Is Jesus Our Example?

येशू आमच्यासाठी कित्ता आहे का?

01/09/2026
The Power of Prayer Meetings

प्रार्थना सभांचे सामर्थ्य

08/09/2026
Is Jesus Our Example?

येशू आमच्यासाठी कित्ता आहे का?

01/09/2026
The Power of Prayer Meetings

प्रार्थना सभांचे सामर्थ्य

08/09/2026

मूर्तिपूजा म्हणजे काय?

What Is Idolatry?

लोक “मूर्तिपूजा” हा शब्द ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात निरनिराळ्या कल्पना उभ्या राहतात. काही जण प्राचीन विधींचे चित्र डोळ्यांसमोर आणतात, ज्यांत उपासक कोरलेल्या प्रतिमांसमोर नतमस्तक होत असतात. तर इतर काही लोकांच्या डोळ्यांसमोर असे चाहते येतात जे आपल्या आवडत्या अभिनेत्यांना, खेळाडूंना किंवा संगीतकारांना आपली “मूर्ती” मानून त्यांची अतिरेकी भावनेने भक्ती करतात. आणखी काही जण या शब्दाचा वापर वेडेपणाचे रूपक म्हणून करू शकतात.

तर मग, मूर्तिपूजा म्हणजे काय? थोडक्यात सांगायचे तर, निर्माणकर्त्याऐवजी निर्माण केलेल्या कोणत्याही वस्तूची उपासना करणे म्हणजेच मूर्तिपूजा.

देव मूर्तिपूजेला इतका गंभीर विषय का मानतो? उत्तर सोपे आहे: देव त्याची उपासना गांभीर्याने घेतो, म्हणून तो मूर्तिपूजेला गांभीर्याने घेतो.

ही कल्पना आधुनिक वाचकांना कधी कधी अस्वस्थ करते, कारण त्यांना देव स्वतःच्या उपासनेच्या अस्वास्थ्यकारक व्यसनाने ग्रस्त असलेला आत्ममग्न व्यक्ती वाटू शकतो. जर देव निर्माणकर्ता नसून निर्माण झालेला जीव असता, तर हा तर्क योग्यच असता. परंतु देवाने मानवांना त्याची उपासना करण्यासाठी निर्माण केले आहे. हे योग्य आहे. हे चांगले आहे, कारण केवळ देवच उपासनेस पात्र आहे. परंतु हे उलटे करून पाहिले, तर देवाने स्वतःचे गौरव आणि सन्मान प्रस्थापित केला नाही किंवा त्यांचे रक्षण केले नाही, तर तो देवाला शोभेल असे वागत नाही. लोक अनेकदा देवाचा विचार सृष्टीचा एक भाग असलेल्या मनुष्याप्रमाणे करतात; आणि त्याच वेळी सृष्टीचाही विचार देवाप्रमाणे, म्हणजे उपासनेस पात्र, असा करतात. सृष्टीला उंचावणे आणि निर्माणकर्त्याला खाली आणणे, या दोन्ही गोष्टी अयोग्य आहेत. तीच मूर्तिपूजा आहे.

प्रेषित पौल मूर्तिपूजेचे वर्णन अदलाबदलीच्या रूपाने करतो. देवाला गौरव देण्याऐवजी, तो गौरव निर्माण केलेल्या वस्तूंच्या प्रतिमांना दिला जातो. असे करताना उपासकाने “देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली; तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. ” (रोमकरांस 1:25).

देवाच्या गौरवाची मूर्तींशी अदलाबदल करणे, म्हणजे देवाचे मूल्य तराजूवर मोजण्यासारखे आहे. त्याचे गौरव, म्हणजे त्याचे अनंत वजन, मूल्य आणि सार, पाहण्याऐवजी उपासक असा निर्णय करतो की निर्माण केलेल्या सृष्टीतील एखादी वस्तू त्याच्यापेक्षा अधिक मूल्यवान आहे, जरी ती तुलना करता हलकी आणि पोकळ असली तरी. ही अदलाबदल मूर्खपणाचा कळस आहे. कल्पना करा, एखादी व्यक्ती तराजूवर हत्ती आणि पिसाची तुलना करून असा निष्कर्ष काढते की पिसाचे वजन अधिक आहे. स्पष्टपणे, अशी व्यक्ती वास्तवापासून पूर्णपणे दूर गेलेली असेल. कोणी असा विचार कसा करू शकतो? आपण देवाची जागा मूर्तीला कशी देऊ शकतो? देवाविषयीच्या सत्याची असत्याशी अदलाबदल केल्याशिवाय हे शक्य नाही. देव कोण आहे, याविषयीचे त्याचे प्रकटीकरण आपण दाबून टाकतो, तेव्हा आपण चुकीचे निष्कर्ष काढतो (रोमकरांस 1:18).   

मूर्तिपूजेपासून रक्षण करण्यासाठी आणि देवाच्या खऱ्या उपासनेला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रभू आपल्याला त्याच्या वचनात असे निर्देश देतो:

ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत.

