मोशेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
31/03/2026
Who Was Samson?
शमशोन कोण होता?
07/04/2026
मोशेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
31/03/2026
Who Was Samson?
शमशोन कोण होता?
07/04/2026

रूथ कोण होती?

Who Was Ruth?

बहुतेक ख्रिस्ती लोक रूथशी परिचित आहेत. तिच्याच नावाचे जुना करारातील पुस्तक असून त्यात ती मुख्य पात्रांपैकी एक आहे. ही अशी वृत्तांतकथा आहे की, प्रौढांनाही आणि मुलांनाही ती तितकीच माहीत आहे व तितकीच प्रिय आहे. तरी आपण या वृत्तांताशी परिचित असलो, तरी रूथ कोण होती हे लक्षात ठेवणे आपल्यासाठी हितावह आहे, जेणेकरून आपल्याला विश्वासूपणे जीवन जगण्यासाठी चालना मिळावी, आणि रूथ ज्याच्याकडे निर्देश करते त्या आपल्या तारकावर आपले डोळे केंद्रित व्हावेत. 

एक परराष्ट्रीय स्त्री

रूथविषयी आपल्याला समजणारी पहिली गोष्ट म्हणजे ती मवाबी स्त्री होती. यहूदातील बेथलेहेमचे अलीमलेख व नामी, यांच्या मुलांपैकी एका मुलाशी तिचे लग्न झाले होते (रूथ 1:1–4). हे विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण मवाबी लोकांना “परमेश्वराच्या मंडळीत” प्रवेश करण्यास मनाई होती. कारण इस्राएल लोक मिसरातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी देवाच्या लोकांसाठी अन्न-पाण्याची तरतूद केली नव्हती, आणि देवाच्या लोकांना शाप देण्यासाठी त्यांनी बलाम ह्याला द्रव्य देऊन आणले होते (अनुवाद 23:3–5). इस्राएलला “त्यांचे कल्याण किंवा त्यांची भरभराट” शोधण्यास मनाई करण्यात आली होती (अनुवाद 23:6).  

एक विधवा

दुसरे म्हणजे, मवाब देशात रूथचा पती मरण पावला, आणि ती निपुत्रिक अशी विधवा झाली (रूथ 1:5). तिला पती गमावल्याचा शोक सहन करावा लागला केवळ इतकेच नाही, तर तिचे सासरे आणि दीर यांचाही मृत्यू झाला. या दुःखानंतर, तिने आपला देश सोडला आणि सासूच्या संगतीने बेथलेहेम गाठले, कारण तेथे दुष्काळ निवळला होता आणि पुन्हा अन्न उपलब्ध झाले होते (रूथ 1:6–7).

एक एकनिष्ठ सून

तिसरे म्हणजे, बेथलेहेमला पोहोचण्यापूर्वीच तिच्या सासूने तिला मवाबला परत जाण्याचा आग्रह केला, तेव्हा रूथने नकार दिला. शेवटी तिची जाऊ परतली, पण रूथ “तिला [नामीला] बिलगून राहिली” (रूथ 1:14). हा एक मोठा त्यागपूर्ण निर्णय होता, विशेषतः यामुळे की रूथसाठी पती म्हणून देण्यास नामीला इतर पुत्र नव्हते. रूथ तिच्याबरोबर राहिली, तर ती निपुत्रिक विधवा म्हणूनच राहण्याची दाट शक्यता होती. तरीही तिने उत्तर दिले, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव;” (रूथ 1:16).

