
सफन्याच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
03/03/2026पवित्र देवाशी असलेले युद्ध आणि शांतीची स्थापना
1945 मधील तो दमट उन्हाळ्याचा दिवस मला आठवतो; मी त्या वेळी शिकागोच्या रस्त्यांवर स्टिकबॉल खेळण्यात गुंतलेलो होतो. त्या काळी माझे जग एका मॅनहोलच्या झाकणापासून दुसऱ्या झाकणापर्यंत पसरलेल्या त्या छोट्याशा पट्ट्यातच मर्यादित होते. माझ्यासाठी महत्त्वाची एकच गोष्ट होती : शेवटी फलंदाजीची माझी पाळी आली होती. पण पहिल्या चेंडूच्या क्षणीच आजूबाजूला अचानक गोंधळ आणि कोलाहल उसळला, तेव्हा मी खूप चिडलो. लोक अपार्टमेंटच्या दारांतून बाहेर धावत येऊ लागले, किंचाळू लागले, आणि लाकडी चमच्यांनी धातूच्या भांड्यांवर ताशेरे वाजवत होते. क्षणभर मला वाटले, कदाचित जगाचा अंत आला की काय. किमान माझ्या स्टिकबॉलच्या खेळाचा तरी नक्कीच अंत झाला होता. त्या गोंधळात मी पाहिले की माझी आई रडत, रडत माझ्याकडे धावत आली. तिने मला उचलून घट्ट कवटाळले, आणि हुंदके देत पुन्हा पुन्हा म्हणू लागली, “संपले. संपले. संपले!”
तो 1945 चा व्ही-जे डे होता. याचा नेमका अर्थ काय, हे मला ठाऊक नव्हते; पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती. याचा अर्थ युद्ध संपले होते आणि माझे वडील घरी परतणार होते. आता दूरच्या देशांना विमानाने पत्रे पाठवण्याची गरज नव्हती. युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांच्या बातम्या रोज रोज कानावर पडणे आता संपणार होते. खिडकीत लावलेले ताऱ्यांचे रेशमी बॅनर, डबे चिरडणे किंवा रेशन कूपन—या सर्वांची आता गरज उरली नव्हती. युद्ध संपले होते आणि शेवटी आम्हाला शांती लाभली होती.
त्या आनंदोत्सवाच्या क्षणाने माझ्या बालमनावर कायमचा ठसा उमटवला. मला कळले की शांती ही फार महत्त्वाची गोष्ट होती: ती प्रस्थापित झाली की तिच्या आनंदाला आवर उरत नाही, आणि ती हरपली की मनाला तीव्र दुःख होते. शिकागोच्या रस्त्यांवर त्या दिवशी मला असेच वाटले की ही शांती आता कायमस्वरूपी आहे. परंतु ती किती नाजूक असते, याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण फारसे दिवस गेले नाहीत, आणि गॅब्रिएल हीटरसारखे वार्ताहर चीनमधील सैन्यसंचय, रशियाकडून उभा राहिलेला अण्वस्त्रांचा धोका, आणि बर्लिनची नाकेबंदी यांविषयी गंभीर इशारे देऊ लागले, असे मला वाटू लागले. अमेरिकेची शांती अल्पकाळ टिकली; आणि लवकरच ती कोरियातील युद्धाला वाट देऊ लागली, आणि पुढे पुन्हा व्हिएतनाममध्येही युद्ध पेटले.
नाजूक. अस्थिर. क्षणभंगुर. हीच पृथ्वीवरील शांतीची नेहमीची अवस्था आहे. नियमांप्रमाणेच, शांतीचे करारसुद्धा जणू मोडले जाण्यासाठीच केले जातात, असेच वाटते. कितीही नेव्हिल चेंबरलेन बाल्कनीवर झुकून हात पुढे करून, “आपल्या काळासाठी आपण शांती साध्य केली आहे” अशी घोषणा करोत, तरी मानवी इतिहास हा सतत घडत राहणाऱ्या एका अखंड “साखळी” पलीकडे कधीच जात नाही, याची खातरी त्याने होणार नाही.
लवकरच आपल्याला हे कळून चुकते की शांतीवर फार भार टाकून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे. युद्ध अतिशय वेगाने आणि सहजपणे, आपल्या आयुष्यात घुसखोरी करते. तरीही टिकाऊ, विसंबता येईल अशी शांती मिळावी, अशी ओढ आपल्यात राहते. प्रेषित पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्रात नेमकी याच प्रकारची शांती जाहीर केली आहे.
जेव्हा देवाशी असलेले आपले पवित्र युद्ध थांबते, जेव्हा आपण ल्यूथरप्रमाणे स्वर्गाच्या द्वारांतून आत प्रवेश करतो, जेव्हा आपण विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जातो, तेव्हा हे युद्ध कायमचे संपते. पापापासून शुद्धी आणि देवाकडून पापक्षमेची घोषणा यांद्वारे आपण देवाशी सार्वकालिक अशा शांती-करारात प्रवेश करतो. आम्हाला नीतिमान ठरविले जाते त्याचे प्रथम फळ म्हणजे ‘देवाबरोबर शांती.’ ही शांती पवित्र शांती आहे, निष्कलंक आणि अलौकिक. ही अशी शांती आहे जिचा कधीही नाश होऊ शकत नाही.जेव्हा देव शांती-करारावर स्वाक्षरी करतो, तेव्हा ती सदासर्वकाळासाठी असते. युद्ध संपलेले असते, सदासर्वकाळासाठी अर्थात, आपण अजूनही पाप करतो, आपण अजूनही बंड करतो; आपण अजूनही देवाविरुद्ध वैरभावाची कृत्ये करतो. परंतु देव आता आपला शत्रू म्हणून उभा राहत नाही. तो आपल्याशी पुन्हा युद्ध करणार नाही. पित्याकडे आपला कैवारी आहे. आपला एक असा मध्यस्थ आहे जो ही शांती टिकवून ठेवतो. तो या शांतीवर प्रभुत्व करतो, कारण तो स्वतः ‘शांतीचा अधिपति’ आहे आणि तोच आपली शांती आहे.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ :तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