(निर्गम 20:2–3)

सर्वांना सुपरिचित असलेला हा शास्त्रभाग हेतुपुरस्सर दहा आज्ञांच्या आरंभी ठेवण्यात आला आहे. देवासाठी राखून ठेवलेले सर्वोच्च स्थान कोणत्याही मनुष्याला, वस्तूला किंवा सृष्टीतील गोष्टीला मिळू देता कामा नये.

परंतु पवित्र शास्त्रात आपल्याला वारंवार काय दिसते? निर्गम या त्याच पुस्तकात, ज्या लोकांची देवाने मिसरमधून सुटका केली होती त्यांनीच आपल्या सोन्यापासून एक देव बनवला आणि मग त्याची उपासना केली (निर्गम 32). पुढे राजा यराबामला आपली सत्ता गमावण्याची भीती वाटली; म्हणून त्याने त्या मूर्तिपूजेची पुनरावृत्ती करून उपासनेची स्वतःची पद्धत निर्माण केली. देवाच्या सन्मानाची अदलाबदल करून त्यांनी स्वतःच्या हातांनी घडविलेल्या वस्तूची उपासना केली: “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पाहा.” (1 राजे 12:28). ही प्रसिद्ध उदाहरणे मूर्तिपूजेविरुद्ध सावध करणाऱ्या प्रखर निऑन दिव्यांसारखी आपल्यासमोर उभी आहेत. देव मूर्तिपूजेचा द्वेष करतो, कारण तो आपल्या गौरवावर प्रीती करतो. देव आपल्या गौरवावर प्रीती करतो, कारण ते चांगले आहे.

अनेकांनी असे निरीक्षण केले आहे की, पहिली आज्ञा इतर नऊ आज्ञांचा पाया आहे; कारण इतर आज्ञांचे उल्लंघन करणे म्हणजे खऱ्या देवापासून दूर वळून मूर्तीची उपासना करणे होय. यावरून मूर्तिपूजेची रूपे किती धोकादायक आणि वैविध्यपूर्ण असू शकतात, हे दिसते. आपण मूर्तिपूजेचा विचार प्रत्यक्ष मूर्तीस नतमस्तक होण्यापुरता करतो; परंतु आपल्याकडे नसलेली गोष्ट जी दुसऱ्याकडे आहे, तिची लोभाने इच्छा धरणे हे देखील मूर्तिपूजाच असू शकते (पाहा निर्गम 20:17). 

आपण ख्रिस्ती झालो तेव्हा जिवंत देवाची सेवा करण्यासाठी मूर्तींपासून दूर वळलो (1 थेस्सलनीकाकरांस 1:9). परंतु संघर्ष तेथे संपत नाही. आपण मूर्तींपासून दूर राहणे सुरू ठेवले पाहिजे (1 करिंथकरांस 10:14), आणि स्वतःला व इतरांना त्यांच्यापासून जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे (1 योहान 5:21). 

प्रेषित पौल आपल्यासमोर योग्य आणि आव्हानात्मक उदाहरण ठेवतो. अथेन्समध्ये फिरत असताना आणि आपल्या सेवासहकाऱ्यांची वाट पाहत असताना, त्याने तेथील दृश्ये पाहिली. त्यांची निर्मिती करणाऱ्याचे कला आणि कौशल्य यांनी प्रभावित होण्याऐवजी, तेथे सर्वत्र पसरलेल्या मूर्तिपूजेमुळे त्याचे अंत:करण संतप्त झाले (प्रेषितांची कृत्ये 17:16). देवाच्या गौरवाविषयी पौल इतका आवेशी होता की, देवाला जो सन्मान मिळणे योग्य होते तो त्याला मिळत नाही, यामुळे तो खरोखर अस्वस्थ झाला. परिणामी, त्याने बाहेर जाऊन आपल्या सभोवतालच्या लोकांना सुवार्ता सांगितली.

देवाच्या सन्मानाविषयीची ही प्रीती मूर्तिपूजेविरुद्ध योग्य संरक्षण ठरते. म्हणून सर्व गोष्टींपेक्षा देवाचे सर्वोच्च मूल्य किती आहे यावर खोलवर मंथन करा. त्याच्या अचूक विश्वासूपणावर, कोणतीही राखीवता न ठेवणाऱ्या प्रीतीवर, अक्षय कृपेवर, अढळ नीतिमत्वावर, निष्कलंक चांगुलपणावर, आक्षेपातीत बुद्धीवर आणि अपरिवर्तनीय स्वभावावर मनन करा. असा दुसरा कोण आहे? मग विचार करा की, हाच तो देव आहे जो येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला ओळखतो आणि तुमच्यावर प्रीती करतो.

देवाने आपल्याला साहाय्य करावे, अशी आपण प्रार्थना करू शकतो; आणि देवास योग्य असलेला सन्मान त्याला देण्याचा, तसेच त्या सन्मानाला अडखळण आणणाऱ्या कोणत्याही गोष्टीविषयी अस्वस्थ राहण्याचा आपण संकल्प करूया.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

एरिक रेमंड

एरिक रेमंड

रेव्हरेंड एरिक रेमंड हे वॉटर्टाउन, मॅसॅच्युसेट्स येथील रिडीमर फेलोशिप चर्चचे वरिष्ठ पास्टर आहेत. ते 'चेसिंग कंटेंटमेंट'सह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.