एक विश्वासू स्त्री

बेथलेहेमच्या वाटेवर, रूथने विश्वास-अंगीकार केला: “तुझे लोक ते माझे लोक व तुझा देव तो माझा देव” (रूथ 1:16). पुढील दिवसांत तिच्या भक्तिपूर्ण वर्तनामुळे या विश्वास-अंगीकाराची पुष्टी झाली. विश्वासाने तिने नामीसाठी व स्वतःसाठी उदरनिर्वाहाची तरतूद करण्याचा पुढाकार घेतला: “मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचत जाईन;” (रूथ 2:2). विश्वासाने तिने शेतात परिश्रमपूर्वक काम केले (रूथ 2:7). बवाजने तिने आपल्या सासूसाठी जे काही केले होते त्याची प्रशंसा केली, आणि तिला या शब्दांनी आशीर्वाद दिला: “परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो.”” (रूथ 2:12). विश्वासाने रूथने बवाजला आपला वारसदार होण्यासाठी विनंती करण्याच्या नामीच्या योजनेला मान्यता दिली, आणि धैर्याने खळ्यावर जाऊन बवाजला स्वतःशी लग्न करण्याची विनंती केली (रूथ 3:1–13). विश्वासानेच तिने हे प्रकरण योग्य रीतीने निकाली निघेपर्यंत सूज्ञपणे वाट पाहिली (रूथ 3:18).  

एक नीतिमान पत्नी व माता

जरी रूथने आपल्या आयुष्यात फार दुःख सोसले होते, तरी प्रभूने तिला नेमका तोच पुरुष प्रतिफळ म्हणून दिला, ज्याने तिच्या चांगल्या कृत्यांचे आणि विश्वासूपणाचे प्रतिफळ प्रभूने द्यावे अशी प्रार्थना केली होती (रूथ 2:12). बवाजने सर्व गोष्टी योग्यरीत्या निकाली काढल्यानंतर रूथला पत्नी म्हणून स्वीकारले (रूथ 4:10). बेथलेहेमचे वडील आणि लोकांनी त्याला आशीर्वाद दिला:

“स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणार्‍या राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी ख्याती होवो; आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे ह्या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे होवो.” (रूथ 4:11–12).

परमेश्वराने बवाज आणि रूथला पुत्र देऊन आशीर्वादित केले (रूथ 4:13). विशेष म्हणजे, नगरातील स्त्रियांनी त्याला “पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा” असे म्हटले (रूथ 4:14–15). त्यांनी प्रार्थना केली की त्याचे नाव “इस्राएलात विख्यात व्हावे” (रूथ 4:14). त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले, ज्याचा अर्थ “सेवक” असा होतो (रूथ 4:17). 

येशू ख्रिस्ताची वंशावळ

रूथचा पुत्र ओबेद हा इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय” (रूथ 4:17). रूथच्या पुस्तकाचा समारोप  दाविदाच्या वंशावळीने होतो, यासाठी की आपले लक्ष येशू ख्रिस्ताच्या वंशावळीकडे वळावे:

“‘अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी. सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय; आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला; ‘मत्तय 1:1,5-6

येशू हा बवाज आणि ओबेदपेक्षाही महान मुक्तिदाता आणि सेवक आहे. तो दाविदापेक्षा महान राजा आहे. तो संपूर्ण जगात विख्यात आहे:

‘मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; 
तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे;
माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, 

पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन; ‘स्तोत्रसंहिता 2:7-8रूथचा विश्वास आणि तिच्या चारित्र्याचा विचार करताना, देवाच्या लोकांचा मुक्तिदाता अशा येशूवर आपण आपली दृष्टी खिळवून ठेवू या; आणि जो “सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला” (मत्तय 20:28), त्याच्याकडे पाहात असताना, विश्वासूपणात दृढ राहण्यास आपल्याला प्रेरणा मिळो.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

सारा आयविल
सारा आयविल
सारा आयविल (टीएचएम, डॅलस थियोलॉजिकल सेमिनरी) या बायबल शिक्षिका आणि कॉन्फरन्स वक्त्या आहेत, ज्या त्यांच्या पती आणि चार मुलांसह मॅथ्यूज, नॉर्थ कॅरोलिना येथे राहतात आणि ख्राईस्ट कॉव्हनंट चर्च (पीसीए) च्या सदस्य आहेत. त्या “द गॉड हू हिअर्स” आणि लुक : “दॅट यु मे हॅव सर्टिनीटी कन्सर्निंग द फेथ” यासह अनेक पुस्तके आणि बायबल अभ्यासांच्या लेखिका आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया www.sarahivill.com या संकेतस्थळाला भेट द्या.