहे”  (हाग्गय 2:4). 

जुन्या करारातील देवाचे पवित्र लोक ज्या मंदिराची वाट पाहत होते, ते देवाच्या देहधारी पुत्रामध्ये आले. नासरेथचा येशूच आपल्यामध्ये वास करण्यासाठी, म्हणजेच आपल्यामध्ये निवासमंडप ठोकण्यासाठी, आला आहे (योहान 1:14). तो देवाची खरी उपस्थिती आहे; त्याच्यामध्ये देवपणाची सर्व पूर्णता देहरूपाने वसते (कलस्सैकरांस 2:9-10). येशूने स्वतः यहुद्यांना सांगितले तेव्हा हेच म्हटले: “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन.” (योहान 2:19). यहुद्यांना वाटले की त्याचे शब्द शाब्दिक अर्थाने समजून घ्यायचे आहेत, परंतु येशू आत्मिक रीतीने स्वतःबद्दल बोलत होता, कारण तोच देवाचे खरे मंदिर आहे (योहान 2:20-21). खरोखर, एक याजक म्हणून, त्याने आपल्या परिपूर्ण जीवनाद्वारे आणि बलिदानी मरणाद्वारे स्वतःला अर्पण केले, जेणेकरून पापी लोकांना त्याच्या बलिदानाद्वारे पवित्र देवाच्या मंदिरातील उपस्थितीत प्रवेश मिळेल (इब्रीकरांस 9:11-14; 10:19-20). येशू एकाच वेळी याजक, बलिदान आणि मंदिर आहे.

परंतु नवा करार मंदिराचे वर्णन दुसऱ्या प्रकारेही करतो. 1 करिंथकरांस 3:16-17 मध्ये पौल सांगतो:

तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?

जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात.

जेव्हा पौल लिहितो की “तुम्ही देवाचे मंदिर आहात,” तेव्हा “तुम्ही” हे एकवचनी नसून अनेकवचनी आहे; याचा अर्थ असा आहे की पौल देवाच्या लोकांना मंडळी म्हणून एकत्रितपणे संबोधित करत आहे. दुसऱ्या शब्दांत, येशू ख्रिस्ताची मंडळी हेदेखील मंदिर आहे. शेवटी, विश्वासणारे ख्रिस्ताच्या प्रतिमेशी समरूप केले जात आहेत (रोमकरांस 8:29), कारण त्याचा आत्मा आपल्यामध्ये वास करतो. देवाची उपस्थिती आणि सामर्थ्य त्याच्या मंडळीत आहे, आणि सुवार्तेद्वारे राष्ट्रांना आशीर्वाद देण्याच्या कार्यासाठी तो तिला आत्म्याने अभिषिक्त करतो (मत्तय 28:18-20; 2 करिंथकरांस 4:1-6). आपण, ख्रिस्ताचे शरीर, त्याच्यामध्ये मंदिर आहोत, कारण तो आपल्याला स्वतःसारखे बनवतो. अशा प्रकारे, आपण या जगात ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करत असताना मंडळी ही देवाच्या पवित्रतेचे दृश्यमान प्रकटीकरण आहे. ख्रिस्तामध्ये, आपण डोंगरावर वसलेले नगर (मत्तय 5:14) आणि राष्ट्रांसाठी प्रकाश आहोत (यशया 49:6 आणि प्रेषितांची कृत्ये 13:47), जेणेकरून जग आपल्याद्वारे खरे मंदिर पाहू शकेल.

पवित्र शास्त्र नक्षीदार पडदे, सोन्याच्या भिंती आणि अद्भुत रचना असलेल्या मंदिरांचे वर्णन करत असले, तरी या सर्व गोष्टी येणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या छाया होत्या (इब्रीकरांस 9-10). आता आपण दुसऱ्या मंदिराची वाट पाहत नाही, कारण आपल्याला तो, म्हणजे ख्रिस्त प्राप्त झाला आहे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

लेव्ही बर्नट्सन

लेव्ही बर्नट्सन

डॉ. लेव्ही बर्नट्सन हे सॅन्फोर्ड, फ्लोरिडा येथील 'रिफॉर्मेशन बायबल कॉलेज'मध्ये धर्मशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत आणि 'प्रेस्बायटेरियन चर्च इन अमेरिका'मधील एक शिक्षक वडील आहेत.